Tuesday, 28 March 2017

जिवनात नेहमी आव्हाने स्विकारा : व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे


जिवनात नेहमी आव्हाने स्विकारा : व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे
       चाळीसगाव दि. 28 (उमाका वृत्तसेवा) :  जिवनात नेहमी आव्हाने स्विकारा यशस्वी झालात तर प्रतिनिधीत्व कराल आणि अपयशी झालात तर इतरांना मार्गदर्शक ठराल असे गौरवोदगार भारतीय नौसेनेचे व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांनी आज केले.
            व्हॉईस अॅडमिरल पदी बढती झाल्यानंतर चाळीसगांवकऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय महाविद्यालयात आयोजित भव्य असा नागरी सत्कार स्विकारतांना ते बोलत होते.
            यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिकुमार पाण्डे, उप विभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, कार्यक्रमाचे आयोजक शरद मोराणकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना सर्वप्रथम श्री.भोकरे म्हणाले जनरल नातुंचा मला अभिमान वाटतो. कर्तव्यावर असतांना मातृभुमीत येतांना खुप आनंद वाटतो. गेले 34 वर्ष नौदलात कर्तव्यावर असतांना कुटूंबाची साथ लाख मोलाची ठरली. जन्म भडगांव येथे झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण कासारी, बोलठाण, नागद येथे पुर्ण केल्यानंतर साताऱ्याच्या सैनिकी शाळेतून माध्यमिक शिक्षण पुर्ण केले, तर लष्करी शिक्षण पुण्याच्या राष्ट्रीय शिक्षण प्रबोधिनीत (एन.डी.ए.) घेतले. सध्या भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख ही अतिरिक्त जबाबदारी असून भारताच्या पानबुडी विभागाचे पहिले अधिकारी म्हणून कामगिरी बजावतांना भारतमातेची सेवा करण्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.
            पुढे बोलतांना श्री.भोकरे म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. लष्करी शिक्षणातील खडतर प्रशिक्षण हे शालेय जिवनातही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. देशाला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभलेला असून कच्च्या तेलासह मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतुक ही जलमार्गाने होत असते. या ठिकाणी प्रामुख्याने सागरी सुरक्षा पुरवितांना मोठी कसरत करावी लागते. खान्देशातील तरुणांमध्ये नौदलाविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे याक्षेत्रात खान्देशी तरुणांमध्ये उदासिनता दिसून येते. भविष्यात खान्देशातील तरुणांमध्ये नौदलाविषयी प्रबोधन करुन या माध्यमातून देशसेवेसाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
            शैक्षणिक जिवनातील अनुभव कथन करतांना लष्करी शिक्षणातील कठोर परिश्रमांचे अनुभवही त्यांनी उपस्थितांना यावेळी सांगितले.
            शुन्याची निर्मीती, देशाचे रक्षणासह क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी करुन यशस्वी ठसा उमटविणारे व्यक्तीमत्व जन्माला घालणाऱ्या चाळीसगांवच्या मातीचा अभिमान वाटतो असे गौरवोदगार राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी आज काढले. यशस्वी शिखर गाठल्यानंतरही जन्मभुमीची ओढ व आत्मीयता नक्कीच कौतुकास्पद असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यशाच्या शिखरावर सर करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींचा आदर्श खान्देशातील विद्यार्थी, नागरिकांसह कष्टकऱ्यांनी घेण्याचे आवाहन ना.गिरीष महाजन यांनी यावेळी केले.
            पाण्यावर साम्राज्य करणारे व्हॉईस ॲडमिरल सुनिल भोकरे तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या माध्यमातून होणारे काम प्रेरणादायी आहे. चाळीसगांवच्या भुमीतून जन्माला आलेल्या व खान्देशाचे नाव उज्वल करणाऱ्या सर्व सत्कार्थ्यांना अभिवादन करुन चाळीसगांवकरांच्या वतीने अभिनंदण आमदार उन्मेश पाटील यांनी यावेळी केले.
            यावेळी व्हॉईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांचे वडील वसंत वाणी, कार्यक्रमाचे आयोजक शरद मोराणकर, सि.सि.वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमास उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्याशी हितगुंज साधून त्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत तरूणांना प्रेरणा मिळेल, त्यांच्यावर कुठलेही दडपण न आणता त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक पालकाने प्रयत्न करण्याचे आवाहन  श्री.भोकरे यांनी यावेळी केले.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment