मतदार
जागृतीसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा
:
निवडणूक निरीक्षक स्वामी
चाळीसगांव,दिनांक 19 :- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2016 मध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी
करावी. तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम हाती
घ्यावी. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात, असे आदेश चाळीसगांव नगरपरिषदचे
निवडणूक निरीक्षक दिलीप स्वामी यांनी दिले.
नगरपरिषद निवडणूक-2016 अंतर्गत
चाळीसगांव नगरपरिषदेच्या निवडणूक कामकाजाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी
श्री.स्वामी बोलत होते. बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शरद पवार,
तहसिलदार कैलास देवरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, निवासी नायब तहसिलदार
विशाल सोनवणे, नायब तहसिलदार सुर्यवंशी, नानासाहेब आगळे यांच्यासह विविध विभागातील
अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नगरपरिषद निवडणुकीचे कामकाज योग्य दिशेने चालले असल्याचे सांगून श्री.
स्वामी म्हणाले, नगरपरिषदांच्या निवडणुकीत 70 टक्के मतदान होते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी
जनजागृती मोठ्या प्रमाणात करा. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये मेळावे, रॅली, रेल्वे स्टेशन,
बस स्टॅण्ड येथे भितीपत्रके चिकटवून व होर्डींग लावून जनजागृती करावी. या कामासाठी
मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून पैसे, मद्य तसेच
इतर वस्तूंचे वाटप करण्यात येते, त्यावर नेमणूक केलेल्या अधिकारी, कर्मचा-यांसह पोलीस
विभागाने गस्त वाढवून अशा वाटपावर अंकुश ठेवावा. प्रत्येक अधिकाऱ्याने आपली भूमिका
काय आहे हे समजावून घ्यावे. सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच उमेदवारांकडून
30 दिवसाच्या आत खर्चाचा तपशील घेवून तो योग्य आहे किंवा नाही हे तपासावे. कोणताही
अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात कुचराई करत असेल त्याच्यावर प्रशासकीय कारवाई
करा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी शरद पवार म्हणाले, सर्व पक्षांकडून तसेच उमेदवारांकडून
वेळेत खर्च घ्यावा. कोणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठलाही उमेदवार
प्रलोभन देत असेल अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियाद्वारे
कुणी अफवा पसरवत असेल अशा व्यक्तींवरही कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
* * * * * * *
*
No comments:
Post a Comment