Wednesday, 19 October 2016

पदवीधर मतदार नोंदणीकरिता विशेष मोहिमेचे आयोजन : तहसिलदार कैलास देवरे

पदवीधर मतदार नोंदणीकरिता विशेष मोहिमेचे आयोजन
                                                : तहसिलदार कैलास देवरे
             
       चाळीसगाव दि. 19 (उमाका वृत्तसेवा) :  भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर, 2016 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 ऑक्टोबर 2016 ते 5 नोव्हेंबर 2016 या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार असून या मतदार नोंदणी मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक 22 व 23 ऑक्टोंबर, 2016 या दोनही शासकीय सुटीच्या दिवशी विशेष  मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी तालुक्यातील 7 मंडळ भागाच्या ठिकाणी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तरी ज्या व्यक्तींनी दिनांक 01 नोव्हेंबर, 2013 पुर्वी पदवी प्राप्त केलेली असेल अशा पदवीधर व्यक्तींनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, चाळीसगाव, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ  यांनी शासकीय पत्रकान्वये केले आहे.
            पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज नमुना 18 तहसील कार्यालय व महसूल मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही नोंदणी करताना व्यक्ती ही भारतीय नागरीक व संबंधित मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जासोबत एक छायाचित्र, मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत, पदवी प्रमाणपत्र, अंतिम वर्षाची गुणपत्रिका, स्थानिक रहिवासी पुरावा जसे आधारकार्ड, वीजबिल, दूरध्वनी देयक, घर नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी दस्ताऐवजाच्या छायांकित प्रती स्वत: किंवा राजपत्रित अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी साक्षांकित केलेल्या असाव्यात.
या नोंदणीसाठी कार्यालयात असलेले पदवीधर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, चाळीसगाव कैलास देवरे यांनी केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment