Friday, 9 October 2015

ब्रेस कँसर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक : डॉ.निलेश चांडक


ब्रेस कँसर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक : डॉ.निलेश चांडक

चाळीसगांव, दिनांक 09 :-  ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्या विषयी मोठया प्रमाणात गैरसमज असून  ब्रेस कँसर बाबत जनजागृतीसाठी व्यापक चळवळ गरजेची असल्याचे प्रतिपादन कँसर तज्ञ डॉ.निलेश चांडक यांनी शहरातील स्व.चंदीराम बजाज हॉल सिन्धी कॉलनी चाळीसगाव येथे आरोग्य विभागामार्फत आयोजित कँसर जनजागृती कार्यशाळेत केले.

            यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंचायत समिती सभापती श्रीमती आशाताई साळुंखे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उन्मेश पाटील, उपसभापती लताताई दौंड, गट विकास अधिकारी डॉ.आर.के.मोराणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दुसाणे, महिला बालविकास अधिकारी वनिता सोनगड, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद सोनवणे, शशिकांत साळुंखे, बाजीराव दौंड, डॉ.कमलेश चव्हाण, डॉ.प्रमोद ओसवाल आदी उपस्थित होते.

            मानवाची बदलती जिवनशैली, व आरोग्याबाबत असलेल्या गैरसमजामुळे मोठया प्रमाणात आजार बळावत असतात, मानवाचा अनियमीत आहार, व्यायामाचा अभाव  व फास्ट फुड हे आजारांना पाय पसरविण्यासाठी पोषक वातावरण तयार करत असतात. तर मोठया प्रमाणात असलेल्या आरोग्याच्या गैरसमजामुळे आजाराचे अचुक निदान केले जात नाही. या सर्व कारणांमुळे आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. आज स्तनांच्या कँसरचे जवळपास दिड लाख नवीन रुग्ण दाखल होतांना दिसतात, तर दर दिवशी 200 रुग्ण हे कँसर आजारामुळे मृत्युमूखी पडतात हे भयावह आकडे नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती महत्वाची असून ग्रामीण भागात कर्तव्यास असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी गावपातळी पर्यंत जाऊन महिलावर्गाशी सुसंवाद साधावा व ब्रेस कँसरची लक्षणे, घ्यावयाची काळजी व उपचारासाठी शासकीय रुग्णालयात असलेल्या सोयी सुविधांबाबत माहिती पोहचवावी.  तसेच शासनाच्या जिवनदायी योजनेअंतर्गत या आजारांवर मोफत उपचाराची सोय असल्यामुळे संशयीत रुग्णांना तात्काळ निदान व उपचारासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन डॉ. निलेश चांडक यांनी या आरोग्य शिबीरात उपस्थित महिला वर्गाला केले. कँसरचे प्रमाण महिलांसोबत व्यसनांमुळे पुरुषांमध्येही मोठया प्रमाणात वाढले असून तंबाखु , सिगारेट, गुटखा या सारख्या तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाच्या कँसरचे प्रमाणही भयावह आहे. व्यसनमुक्तीसाठी शासनामार्फत मोठया प्रमाणात प्रचार प्रसिध्दी केली जात असूनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आवाहनही डॉ.चांडक यांनी यावेळी केले. स्तनांचा कँसर, मुखाचा कँसर, त्वचेचा कँसर, जठराचा, फुप्फुसाचा व स्वरयंत्राचा अशा विविध प्रकारच्या कँसर विषयी मार्गदर्शन करतांना कँसरची प्राथमिक लक्षणे, प्राथमिक अवस्था, निर निराळी परिक्षणे या विषयी माहिती देऊन कँसरचे पहिल्या टप्प्यात निदान व उपचार घेतल्यास रुग्णाचे 95 टक्के आयुष्य सुरक्षीत होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वर्षभरात उप जिल्हा रुग्णालयासह ट्रामा सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करणार : आमदार उन्मेश पाटील

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार उन्मेश पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, तालुक्याची आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी येत्या वर्षभरात उप जिल्हा रुग्णालयासह ट्रामा सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी म्हणाले. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेवीका व आशा वर्कर हया आरोग्य सेवांचा मुळ कणा असून त्या गावपातळीवर घराघरात जाऊन महिलांशी संवाद साधतात त्यामुळे यांचेमार्फत आरोग्या विषयी जनजागृती फलदायी ठरणार आहे. तर आमदार होण्यापुर्वी सेंद्रीय शेतीबाबत मी स्वत: मोठया प्रमाणात प्रचार केला असून सेंद्रीय शेतीमधुन मिळणाऱ्या खाद्यान्नामुळे कँसर सारख्या आजारांना फाटा देता येऊ शकतो. त्यामुळे सेंद्रीय शेतीबाबतही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

            यावेळी शशीकांत साळुंखे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना आरोग्य शिबीराचा उपक्रम स्तुत्य असुन असे उपक्रम नियमीत राबवावे, कँसर तज्ञामार्फत प्रबोधनासाठी राबविण्यात आलेले शिबीरास मिळालेला उत्तम प्रतिसाद पहाता विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांना आमंत्रीत करुन प्रबोधन करण्यात यावे असे मतही त्यांनी यावेळी मांडले. तालुक्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रमोद ओसवाल यांनी केले तर आभार डॉ.सुरेश पाटील यांनी केले. या कार्यशाळेसाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मोठया संख्येने उपस्थित होत्या.
* * * * * * * *

No comments:

Post a Comment