Wednesday, 7 October 2015

महाराजस्व अभियानामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख होणार : तहसिलदार बाबासाहेब गाढवे


महाराजस्व अभियानामुळे
महसूल प्रशासन लोकाभिमुख होणार‍!
: तहसिलदार बाबासाहेब गाढवे

              चाळीसगांव, दिनांक 07 :-  सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी नियमित संबंध येतो. शेतकरी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरीत निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान राबविण्याच्या सुचना विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या असून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण सात महसुल मुख्यालयी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्याचे आदेश तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आज आढावा बैठकीत दिले.

                     यावेळी गट विकास अधिकारी डॉ.आर.के.मोराणकर, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत, महावितरणाचे कार्यकारी अभियंता डी.के.मोहोड, लागवड अधिकारी पी.डी.खैरनार, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे,  यांच्यासह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसिलदार गाढवे म्हणाले की, महाराजस्व अभियानांतर्गत लोकाभिमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश राहणार असून गावपातळीपर्यंत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याने सर्व जनतेने यात सक्रीय सहभाग घेऊन लाभ घ्यावा.

                     दर ‍ महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी हे अभियानाचे आयोजन करतांना ज्या बुधवारी शासकीय सुटी येईल त्यांच्या दुसऱ्या दिवशी आयोजन करण्यात यावे. या अभियानाच्या आयोजनाप्रसंगी  विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी नमूद दिवशी मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी तसेच चर्चासत्र, प्रबोधनपर कार्यक्रम, तक्रारी, गाऱ्हाणी या विस्तारीत समाधान योजनेत समाविष्ठ करण्यात येणार असून याचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचविण्याच्या सुचना देखील त्यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिल्यात.

                     तालुक्यातील मेहुणबारे, शिरसगांव, तळेगांव, हातले, खुडकी बु, बहाळ व चाळीसगांव या सातही मंडळ मुख्यालयी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या योजनेच्या अंमलबजावणी व नियोजनासाठी मंडळ अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यांनी विस्तारीत समाधान योजनेचे आयोजन करणे, समन्वय साधने, प्राप्त तक्रारींचा संबंधीत विभागाशी पाठपुरावा करण्याबरोबर संबंधित विभागांशी समन्वय साधुन या योजनेचा अहवाल इतिवृत्तासह सादर करण्याचे आदेशही तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी यावेळी दिले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment