Friday, 9 October 2015

ब्रेस कँसर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक : डॉ.निलेश चांडक


ब्रेस कँसर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक : डॉ.निलेश चांडक

चाळीसगांव, दिनांक 09 :-  ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्या विषयी मोठया प्रमाणात गैरसमज असून  ब्रेस कँसर बाबत जनजागृतीसाठी व्यापक चळवळ गरजेची असल्याचे प्रतिपादन कँसर तज्ञ डॉ.निलेश चांडक यांनी शहरातील स्व.चंदीराम बजाज हॉल सिन्धी कॉलनी चाळीसगाव येथे आरोग्य विभागामार्फत आयोजित कँसर जनजागृती कार्यशाळेत केले.

            यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंचायत समिती सभापती श्रीमती आशाताई साळुंखे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उन्मेश पाटील, उपसभापती लताताई दौंड, गट विकास अधिकारी डॉ.आर.के.मोराणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दुसाणे, महिला बालविकास अधिकारी वनिता सोनगड, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद सोनवणे, शशिकांत साळुंखे, बाजीराव दौंड, डॉ.कमलेश चव्हाण, डॉ.प्रमोद ओसवाल आदी उपस्थित होते.

            मानवाची बदलती जिवनशैली, व आरोग्याबाबत असलेल्या गैरसमजामुळे मोठया प्रमाणात आजार बळावत असतात, मानवाचा अनियमीत आहार, व्यायामाचा अभाव  व फास्ट फुड हे आजारांना पाय पसरविण्यासाठी पोषक वातावरण तयार करत असतात. तर मोठया प्रमाणात असलेल्या आरोग्याच्या गैरसमजामुळे आजाराचे अचुक निदान केले जात नाही. या सर्व कारणांमुळे आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. आज स्तनांच्या कँसरचे जवळपास दिड लाख नवीन रुग्ण दाखल होतांना दिसतात, तर दर दिवशी 200 रुग्ण हे कँसर आजारामुळे मृत्युमूखी पडतात हे भयावह आकडे नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती महत्वाची असून ग्रामीण भागात कर्तव्यास असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी गावपातळी पर्यंत जाऊन महिलावर्गाशी सुसंवाद साधावा व ब्रेस कँसरची लक्षणे, घ्यावयाची काळजी व उपचारासाठी शासकीय रुग्णालयात असलेल्या सोयी सुविधांबाबत माहिती पोहचवावी.  तसेच शासनाच्या जिवनदायी योजनेअंतर्गत या आजारांवर मोफत उपचाराची सोय असल्यामुळे संशयीत रुग्णांना तात्काळ निदान व उपचारासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन डॉ. निलेश चांडक यांनी या आरोग्य शिबीरात उपस्थित महिला वर्गाला केले. कँसरचे प्रमाण महिलांसोबत व्यसनांमुळे पुरुषांमध्येही मोठया प्रमाणात वाढले असून तंबाखु , सिगारेट, गुटखा या सारख्या तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाच्या कँसरचे प्रमाणही भयावह आहे. व्यसनमुक्तीसाठी शासनामार्फत मोठया प्रमाणात प्रचार प्रसिध्दी केली जात असूनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आवाहनही डॉ.चांडक यांनी यावेळी केले. स्तनांचा कँसर, मुखाचा कँसर, त्वचेचा कँसर, जठराचा, फुप्फुसाचा व स्वरयंत्राचा अशा विविध प्रकारच्या कँसर विषयी मार्गदर्शन करतांना कँसरची प्राथमिक लक्षणे, प्राथमिक अवस्था, निर निराळी परिक्षणे या विषयी माहिती देऊन कँसरचे पहिल्या टप्प्यात निदान व उपचार घेतल्यास रुग्णाचे 95 टक्के आयुष्य सुरक्षीत होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वर्षभरात उप जिल्हा रुग्णालयासह ट्रामा सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करणार : आमदार उन्मेश पाटील

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार उन्मेश पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, तालुक्याची आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी येत्या वर्षभरात उप जिल्हा रुग्णालयासह ट्रामा सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी म्हणाले. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेवीका व आशा वर्कर हया आरोग्य सेवांचा मुळ कणा असून त्या गावपातळीवर घराघरात जाऊन महिलांशी संवाद साधतात त्यामुळे यांचेमार्फत आरोग्या विषयी जनजागृती फलदायी ठरणार आहे. तर आमदार होण्यापुर्वी सेंद्रीय शेतीबाबत मी स्वत: मोठया प्रमाणात प्रचार केला असून सेंद्रीय शेतीमधुन मिळणाऱ्या खाद्यान्नामुळे कँसर सारख्या आजारांना फाटा देता येऊ शकतो. त्यामुळे सेंद्रीय शेतीबाबतही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

            यावेळी शशीकांत साळुंखे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना आरोग्य शिबीराचा उपक्रम स्तुत्य असुन असे उपक्रम नियमीत राबवावे, कँसर तज्ञामार्फत प्रबोधनासाठी राबविण्यात आलेले शिबीरास मिळालेला उत्तम प्रतिसाद पहाता विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांना आमंत्रीत करुन प्रबोधन करण्यात यावे असे मतही त्यांनी यावेळी मांडले. तालुक्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रमोद ओसवाल यांनी केले तर आभार डॉ.सुरेश पाटील यांनी केले. या कार्यशाळेसाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मोठया संख्येने उपस्थित होत्या.
* * * * * * * *

Wednesday, 7 October 2015

महाराजस्व अभियानामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख होणार : तहसिलदार बाबासाहेब गाढवे


महाराजस्व अभियानामुळे
महसूल प्रशासन लोकाभिमुख होणार‍!
: तहसिलदार बाबासाहेब गाढवे

              चाळीसगांव, दिनांक 07 :-  सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी नियमित संबंध येतो. शेतकरी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरीत निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान राबविण्याच्या सुचना विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या असून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण सात महसुल मुख्यालयी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्याचे आदेश तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आज आढावा बैठकीत दिले.

                     यावेळी गट विकास अधिकारी डॉ.आर.के.मोराणकर, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत, महावितरणाचे कार्यकारी अभियंता डी.के.मोहोड, लागवड अधिकारी पी.डी.खैरनार, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे,  यांच्यासह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसिलदार गाढवे म्हणाले की, महाराजस्व अभियानांतर्गत लोकाभिमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश राहणार असून गावपातळीपर्यंत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याने सर्व जनतेने यात सक्रीय सहभाग घेऊन लाभ घ्यावा.

                     दर ‍ महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी हे अभियानाचे आयोजन करतांना ज्या बुधवारी शासकीय सुटी येईल त्यांच्या दुसऱ्या दिवशी आयोजन करण्यात यावे. या अभियानाच्या आयोजनाप्रसंगी  विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी नमूद दिवशी मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी तसेच चर्चासत्र, प्रबोधनपर कार्यक्रम, तक्रारी, गाऱ्हाणी या विस्तारीत समाधान योजनेत समाविष्ठ करण्यात येणार असून याचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचविण्याच्या सुचना देखील त्यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिल्यात.

                     तालुक्यातील मेहुणबारे, शिरसगांव, तळेगांव, हातले, खुडकी बु, बहाळ व चाळीसगांव या सातही मंडळ मुख्यालयी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या योजनेच्या अंमलबजावणी व नियोजनासाठी मंडळ अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यांनी विस्तारीत समाधान योजनेचे आयोजन करणे, समन्वय साधने, प्राप्त तक्रारींचा संबंधीत विभागाशी पाठपुरावा करण्याबरोबर संबंधित विभागांशी समन्वय साधुन या योजनेचा अहवाल इतिवृत्तासह सादर करण्याचे आदेशही तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी यावेळी दिले.

* * * * * * * *

कुष्ठरोग जनजागरण मोहिमेचा लाभ घ्यावा : डॉ.प्रमोद सोनवणे


कुष्ठरोग जनजागरण मोहिमेचा लाभ घ्यावा : डॉ.प्रमोद सोनवणे
 
चाळीसगांव, दिनांक 07 :-  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगुडे    सहाय्यक संचालक (आरोग्य) जळगाव डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यात दिनांक ३ ते १७ ऑक्टोंबर २०१५ या कालावधीत कृष्ठरोग जनजागरण मोहिम राबविली जात आहे, या ‍ मोहिमेचा शुभारंभ दि.२ ऑक्टोंबर,२०१५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपन्न झाला. या अभियानात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, निबंधस्पर्धा  व कुष्ठरोगाबाबत प्रश्नमंजुशा तसेच समाजातील लोक प्रतिनिधी व मान्यवरांना कुष्ठरोगाबाबत माहिती देवून त्यांच्या सहकार्याने या कुष्ठरोगाबाबत समाजात असलेला गैरसमज दुर करण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे प्रचार करणे, रोग निदान शिबीरांचे आयोजन करणे इत्यादी कार्यक्रमाद्वारे जनजागरण मोहिम राबविणार असल्याने तालुक्यातील सर्व संबंधितांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी केले आहे.

            या  मोहिमेदरम्यान आज दिनांक ०७ ऑक्टोंबर, २०१५ रोजी तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील ३५ वर्षीय महिला उपचारासाठी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आल्या असता येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे, कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ.हमीद पठाण यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली, तर रुग्णास कुष्ठरोग सांसर्गिक असल्याचा संशय आल्याने तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. तालुक्यातुन कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्याचा मानस असल्याने तालुक्यातील सर्व संबंधित नागरिकांनी आरोग्य केंद्रात व आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात जाऊन तपासणी व उपचार करुन घ्यावेत व कुष्ठरोग जनजागरण मोहिम यशस्वी करावी असे आवाहनही डॉ.सोनवणे यांनी केले आहे.

* * * * * * * *

चाळीसगाव येथे 9 ऑक्टोंबरला
कँसर निदान कार्यशाळेचे आयोजन

चाळीसगांव, दिनांक 07 :- स्व.चंदीराम बजाज हॉल सिन्धी कॉलनी स्टेशन रोड, चाळीसगाव येथे शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर २०१५ रोजी कँसर तज्ञ डॉ.निलेश चांडक, जळगांव हे कँसर निदान जनजागृती कार्यक्रमास मार्गदर्शन करणार आहेत. सदर कँसर निदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगावचे आमदार श्री.उन्मेश पाटील यांना निमंत्रीत करण्यात आले असून कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सौ.आशालता साळुंखे, उप सभापती लताताई दौंड  तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती  सदस्य यांचेसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शामसुंदर  निमगडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जे.जे.मोरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

           तरी चाळीसगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांनी द्वीतीय वैदयकीय अधिकायांवर ओ.पी.डी. ची जबाबदारी सोपवून आपल्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेवीका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, आरोग्य  सेविका व सहाय्यकांना  शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर २०१५ रोजी  सकाळी  ०९:०० वाजता  उपस्थित राहण्याच्या सुचना देवून आपणही स्वत: वेळेवर उपस्थित रहाण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव यांनी एका  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

* * * * * * * *

Monday, 5 October 2015

राष्ट्रीय सामाजिक कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत 98 लाभार्थ्यांना धनादेश वाटप



राष्ट्रीय सामाजिक कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत
98 लाभार्थ्यांना धनादेश वाटप
 
              चाळीसगांव, दिनांक 05 :- दारिद्रय रेषेखालील कुटूंबाचा कमविता व्यक्ती गमावलेल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी केंद्र शासनाची राष्ट्रीय सामाजिक कुटूंब अर्थसहाय्य योजना कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत चाळीसगांव तालुक्यातील एकूण 98 लाभार्थ्यांच्या वारसांना आज तहसिल कार्यालयात उमंग समाज शिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती संपदा उन्मेश पाटील यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नितीन पाटील,हिराशेठ बजाज, निलेश राजपूत, प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, संगायो नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, आदी उपस्थित होते.

                     शहरासह तालुक्यातील एकूण 98 लाभार्थ्याना एकूण 19 लाख 20 हजार इतक्या रकमेचे धनादेश वाटप करतांना मनस्वी आनंद होत असून कुटूंब प्रमुख गमावलेल्या कुटूंबाला अर्थसहाय्य देऊन आधार देण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे यावेळी उमंग समाज शिल्पी महिला ‍ परिवाराच्या संस्थापिका तथा आमदार उन्मेश पाटील यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती संपदा पाटील यावेळी म्हणाल्या.

                     यावेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी राष्ट्रीय सामाजिक कुटूंब अर्थसहाय्य योजनेबद्दल माहिती देतांना  सांगितले की, दारिद्र रेषेखालील कुटूंब प्रमुखाचा अपघाती अथवा ‍ नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटूंबाला आधार देण्यासाठी ही अर्थसहाय्य योजना कार्यरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा कुटूंबातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यू दिनांकापासून एक वर्षाच्या आत विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या योजनेकरिता दारिद्र रेषेखालील कुटूंबातील कुटूंब प्रमुखाच्या मृत्यू दिनांकास सदर मयत व्यक्तीचे वय 18 ते 59 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अशा पात्र लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील मुळ अर्ज, दारिद्र रेषेखालील यादीत नाव समाविष्ठ असल्याचा पुरावा व मयत दाखला सादर करणे आवश्यक आहे. अशा पात्र लाभार्थ्यांच्या कुटूंबातील वारसांना रु. 20 हजार इतक्या रकमेचे अर्थसहाय्य देण्यात येते.

* * * * * * * *

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
 
              चाळीसगांव, दिनांक 05 :- भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी 1 जानेवारी 2016 याअर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
                     या कार्यक्रमांतर्गत दिनांक 8 ऑक्टोंबर 2015 (गुरूवार) ते 7 नोव्हेंबर 2015 (शनिवार) या कालावधीत नवीन नोंदणी फॉर्म क्र.6, नांव नोंदणी वगळणी फॉर्म क्रमांक 7, तपशील दुरूस्ती फॉर्म क्र.8, नांव स्थलांतर फॉर्म क्र.8-अ स्वीकारण्यात येणार असून सदरचे फॉर्म आपल्या यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करावे या कार्यक्रमांतर्गत दिनांक 11 ऑक्टोंबर व 18‍ ऑक्टोंबर 2015 या दिवशी  विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
                     तरी सर्व नवमतदारांनी या कार्यक्रमाची नोंद घ्यावी असे आवाहन चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी श्री.मनोज घोडे पाटील व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी यांनी संयुक्तपणे केले आहे.

 * * * * * * * *

पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षणाचे आयोजन
लाभ घेण्याचे सहसंचालक कोषागारे बाळासाहेब घोरपडेंचे आवाहन

        चाळीसगांव, दिनांक 05 :- दैनंदिन शासकीय कामकाज, विशेषत: प्रशासकीय कामे व लेखाविषयक कामे करणाऱ्या पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना शासकीय नियम व पध्दतीची सविस्तर माहिती, विविध अधिनियम व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे कामाचा निपटारा त्वरित व योग्य प्रकारे तर होतोच शिवाय वरिष्ठांना कामाचे निर्णय घेणे सुलभ होते. कर्मचाऱ्यास लेखानियमांचे ज्ञान होऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी या दृष्टीने वित्त व लेखा सेवा नियमासंबंधी नियमित  प्रशिक्षणवर्ग  वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था नाशिक येथे ‍ प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत असतात त्या अनुषंगाने 13 व्या सत्राचे प्रशिक्षण वर्ग हे 20 ऑक्टोंबर, 2015 ते 7 जानेवारी, 2016 या 60 दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षण वर्गासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी तसेच महाराष्ट्र लेखा लिपीक यांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. यासाठी विवरणपत्र क्रमांक 1 व त्यासोबत आवेदन पत्र (अ) मध्ये पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती कार्यालय प्रमुखांच्या शिफारशीसह पाठविण्याचे आवाहन लेखा व  कोषागारे  नाशिक विभागाचे सहसंचालक बाळासाहेब घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 * * * * * * * *