Thursday, 26 February 2015

धरणातील गाळ हेच शेतीसाठी योग्य नैसर्गिक खत ! मन्याड धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा :आमदार उन्मेश पाटील


धरणातील गाळ हेच शेतीसाठी योग्य नैसर्गिक खत !
मन्याड धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा
:आमदार उन्मेश पाटील

चाळीसगांव, दिनांक 26 :-  राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर-2014 साली मांडलेली संकल्पना सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र -2019 या संकल्पनेतुन जलयुक्त शिवार अभियान राज्यात मोठया प्रमाणावर सुरु आहे. पिंपळवाड शिवारातील मन्याड धरणातील लोकसहभागातून पात्रातील 1 ते 1.5 चौरस कि.मी. परिसरातील सुमारे 50 हजार ब्रास इतका गाळ येत्या काही महिन्यात काढण्यात येऊन तो परिसर लवकरच पाण्याने व्याप्त होईल. यामुळे या परिसरातील हे अभियान केवळ जिल्हयातच नव्हे तर नाशिक विभागात एक आदर्श ठरेल असा विश्वास आमदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त करुन शेतीला रासायनिक खतांची नव्हे तर नदीपात्रातील गाळासारख्या जैविक खतांची खरी गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
                     तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ शिवारातील नदीपात्रातील लोकसहभागातुन गाळ उपसा मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पिंपळवाड चे सरपंच शिरीष जगताप, जलसंपदाचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील, जलसंपदाचे शाखा अभियंता जे.डब्ल्यु. सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील, कृषी अधिकारी ए.जे.येवले,  मंडळ अधिकारी राठोड, ग्रामसेवक चंद्रकांत गढरे, तलाठी डि.डि.अहिरे, नरेश जैन, भरत गोरे, कैलास गावडे आदि मान्यवर उपस्थित होते. 
                     यावेळी आमदार उन्मेश पाटील म्हणाले की, नविन प्रकल्प सुरु करावयाचा झाल्यास अनेक विभागांच्या तांत्रीक मान्यता, अनुदान शिवाय वेळ जातो म्हणून लोकसहभागातून स्वयंस्फुर्तीने अभियान राबविल्यास पैसा, वेळ वाचुन जनमान्य असे अभियान नक्कीच स्वागतार्ह आहे. लोकसहभागाला जोड म्हणून लोकप्रतिनीधी या नात्याने मी शासनस्तरावरुन तांत्रीक विभागाकडून काही अत्याधुनिक यंत्र सामुग्री मिळविण्यासाठी  सैदव प्रयत्नशिल असून जलयुक्त शिवार अभियानाच्या दृष्टीने नागरिकांच्या सुचना व संकल्पनांचे नेहमी स्वागतच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
                     उप विभागीय अधिकारी  मनोज घोडे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, राज्याच्या स्थापनेच्यावेळी राज्याची सिंचन क्षमता 5 टक्के एवढी होती. त्यात वाढ होऊन आताही ती केवळ 18 टक्के एवढीच आहे, आणि ही बाब समाधानकारक नसुन लोकसहभागातुन असे अभियान राबविल्यास सिंचन क्षमतेत वाढ होऊन परिसर टंचाईमुक्त होण्यास नक्कीच मदत होईल असे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी लोकसहभागातून गावक-यांनी स्वयंस्फुर्तीने सुरु केलेल्या या अभियानास शुभेच्छा देऊन हा परिसर मार्च-2016 पर्यंत जलमय होईल असा विश्वास व्यक्त केला.
                     अभियानातंर्गत गाळ काढण्याकामी हिरापुरचे संदीप पाटील यांनी त्यांच्या मालकीचे दोन जे.सी.बी. उपलब्ध करुन दिलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पिंपळवाड निकुंभ चे सरपंच शिरीष जगताप, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवकांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील यांनी मानले

* * * * * * * *

No comments:

Post a Comment