Saturday, 31 January 2015

कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेस जनतेने सहकार्य करावे !

कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेस जनतेने सहकार्य करावे !
वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुलभा साळुंखे यांचे आवाहन

चाळीसगांव,दिनांक 31:- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत तालुक्यात कुष्ठरोग निर्मुलनासाठी दिनांक 9 फेब्रुवारी, 2015 ते 21 फेब्रुवारी, 2015 या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरोघरी माहिती देऊन सर्व्हेक्षण करणार आहेत तरी या मोहिमेस तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ.सुलभा साळुंखे यांनी केले. महात्मा गांधीच्या पुण्यतिथी निमीत्त ग्रामिण रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
                     सर्व शहरी व ग्रामीण भागात खास कुष्ठरोग दुरिकरण मोहिम हाती घेण्यात आली असून आरोग्य सेवक आपल्या घरी आल्यानंतर स्त्री-पुरुषांनी आपली स्वत:ची व मुलाबाळांची तपासणी करुन घ्यावी जर शरीरावर चट्टा असल्यास त्यांच्याकडे नोंद करुन ग्रामीण रुग्णालय तसेच नगरपालिका रुग्णालयात चट्टयाची तपासणी वैद्यकिय अधि कारी मार्फत करुन उपचार घ्यावा. कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यास ह्या मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन डॉ.साळुंखे यांनी केले आहे.
                     यावेळी डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी कुष्ठरोगाविषयी माहिती देतांना सांगितले की, कुष्ठरोग हा इतर रोगांप्रमाणे एक रोग असून कुष्ठरोग हा त्वचा मज्जातंतूचा रोग आहे तर हा रोग केवळ मानव जातीलाच होता, प्रथम अवस्थेत उपचार केल्यास कुष्ठरोग लवकर व विकृती न येता लवकर बरा होतो, या रोगाचे सर्वच रोगी सांसर्गीक नसून केवळ 15 ते 20 टक्के रोगीच सांसर्गीक असतात. कुष्ठरोग्याशी ‍ घनिष्ठ व दिर्घकाळ सहवास घडल्यास होवू शकतो, परंतू ही गोष्ट शरिरातील रोग प्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे. तरी नागरिकांनी खालील कुष्ठरोगाची सुचक लक्षणे दिसताच ग्रामीण रुग्णालय अथवा नगरपालिका रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. (1) न खाजणारा न दुखणारा चट्टा (2) फिक्कट  रंगाचा किंवा लालसर रंगाचा चट्टा (3) त्वचेवर पसरलेली लाली, चट्टयावरील बधीरपणा (4) चट्टयावरील केस विरळ होणे वा गळणे (5) हातापायास वरचेवर मुंग्या येतात, मज्जातंतू जाड होतात व दुखतात (6) त्वचेवर लाली पसरल्यामुळे त्वचा लालसर, तांबूस होणे (7) त्वचा तेलकट, मऊ व चमकदार दिसते, अकस्मात ताप येणे (8) भुवया विरळ होतात, कानाच्या पाळी सुजतात व जाड होतात (9) चेहरा किंवा हातापायावर लहान गाठी येतात (10) हात, पाय, मज्जातंतू व सांधे दुखणे, सुजणे (11) चेहऱ्यावर अकस्मात गाठी उभारुन येणे  या सारखी सुचक लक्षण आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन उपचार घ्यावा असेही डॉ.बावीस्कर यांनी यावेळी सांगीतले.
* * * * * * * *
दहिवद येथील मोबाईल टॉवर
महसूल प्रशासनाने केले सिलबंद

चाळीसगांव,दिनांक 31:- दहिवद येथील मोबाईल टॉवरच्या थकीत बिनशेतसारा तसेच अंतर्गत लेखा आक्षेपांची रक्कम 50 हजार थकविल्यामुळे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी बी.आर.सोनवणे, तलाठी ‍डि.एल.येडे,‍ व्हि.के.मेन यांनी मोबाईल टॉवर सिल करण्याची कारवाई केली आहे तर तालुक्यातील उंबरखेडे, मेहुणबारे सह इतर ठिकाणच्या मोबाईल टॉवरच्या थकीत रकमाचा त्वरीत भरणा करुन होणारी कारवाई टाळावी असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment