Saturday, 31 January 2015

कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेस जनतेने सहकार्य करावे !

कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेस जनतेने सहकार्य करावे !
वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुलभा साळुंखे यांचे आवाहन

चाळीसगांव,दिनांक 31:- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत तालुक्यात कुष्ठरोग निर्मुलनासाठी दिनांक 9 फेब्रुवारी, 2015 ते 21 फेब्रुवारी, 2015 या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरोघरी माहिती देऊन सर्व्हेक्षण करणार आहेत तरी या मोहिमेस तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ.सुलभा साळुंखे यांनी केले. महात्मा गांधीच्या पुण्यतिथी निमीत्त ग्रामिण रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
                     सर्व शहरी व ग्रामीण भागात खास कुष्ठरोग दुरिकरण मोहिम हाती घेण्यात आली असून आरोग्य सेवक आपल्या घरी आल्यानंतर स्त्री-पुरुषांनी आपली स्वत:ची व मुलाबाळांची तपासणी करुन घ्यावी जर शरीरावर चट्टा असल्यास त्यांच्याकडे नोंद करुन ग्रामीण रुग्णालय तसेच नगरपालिका रुग्णालयात चट्टयाची तपासणी वैद्यकिय अधि कारी मार्फत करुन उपचार घ्यावा. कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यास ह्या मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन डॉ.साळुंखे यांनी केले आहे.
                     यावेळी डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी कुष्ठरोगाविषयी माहिती देतांना सांगितले की, कुष्ठरोग हा इतर रोगांप्रमाणे एक रोग असून कुष्ठरोग हा त्वचा मज्जातंतूचा रोग आहे तर हा रोग केवळ मानव जातीलाच होता, प्रथम अवस्थेत उपचार केल्यास कुष्ठरोग लवकर व विकृती न येता लवकर बरा होतो, या रोगाचे सर्वच रोगी सांसर्गीक नसून केवळ 15 ते 20 टक्के रोगीच सांसर्गीक असतात. कुष्ठरोग्याशी ‍ घनिष्ठ व दिर्घकाळ सहवास घडल्यास होवू शकतो, परंतू ही गोष्ट शरिरातील रोग प्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे. तरी नागरिकांनी खालील कुष्ठरोगाची सुचक लक्षणे दिसताच ग्रामीण रुग्णालय अथवा नगरपालिका रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. (1) न खाजणारा न दुखणारा चट्टा (2) फिक्कट  रंगाचा किंवा लालसर रंगाचा चट्टा (3) त्वचेवर पसरलेली लाली, चट्टयावरील बधीरपणा (4) चट्टयावरील केस विरळ होणे वा गळणे (5) हातापायास वरचेवर मुंग्या येतात, मज्जातंतू जाड होतात व दुखतात (6) त्वचेवर लाली पसरल्यामुळे त्वचा लालसर, तांबूस होणे (7) त्वचा तेलकट, मऊ व चमकदार दिसते, अकस्मात ताप येणे (8) भुवया विरळ होतात, कानाच्या पाळी सुजतात व जाड होतात (9) चेहरा किंवा हातापायावर लहान गाठी येतात (10) हात, पाय, मज्जातंतू व सांधे दुखणे, सुजणे (11) चेहऱ्यावर अकस्मात गाठी उभारुन येणे  या सारखी सुचक लक्षण आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन उपचार घ्यावा असेही डॉ.बावीस्कर यांनी यावेळी सांगीतले.
* * * * * * * *
दहिवद येथील मोबाईल टॉवर
महसूल प्रशासनाने केले सिलबंद

चाळीसगांव,दिनांक 31:- दहिवद येथील मोबाईल टॉवरच्या थकीत बिनशेतसारा तसेच अंतर्गत लेखा आक्षेपांची रक्कम 50 हजार थकविल्यामुळे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी बी.आर.सोनवणे, तलाठी ‍डि.एल.येडे,‍ व्हि.के.मेन यांनी मोबाईल टॉवर सिल करण्याची कारवाई केली आहे तर तालुक्यातील उंबरखेडे, मेहुणबारे सह इतर ठिकाणच्या मोबाईल टॉवरच्या थकीत रकमाचा त्वरीत भरणा करुन होणारी कारवाई टाळावी असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

Thursday, 29 January 2015

महसुल वसुलीसाठी सर्वांनी प्रयत्न करावा:प्रांताधिकारी गणेश मिसाळ


महसुल वसुलीसाठी सर्वांनी प्रयत्न करावा !
                                : प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगांव,दिनांक 29:- आर्थिक वर्ष सन 2014-2015 हे 31 मार्च 2015 अखेर पुर्ण होत असून पाचोरा व भडगाव या विभागातील महसुल वसुलीचे एकूण उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशा सुचना प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी आज महसुल प्रशासनाच्या आढावा बैठकीत दिल्या. तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीस  पाचोरा तहसिलदार गणेश मरकड, भडगाव तहसिलदार बि.ए.कापसे, नायब तहसिलदार आबा महाजन, राजेंद्र नजन, सोना मगर, मुकेश हिवाळे, अमित भोईटे यांच्यासह पाचोरा व भडगाव येथील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
                     महसुल वसुली बाबतच्या आढावा बैठकीत पाचोरा, भडगाव विभागास एकूण 8 कोटी 9 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले असून यापैकी केवळ 3 कोटी 97 लाख इतकीच वसुली झालेली आहे.  एकूण उद्दिष्टाच्या केवळ 49 टक्के वसुलीचे काम झाल्याने प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी तिव्र नाराजी व्यक्त करत तहसिलदार पाचोरा व भडगांव यांनी प्रत्येक आठवडयातुन एकदा वसुली संदर्भात मंडळअधीका-यांसह तलाठयांच्या बैठका घेण्याच्या सुचना केल्या. वसुली मध्ये बिनशेती वरील महसूल, नगर परिषदेकडील वसुल,अनधिकृतरित्या बिनशेती वापर करणा-यांकडील दंड व महसूल, गौण खनिज वरील कारवाया, अवैध वाळु वाहतुक, मोबाईल टॉवरची वसुली, विटाभट्टी चालकांकडील वसुली, स्टोन क्रेशर मालकांकडील ताळेबंद व त्याप्रमाणे वसुली, एम.एस.ई.बी. तसेच बि.एस.एन.एल. या सरकारी संस्थांकडील वसुली यावर गांभिर्याने लक्ष केंद्रीत करुन महसुल वसुली सक्तीने करावयाच्या सुचना दिल्या. त्याचप्रमाणे शासकीय कामांवर वापर होणारे गौणखनिज यावरील रकमांचे समायोजन करण्याच्या सुचना देखील ‍दिल्या तर प्रत्येक तलाठयाने आपल्याकडे असलेल्या गावातील महसूल वसुली ही फेब्रुवारी-2015 अखेर शंभर टक्के पुर्ण करण्याच्या सुचना देऊन वसुली कामात हयगय करणा-या कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशा सुचनाही या बैठकीत उपस्थितांना दिल्या.
                     यावेळी तहसिलदार गणेश मरकड यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, महालेखापाल कार्यालय, मुंबई तथा नागपुर यांनी शक उपस्थित केलेली वसुली प्राधान्याने करावयाच्या सुचना करुन केबल जोडणी, चित्रपटगृह चालक यांच्याकडुन मिळणारा महसुलाबाबत संबंधित करमणूक कर निरीक्षकांनी सक्ती करुन वसुली करावी तसेच ज्यामधून नजराणा प्राप्त होतो अशी जमीन खरेदी विक्री प्रकरणे,  त्याच प्रमाणे ब सत्ता प्रकार भुखंड  खरेदी विक्री प्रकरणे ही त्वरेने निकाली काढण्याच्या सुचना देण्यात आल्या.
                     तहसिलदार भडगाव बि.ए.कापसे यांनी यावेळी उपस्थितांना सुचना करतांना सांगितले की, महसुल वसुलीवर संपुर्ण लक्ष केंद्रीत करुन फेब्रुवारी-2015 अखेर पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करावे जेणे करुन शासनाच्या लोकाभिमुख योजना व कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल करिता सर्वांनी जोमाने कामाला लागावे व वसुली मोहिम सफल करावी असे आवाहनही यावेळी केले.

* * * * * * * *

Monday, 26 January 2015

पोलीस परेड मैदानावर प्रांताधिका-यांचे हस्ते ध्वजारोहण


पोलीस परेड मैदानावर प्रांताधिका-यांचे हस्ते ध्वजारोहण
चाळीसगांव,दिनांक 26:- पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते सकाळी 09:15 वाजता संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, सभापती आशालता साळुंखे, उपभापती लता दौंड, माजी आमदार राजीव देशमुख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, उदेसिंग पवार, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी मालती जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
                     याप्रसंगी पोलीस प्रशासन व होमगार्ड यांनी पथसंचलन करुन ध्वजास मानवंदना दिली. तर जयहिंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. यावेळी काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनो-यांचे सादरीकरण केले. यानंतर प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
पंचायत‍ समिती चाळीसगाव येथे सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण
पंचायत ‍ समिती चाळीसगाव येथे 26 जानेवारी, 2015 रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त सकाळी 07:00 वाजता सभापती सौ.आशालता साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. याप्रसंगी उप सभापती सौ.लताताई दौड, पं.स.सदस्य सतिष पाटे, जनन्नाथ महाजन, सुवर्णा मांडोळे, माजी सभापती विजय जाधव, गटविकास अधिकारी मालती जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश नरवाडे, उप विभागीय अभियंता एम.आर.पाटील, प्रभारी गट  शिक्षणाधिकारी एस.पी.विभांडीक यांच्यासह ‍जिल्हा परिषद तथा पंचायत  समिती सदस्य, पंचायत ‍समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ या चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात आली. तर सभापती सौ.आशालता साळुंखे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांच्या हस्ते शिवाजी घाट येथे ध्वजारोहण संपन्न
चाळीसगाव शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमीत्त  शिवाजी घाट येथे सकाळी 08:20 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, नगरसेवक पद्मजा देशमुख, शोभा जाधव, शाम देशमुख, संजय घोडे, संजय अग्रवाल, हाजी गफ्फुर, प्रभाकर चौधरी, शेखर बजाज, पंडीत चौधरी, राजेंद्र चौधरी, सुरेश चौधरी, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, प्रशासन अधिकारी खरात, सि.एम.खडके, राजू पाटील, दिनेश जाधव, संजय अहिरे, संजय गोयर यांच्यासह नगरसेवक, नगर परिषदेचे पदाधिकारी, जेष्ठ व प्रतिष्ठीत नागरिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

Sunday, 25 January 2015

नव मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा:आमदार उन्मेश पाटील


नव मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा !
:आमदार उन्मेश पाटील
          चाळीसगांव,दिनांक 25:- लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत निर्भयमुक्त वातावरणात पार पडणा-या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण असे महत्व आहे. एकीकडे आपल्या आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यांची एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान बाळगून प्रत्येक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत आपला सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन आमदार उन्मेश पाटील यांनी तहसिल कार्यालयातील सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात केले.
                     यावेळी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पंचायत समिती सदस्य सतिष पाटे, नरेंद्र जैन, प्रभाकर चौधरी, राजेंद्र चौधरी, शरद पाटील आदी उपस्थित होते.
                     यावेळी प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी 017-चाळीसगाव मतदार संघातील दिनांक 21 जानेवारी, 2015 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीनुसार एकूण मतदार 321250 असून पैकी 171987 इतके पुरुष मतदार तर 149263 इतके स्त्री मतदार असल्याची माहिती दिली. या मतदारांपैकी एकूण 311394 इतके मतदार ओळखपत्रधारक असल्याचे सांगूण ते म्हणाले की, आपले मत हा आपला हक्क व अधिकार आहे. या बाबतीत जागरूक राहून मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावे. मतदानाचा मुलभूत अधिकार बजवावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासिनता मनातून काढून टाकावी, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले असून त्याचे पाचवे वर्ष आज साजरा करतांना मनस्वी आनंद होत आहे या दिवसाचे महत्व व आपला मौल्यवान मताधिकार ओळखून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.
                     यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले  उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी उपस्थित मतदार व नवमतदारांना निवडणूकांचे पावित्र्य व निर्भयपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली. आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळख पत्राचे वाटप करण्यात आले तर आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, निवडणूक शाखेतील कैलास सैंदाणे यांच्यासह तालुक्यातील सर्व  बीएलओ, नवमतदार, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

* * * * * * * *

26 जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन कृती आराखडयासह ठराव करण्याचे सभापतींचे आवाहन

26 जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन
कृती आराखडयासह ठराव करण्याचे सभापतींचे आवाहन

चाळीसगांव,दिनांक 25:-  तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी 26 जानेवारी, 2015 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्याच्या सुचना केल्या आहेत. या ग्रामसभेमध्ये विविध शासनाच्या योजनाबाबत प्रमुख विषय घेऊन या विषयांचा कृती आराखडा मंजूर करुन तसा ठराव घेणे व त्या ठरावाची इतिवृत्तात नोंद घेण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती सौ.आशालता साळुंखे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
ग्रामसभेला असलेल्या अधिकाराचा पुरेपुर वापर केल्यास गावातील समस्या, अडचणी, तंटे, शासकीय योजना याबाबत एकत्रित बसून ठराव केल्यास गावातील प्रश्न गावातच सोडविले जाऊ शकतात, महात्मा गांधी  ग्रामीण हमी रोजगार योजना, जयलयुक्त शिवार अभियान, बेटी बचाव अभियान या सारख्या शासनाच्या विविध योजनांच्या एप्रिल-2014 ते आजतागायत निर्गमीत झालेल्या शासन निर्णय व योजनांचे ‍ परिपत्रकांचे वाचन ग्रामसभेमध्ये करावे, जेणेकरुन ग्रामपातळी वरील सर्व नागरिकांना या बाबत सखोल ज्ञान मिळेल व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचण्यास मदत होईल. तरी सर्व ग्रामपंचायतींच्या पदाधिका-यांसह ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभागी होण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती सौ.अशालता साळुंखे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
प्रजासत्ताक दिनाचा 65 वा वर्धापनदिनी उपस्थित रहावे
सहा.गटविकास अधिकारी सुरेश नरवाडे यांचे आवाहन

चाळीसगांव,दिनांक 25:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2015 रोजी सकाळी 7:00 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ पंचायत समिती सभापती सौ.आशालता साळुंखे यांच्या हस्ते पंचायत समिती आवार, चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास तालुक्यातील अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश नरवाडे यांनी केले आहे. पंचायत समितीतंर्गत येणाऱ्या जि.प.बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, सिंचन विभाग, तालुका वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्पासह पंचायत समिती अंतर्गत येणा-या सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, अनुपस्थित राहणा-या अधिकारी कर्मचा-या विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही करण्यात येईल असेही सहाय्यक गट विकास अधिकारी नरवाडे यांनी कळविले आहे.


* * * * * * * *

Friday, 23 January 2015

सुमित भोसले हद्दपार : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

सुमित भोसले हद्दपार : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील
          चाळीसगांव,दिनांक 23:- स्वाती समर्थ नगर नागद रोड, चाळीसगाव येथील रहिवासी ‍ सुमित अशोकराव भोसले याला मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(ब) नुसार उप विभागीय दंडाधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांच्याकडील सुनावणीनुसार भोसले याचेवर असलेले आरोप,‍ खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण अशा विविध गुन्हयांचा समावेश असून गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जनतेस धोका निर्माण झाल्याने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने उप विभागीय दंडाधिकारी, चाळीसगाव यांनी पुढील एक वर्षाकरिता जळगाव, धुळे, नाशिक, औरंगाबाद या चार जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. भोसले याला हद्दपारीनंतर पोलीसांमार्फत अहमदनगर येथे सोडण्यात आले.
                     सुमित भोसले याला पुढील एक वर्षाच्या कालावधीत उप विभागीय दंडाधिकारी चाळीसगाव यांच्या अथवा शासनाच्या लेखी परवानगी शिवाय जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश करता येणार नाही. तसेच त्याचा उपरोक्त चारही जिल्हयाव्यतिरीक्त राज्यात कोठेही रहिवास करणार असेल तर त्या रहिवास नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातुन एकदा हजेरी देणे बंधनकारक असेल शिवाय भोसले हा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाणार असल्यास राज्याबाहेर गेल्यापासून दहा दिवसांचे आत त्याने त्याच्या जाणेबाबत नजीकच्या पोलीस स्टेशन प्रभारी यांना कळविणे बंधनकारक असेल व राज्याबाहेरून परत आल्यावरही या बाबत त्याने नजीकच्या पोलीस स्टेशन प्रभारी यांना कळविणे बंधनकारक असल्याचे प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस
           चाळीसगांव,दिनांक 23:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याच्या सुचना असल्याने 25 जानेवारी रोजी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांनी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना मतदान कार्डाचे वाटप, मतदान कार्डासोबत Proud to be a Voter, Ready to Vote असा ‍बिल्ला देऊन नवमतदारांना मतदाना विषयी माहिती द्यावी अशा सुचना सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केल्या आहेत. 
            महिला विशेषत: नवविवाहीत महिला व नव मतदारांकडून मतदार नोंदणी संदर्भात नमुना क्रं. 6 प्राप्त करुन घेणे, युवक-युवतींमध्ये मतदानाचे हक्क विषयक जनजागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंधस्पर्धा, चित्रकलास्पर्धा या सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करुन युवक मतदार उत्सव (Young Voter’s Festival) साजरा करण्याच्या सुचनाही त्यांनी दिलेल्या आहेत. 25 जानेवारी, 2015 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालयाच्या सभागृहात चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते नवमतदारांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात येणार असून ते नवमतदारांना मार्गदर्शनही करणार आहेत. तरी सर्व नवमतदारांनी मोठया संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


* * * * * * * *

जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा :प्रांताधिकारी गणेश मिसाळ

जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा !
:प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगांव,दिनांक 23:- जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन  पाचोरा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रशासनातर्फे आयोजीत केलेल्या अधिका-यांच्या आढावा बैठकीत केले. शहरातील गिरड रोडवरील कृषी कार्यालयातील बैठकीसाठी पाचोरा तहसिलदार गणेश मरकड, भडगाव तहसिलदार कापसे, पाचोरा गट विकास अधिकारी हिराबाई जाधव, भडगाव गट विकास अधिकारी सुभाष जाधव, जि.प.लघुसिंचन उप अभियंता गायकवाड, जलसंधारण उप अभियंता अहिरे, उप विभागीय कृषी अधिकारी नारायण देशमुख, तालुका कृषी अधि कारी पाचोरा दिपक ठाकूर, भडगांव चकोर, नायब तहसिलदार आबा महाजन यांच्यासह संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या सुधारित निकषानुसार पाचोरा तालुक्यातील 17 गावांची निवड करण्यात आली असून त्यात मोहाडी, वडगाव आंबे, सार्वे बु.प्र.लो., वडगांव खु.प्र.पा., हडसण, भोकरी, सावखेडा बु., वडगांव जोगे, कोल्हे, खेडगांव नंदीचे, वेरुळी बु., नाईकनगर, सांगवी प्र.लो., कुऱ्हाड खु. कुऱ्हाड बु., कासमपुरा,पिंप्री बु.प्र.पा. या गावांचा समावेश आहे. तर भडगाव तालुक्यातील 18 गावांची निवड करण्यात आली असून त्यात कजगांव, तांदुळवाडी, आंचळगांव, वडजी, खेडगांव खु., शिवणी, वलवाडी बु., वडगांव नालबंदी, वाक, कोळगांव, पथराड, महिंदळे, रुपनगर, पळासखेडे, पिचर्डे, शिंदी, पासर्डी, भोरटेक बु. या गावांचा समावेश करण्यात आला आहे.  सन 2019 पर्यंत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असून  या गावांची टंचाईमुक्त गाव अशी ओळख निर्माण करण्याची आपणा सर्व अधिका-यांवर महत्वपुर्ण जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानात पाणलोट विकासाची कामे, जुन्या बंधा-यांची दुरुस्ती, जुन्या जलस्त्रोताचे संवर्धन करणे,  पाझर व लघुसिंचन तलावांची दुरुस्ती, साखळी सिमेंट बंधाऱ्यांचे रुंदीकरण/खोलीकरण, पाझर तलाव, नालाबांध आदींचा गाळ काढणे, मध्यम व मोठया प्रकल्पांचा सिंचन क्षमतेनुसार वापर करणे आदी कामांचा समावेश असून गेल्यावर्षी गाळ काढण्याच्या मोहिमेला लोकसहभागामुळे कामाची व्यापकता वाढली होती त्याच प्रकारे या मोहिमेत देखील लोकांनी पुढे येऊन लोकसहभाग नोंदवावा व एक मॉडेल व्हिलेज तयार करावे असे आवाहन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी यावेळी केले.
प्रजासत्ताक दिनी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार भुमिपूजन
जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते येत्या 26 जानेवारी, 2015 रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार असून नगरदेवळा येथे सिमेंट नाला बांधचे दुपारी 1:00 वाजता तर शिंदी येथील सिमेंट नाला बांधचे दुपारी 4:00 वाजता भुमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गावातील पदाधिकारी, नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही पाचोरा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव,दि.23- थोर  स्वातंत्र्यता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात,  निवासी उप जिल्हाधिकारी धनंजय निकम, उप जिल्हाधिकारी मनोहर चौधरी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी,  कर्मचारी आदींनीही अभिवादन केले.


* * * * * * * * * * *

Thursday, 22 January 2015

ग्राम दक्षता पथकाव्दारे वाळु चोरी रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात :प्रांताधिकारी गणेश मिसाळ


ग्राम दक्षता पथकाव्दारे वाळु चोरी
रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात
:प्रांताधिकारी गणेश मिसाळ
                                                      
चाळीसगांव,दिनांक 22:- पाचोरा व भडगांव तालुक्यातील गिरणा व तितुर या नदीकाठच्या गावांमध्ये वाळू लिलावा बाबत दिनांक 12 मार्च, 2013 च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभा घेण्यात आल्या ग्रामसभेतील ठरावानुसार गावात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने व गावक-यांचा विरोध असल्याने वाळू लिलाव न घेण्याबाबत जिल्हाधिकारी जळगांव यांना प्रस्ताव सादर करण्यात आला असून तसा पत्रव्यवहार संबंधित ग्रामपंचायतींनाही करण्यात आला आहे.
ज्या ग्रामपंचायतींमधील ठरावाच्या अनुषंगाने वाळू लिलाव प्रक्रीया थांबविण्यात आली आहे अशा गावातील वाळूचोरी रोखण्याची जबाबदारी प्रशासनासोबत समस्त गावकरी व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी यांची देखील राहणार आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी  हे चोवीस तास खडा पहारा देऊ शकत नसल्याने गावक-यांनी तसेच पदाधिकारी यांनी वाळू साठयांची निगराणी ठेवण्यासाठी गावातील तरुणांचे ग्राम दक्षता पथकाची नेमणूक करुन वाळु चोरी रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे आवाहन प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. त्याच बरोबर वाळू लिलाव प्रक्रिया ज्या गावात थांबविण्यात आली आहे अशा गावातील वाळु चोरीचे प्रकार उघडकीस आल्यास संबंधित ग्रामपंचायत पदाधिका-यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत ‍जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
तसेच प्रांताधिकारी यांनी ज्या गावांमधून वाळूचोरी होत नाही असे भडगांव तालुक्यातील सावदे, वडजी, गुढे, भातखंडे बु. तर पाचोरा तालुक्यातील भातखंडे खु.प्र.पा., होळ, वरताडे प्र.बो., परधाडे या गावांचे खास अभिनंदन व कौतुकही केले आहे.
* * * * * * * *
ध्वजसंहितेतील तरतूदींचे काटेकोर पालन करावे
:प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील
                                                      
चाळीसगांव,दिनांक 22:- प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिनासारखे राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रिडा सामन्यांच्यावेळी स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम, ‍निष्ठा व अभिमान दर्शविण्याकरिता वैयक्तीरित्या छोटया राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा या संदर्भात शासनामार्फत वेळोवेळी सुचना प्रसारित केल्या जातात. त्याअनुषंगाने ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करणे तसेच खराब झालेल्या, माती लागलेल्या राष्ट्रध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गृह विभागाने या संदर्भात मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. नागरिकांनी कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. कार्यक्रम पार पडल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरत्र पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी सदर राष्ट्रध्वज स्थानिक प्रशासन तथा तहसिलदार यांचेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन प्राताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

* * * * * * * *
प्रजासत्ताक दिनाचा 65 वा वर्धापन
दिन समारंभ पोलीस परेड मैदानावर
:तहसिलदार बाबासाहेब गाढवे
                                                      
चाळीसगांव,दिनांक 22:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2015 रोजी सकाळी 9:15 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास तालुक्यातील अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. शहरातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तहसिल कार्यालय चाळीसगाव येथे उप विभागीय अधिकारी चाळीसगांव यांच्या अध्यक्षतेखाली  तालुक्यातील सर्व कार्यालय व  विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली  प्रसंगी ते बोलत होते.
            प्रजासत्ताक दिनी  ध्वज सरंक्षणासाठी पोलीस प्रमुखांना दोन पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्याच्या सुचना देण्यात आल्या, तर वन्य जिवांचे सरंक्षण व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृतीपर भित्तीपत्रीका प्रदर्शित करण्याच्या सुचना वन विभागाला देण्यात आल्या, विविध शाळांनी आपले सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजनाची मंजूरी घेऊन त्याचे नियोजन करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांना सुचना देण्यात आल्या तर आदर्श आचारसंहितेचे यथोचित नियोजन सर्व विभाग प्रमुखांनी करण्याच्या सुचना प्रातांधिकारी घोडे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
            शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी 26 जानेवारी, 2015 रोजी सकाळी 08:30 ते 10:00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 08:30 पूर्वी किंवा 10:00 वाजेनंतर करावे असे आवाहनही उप विभागीय अधिकारी मनोज घोडे यांनी केले आहे.

* * * * * * * *

चाळीसगांव न्यायालयात कायदेविषयक शिबीर संपन्न
                                                      
        चाळीसगांव,दिनांक 22:- विधी सेवा समिती, चाळीसगांव पंचायत समिती तसेच वकील संघ चाळीसगांव तर्फे न्यायालय परिसरात कायदेविषयक चर्चा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात शालेय तसेच सामाजिक स्तरावरील ‍विधी विषयक, शासनाच्या वतीने ग्रामीण भागात राबविण्यात येणा-या विविध प्रकारच्या योजना, अंधश्रध्दा ‍निर्मुलन, शेतकऱ्यांसाठी विविध योजना व कायदे, विधी विषयक कायदा, बंदीस्त असणाऱ्या कैद्याबाबतचे सुधारित अधिकार व कायदे या विषयांवरील चर्चा शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.डी.पी.खंडेलवाल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून न्या.एम.आर.सोनी, न्या.पी.ए.पत्कि, होते तर सहाय्यक गट विकास अधिकारी तथा विधी सेवा समितीचे सचिव सुरेश नरवाडे, तालुका कृषी अधिकारी जी.आर.पाटील, मेहुणबारे पोलीस निरीक्षक जयवंत सातव, वकील संघाचे अध्यक्ष शैलेंद्र पाटील यांच्यासह वकील संघाचे सभासद, पक्षकार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

Monday, 19 January 2015

धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्याची सामुहिक जबाबदारी ! अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद खान यांचे आवाहन


धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्याची सामुहिक जबाबदारी !
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद खान यांचे आवाहन
                                                   
चाळीसगांव,दिनांक 19:- धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्याची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी आज पाचोरा येथे केले. दंगलग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते पाचोरा येथे आले होते प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत अल्पसंख्याक आयोगाचे सचिव मोहम्मद हुसेन मुजावर, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, अप्पर पोलीस अधिक्षक संदिप जाधव, तहसिलदार गणेश मरकड, उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा रमेश गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर रमेश पवार, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, नायब तहसिलदार आबा महाजन, नायब तहसिलदार राजेंद्र नजण आदि उपस्थित होते.
दंगलीमध्ये कुठल्याही समाजातील सभ्य व चांगल्या संस्कृतीच्या लोकांचा समावेश नसतो, समाजातील मुठभर समाजकंटकांचे हे कृत्यु असून शांतता प्रिय शहराची ओळख कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. घटनास्थळाची पहाणी करतांना त्यांनी दोन्ही समुदायांच्या लोकांशी चर्चा केली असता जनतेला विश्वासात घेऊन तालुका प्रशासनाने दंगलीचे सावट दुर करण्यात यश मिळविल्याने तालुका प्रशासनासह पोलीस प्रशासनाचेही कौतुक करुन दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. नुकसान ग्रस्तांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्ष खान यांनी यावेळी पाचोरा शहरातील आपदग्रस्त भागातील जामा मस्जिद, रंगाल गल्ली, कृष्णापुरी परिसर आदि भागांची पहाणी केली व दोन्ही समाजातील व्यक्तींच्या समस्या, गा-हाणी व तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी जामा मस्जिदचे चेअरमन रशीद देशमुख, नगरसेवक नसिर बागवान, खलील बागवान, कांतीलाल जैन, अझहर शेख आदी समाज सेवकांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त करत काही सुचना मांडल्या. त्याअनुषंगाने अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री.खान यांनी प्रशासनास काही सुचनाही दिल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात म्हणाले की, शांतता प्रिय शहरास अशा घटनांचा गालबोट लागल्याने यात गरिब मजुरांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते व अशा भयभीत वातावरणामुळे मजुर वर्ग मोठया प्रमाणावर स्थलांतरीत होत असतो. तरी मजुर वर्गाने भयभीत न होता पुन्हा आपला व्यवसाय जोमाणे सुरु करावा व आपल्या शांतता  प्रिय शहराची ओळख अबाधित राखण्यास मदत करावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
अल्पसंख्याक आयोगाचे सचिव मोहम्मद हुसेन मुजावर यांनी सगळया घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली. तर अप्पर पोलीस अधिक्षक संदिप जाधव यांनी नागरिकांकडून तसेच प्रसारमाध्यमांकडून योग्य सहकार्य मिळाल्याने तपास कामात मोठी मदत झाल्याने समाधान व्यक्त केले. मोहल्ला मिटींग, शांतता समितीच्या बैठका यातही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


* * * * * * * *

Sunday, 18 January 2015

टोकरे कोळी समाजाच्या सवलतींसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु : ना. एकनाथराव खडसे यांची ग्वाही


टोकरे कोळी समाजाच्या सवलतींसाठी
केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु
                                          -ना. एकनाथराव खडसे यांची ग्वाही
जळगाव, दि. 18- टोकरे कोळी समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असून या समाजाला सवलती मिळवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथराव खडसे यांनी दिली.
जळगाव शहरात आयोजित आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या प्रबोधन मेळाव्यात ना. श्री. खडसे बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, जळगावच्या महापौर सौ. राखीताई सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रयागताई कोळी, आमदार सर्वश्री गुलाबराव पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, सौ. भारती सोनवणे, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष शानाभाऊ सोनवणे, जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. खडसे म्हणाले की, टोकरे कोळी समाजाच्या मागण्यांसाठी विशेषतः आरक्षणाच्या संदर्भात १९९१ पासून विधीमंडळात आपण वारंवार पाठपुरावा केला आहे.  टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी आदी उपजातींना आरक्षण देण्याच्या विषयावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता टोकरे कोळी समाजाचा तिस-या सूचीत समावेश करुन सवलती देण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही ना. खडसे यांनी सांगितले. या विषयासंदर्भात प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून हा प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही देखील ना. खडसे यांनी यावेळी दिली. सामाजिक न्याय किंवा आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून जातवैधता प्रमाणपत्रांच्यासंदर्भात जिल्हास्तरावर निर्णय घेण्याकरिता जळगाव येथे समिती कार्यरत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ना. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन म्हणाले की, आदिवासी बांधवांच्या हक्कावर गदा येणार नाही आणि कोळी समाजबांधवांवर अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका आहे आणि त्यादृष्टीने कार्यवाही देखील सुरु आहे. कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही ना. महाजन यांनी यावेळी दिले.
प्रारंभी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या वतीने पालकमंत्री ना. खडसे आणि जलसंपदामंत्री ना. महाजन यांचा भव्य  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
* * * * * * * * * * * * *
६० व्या राष्ट्रीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ
विजेतेपदाचे ध्येय ठेवूनच नेहमी खेळा : ना. एकनाथराव खडसे
जळगाव, दि. 18- क्रीडा क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असून खेळाडूंनी हे बदल आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता आहे. विजेतेपद  मिळविण्याचे ध्येय ठेवूनच नेहमी खेळत रहा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे यांनी केले.
जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच ॲम्युचर टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६० व्या राष्ट्रीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ना. एकनाथराव खडसे बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, जळगावच्या महापौर श्रीमती राखीताई सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती प्रयागताई कोळी, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाबराव खरात,शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. गणपतराव पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. खडसे यांनी आपल्या राज्याचे नाव उज्वल करण्यासाठी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करण्याचे आवाहनही खेळाडूंना केले. जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी देशाच्या विविध भागातून स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत करुन आपल्या खेळाच्या प्रदर्शनातून जळगावकरांना खूप शिकायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री ना. खडसे आणि जलसंपदामंत्री ना. महाजन यांच्या हस्ते आकाशात रंगीत फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा उपसंचालक जगन्नाथ आधाने यांनी तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी मानले.
२० जानेवारीपर्यंत चालणा-या या राष्ट्रीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, तेलंगणा, गोवा,केरळ, झारखंड या ९ राज्यातील दीडशे खेळाडू सहभागी झाले आहेत.
* * * * * * * * * * * * *
रस्ता सुरक्षा अभियाननिमित्त चित्र व चलचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
वाहतूक नियमांचे पालन यातच खरी सुरक्षितता : पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे
जळगाव, दि.१८-वेगवान वाहने मानवी जीवनाच्या विकास-प्रगतीसाठी आवश्यक आहे. या संशोधनातून उपलब्ध झालेल्या सुविधांचा वापर योग्यपद्धतीने करुन आपले जीवन सुखकर करायचे असते. त्यामुळे वाहने चालवितांना वाहतूक नियमांचे पालन करणे यातच खरी सुरक्षितता आहे.त्यासाठी रहदारीच्या नियमांचे पालन प्रत्येकाने करावे, असे आवाहन राज्याचे महसूल, कृषी, उत्पादन शुल्क,  पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे यांनी केले.
जळगाव जिल्हा पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१५ निमित्त  जनजागृतीसाठी आयोजित चित्र व चलचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ना. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी, महापौर राखीताई सोनवणे, आमदार सर्वश्री हरिभाऊ जावळे, गुलाबराव पाटील, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक पांडे, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे आदी उपस्थित होते.
            यावेळी ना. खडसे म्हणाले की, देशात दरवर्षी एक लाखाहून अधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात.एका अपघातामुळे कुटूंबच उद्ध्वस्त होतात. दरवर्षी वाहनांची संख्या वाढते आहे.अधिक वेगवान वाहने बाजारात येऊ लागली आहेत.अशा परिस्थितीत अपघातांचे प्रमाण कमी करणे हे समाजासमोर मोठे आव्हान आहे. वाहनांना नंबरप्लेट न लावणे ही फॅशन किंवा प्रतिष्ठा मानली जाते. अशाप्रकारे नियमभंग करणा-यांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणा-यांवर एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करा, पण कायदा मोडण्याची प्रवृत्ती वाढता कामा नये. मद्यपानामुळेही अनेक अपघात होतात. अपघातग्रस्तांना दुर्घटनेनंतर इतरांनी तातडीने मदत केली पाहिजे.  माणूसकी ही निघून जाण्यात नाही तर थांबून मदत करण्यात आहे. पोलीस नंतर चौकशी करतात ही भिती निरर्थक आहे. वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या कायद्यांना जेव्हा सुशिक्षित माणसेच  विरोध करतात, तेव्हा वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सुरक्षित राहण्याची जबाबदारी ही सा-यांचीच आहे, त्यातला वाटा प्रत्येकाने उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी काळात जळगाव जिल्ह्यात रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात होत असलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली. आगामी काळात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सा-यांनी मिळून प्रयत्न करु या,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ना. गिरीष महाजन म्हणाले की, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर हे अपघाताचे मोठे कारण आहे. वाहन चालवितांना वाहनचालकाने आपल्या घरी असणा-या लोकांचा विचार करावा. वाहनांची नोंदणी करणे, परवाना असणे अशा कायदेशीर बाबींची पुर्तता आवश्यक आहे. दुर्देवाने अपघात झालाही तर किमान आर्थिक नुकसान भरपाई त्यामुळे मिळते. रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक नियमांची माहिती सा-यांना होते आहे. शालेय विद्यार्थ्यांना ती अवश्य द्या, तेच उद्याचे वाहन चालक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, आमदार गुलाबराव पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी केले. अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली. याप्रसंगी रस्ते सुरक्षा जनजागृती दिनदर्शिका व चित्रफितीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद केदारे यांनी तर आभारप्रदर्शन वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील व जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक, वाहतूक क्षेत्रातील संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.
* * * * * * * * * * * * *
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे
अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांचा जळगांव दौरा कार्यक्रम
      जळगाव, दि. 18 – महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा.श्री.मोहम्मद हुसेन खान  हे कालपासून जळगाव  जिल्हा दौ-यावर  असून दिनांक 19 जानेवारी 2015 रोजी ते पाचोरा शहराला भेट देणार आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे
दिनांक 19 जानेवारी 2015 रोजी सकाळी 08:00 वाजता मुक्ताईनगर येथून पाचोराकडे प्रयाण, सकाळी 09:00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, सकाळी 10:00 वाजता अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींची भेट व तक्रारी स्विकारने, दुपारी 12:00 वाजता नुकसानग्रस्त घटना स्थळांना भेट, दुपारी 02:00 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व इतर संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक (कायदा व सुव्यवस्थेबाबत), नंतर जळगावकडे रवाना दुपारी पत्रकार परिषद नंतर मुक्ताईनगरकडे प्रयाण, मुक्ताईनगर  येथे राखीव व मुक्काम
* * * * * * * * * * * * *

Saturday, 17 January 2015

महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार

महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा
पालकमंत्र्यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार
                                                      
चाळीसगाव,दिनांक 17:-  चाळीसगाव तालुक्याचे नावलौकीक वाढविणारा सायगावच्या मातीत जन्मलेला विजय चौधरी याने महाराष्ट्र केसरी वर न थांबता हिंद केसरी होण्याची इच्छा व्यक्त करत त्यासाठी संपुर्ण पाठबळ देऊन दत्तक घेण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री  तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी आज केली.  सायगावचा महाराष्ट्र केसरी किताब पटकविणा-या विजय चौधरी याची आज शहरातुन हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली व या मिरवणूकीचा समारोप उर्दु हायस्कुलच्या पटांगणात भव्य नागरी सत्कार समारंभात करण्यात आला.
यावेळी खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, उदय वाघ, माजी आमदार साहेबराव घोडे, वाडीलाल राठोड, सतिष दराडे, के.बी.साळुंखे, यांच्यासह विजय चौधरी चे वडील नथ्थु चौधरी व आई रंजना चौधरी  आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात ना.खडसे म्हणाले की, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याचा सत्कार हा शेकडो विजय चौधरी तयार करण्यासाठी प्रेरणादायी सत्कार असून कुस्तीगिरांसाठी शासनातर्फे व्यापक असे धोरण आखण्यात येईल. त्याच बरोबर त्यांना आजिवन मानधन व एस.टी.मोफत प्रवास उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही याप्रसंगी दिले. गाव तेथे व्यायामशाळा हे धोरण पुर्वीपासूनच आमलात आले आहे मात्र त्यासाठी योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळे शासनाकडून मिळणारा निधी इतरत्र वळविला जातो. यासाठी सर्व संबंधितांनी योग्य पाठपुरावा केल्यास गाव तेथे व्यायामशाळा उभारण्यास मदत होईल असेही ना.खडसे यावेळी म्हणाले तसेच तालुक्यात राहूरी कृषि विद्यापीठाच्या धर्तीवर लिंबू संशोधन केंद्र उभारण्यासाठी तसेच बेलगंगा साखर कारखाना कार्यान्वित करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी खासदार ए.टी.पाटील म्हणाले की, देशी खेळांची व्यापकता वाढविण्याची गरज असून खेळाडुंना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे पालकमंत्री ना.खडसेंना यांना आवाहन केले. शहरीकरणाच्या आधुनिकीकरणामुळे व्यायामशाळा नष्ट होतांना दिसतात परंतु व्यायामशाळा ही काळाची गरज ओळखुन त्यांचे संरक्षण व संवर्धन होणेही गरजेचे असल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.
विजय चौधरींचा जिवन प्रवास अंगावर शहारे आणणारा असून गिरणा खो-यात मिळालेल्या या हि-याला विविध पैलू पाडण्यासाठी व त्याच्या ध्येयपुर्तीसाठी योगदान देणार असल्याचे आमदार उन्मेष पाटील आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आपल्या मनोगतात म्हणाले की, कुठल्याही क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी मेहनत गरजेची असून मेहनतीसोबत चिकाटी धरुन वाटचाल करा असे आवाहन उपस्थित कुस्तीप्रेमींना केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र चौधरी व आण्णा कोळी यांच्या हस्ते हिंद केसरी अमोल बुचडे, रोहीत पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सतिष दराडे, राजेंद्र चौधरी, आबा पहेलवान अमोल बुचडे, रोहीत पटेल यांनी मनोगत व्यक्ते केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णा कोळी यांनी केले तर आभार नगर परिषदेचे विरोधी पक्षनेता राजेंद्र चौधरी यांनी मानले.
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र केसरीचा सत्कार करणार
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा येत्या 26 जानेवारी, 2015 रोजी साजरा होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय समारंभात सत्कार करण्याच्या सुचना ना.खडसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या तर विजय चौधरीच्या भावी वाटचालीस आर्थिक मदत व्हावी या करिता वैयक्तीक 11 लाखाची देणगी जाहिर केली. तसेच खासदार ए.टी.पाटील, आमदार राजु भोळे व आमदार उन्मेष पाटील यांनी देखील प्रत्येकी 1 लाखाची देणगी जाहिर केली आहे.
* * * * * * * *

जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा :आमदार उन्मेष पाटील


जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा !
:आमदार उन्मेष पाटील
                                                      
चाळीसगांव,दिनांक 17:- जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा अशा सुचना आमदार उन्मेष पाटील यांनी तहसिल कार्यालयात तालुका प्रशासनाने आयोजीत केलेल्या अधिका-यांच्या आढावा बैठकीत केल्या. यावेळी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश नरवाडे, तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या दिनांक 02 जानेवारी, 2015 च्या निकषानुसार तालुक्यातील 24 गावांची निवड करण्यात आली असून त्यात लोंजे, शेवरी, डोण दिगर, टाकळी प्र.चा., ओझर, खरजई, वाकडी, रोकडे, शिरसगांव, टाकळी प्र.दे., तळोंदे प्र.दे., माळशेवगे, डामरूण, वडाळा-वडाळी, पिंप्री खु. परशरामनगर, रांजणगांव, सांगवी, खेरडे, सोनगांव, आंबेहोळ, तळोंदे प्र.चा., बोढरे, भोरस या गावांचा समावेश असून सन 2019 पर्यंत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. तरी या गावांची टंचाईमुक्त गाव अशी ओळख निर्माण करण्याची आपणा सर्व अधिका-यांवर महत्वपुर्ण जबाबदारी असून कर्तव्य पार पाडतांना हयगय करणा-या अधिका-यांची गय करणार नाही अशी तंबी देखील आमदार पाटील यांनी या बैठकीत दिली. जलयुक्त शिवार अभियानास जलसाक्षरतेची देखील जोड मिळणार असून शिरसगांवचा ब्रिटीश कालीन बंधार, बोढरे तसेच ओझर येथील नैसर्गिक स्त्रोताचे सरंक्षण व संवर्धन करणे महत्वाचे असल्याचे आमदार पाटील यावेळी म्हणाले.
            या बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी दिनांक 20 ते 23 जानेवारी, 2015 या कालावधीत संपुर्ण शिवार फे-या पुर्ण करण्याच्या सुचना केल्या  तर येत्या 27 जानेवारी, 2015 रोजी पुन्हा या बैठकीचा आढावा आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थित घेणार असल्याचे सांगितले.

* * * * * * * *
77 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
                                                      
चाळीसगांव,दिनांक 17:- तालुक्यातील 77 ग्रामपंचायतींचा मा.राज्य निवडणूक आयोग मुंबई यांच्या दिनांक 12.01.2015 च्या पत्रानुसार प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर झाल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे. जुलै-2015 ते डिसेंबर-2015 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर झाला असून प्रभाग रचनेच्या कामकाजासाठी तालुक्यातील एकूण 31 अधिका-यांना प्राधिकृत करण्यात आले आहे,  ग्रामपंचायतीचे सरपंच, आजी माजी सदस्य, तसेच सर्व संबंधीत पदाधिकारी यांनी नेमुण दिलेल्या दिनांकास उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे. नेमणूक केलेल्या अधिका-यांनी त्यांनी दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नियमाप्रमाणे बैठक घेऊन ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक व तलाठी यांच्या मदतीने प्रभाग रचनेचे कामकाज पुर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचनाही तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी सर्व संबंधितांना ‍दिल्या असून कामात हयगय झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची सुचनाही दिली आहे.

* * * * * * * *
तिळगुळ घ्या, विज बील भरा
महावितरणच्या अभियानाला देवळीचा सकारात्मक प्रतिसाद
                                                      
चाळीसगांव,दिनांक 17:-  महावितरणचे चाळीसगांव ग्रामीण-1 मार्फत तिळगुळ घ्या, विज बील भरा हे अभियान राबविण्यात आले याला या अभियानाला तालुक्यातील देवळी ग्रामपंचायतीने सकारात्मक प्रतिसाद देत सरपंच भगवान पाटील यांनी उप कार्यकारी अभियंता  धिरज चव्हाण यांच्याकडे 60 हजाराची थकीत विज बीलाची रक्कम भरणा करुन आदर्श घालुन दिला आहे.
            चाळीसगाव ग्रामीण-1 च्या वतीने मकरसंक्रातींचे निमीत्त साधत आगळे-वेगळे अभियान राबविले. उपविभागातील सर्व ग्रामपंचायतींना भेट देऊन पाणीपुरवठा विज कनेक्शनची थकबाकी भरण्याविषयी आवाहन करण्यात आले. या अभियानात उप कार्यकारी अभियंता धिरज चव्हाण यांच्यासह अभियंता पवार, मोरे, सरोदे, महाजन व गवळी यांनी सहभाग घेतला असून सदर अभियान राबविण्यासाठी  प्रताप सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
            ग्रामपंचायतींमार्फत पाणी पुरवठयाची विज बीलाची थकीत रक्कम भरण्यासाठी देवळी ग्रामपंचयातीचा आदर्श घेऊन इतर थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतीनी देखील विज बील भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कृषि संजिवनी योजनेला शासनामार्फत मार्च-2015 पर्यंत मुदत वाढ मिळाली असल्याने या योजनेचाही शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उप कार्यकारी अभियंता धिरज चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

* * * * * * * *

नवे वर्ष नवे संकल्प जानेवारी-2015
चा लोकराज्य अंक प्रकाशित
लोकराज्य अंकाचे वार्षीक वर्गणीदार होण्यासाठी आवाहन
                                                      
चाळीसगांव,दिनांक 17:-  नव्या वर्षात महाराष्ट्राला अधिक समृध्द आणि गौरवशाली करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकराज्यच्या या अंकात विविध विभागांच्या मंत्रीमहोदयांनी केलेल्या नवीन वर्षाच्या संकल्पावरील लेखांना समाविष्ट करण्यात आले असून वेगवेगळया क्षेत्रात महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेऊन जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्याचा संकल्प आणि निर्धार यामधून अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणा-या या मासिकाचे वार्षीक वर्गणीदार होण्यासाठी आता चाळीसगावातही सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. चाळीसगाव येथील उप माहिती कार्यालय, छाया निवास स्टेट बँक इमारत पहिला मजला भडगाव रोड चाळीसगाव येथे या महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य मासिकाचे वार्षीक वर्गणीदार होण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन प्र.माहिती सहाय्यक मनोहर पाटील यांनी  केले आहे.

* * * * * * * *