Thursday, 25 December 2014

संविधानामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



संविधानामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
        नागपूर दि.25- कोणतेही संविधान चुकीचे असत नाही. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच संविधानाची निर्मिती झालेली असते. कोणतीही व्यवस्था खराब नसते तर ती व्यवस्था चालविणाऱ्या लोकांवर तिचे भवितव्य अवलंबून असते असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 1990 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
            समारंभास कुलगुरु विनायक देशपांडे, सेवानिवृत्त प्राचार्य अरुण दत्तात्रय गोडबोले, प्राचार्य श्रीमती प्रमिला खोब्रागडे, डॉ.श्रीमती महाजनी, डॉ.श्रीमती स्नेहा देशपांडे, डॉ. श्रीमती रिंगे, डॉ.एस.के.कडाव आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले की, मी  या महाविद्यालयातील 1990 च्या बॅचचा विद्यार्थी आहे. शिक्षण घेत असतांना पहिल्या ते चौथ्या बॅच पर्यंतच्या विद्यार्थ्यांत समन्वय असायचा. स्नेहसंमेलनात भाग घ्यायचो, महाविद्यालयीन निवडणूका लढवायचो असे सांगून त्यांनी त्यावेळच्या स्नेह संमेलनातील आनंदाचे क्षण कथन केले. विधी महाविद्यालयामुळे मला जीवनात खूप काही शिकायला मिळाले. माझे व्यक्तिमत्व याच महाविद्यालयात तयार झाले. त्यावेळच्या वक्तृत्व स्पर्धांचा आवर्जून उल्लेख केला. हे सर्व करत असतांना माझा आत्मविश्वास वाढत गेला असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संविधान कोणतेही चुकीचे नसते. ते लोकांना न्याय मिळवून देते. व्यवस्था खराब नसते तर तिला चालवणारे लोक खराब असतात असे वाक्य वर्गात लिहिलेले होते. हे वाक्य मी जीवनात कायमचे कोरुन ठेवले आहे. सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संविधानाचे महत्व येथे मला मिळाले. अध्ययन करत असतांना कायदा आणि त्याच्या मागील मुलभूत तत्वे मी शिकलो. कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत मी नेहमी अग्रेसर राहिलो. कायद्यामागील मुलभूत तत्व समजले की कायदा समजायला सोपे जाते. 
            विधी महाविद्यालयातील शिक्षण घेतांना आपण चुकीचे काम केले नाही. आनंदी जीवन व्यतीत केले. आपण सर्वजणही पुढील काळात आनंदी जीवन व्यतीत करावे, अशा शुभेच्‍छा त्यांनी यावेळी सहकारी मित्रांना दिल्या.
            यावेळी ॲड. भारती डांगरिया यांनी सर्वांतर्फे मनोगत व्यक्त्त केले. त्यावेळच्या शिक्षकांमुळेच आम्ही उच्चपदापर्यंत जाऊ शकलो असे आदराने सांगितले. 1990 च्या बॅच मधील विद्यार्थ्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे, असे सांगून त्यांनी राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असणारे न्यायमूर्ती, न्यायाधीश, सचिव, अन्य उच्च पदस्थ वर्ग मित्र मैत्रिणींच्या नावांसह उल्लेख केला.
            प्रारंभी सेवानिवृत्त प्राचार्य अरुण गोडबोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा तसेच अन्य मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. श्रीमती सरिता यांनी सरस्वती स्तवन गायिले. मुकूल कानिटकर यांनी सुत्रसंचालन करुन शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
* * * * * * * * *

No comments:

Post a Comment