Friday, 17 October 2014

मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज !


मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज !

:निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील


            चाळीसगांव,दिनांक 17:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव मतदार संघातील मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केला आहे. हिरापूर रोडवरील य.ना.चव्हाण राष्ट्रीय विदयालयाच्या सभागृहात मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार असून या ठिकाणी मतमोजणी करिता 14 टेबल लावण्यात आले आहे . प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सुक्ष्म निरीक्षक, शिपाई अशा चार लोकांची टीम एका टेबलावर लावण्यात आली  आहे. मतमोजणीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सि.सि.टी.व्ही. कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. सर्व मतमोजणी प्रक्रीयेचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. संपुर्ण मतमोजणी  प्रक्रीयेसाठी  150 कर्मचा-यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत तर मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या करिता त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  मनोज घोडे यांनी कळविले आहे.

            15 ऑक्टोंबर, 2014 रोजी  17-चाळीसगांव मतदार संघामध्ये एकूण 327 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून मतदार संघातील एकूण 3,22,266 इतक्या मतदारांपैकी  2,08,065 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. टक्केवारी  नुसार 64.56 टक्के इतके मतदान चाळीसगांव मतदार संघात झाले असून येत्या रविवारी  19 ऑक्टोंबर, 2014 रोजी  मतमोजणीची  प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मिडीया कक्षात लावण्यात आलेल्या बोर्डवर प्रसीध्द करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व प्रसीध्दी माध्यमांकरिता स्वतंत्र मिडीया कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी  मोबाईल वापरण्यास बंदी असल्याने नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी आपला मोबाईल सोबत आणू नये अशा सुचनाही  निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी दिल्या आहेत.

 
                                         * * * * * * * *

No comments:

Post a Comment