Saturday, 13 September 2014

आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करणार : प्रांताधिकारी मनोज घोडे



आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करणार !
                                                              :प्रांताधिकारी मनोज घोडे

            चाळीसगांव,दिनांक 13:- आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आज तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या बैठकीत सांगितले. चाळीसगाव 17 विधानसभा मतदार संघा करिता जाहिर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गट विकास अधिकारी मालती जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सातव, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव यांच्यासह महसुल प्रशासनातील अधिकारी व तालुक्यातील सर्व कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
            महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 या अंतर्गत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या मालकी हक्काच्या जागेतील बॅनर, बोर्ड काढण्याची कार्यवाही त्वरीत करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या. कुठल्याही सभा, मोर्चा, रॅलींची परवानगी पोलीस प्रशासनाकडुन तर बॅनर, होर्डींग ची परवानगी शहरी भागात नगर परिषद तर ग्रामीण भागात पंचायत समिती व वाहन परवाना हा तहसिल कार्यालयातील एक खिडकी योजनेतून घेण्याचे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.  आदर्श आचार संहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे किंवा काय करु नये या बाबतची माहिती व सुचनांचा तपशिल हा निवडणूक आयोगाच्या www.eci.nic.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी दाखल केलेली शपथ पत्र व खर्चाचे तपशिलांची माहिती ही वेळोवेळी http://ceo.maharashtra.gov.in किंवा http://ceo.maharashtra.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणूक कार्यक्रमा दरम्यान नवरात्र, दसरा व बकरी ईद हे धार्मीक सण-उत्सव येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याच्या सुचना पोलीस प्रशासनास यावेळी दिल्या तसेच निवडणूकीच्या संदर्भात आयोजीत बैठकीस अनुपस्थित राहणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही यावेळी दिल्या.

तहसिल कार्यालयात आदर्श आचार संहिता कक्षाची स्थापना

            आदर्श आचार संहितेसंदर्भातील मार्गदर्शन व तक्रारींचे निराकरणासाठी तहसिल कार्यालयात आदर्श आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे प्रमुख निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे काम पाहणार असून या कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 02589-224011 असा आहे. तरी आदर्श आचार संहितेसंदर्भातील मार्गदर्शन अथवा तक्रारी करिता या कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहनही  निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

                                           * * * * * * * *

No comments:

Post a Comment