निवडणूक आचार संहितेबाबत अधिका-यांना
मार्गदर्शन
जळगाव,
दि.6 - भारत निवडणूक आयोग दिल्ली
यांनी दि. 5 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणूकीची घोषणा केली आणि निवडणूक आदर्श आचारसंहितेस
प्रारंभ झाला. या पार्श्वभूमिवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून जळगाव जिल्ह्यात आचार
संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांची सभा
आज बोलावण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अल्पबचत सभागृहात ही सभा पार
पडली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी रुबल अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदर्श आचार संहिता काळात
अधिकारी कर्मचा-यांनी कटाक्षाने पाळावयाच्या बाबींची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
तसेच निवडणूक यंत्रणेत सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचा-यांनीही आपला मतदानाचा हक्क
बजवावा, त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, सार्वजनिक जागी लावलेले शासकीय
योजनांचे जाहिरात फलकावरील मजकूर हटविण्यात यावा, तसे अहवाल निवडणुक शाखेला सादर करावे,
असे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक एस. जयकुमार
यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थे संदर्भात सद्यस्थितीची माहीती दिली. निवडणूक प्रक्रिया
ही प्रशासनातील सा-यांची सामूहिक जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी सा-यांनी कटीबद्ध
व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या सभेस जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले,
अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनपा आयुक्त संजय
कापडणीस आदी वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी
उपस्थित होते. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी
यांनी केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment