Thursday, 27 March 2014

निवडणूक कामात हयगय केल्यास कायदेशीर कारवाई करणार : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील


निवडणूक कामात हयगय केल्यास
कायदेशीर कारवाई करणार
                                  : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

            चाळीसगाव, दिनांक 27 मार्च :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन 2014 च्या पार्श्वभुमीवर विविध कामांचा निपटारा तातडीने होण्याच्या दृष्टीने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांनी आपल्यावर सोपविलेल्या कामात हयगय केल्यास लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 चे कलम 134 अन्वये कारवाई करण्यात येईल अशा सुचना तहसिल कार्यालयातील आढावा बैठकीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आढावा बैठकीत केल्या.
            निवडणूक कामकाजात निश्चितच ब-याच अडचणी येतात परंतु येणा-या अडचणींवर मात करुन केवळ सोपविलेली जबाबदारी पार न पाडता देशप्रेमाची भावना मनात ठेवून काम करा तसेच कामकाजात मार्गदर्शन लागल्यास तात्काळ संपर्क करा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी सदर आढावा बैठकीत केले.
            या बैठकीला तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार व्हि.पी. सुर्यवंशी, पुरवठा निरीक्षक शेख, संदेश निकुंभ, प्रणिल पाटील यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            लोकसभा सार्वत्रीक निवडणूकीच्या कामकाजाचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश पारित करण्यात आले असून यामध्ये एकूण 21 कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य नियंत्रण कक्ष, क्षेत्रिय अधिकारी यांचे सहनियंत्रण कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष, टपाल व्यवस्था, हेल्प लाईन मिडीया सेंटर, एक खिडकी कक्ष, वाहन कक्ष, मतदान साहित्य कक्ष, संगणक कक्ष, मतदार यादी कक्ष, मतदान यंत्र सिलींग कक्ष, टपाली मतपत्रीका कक्ष, मतदार ओळखपत्र तपासणी कक्ष, प्रशिक्षण व्यवस्था, मतदार जनजागृती, बॅनर होर्डींग छपाई कक्ष, या प्रकारच्या कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक कक्षास नेमून दिलेली कामे, कक्ष प्रमुख तसेच सहाय्यक अधिकारी व कर्मचारी अशा विस्तृत स्वरुपातील आदेश पारित करुन या आदेशामध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रातांधिकारी मनोज घोडे यांनी समजावून सांगितली. त्याचप्रमाणे नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, लिपीक, तलाठी यांनी नेमुन दिलेल्या कामाव्यतिरीक्त इतर आवश्यक ती सर्व कामे देखील सहा.निवडणुक निर्णय अधिकारी यांचे आदेशानुसार पार पाडावयाची आहेत. तसेच सहा.निवडणुक निर्णय अधिका-यांच्या पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये व पुर्व परवानगी शिवाय किरकोळ रजा घेऊ नये अशा सुचना करत सदर अधिकारी, कर्मचा-यांची आढावा बैठक दररोज सायंकाळी 06:00 वाजता तहसिल कार्यालयात घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
                                               * * * * * * * *

No comments:

Post a Comment