जळगाव, दिनांक 7-
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातंर्गत
जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 13 ते 15 मार्च,2013 या
कालावधीत वल्लभदास वालजी वाचनालयाच्या सभागृहात ग्रंथोत्सव-2012 चे आयोजन करण्यात
आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई
गुजराथी यांचे हस्ते होणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे यांनी
कळविले आहे.
दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता
ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर असतील तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरु डॉ.सुधीर मेश्राम, मुख्य
कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा पोलिस अधिक्षक एस.जयकुमार उपस्थित राहणार
आहेत.
ग्रंथोत्सव उदघाटनप्रसंगी विनोद ढगे व
अन्य कलाकारांचे वाचन संस्कृतीबाबत पथनाटय सादर होईल. तसेच जळगाव शहरातील
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील तर दुपारी
4 ते 6 वाजता वाचन संस्कृतीबाबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या
परिसंवादाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक डॉ.पी.एस.चौधरी असून प्रा.किसन पाटील, डॉ.चंद्रकांत
भंडारी, ॲड.एहते श्याम देशमुख, शंभु पाटील, अजय चिकाटे या साहित्यीकांचा सहभाग
लाभणार आहे.
गुरुवार, दिनांक 14 मार्च,2013 रोजी
सकाळी 10 ते 11.30 वाजता कथाकथन कार्यक्रम आयोजित केला असून अशोक कोळी, विनोद
कोसुदे, रा.सी.साळुंके, पोर्णिमा हुंडीवाले हे साहित्यिक आपल्या कथांचे वाचन करतील
तर दुपारी 12 ते 2 या कालावधित महाविद्यालयीन विद्यार्थी व दिशा बहुउददेशीय
संस्थेच्या कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी रसिकांना मिळणार आहे.
तर शुक्रवार, दिनांक 15 मार्च,2013 रोजी
समारोपाचा कार्यक्रम अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांचे अध्यक्षतेखाली होणार
आहे यावेळी स्थानिक कलाकार वाचनाची आवड वृध्दीगंत करणेबाबतची नाटिका सादर करतील तर
सायंकाळी 5 ते 7 या वेळेत कवी संमेलन आयोजित केले असून प्रभाकर महाजन, शशिकांत
हिंगोणेकर, मंगला नागरे, अशोक जोशी, अशोक कोतवाल, अस्मिता गुरव, प्रशांत धांडे,
प्रभाकर सोनवणे आदि कवी सहभागी होतील कवी संमेलनाचे अध्यक्ष अशोक सोनवणे असतील.
ग्रंथप्रदर्शन व विक्री
दिनांक 13 ते 15 मार्च,2013 या कालावधित
वल्लभदास वालजी वाचनालयाच्या जुन्या सभागृहात ग्रंथ विक्री व प्रदर्शनासाठी 25
स्टॉल उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये ग्रंथाली प्रकाशन मुंबई, वैशाली प्रकाशन
पुणे, ग्रंथमोहन बुकशेलर नाशिक, मराठी शब्द कोश धुळे, जनउन्नती ग्रंथभांडार नाशिक,
ज्ञानगंगा प्रकाशन पुणे, शासकीय मुद्रणालय औरंगाबाद आदि प्रकाशन संख्या व ग्रंथ विक्रेत्यांचे
स्टॉलची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयातील रसिक, ग्रंथप्रेमी आदिंना
पुस्तक प्रदर्शन व खरेदी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे.
तरी जळगाव जिल्हयातील जास्तीत जास्त
नागरिकांनी ग्रंथोत्सवास भेट देण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत
करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment