Wednesday, 30 January 2013

शासनाकडून ओ.डी.ए. च्या थकीत विज बिलात सवलत मिळावी म्हणून प्रयत्न करणार --पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर

 
         जळगांव, दि. 30 :-  बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यामधील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ओ.डी.ए) पुन्हा कार्यान्वित व्हाव्यात म्हणून चालू थकीत वीज बिलात सवलत व सदरच्या योजनांच्या दुरुस्तीकरिता एक कोटीचा निधी मिळावा म्हणून मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाठपुरावा करण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
        बोदवड व मुक्ताईनगर तालुका टंचाई आढावा बैठकीत ना. देवकर बोलत होते. यावेळी  मुक्ताईनगर, बोदवड मतदारसंघाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, ॲड. रविंद्र भैयया पाटील, बोदवड पंचायत समिती उपसभापती श्रीमती पाटील, प्रांताधिकारी विवेक सैंदाणे , बोदवड व मुक्ताईनगर तहसिलदार, गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते.
                 ना. देवकर पुढे म्हणाले बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांना ओडीए योजनेतून पाणी पुरवठा केला जात होता. परंतु थकीत वीज बीले व दुरुस्ती अभावी सदरच्या गावांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा योजनांच्या थकीत वीज बिलाला टंचाईच्या काळात इतर योजनेप्रमाणे 33 टक्के भरणा केल्यास वीज बिलात 67 टक्के सवलत मिळावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण आहेत अशा योजना तात्काळ सुरु करण्यासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रयत्न करावेत असे ना. देवकर यांनी सांगितले.
           महात्मा गांधी नरेगा योजनेतून दुष्काळी तालुक्यात मागेल त्याला काम मिळाले पाहीजे. या मध्ये शेतरस्ते, तलावातील गाळ काढणे, तलाव दुरुस्ती आदि कामे करता येतील, असे ना. देवकर यांनी सांगितले तसेच टंचाईची भीषणता अधिक असल्याने ग्रामसेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबले पाहिजे याकरिता गटविकास अधिका-यांनी दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले
         प्रारंभी मुक्ताईनगर बोदवडचे आमदार मा. एकनाथराव खडसे यांनी ओडीए योजना पुर्नजिवित करणे ओडीए च्या तात्पुरती दुरुस्ती करिता शासनाने निधी दयावा तसेच सदरच्या योजनांच्या थकीतवीज बिलासाठी सवलत मिळावी व टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरु करण्याची मागणी केली तसेच बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झालेली असून सदरच्या गावांमध्ये टंचाईच्या उपाय योजना त्वरित राबविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
वीज कंपनीच्या अधिका-यांना सूचना :-
             बोदवड व मुक्ताईनगर तालुका टंचाई आढावा बैठकीत सरपंच , ग्रामसेवक इतर पदाधिका-याची वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांविषयी तक्रारी केल्या. यामध्ये लोकांशी असभ्य वागणूक, थकीत वीज बिल सवलतीमध्ये चुकीची माहिती देणे, चुकीचे वीज बिले देणे आदि. या विषयी ना. देवकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी नागरिकांशी सौजन्याने वागणूकीचे आदेश देऊन शासनाने वीज बिल सवलतीचा शासन निर्णय बैठकीत वाचून दाखविला. त्या शासननिर्णयाप्रमाणे अधिका-यांनी पाणी पुरवठा योजनांची चालू थकबाकी म्हणजे 1 एप्रिल 2012 पासूनची वीज बिल थकबाकीत 67% सवलत देण्याचे आदेश ना. देवकर यांनी दिले. 
               यावेळी दोन्ही तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक , जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित राहून आपल्या गावांमधील टंचाई विषयीच्या समस्या मांडल्या व त्या दूर करण्याची मागणी त्यांनी केली.             

No comments:

Post a Comment