Wednesday, 31 October 2012

अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गातील 33.33 टक्के पदे निवडश्रेणीत आणण्याचा निर्णय


मंत्रिमंडळ निर्णय :                                          दिनांक : 31 ऑक्टोबर 2012

       मुंबई, दि. 31 : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. 
      अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी या संवर्गातील पदोन्नतीची कुंठीतता दूर करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी निवडश्रेणी संवर्गातील सध्या असलेल्या 20 टक्के पदांमध्ये वाढ करून ती 33.33 टक्के इतकी करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती मिळण्यासाठी सुमारे 26 वर्षे लागत आहेत. यामुळे संवर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर कुंठितता आली आहे. याकरिता अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी या दोन्ही संवर्गातील पूर्वी 20 टक्के इतकी पदे निवडश्रेणीत रूपांतरित करण्यात आली होती. मात्र निवडश्रेणी मिळण्याकरिताही साधारणत: 10 ते 15 वर्षे इतका कालावधी लागत असल्यामुळे  पदोन्नतीच्या संधी कमी होत्या.
या निर्णयामुळे या दोन्ही संवर्गातील अधिकाऱ्यांना निवडश्रेणी पदाचा लाभ होणार असून पदोन्नतीतील कुंठितता दूर होईल व अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल. त्यामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये गतिमानता येणार आहे.
0 0 0 0 0
तंत्रनिकेतनांमध्ये 248 नवीन शिक्षकीय पदे
राज्यातील  45 पैकी 25 शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये 248 नवीन शिक्षकीय पदे निर्माण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
          या 25 शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये 2007-08 पासून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास तसेच काही अभ्यासक्रमाचे प्रवेश क्षमता वाढविण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिली होती. नवीन अभ्यासक्रम सुरू झाल्याने, तसेच प्रवेश क्षमतेत वाढ झाल्याने अध्यापनाच्या कामात अडचणी निर्माण झाल्या होत्या. शिक्षकीय पदांच्या अभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.  पहिल्या वर्षी 116, दुसऱ्या वर्षी 76 आणि तिसऱ्या वर्षी 56 याप्रमाणे येत्या तीन वर्षांत ही पदे टप्प्या-टप्प्याने भरण्यात येतील. यावर एकूण 16 कोटी 93 लाख एवढा खर्च येईल.


सीआरपीएफ, निमलष्करी शहीद जवानांच्या कुटुंबियांना

राज्य शासनाकडून 10 लाख रूपयांचे अनुदान
   महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत राज्याच्या पोलीस दलाबरोबर नक्षलविरोधी कारवाईत, नक्षलवादी हल्ल्यात किंवा आतंकवाद विरोधी कारवाईत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव दलातील (सीआरपीएफ), तसेच निमलष्करी दलातील (पॅरा-मिलीटरी फोर्सेस) जवानांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून दहा लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना केंद्र शासनाकडून 15 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान दिले जात होते. तर नक्षलवादी किंवा आतंकवादी हल्ल्यात राज्य पोलीस दलातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना 25 लाख रूपयांचे अनुदान दिले जात होते. यातील फरकाची रक्कम दहा लाख रूपये केंद्रीय राखीव पोलीस दलातील तसेच निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून देण्यास मान्यता देण्यात आली. या सुविधेचा लाभ 1 फेब्रुवारी 2009 नंतरच्या संयुक्त मोहिमेत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

जिल्हा लघु उदयोग पुरस्कार 2012 साठी अर्ज करण्याचे आवाहन



जळगांव, दि. 31 – येथील जिल्हा उदयोग केंद्र कार्यालयाकडे कायमस्वरुपी नोंदणी झालेल्या सर्व सूक्ष्म व लघु उदयोग उपक्रमधारकांनी जिल्हा लघु उदयोग पुरस्कार – 2012 साठी आठ दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन प्रभारी  महाव्यावस्थापक ज्ञा.न.बागडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
सदरचा पुरस्कार राज्य शासनाकडून उदयोग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या जिल्हयातील दोन लघु उदयोग घटकांना देण्यात येतो. प्रथम पुरस्कार 25 हजाराचा तर व्दितीय पुरकार दहा हजाराचा आहे.
सन 2012 चे जिल्हा पुरस्कारासाठी सुक्ष्म व लघु उद्योग उपक्रम 1 जानेवारी 2009 पूर्वी स्थायी सुक्ष्म किंवा लघु उद्योग उपक्रम म्हणून जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी झालेला असावा. तसेच उद्योग घटक मागील सलग दोन वर्ष उत्पादनात असावा. यापुर्वी या योजनेअंतर्गत जिल्हा पुरस्कार प्राप्त झालेला नसावा.
या पुरस्कारासाठी सर्वसधारणपणे 1) उद्योजकाची स्थिरमत्ता, उत्पादन व कामगार यांचेमधील वाढ 2)तंत्रज्ञान कौशल्य 3) उद्योजकाची पार्श्वभूमी 4) उद्योगासांठी निवडलेली जागा 5) उत्पादनात केलेला विकास व गुणवत्ता 6) आयात – निर्यात 7) नवीन उत्पादनासाठी केलेली धडपड 8) घटकाचे व्यवस्थापन व अकौंटींग सिस्टीम 9) मशिनरीची सर्वसाधारण स्थिती, इमारत व मशिनरीची देखभाल 10) कामगार कल्याण योजना 11) याव्यतिरिकत अनु.जाती/ जमातीचे उद्योजक असल्यास प्राधान्य 12) कर्ज घेतले असल्यास नियमीत परफेड अशा प्रकारचे निकष लावले जातात.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त सुक्ष्म व लघु उद्योग उपक्रम धारकांनी सन 2012 चे जिल्हा पुरस्कार योजना अंतर्गत बातमी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून आठ दिवसात आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत नमुन्यात अर्ज करावेत जिल्हा पुरस्कार योजना अंतर्गत अर्ज जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत.

क्रीडांगण विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन



           जळगांव, दि. 31 :- राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने क्रीडांगण विकास अनुदान योजना सन 2012 – 13 जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. तरी सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी प्रसिध्दी पत्राकान्वये दिली आहे.
            शासनाचे क्रीडा धोरणानुसार या योजनेअंतर्गत जिल्हयातील माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविदयालये तसेच विविध खेळांच्या विकासासाठी स्वराज्य संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविदयालये आणि अदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणा-या आश्रमशाळा यांना उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडा गुण विकसित करण्यासाठी सुयोग्य क्रीडांगण व क्रीडांगणावर मुलभूत सुविधा जिल्हयात मोठया प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, आर्थिक मदत देण्यात येते. त्या अंतर्गत 1) क्रीडांगण समपातळीत करणे,  2) 200 मी. अथवा 400 मी. चा धावनमार्ग तयार करणे,  3) क्रीडांगणास कुंपण घालणे, 4) विविध खेळांची प्रमाणित क्रीडागणे तयार करणे, 5) प्रसाधन गृह बांधणे, 6) पाण्याची सुविधा निर्माण करणे, 7) भांडारगृह बांधणे या प्रत्येक बाबींकरीता खर्चाचे अंदाजे 50 टक्के किंवा कमाल रु. 2.00 लाख यापैकी कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणून दोन हप्त्यात देण्यात येते.
            याकरिता संस्थेच्या मालकीची किंवा दीर्घ मुदतीच्या करारावर (33 वर्षाचे वर) उपलब्ध असलेली सुयोग्य आकरमानाची सलग जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. 200 मी. अथवा 400 मी. धावनमार्ग करता येईल अशी सुयोग्य आकाराची व सलग जमीन असणे आवश्यक आहे.  तरी जळगांव जिल्हयातील जास्तीत जास्त सस्था अथवा संस्था चालकांनी सदरच्या योजनेचा लाभ घ्यावा.

कामात पारदर्शकता ठेवून लोकसेवा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन


        जळगांव, दि. 31 :-राष्ट्रीय संकल्प दिनानिमित आज (दि.31 ऑक्टोंबर रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचा-यांना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी प्रतिज्ञा दिली. सदरच्या प्रतिज्ञेप्रमाणे सर्वांनी लोकसेवक म्हणून काम करत असताना आपल्या कामात सचोटी व पारदर्शकता ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
            मा. जिल्हाधिकारी राजूरकर यांनी अधिकारी / कर्मचा-यांना पुढील शपथ दिली ‘‘आम्ही भारताचे लोक सेवक, याव्दारे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, आम्ही आमच्या सर्व कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याचा सातत्याने आटोकाट प्रयत्न करु. आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्य करु. आम्ही दक्ष राहून आमच्या संघटनेच्या वृध्दीसाठी व लौकीकासाठी कार्य करु. आमच्या सामुदायिक प्रयत्नांनी आम्ही आमच्या संघटनांना अभिमान प्राप्त करुन देऊ आणि आमच्या  देशबांधवांना मूल्याधिष्ठीत सेवा पूरवू. आम्ही आमचे कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडू आणि भय किंवा पक्षपात या विना कार्य करु.’’         

पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर जिल्हा दौ-यावर



           जळगांव, दि. 31 :- राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री       ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे,
गुरुवार, दिनांक 1 नोव्हेंबर, 2012 सकाळी 6.55 वा. जळगांव रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण,  सकाळी 7.05 वा. मधुबन जळगांव येथे आगमन व राखीव सकाळी 9.00 वा. टहाकळी, ता. धरणगांव आयडब्ल्एमपी अंतर्गत गांव प्रवेश बाबींचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती , सकाळी 9.30 वा. फुलपाठ, ता. धरणगांव   आयडब्ल्एमपी अंतर्गत गांव प्रवेश बाबींचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10.00 वा. दोनगांव ता. धरणगांव आयडब्ल्एमपी अंतर्गत गांव प्रवेश बाबींचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती , सकाळी 10.30 वा. महात्मा ज्योतीबा फुले जल व भुमि अभियान (एमआरईजीएस) अभिसरण मेळावा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : विश्वकर्मा हॉल, धरणगांव जि. जळगांव दुपारी 12.00 ते 4.30 राखीव सायं 5.00 वा. पाणी आरक्षण निश्चित करण्याबाबत बैठक स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव सायं 6.ते 7.00 शासकीय विश्रामगृह पदमालय येथे राखीव व मुक्काम
            शुक्रवार , दिनांक 2 नोव्हेंबर , 2012 सकाळी 8.30 ते 10.30 राखीव, सकाळी 10.30 वा. महात्मा ज्योतीबा फुले जल व भुमि अभियान (एमआरईजीएस) अभिसरण मेळावा कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव, दुपारी 2.00 ते 2.30           वा. राखीव, दुपारी 3.00 वा. मोटारीने जळगांव येथून चाळीसगांवकडे प्रयाण, सायं 4.00 ते 6.00 वा. दहिवद, ता. चाळीसगांव विविध कामांचे उदघाटन सायं 6.00 वा. जळगांवकडे प्रयाण, रात्री 9.55 वा. सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण.

Tuesday, 30 October 2012

"विश्वाचे आर्त" पुस्तक प्रत्येक संवेदनशील माणसाला विचार करायला लावेल - मुख्यमंत्री



मुंबई, दि. 30 : पर्यावरणाचे संरक्षण आणि जागतिक तापमान वाढ हा संपूर्ण जगभरात कळीचा मुद्दा बनलेला आहे. देऊळगावकर यांनी या महत्त्वाच्या विषयावर आणि प्रत्येक सजीव प्राणीमात्राच्या जीवन मरणाशी संबंधीत  लिहिलेले "विश्वाचे आर्त" पुस्तक प्रत्येक संवेदनशील माणसाला विचार करायला लावेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
            प्रसिद्ध लेखक अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या "विश्वाचे आर्त" या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले.  त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी लोकवाड्‍.मय गृहाचे सतीश काळसेकर, श्रीमती वैशाली वैद्य, संदीप वासलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले, प्रचंड वेगाने होणारे नागरिकीकरण, जंगलाची बेसुमार तोड, प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन, वाहनापासून होणाऱ्या हवेचे प्रदूषण आदी विविध कारणांमुळे पृथ्वीचे वातावरण संकटात आले असून पर्यावरण आणि तापमान वाढ याबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे. देऊळगावकर यांचे पुस्तक यासाठी मोलाचा हातभार लावेल, असेही त्यांनी सांगितले.
            हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीच्या समस्येमुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर ठाकले असून या समस्येवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. "मला वाचवा" अशी साथ घालून वसुंधरा विनवणी करीत आहे हेच "विश्वाचे आर्त" आहे. ही आर्त आपणास ऐकू यावयास हवी. श्री. देऊळगावकर यांनी या पुस्तकातून एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे, या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर झाल्यास इतर भाषिक लोकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  
            यावेळी या "विश्वाचे आर्त" या पुस्तकातील निवडक पुस्तकाचे वाचन अतुल पेठे, गजानन परांजपे, गितांजली कुलकर्णी यांनी केले.

डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग, महापालिका, व जिल्हास्तरीय यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावे - आरोग्यमंत्री



मुंबई, दि. 30 : डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागासोबत महापालिका, जिल्हापरिषद व जिल्हास्तरीय यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.अशी सूचना आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आज येथे केली.
            मुंबईसह राज्यातील काही भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
            चर्चेच्या प्रसंगी आरोग्यमंत्री म्हणाले की, डेंग्यू रोगाला कारणीभूत असणारे विशिष्ट प्रजातींचे डास साठवून ठेवलेल्या उघड्या स्वच्छ पाण्यात जसे डबे, टायर, पाण्याच्या टाक्या अशा ठिकाणे आढळून येतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अशी ठिकाणी शोधून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे, जेणे करून डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती तेथे होणार नाही. डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी महापालिका, जिल्हापरिषद आणि आरोग्य विभागाने एकत्रित उपाययोजना करावी, ग्रामीण भागात डेंग्यू संदर्भातील जनजागृतीच्या कामासाठी आशा कर्मचाऱ्यांची देखील मदत घेण्यात यावी असे श्री. शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
            राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयातील औषधांच्या साठ्याबाबतचा आढावाही यावेळी घेण्यात आला. सर्व रुग्णालयात औषधांची उपलब्धता राहील याबाबत आरोग्य संचालनालयाने दक्षता घ्यावी असे निर्देश श्री. शेट्टी यांनी यावेळी दिले.
            डेंग्यूच्या आजाराबाबत आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांनी सांगितले. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असल्याचे श्री. बेंजामिन यांनी सांगितले.
बैठकीस एनआरएचएमचे प्रकल्प संचालक विकास खारगे, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. सतीश पवार, डॉ. खाणंदे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील ग्रंथालये संगणकाने जोडणार - राजेश टोपे



मुंबई, दि. 30 : राज्यातील ग्रंथालयांचे संगणकीकरण करण्याचे काम महाराष्ट्र ज्ञान विकास महामंडळाला देण्यात आले असून ही सर्व ग्रंथालये संगणकाच्या सहाय्याने जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्राशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालये पुरस्कार आणि डॉ. एस. आर. रंगनाथन् ग्रंथमित्र पुरस्कार 2011-12 चा वितरण समारंभ आज शासकीय मध्यवर्ती ग्रंथालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी समारंभाचे अध्यक्ष म्हणून श्री. टोपे बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू, राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. जे.बी. नाईक, ग्रंथालय संचालक दि.श्री. चव्हाण आणि ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते व स्वयंसेवक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
आजचे युग हे संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे आहे. ई- बुकस् आणि ई-लायब्ररीच्या युगात पारंपरिक ग्रंथालयांमध्ये काही बदल करावे लागणे अपरिहार्य आहे असे सांगून श्री.टोपे पुढे म्हणाले की, ग्रंथालये ही माहितीकेंद्रे आणि ज्ञानकेंद्रे व्हावीत यासाठी त्यांचा संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक विकास होणे आवश्यक आहे. या चळवळीच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती रुजावी आणि ग्रामीण भागात तसेच वाड्या-वस्त्यांपर्यंत प्रेरणादायी यशकथा सांगणारी पुस्तके पोहचावी अशी अपेक्षा श्री.टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
ग्रंथालय चळवळीच्या विकास आणि विस्ताराबाबत शासनाचे धोरण सकारात्मक आहे. दर पाच वर्षांनी ग्रंथालयांच्या अनुदानाची रक्कम दुप्पट करण्याच्या अनुषंगाने राज्यातील ग्रंथालयांची पटपडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रंथालय चळवळ निकोप आणि सुदृढ करण्यासाठी जी ग्रंथालये निकषानुसार चालवली जात नसतील त्यांच्या बाबत कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही श्री. टोपे यांनी यावेळी दिला. राज्य ग्रंथालय परिषदेच्या निर्मितीचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला असून जिल्हास्तरावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी हे पद निर्माण करुन त्यांना अधिक अधिकार दिले जातील, अशी घोषणाही श्री. टोपे यांनी यावेळी केली.
मधूकर भावे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त ग्रंथालयांचे तसेच ग्रंथालय सेवक व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. सध्या एका गावातील एकाच ग्रंथालयांना अनुदान दिले जाते. ग्रंथालय कायद्यातील ही त्रुटी दूर करुन गावात जेवढी चांगली ग्रंथालये असतील त्या सर्वांना अनुदान दिले जावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
वाचन संस्कृती तळागाळापर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ग्रंथालय चळवळ नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास जे.बी.नाईक यांनी व्यक्त केला.
प्रारंभी द.श्री. चव्हाण यांनी राज्यातील ग्रंथालय संचालनालयाच्या कार्याविषयी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय तसेच डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट कार्यकर्ता व कर्मचारी ग्रंथमित्र पुरस्कारांविषयी माहिती दिली. उत्कृष्ट ग्रंथालयाचा ‘अ’ वर्ग पुरस्कार पुणे मराठी ग्रंथालय नारायण पेठ, पुणे यांना देण्यात आला. तर ग्रामीण विभागात सार्वजनिक वाचनालय राजगुरु नगर, पुणे यांना देण्यात आला. पन्नास हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. डॉ. गजानन जगन्नाथ कोटेवार, रामनगर, वर्धा यांना तर उकृष्ट कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार बबन नामदेव आखरे, खामगाव, जि. बुलडाणा यांना देण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभात आठ उत्कृष्ट ग्रंथालये, सात उत्‍कृष्ट कार्यकर्ते आणि पाच उत्कृष्ट कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Thursday, 25 October 2012

त्याग आणि सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लागावी


त्याग आणि सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लागावी
बकरी ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांचा संदेश

मुंबई, दि.25:  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बकरी ईद निमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, बकरी ईद या सणामुळे त्यागाची भावना, सामाजिक ऐक्य वाढीस लागते. समाजातील प्रत्येक घटकामध्ये मैत्रीचा  आणि बंधूत्वाचा संदेश देणारा हा सण राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता प्रस्थापित करणारा आहे. महाराष्ट्राने नेहमीच सामाजिक सौहार्द आणि ऐक्याचा पुरस्कार केला आहे. बकरी ईदच्या मंगलप्रसंगी आपण सारे हे सामाजिक ऐक्य वाढीस लागण्यासाठी मिळून काम करु या आणि सर्वधर्मसमभावाचे पालन करुन या तत्वाचा सर्वत्र प्रसार करु या.
या पवित्र दिनी आपण सगळे त्याग, ईश्वराप्रती प्रेम आणि समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याची समर्पण वृत्ती अंगिकारण्याची शिकवण देऊ या, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
                                              * * * * * * *

Wednesday, 24 October 2012

पालकमंत्री ना. देवकर यांच्या हस्ते शिरसोली ( ब्र. बो.) येथील सामाजीक सभागृहाच्या कामाचे भूमीपूजन

जळगांव, दिनांक 24 :- आमदार स्थानिक विकास निधी सन 2010-2011 अंतर्गत शिरसोली प्र.बो. येथे सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले .
            यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गप्फार मलीक, जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मीक पाटील, ज्येष्ठ नेते जगतराव पाटील, सरपंच श्रीमती सोनवणे, स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख प्रभाकर शिंपी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पी.जे. पाटील आदी उपस्थित होते.
            सदरील सभागृहाच्या कामाकरिता आमदार निधीतून सुमारे सात लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सदरचे काम त्वरित पूर्ण करण्याची सूचना ना. देकवर यांनी यावेळी केली. तसेच श्री. स्वामी समर्थ केंद्राचे शिरसोली परिसरात बालसंस्कार, व्यसनमुक्ती आदी सामाजीक उपक्रमातील सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
            ग्रामीण भागातील लोकांना दैनंदिन जीवनातील समस्यांमुळे आलेले वैफल्य दूर करुन एक सुसंस्कारीत पिढी घडविण्याबरोबरच शांततामय वातावरण निर्माण करण्याचे काम केंद्राच्या वतीने केले जात असल्याने त्यांच्या या कामाला सामाजीक सभागृहाच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे काम करण्यात येत असल्याचे ना.देवकर यांनी सांगितले.
            प्रारंभी केंद्र प्रमुख प्रभाकर शिंपी यांनी प्रास्तावीक केले तर आभार श्री. बारी यांनी मानले.

                                                  * * * * * *

Tuesday, 23 October 2012

वाघुर धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित शेतीसाठी पाणी उचलण्यास बंदी

            जळगाव, दिनांक 23 -  जिल्हयातील वाघुर धरणाच्या परिसरात या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे धरणात दिनांक 22 ऑक्टोंबर,2012 रोजी फक्त 2.42 दशलक्षघनमीटर इतका अत्यल्प उपयुक्त साठा आहे. धरणातील सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी राखुन ठेवण्यात आलेले आहे. शासनाचे आदेशानुसार जलाशयातील पाण्यावर चालत असलेले सर्व कृषी पंप त्वरीत बंद करुन त्याची विद्युत जोडणी महावितरण कंपनीने खंडीत करण्यात आलेली आहे. धरणात पाणी उपलब्ध नसल्यामुळे जलसंपदा विभागाने यापूर्वी पाणी परवानगी दिलेली असली तरी विद्युत पंपाने अथवा इतर माध्यमाने धरणातून शेतीसाठी पाणी उचलण्यास बंदी घालण्यात आली आहे असे असतांना धरणांच्या जलाशयातील काही कृषी पंप चालु असल्याचे आढळुन आल्यास असे कृत्य हे पिण्याच्या पाण्याची चोरी अथवा गैरप्रकार समजुन भारतीय दंड संहिता कलम-430 अन्वये गुन्हा ठरेल. सदरील गुन्हा अदखलपात्र स्वरुपाचा असून अशा गुन्हेगारांविरुध्द कायद्यात शिक्षेची तरतुद आहे तरी सर्व संबंधीतांना या निवेदनाव्दारे जाहिर आवाहन करण्यात येते की, वाघुर जलाशयामधुन शेतीपंप लावुन पाणी वापर करु नये व असे केल्याचे निदेर्शनास आल्यास अपकृती करणा-याविरुध्द गुन्हा नोंदवुन योग्य ती पुढील कारवाई करण्यात येईल. चालु वर्षी पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवणार असल्याने सर्व शेतकरी बंधुंनी जलसंपदा विभागास या बाबतीत सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *



जिल्हयात साथ रोगांच्या प्रतिबंधाकरिता
स्वच्छता पंधरवाडा मोहिम राबवावी
                                      --पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर
            जळगाव, दिनांक 23 -  जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात डासांचा मोठा प्रार्दुभाव झाला असून त्यातून साथीच्या रोगांचा फैलाव होऊन नागरिक हैराण झालेले आहेत त्यामुळे प्रशासनाने सर्व नागरिक, कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेऊन जिल्हयात ``स्वच्छता पंधरवाडा`` मोहिम राबविण्याची सूचना पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी दिली. ते आज दुपारी पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित डेंग्युबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, प्रभारी महानगरपालिका आयुक्त सोमनाथ गुंजाळ, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.लाळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, मनपा आरोग्य अधिकारी विकास पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी एस.बी.सोनवणे, जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मीक पाटील आदि उपस्थित होते.
            ना.देवकर पुढे म्हणाले की, साथीच्या रोगांवर प्रतिबंधाकरिता सर्व शासकीय विभागांनी समन्वय ठेवुन कार्य करावे. डासांवर नियंत्रण आणणे महत्वाचे असून त्याकरिता आरोग्य विभागाने जळगाव शहरासह व ग्रामीण भागात सर्वत्र फॉगींग, ॲबेटींग करणे आवश्यक आहे. डेंग्यु, चिकनगुनिया, स्वाईन फल्यू आदि साथीच्या रोगांवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्याकरिता प्रशासनाने त्वरीत डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कार्यवाही करावी, असे त्यांनी सूचित केले.
            जिल्हयात सर्वत्र डासांचा प्रार्दुभाव झाला असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम प्रशासनाने राबविण्याची सूचना ना.देवकर यांनी केली त्याकरिता सर्व नागरिक, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून जिल्हयात ``स्वच्छता पंधरवाडा`` मोहिम राबविण्याची सूचना त्यांनी केली. या मोहिमेची प्राथमिक तयारी प्रशासनाने करुन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापासून सदरच्या मोहिमेची अंमलबजावणी करावी त्याकरिता पूर्वतयारी आढावा बैठक 1 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
            प्रारंभी आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी जिल्हयातील आजपर्यंतचे डेंग्यु, चिकनगुनिया, स्वाईन फल्यू आदि रुग्णांबाबत माहिती ना.पालकमंत्री यांना दिली तसेच आरोग्य विभागाच्या वतीने साथीच्या प्रतिबंधाकरिता करण्यात आलेल्या उपाय-योजनांची माहितीही बैठकीत देण्यात आली यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी नशिराबाद, कु-हे, अंतुर्ली, शिरसाळा, खिरोदा आदि गावांमध्ये फॉगींग तेथील नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आल्याची माहिती दिली. डेंग्युच्या संदिग्ध रुग्णांचे रक्ताचे सॅंपल त्वरीत पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्याची सुविधा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.लाळीकर यांनी दिली.
            जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील सुमारे साडेपाच लाख लोकांचा सर्व्हे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला असून त्यात सुमारे 1200 लोकांना ताप असल्याचे आढळले तर 69 हजार घरातील पाणी साठयाची तपासणी करुन तेथे फॉगींग, ॲबेटींग, पाणी साठा नष्ट करणे आदि कार्यवाही करण्यात आल्याची माहिती प्रभारी आयुक्त गुंजाळ यांनी दिली.
            जिल्हा आरोग्य अधिकारी व मलेरिया अधिकारी यांनी शिरसोली गावात जाऊन तेथील स्वच्छतेबाबत कार्यवाही करावी तसेच साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून तात्काळ उपाय योजावेत अशी सूचना ना.देवकर यांनी केली तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून शल्य चिकित्सकांनी लक्ष घालुन साफसफाईची कामे करुन घेण्याची सूचना त्यांनी केली.
1 नोव्हेंबर रोजी बैठक
            जिल्हयात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असल्याने डासांचा प्रार्दंभाव झालेला आहे त्याकरिता प्रशासनातर्फे स्वच्छता पंधरवाडा राबविला जाणार आहे. त्यासंबंधीची पुर्वतयारी बैठक दिनांक 1 नोव्हेंबर,2012 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3 वाजता मा.पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे तर दिनांक 6 ते 20 नोव्हेंबर,2012 या कालावधीत जिल्हयात सर्वत्र ``स्वच्छता पंधरवाडा`` मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिली.
* * * * * * * *


महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सामूहिक
पाणी पुरवठा योजना बंद करु नयेत
                                   --पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर

जळगाव, दिनांक 23 -  जिल्हयातील सामूहिक पाणी पुरवठा योजनांची थकीत पाणी पुरवठा रक्कम व वीज बिले सदरच्या गावांनी भरणे आवश्यक आहे तरी जिल्हयात टंचाईसदृष्य परिस्थिती असल्याने अशा योजनेतून होणारा पाणी पुरवठा महाराष्ट्र् जीवन प्राधिकरणाने थांबवु नये अशी सूचना पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी केली ते पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पहुर-नेरी परिसरातील आठ गावांच्या पाणी पुरवठा योजनेबाबत आढावा घेत होते.
यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, महाराष्ट्र् जीवन प्राधिकरणाचे अभियंता श्री.जैन, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.ठाकुर व पहुर-नेरी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सदरची योजना थकीत वीज बील व कर्मचा-यांच्या पगाराबाबतच्या समस्येत अडकली असून महाराष्ट्र् जीवन प्राधिकरणाकडून सदरच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे प्रस्तावित आहे परंतू जिल्हा परिषदेकडे असलेल्या 12 सामुदायिक योजनाच सुरळीत नसल्याने ही योजना ही त्यांच्याकडून चालविणे शक्य नसल्याची माहिती पाणी पुरवठा अधिकारी (जि.प.) श्री.ठाकुर यांनी दिली.
* * * * * * * *
   

जिल्हयात पुर्नवसनाची कामे दर्जेदार व्हावीत
--जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर--

जळगाव, दिनांक 23 -  जिल्हयातील पुर्नवसनाची कामे दर्जेदार होणे आवश्यक असून लोकांच्या पुर्नवसनाबाबत संबंधीत विभागाने लोकांची व प्रशासनाची ही सोय होऊन सदरचे पुर्नवसन त्वरीत मार्गी लागेल याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सकाळी आयोजित पुर्नवसनाबाबतच्या बैठकीत ते अधिका-यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, तापी सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता व्ही.डी.पाटील, जिल्हा पुर्नवसन अधिकारी श्री.राजगुरु, विशेष भुसंपादन अधिकारी सर्वश्री प्रविण महिरे, सैंदाणे, दीपमाला चौरे, कार्यकारी अभियंता राजश्री घाणे, तहसिलदार बबनराव काकडे, सर्व तालुका भूमि निरिक्षक आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजूरकर यांनी जिल्हयातील वाघुर, हतनुर, सुकी, पाडळसे धरणांमुळे पुर्नवसित झालेले लोक तसेच अंजनी, तापी नदीच्या पुररेषेमुळे पुर्नवसित लोकांच्या पुर्नवसनाबाबतचा आढावा घेतला यामध्ये विविध प्रकल्प व पुरांमुळे पुर्णत: व अशंत: पुर्नवसन करण्यात आलेल्या गावांचा ही आढावा घेण्यात आला.
जिल्हयातील पुर्नवसनाची कामे व समस्या त्वरीत मार्गी लावण्याकरिता जिल्हा पुर्नवसन अधिका-यांनी इतर संबंधीत विभागांशी समन्वय साधणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राजूरकर यांनी सांगितले तसेच पुर्नवसनाचे काम हाती घेतल्यानंतर तेथे रस्ते, वीज, गटारी, स्मशानभूमी, पाणी पुरवठा आदि कामांना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली.
तसेच ज्या ठिकाणी पुर्नवसनाबाबत अडचणी निर्माण होत असतील अशा ठिकाणी पुर्नवसन अधिकारी, प्रांताधिकारी, अभियंता, तहसिलदार व संबंधीत लोकांमध्ये समन्वय बैठक घेऊन सदरचे प्रश्न मार्गी लावण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली.
* * * * * * * *




25 ऑक्टोंबरला रावेर येथे दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश

            जळगाव, दिनांक 23 -  जिल्हयात दिनांक 25 ऑक्टोंबर,2012 रोजी रावेर येथे दुर्गादेवी विसर्जनानिमित्त मिरवणुकी निघणार आहेत. सदर उत्सव शांततेत व सुरळीतपणे पार पडावा व त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सामाजिक सलोखा रहावा तसेच या कालावधीत रावेर येथील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) नुसार दिनांक 25 ऑक्टोंबर,2012 रोजी रावेर नगरपालिका हद्दीतील व त्या सिमेलगतची देशी / विदेशी मद्याची दुकाने / परमीट रुम, बिअर शॉपी व ताडी विक्रीची दुकाने पुर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी उपरोक्त आदेशाचे उल्लघंन केल्याचे आढळुन आल्यास त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
                                                                  * * * * * * * *



Monday, 22 October 2012

जिल्हयातील 300 गांवे तंटामुक्त करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट


जळगांव. जि. 22 :- जिल्हयात महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता सन 2012-2013मध्ये तीनशे गांवे तंटामुक्त करण्याचे उदिष्टय ठेवण्यात येत असून सदरचे उदिष्टय  पूर्ण करण्यासाठी सर्व अधिका-यांनी जाणीपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सकाळी आयोजित  महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम अंतर्गत जिल्हा कार्यकारी समितीच्या बैठकीत अधिका-यांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलिस अधिक्षक एस. जयकुमार, अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, अप्पर पोलीस अधिक्षक रुपसिंग तडवी, प्रांताधिकारी सर्वश्री. रविंद्र राजपूत, राहुल मुंडके, गणेश मिसाळ,तुकाराम हुलवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, विवेक पानसारे, पोलिस निरीक्षक मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजन पाटील, उत्पादन शुल्क अधिक्षक श्री. पाटील आदि उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी राजूरकर पुढे म्हणाले की, जिल्हयातील जास्तीत जास्त गांवे तंटामुक्त होण्यासाठी गावांमध्ये जागृती घडवून आणावी. त्याकरिता तालुकास्तरावर 10 नोव्हेंबर पर्यत मेळावे आयोजित करावेत. तसेच प्रत्येक महिन्याला गट विकास अधिकारी व तहसिलदार यांनी तंटामुक्त गांव समितीच्या कामाचा आढावा घेण्याची सूचना त्यांनी केली.
            तसेच जिल्हयातून मोहिमेंतर्गत जी गावे निवडलेली असतात त्या गवाचे सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवावे. जेणे करुन बाहेरील जिल्हयाची समिती तपासणीसाठी आली असता केलेल्या कामाचे व रेकॉर्डचे सादरीकरण चांगले असावे. ज्यामुळे गांव तंटामुक्त होण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी राजूकर यांनी सोगितले.कारण जिल्हयात सदरच्या मोहिमेचे काम चांगले केले जात असून रेकॉर्ड च्या अभावी गांवे तंटामुक्त होण्याचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
            राज्य शासनाकडून सदरच्या मोहिमेत गांव तंटामुक्त  समित्यांना प्रत्येकी  एक ते दोन हजाराच्या निधी कार्यालयीन खर्चासाठी मिळणार आहे. सदरचा निधी, रेकॉर्ड मेनटेन करणे व पुरस्काराचा निधी कसा खर्च करावा याकरिता तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती पोलिस अधिक्षक एस. जयकुमार यांनी दिली. जिल्हयात सदच्या मोहिमेतून अधिकाधिक गांवे तंटामुक्त होण्याची क्षमता आहे. परंतू  रेकॉर्ड अभावी व पाठपुरावा न केल्याने गांवे तंटामुक्त होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे जिल्हयातील जास्तीत जास्त गांवे तंटामुक्त व्हावी म्हणून रेकॉर्ड व्यवस्थतीत ठेवणे, तंटामुक्तीसाठी  पाठ पुरावा करणे याकरिता कार्यशाळेत  भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
            जिल्हयातील 15 तालुके, 29 पोलिस स्टेशन, 1151 ग्रामपंचायती पैकी 1139 ग्रामपंचायती व 1238 ग्रामरक्षक दले मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक रुपसिंग तडवी यांनी दिली. तर मोहिमेत कंडारी (भुसावळ), बांभोरी प्र. चा. (धरणगांव), तामसवाडी (रावेर), खिरोदा प्र. मस्कावद बु, मस्कावद खु. मांगा, थोरगव्हाण, उदळी बु., सावखेडा खु., सावखेडा बु, ( सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत) आदि 12 ग्रामपंचायतीनी महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेत सहभाग नोंदविला नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पोलिस विभागाकडून जिल्हयातील 349 गांवे दत्तक घेण्यात आली असून सदरची गांवे तंटामुक्त करण्यासाठी  प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले.
            मोहिमेच्या अंमलबजावणीपासून मागील पाच वर्षात जवळपास अडीचशे गांवे तंटामुक्त झाली असून सन 2012-2013 मध्ये 300 गांवे तंटामुक्त करण्याचे उदिष्टय कार्यकारी समितीच्या बैठकीत एकमताने ठेवण्यात येऊन त्या करिता गावांमध्ये जनजागृत करुन रेकॉर्ड मोहिमेचे व्यवस्थीत ठेवले जाणार आहे.
                                                                    * * * * * * *

लोककलावंतांसाठी विमा योजना आणण्यासाठी शासन प्रयत्न करील -मुख्यमंत्री

मुंबई, दि. 22: लोककलावंतांसाठी विमा योजना आणण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न केले जातील असे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
राज्य शासनाचा महिला व बाल विकास विभाग, भारत सरकारची संगीत नाटक अकादमी आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व लोकरंग सांस्कृतिक मंच, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
 मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राच्या समाज जीवनात लोककलांना अनन्य साधारण महत्व आहे. विविध लोककलांमध्ये नेहमीच पुरुष हा सूत्रधार राहीला असून महिला कलावंत दुय्यमस्थानी राहिल्या आहेत. या लोककलांना आणि त्या कला जिवंत ठेवणाऱ्या लोककलावंतांना रामान्यता देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.
विठाबाईंच्या स्मारकासाठी प्रयत्न:
मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीला अनुदानावर आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे विठाबाई नारायणगावकर यांच्या नारायणगांव येथील स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन निश्चितपणे पाले उचलील. महिला कलावंतांच्या घरांसाठी नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील तथापि सद्या भूखंड वाटपास न्यायालयाची स्थगित आहे. ती उठल्यानंतर विचार केला जाईल,  असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लोककला व मनोरंजन यातून मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. तालुक्याच्या ठिकाणीही प्रेक्षकगृह होतील असा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. आजचे संमेलन हा स्त्रीशक्तीचा जागर असून महिला लोककलावंतांची हजेरी पाहता हे संमेलन पूर्णपणे यशस्वी झाले आहे. लोककला जिवंत ठेवण्यासाठी तसेच या कलांचा प्रसार देशभर व जगभर व्हावा यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाने काम करावे, असही ते म्हणाले.                                                                
            संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती माया जाधव यांनी या संमेलनाला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून संबोधून गौरव केला. चूल आणि मूल यातून आता महिला मक्त झाल्या आहेत. महिला लोककलावंतांना हे संमेलन नक्कीच नवशक्ती देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकरंजनातून लोक प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या विठ्ठाबाई नारायणगाकर, कांताबाई सातारकर तर थेट नव्या पिढीतील कलावंतांचा उल्लेख करुन  त्यांनी स्त्री शक्तीचा जागर असाच पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. शासनाने लोककलेच्या विकासाचा विचार करावा असे त्या म्हणाल्या.
विधानपरिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, संमेलनाच्या कार्याध्यक्ष राही भिडे यांचीही भाषणे झाली.महिला व बाल विकास मंत्री तथा या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी महिला लोककलांच्या संमेलनास पाठबळ देणे हा महिला सबलीकरणाचा भाग असल्याचे सांगून शासनाने महिला लोककलावंतांच्या संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन, चित्रपट महोत्सव या प्रमाणे अनुदान द्यावे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रचार, प्रसारासाठी महिला लोककला पथकांना मोठया प्रमाणात कार्यक्रम दिले जावेत असे सांगून त्या म्हणाल्या लोककलावंतांनी लोक कलेच्या माध्यमातून मोठे समाज प्रबोधन केले असल्याचा गौरव त्यांनी यावेळी केला.
संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती वसंतराव डावखरे, संमलेनाच्या अध्यक्षा श्रीमती माया जाधव, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री तथा संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, खासदार एकनाथ गायकवाड, चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, उपकार्याध्यक्षा श्रीमती शैला खांडगे,  साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, सुमंगल पब्लिकेशनचे संचालक जयराज साळगांवकर, पु. . देशपांडे अकादमीच्या प्रकल्प संचालिका श्रीमती सुप्रभा अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
या संमेलनात राजस्थान, त्रिपूरा, छत्तीसगड आदी राज्यातील महिला लोककलावंत त्याचप्रमाणे राज्यातील महिला कलावंत मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                     * * * * * * *