Monday, 10 September 2012

पीडित महिलांसाठी बँकानी शून्य रुपये शिल्लकीवर खाते चालू करावे - प्रा. वर्षा गायकवाड


मुंबई, दि. 10 : कौटुंबिक हिंसाचारा अंतर्गत घराबाहेर काढलेल्या महिलांना न्यायालयाच्या आदेशानुसार पोटगी व इतर सवलती दिल्या जातात. परंतु बऱ्याचदा या पीडीत महिलांची बँकेत खाती नसतात. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या पोटगीचे धनादेश बँकेत जमा केले जाऊ शकत नाहीत. अशा पीडित महिलांना त्यांनी दाखल केलेल्या आरोपपत्राच्या प्रतीवर किंवा न्यायालयाचा अंतिम आदेश हाच पुरावा समजून बँकांनी बचत खाते शून्य रुपये शिल्लकीवर उघडण्यास परवानगी देण्याबाबतच्या सूचना केंद्र शासनाने बँकांना द्याव्यात, असे महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज येथे सांगितले.
          कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत पीडीत महिलांना न्याय मिळावा यासाठी काय उपाययोजना करता येतील यासंबंधी राज्यातील कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पीडित महिलांना सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या (सर्व्हिस प्रोव्हायडर) प्रतिनिधींची चर्चा करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. गायकवाड मार्गदर्शन करीत होत्या. 
श्रीमती गायकवाड म्हणाल्या, महिलेला घराबाहेर काढल्यानंतर तिच्याकडे कोणतेही पाठबळ राहत नाही, बँकांच्या सहकार्याने बचत खाते उघडल्यास पीडित महिलेला मोठा आधार मिळेल व ती स्वावलंबी आयुष्य जगू शकेल. तसेच कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांना जयश्री विमा योजना व आम आदमी विमा योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी या योजनेत विशेष सवलत देण्यात यावी अशी मागणीही आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी माजी राज्यमंत्री श्रीमती रजनीताई सातव, आमदार शोभाताई फडणवीस, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, महिला बालविकास आयुक्त राजेंद्र चव्हाण, राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव ए. एन. त्रिपाठी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment