Tuesday, 25 September 2012

माथाडी कामगारांच्या विविध समस्या उच्चस्तरीय बैठक घेऊन मार्गी लावू - मुख्यमंत्री



मुंबई, दि. 25 : माथाडी कामगारांच्या विविध समस्या, त्यांच्या घरांचा प्रश्न, माथाडी कामगार कायद्यातून कंपन्यांना मिळत असलेली सुट आदी विविध समस्यांच्या निराकरणासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.  
महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनतर्फे स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष आणि माथाडी कामगार नेते स्व. आण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त चिंचबंदर येथील महाजनवाडी सभागृहात आज आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावीत, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार भाई जगताप, कामगार नेते बळवंतराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, माथाडी कामगार कायद्यातून सूट मिळविण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्न करीत असतात. या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने कुणाला सूट मिळणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मुंबईच्या जडणघडणीत माथाडी कामगारांचे अनन्यसाधारण योगदान आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत घरे मिळू न शकलेल्या गिरणी कामगारांना त्यांच्या गावाकडे घरे देता येऊ शकतील का याबाबत प्रयत्न सुरु आहेत. त्याच धर्तीवर निवृत्त झालेल्या किंवा गावाकडे गेलेल्या माथाडी कामगारांना शासकीय जागा उपलब्ध करुन गावाकडे घरे देण्याबाबत प्रयत्न केले जातील.
1969 मध्ये माथाडी कामगारांसाठी राज्यात क्रांतीकारी असा माथाडी कामगार कायदा करण्यात आला. अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. यापुढील काळातही माथाडी कामगार कायद्याद्वारे माथाडी कामगारांचे हितरक्षण केले जाईल. शासनाची भूमिका ही सदैव माथाडी कामगारांना न्याय देण्याचीच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

No comments:

Post a Comment