Wednesday, 12 September 2012

विभागीय स्तरावर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधावे - मुख्यमंत्री



मुंबई, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात विभागीयस्तरावर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुसज्ज वसतीगृह बांधण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिल्या.
            स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात आयोजित करावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक आज विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, समितीचे सदस्य मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री आर. आर. पाटील, जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे व पाटबंधारे महामंडळ) रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार अरुण गुजराथी, उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विभागीयस्तरावर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात विभागीयस्तरावर वसतीगृह बांधण्याची योजना हाती घेण्याबरोबरच स्व. यशवंतराव चव्हाणांच्या 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्राचे ऑडियो रेकॉर्डिग करुन ते वेबसाईटवर उपलब्ध करावे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे या गावी त्याच्या मूळ घराच्या ठिकाणी स्मारक करण्यासाठी जागा अधिग्रहीत करता येईल का याबाबत कार्यवाही करावी. स्व. यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. या जन्मशताब्दी वर्षात करावयाच्या विविध कामकाजाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला.
            याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विभागीय स्तरावर मुलां-मुलींसाठी वसतीगृह बांधण्याबरोबरच कराड येथेही वसतीगृह बांधण्याबाबतची कार्यवाही करावी.
            देवराष्ट्रे येथे अत्याधुनिक सभागृह बांधण्याबाबत‍ कार्यवाही करावी, अशी सूचना पतंगराव कदम यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment