चाळीसगांव दि.14 : येथील कृषि विभागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, जलसंधारण, रोहयो, रोजगार व स्वयंरोजगार, परिवहन तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी चाळीसगांव तालुका कृषि अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह कक्षात घेतली.
या बैठकीला तालुक्याचे आमदार राजीव देशमुख, तहसिलदार शशिकांत हतगल, पोलीस निरीक्षक लक्ष्मण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुका कृषि अधिकारी श्री. शिंदे यांनी कृषि योजनांमध्ये खरीप हंगामात वैरण विकास कार्यक्रम तालुक्यात 500 हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात आला असून यातंर्गत शेतक-यांना ज्वारी बियाणे, रासायनिक खते वाटपाबाबत तसेच कृषि विभागाच्या विविध योजना, पिक परिस्थिती, पर्जन्यमान यांविषयी सविस्तर माहिती कृषिमंत्री ना. गुलाबराव देवकर यांना दिली.
कृषिमंत्री ना. देवकर म्हणाले की तालुक्यात वैरण विकास कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त शेतक-यांना याचा लाभ मिळण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करण्याच्या सुचना यावेळी तालुका कृषि अधिकारी यांना देण्यात आल्या.
या बैठकीत तहसिलदार शशिकांत हतगल यांनी तालुक्यातील शेतक-यांना कापूस मदत वाटपासाठी शासनाकडून 20 कोटी 90 लाख अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी 18 कोटी रुपयांचे कापूस वाटप मदत शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यांत आले असून उर्वरित रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यांची प्रक्रिया सुरु आहे. तसेच धरणातील पाणीसाठयाबाबत सविस्तर माहिती दिली.
या बैठकीस मंडळ कृषि अधिकारी श्री. एस. बी. पाटील व श्री. एस. पी. देसले उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment