Tuesday, 24 June 2025

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवन मध्ये विशेष प्रदर्शनाचे आयोजन


         जळगाव दि. 24 ( जिमाका ):– भारताचे चर्चित पर्व ठरलेली आणीबाणी (Emergency) २५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आली होती. यावर्षी या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने, या निमित्ताने जळगावमध्ये अल्पबचत भवन मध्ये शासनातर्फे विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

                 बुधवार, २५ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्प बचत भवन येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

                 या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने विविध घटना/घडामोडी, -आणीबाणी विरोधी संघर्षात सहभागी झालेले विविध कार्यकर्ते/नागरिकांची छायाचित्रे समाविष्ट तसेच छायाचित्रांसोबत अनुरुप व औचित्यपूर्ण असा मजकूर, आणीबाणीच्या कालावधीतील संपूर्ण संघर्ष व त्याचे विविध पैलू प्रभावीपणे प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहे. 

                  या प्रदर्शनामध्ये छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त व माहितीपूर्ण मजकूर, घटनाक्रम, माहितीफलक यांची मांडणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, अभ्यासक, नागरिक यांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी टोल सवलत; प्रवेशपत्रासाठी जळगाव आरटीओमध्ये विशेष कक्ष


         जळगाव दि. 24 ( जिमाका ):  —आगामी आषाढी एकादशी (२०२५) निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या व परत येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना दिलासा देणारी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी दिली आहे.

            दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या हलक्या व जड वाहनांसाठी पथ करातून (टोल) सूट देण्यात आलेली आहे. या सूटचा लाभ घेण्यासाठी विहीत नमून्यात सवलत प्रवेशपत्र आवश्यक असून, ते मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

            हा विशेष कक्ष दररोज सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील. प्रवेशपत्र जारी करण्याचे काम याच वेळेत पार पडणार आहे. तरी सर्व भाविक व वाहनचालकांनी याची नोंद घेऊन वेळेत प्रवेशपत्र मिळवावे, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

जळगावमध्ये भव्य प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन – विविध कंपन्यांकडून भरती


       जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हे ड्राईव्ह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे होणार आहे.

                     या ड्राईव्हमध्ये जैन फार्म फ्रेश फुडस.लि. शिरसोली व छब्बी इलेक्ट्रीकल्स, जळगाव या दोन नामांकित उद्योग संस्थांचा सहभाग असून, इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसह संबंधित सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

                   ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी देखील आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहता येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अख्तर तडवी यांनी केले आहे.