Monday, 24 June 2024

विविध पिकांसाठी जिल्ह्यात पीक स्पर्धा ; शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 विविध पिकांसाठी जिल्ह्यात पीक स्पर्धा ; 
शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 24 जून, 2024 ( जिमाका )  : राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडुन विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येत अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकते बाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यामुळे कृषि उत्पादकतामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्यातील एकुण उत्पादनास मोलाची भर पडेल हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना आदिवासी गट व सर्वसाधारण गट असे दोन गटानमध्ये राबविण्यात येत आहे.

पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रूपये सर्वसाधारण गटासाठी रक्कम रूपये ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रू १५० राहिल. पिक स्पर्धा मध्ये खरोप हंगामात मुग उडीद या दोन पिकांसाठी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दिनांक ३१ जुलै २०२४ असुन ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकासाठी अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ आहे.

बक्षिसाचे स्वरूप व वितरण

 स्पर्धा पातळी - तालुका पातळी - सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रूपये तालुका पातळी  पहिले - ५,००० दुसरे -३,००० तिसरे - २,०००, जिल्हा पातळी - पहिले - १०,००० दुसरे - ७,००० तिसरे - ५,००० राज्य पातळी -पहिले - ५०,००० दुसरे - ४०,००० तिसरे - ३०,०००

तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे भाग घेण्यासाठी व अधिकच्या माहिती साठी संबंधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  कुब्रान तडवी यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0 0 0

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 मतदान करण्याचे आवाह

 नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024
मतदान करण्याचे आवाहन


नाशिक ,दिनांक 24 जून, 2024 (विमाका वृत्तसेवा)

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 करिता सर्व मतदारांनी 26 जून,2024 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 वाजे पर्यंत आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदवावे, असे आवाहन  सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांनी केले आहे.

या निवडणूकीत सर्व मतदान केंद्रांतील मतपत्रिकांची सरमिसळ करुन मतमोजणी केली जाते, त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रात कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली, असा तपशिल तयार केला जात नाही. मतदारांनी मोठया संख्येने निर्भयपणे मतदान करावे, असेही श्री.सागर यांनी कळविले आहे
0 0 0 0  0.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024; मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

 नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024;
मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

नाशिक, दिनांक 24 जून, 2024 (विमाका वृत्तसेवा) :

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 26 जून,2024  रोजी होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य

1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

0 0 0 0 0 0 0 0

Friday, 21 June 2024

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे जागतिक योग दिवस' उत्साहात साजरा

 बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे जागतिक योग दिवस' उत्साहात साजरा

जळगाव दिनांक 21 जून, 2024 ( जिमाका ) : आज दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगावातील बँक ऑफ महाराष्ट्र ने ऑफिसर्स क्लब जळगाव येथे  जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने  जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले.

योग दिना साठी जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र. से.), बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव अंचल प्रबंधक श्री प्रवीण कुमार सिंह , सहायक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील , ऑफिसर्स क्लब जळगाव चे सर्व सदस्य व बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव शहरातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

या योग शिबिरासाठी योग गुरु आचार्य श्री आदित्य जहागीरदार व श्रीमती तनया पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. योग गुरु आचार्य श्री आदित्य जहागीरदार यानी योगा चे महत्व सांगीतले योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वत:च्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो.  त्याच बरोबर सर्वांनी योग करुण जागतिक योग दिवस साजरा केला.  ऑफिसर्स क्लब जळगाव ने बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव अंचल प्रबंधक श्री प्रवीण कुमार सिंह यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करुन आभार व्यक्त केले.

0 0 0 0 0 0 0

Thursday, 20 June 2024

जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न




 जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

▪️ दोन हजारा पेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी यांचा सहभाग

जळगाव, दिनांक 21 जून, 2024 ( जिमाका ) : आज दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन हजारापेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागाने उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन " म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने 21 जून रोजी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला.

जळगांव जिल्हा प्रशासन च्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव, नेहरू युवा केंद्र संघटन, जळगांव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जळगांव जिल्हा क्रीडा संघटना महासंघ, जळगांव जिल्हा योग संघटना, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगांव, यांचे संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे सकाळी ७.०० वाजता जळगांव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अधिकारी वेवोतोलु केजो,  शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री विकास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, श्री नरेंद्र, समन्वयक नेहरू युवा केंद्र संघटन जळगांव, श्रीमती सरला पाटील गट शिक्षणाधिकारी, श्री खलील शेख, गट शिक्षणाधिकारी, श्री विनोद बियाणी, रेड क्रॉस, श्रीमती जयश्री पाटील, श्री समाधान बर्कले, पतंजली योग समिती, जळगांव, श्रीमती डॉ अनिता पाटील, जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन, प्रा डॉ नारायण खडके, शिव छत्रपती पुरस्कारर्थी, श्री किशोर चौधरी, श्री सुमेध तळवेलकर, शिव छ्त्रपती क्रीडा पुरस्कारार्थी आदी मान्यवर उपस्थीत होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरुवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, श्री रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्व मान्यवरांचे योगा चे पुस्तक देऊन स्वागत केले. त्या नंतर कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केले. या कॉमन योगा प्रोटोकॉल चे प्रात्यक्षिक जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन च्या खेळाडूंनी सादर केले. अनुभुती इंग्लिश मेडियम स्कुल द्वारा म्युझिकल योगा विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक क्रीडा शिक्षक श्रीमती स्मिता बुरकुल, श्रीमती श्वेता कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सादर केले.

सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थितांचे आभार श्रीमती सुजाता गुल्हाणे, क्रीडा अधिकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे श्री मिनल थोरात, श्री किशोर चौधरी, श्री भारत देशमुख, श्री विनोद कुलकर्णी, श्री उमेश मराठे, श्री गोविंद सोनवणे, श्री विनोद माने, श्री संजय महिरे, श्री सुरज पवार, श्री अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.

0 0 0 0 0 0 0 0 0 0

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची मुलाखत

 


आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची मुलाखत

 मुंबई, दिनांक 20 जून, 2024 : ‘योग’ अभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. दरवर्षी 21 जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग' दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु), वरळी, येथील स्वस्थवृत्त व योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक, डॉ. वृषाली उजेडे यांची विशेष मुलाखत 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

            'आंतरराष्ट्रीय योग' दिवस आणि जागतिक संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी 'योग' अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. तर माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी संगीत फायदेशीर आहे. कोविडनंतर योगचे महत्त्व वाढले असून केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगची मदत घेत आहेत. योग साधना आणि संगीत यांचे मानवी जीवनातील महत्व आणि योगाचे विविध प्रकार, संगीत थेरपी आशा महत्वपूर्ण विषयावर 'दिलखुलास' कार्यक्रमातून डॉ. उजेडे यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार, दि. 21, शनिवार दि. 22 आणि सोमवार दि. 24 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. प्राध्यापक डॉ. सचिन उपलंचीवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0 0 0 0 0 0 0

शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत कृषी विभागाचे आवाहन


 शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत
कृषी विभागाचे आवाहन

 मुंबई, दिनांक 20 जून, 2024 : चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. 

            महाराष्ट्र हे मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरिता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. 

            डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त  खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे.  एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपी खतास चांगला पर्याय आहे.

            एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याचबरोबर टीएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल डीएपी खतास उत्तम पर्याय आहे.

0 0 0 0 0 0 0