Tuesday, 30 May 2017

सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास नैसर्गिक आपत्तीवर मात शक्य : तहसिलदार कैलास देवरे


सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास
नैसर्गिक आपत्तीवर मात शक्य
                                         : तहसिलदार कैलास देवरे

चाळीसगाव दि. 30 मे (उमाका वृत्तसेवा) :  नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिक भावना आणि समन्वय राखल्यास नैसर्गिक आपत्तीवर मात करणे सहज शक्य असल्याचे तहसिलदार कैलास देवरे आज म्हणाले. जुन महिन्यात सुरू होणाऱ्या मान्सूनपुर्व तयारीसाठी तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
            याप्रसंगी गट विकास अधिकारी एम.के.वाघ, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन.के.सोनवणे, उप अभियंता सचिन जोशी, सहा.अभियंता जयेश सुर्यवंशी, डॉ.विशाल पाटील, उप विभागीय अधिकारी वरखेड-लोंढे प्रकल्पाचे सहा. अभियंता एस.आर.पाटील, भारत संचार निगमचे पी.एम.पाटील, देवेंद्र शिंदे, ए.जी.चव्हाण, पी.एस.बावीस्कर, दत्ता गवळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
            यावेळी तहसिलदार श्री.देवरे यांनी मान्सूनपुर्व करावयाच्या कामांचा प्रत्येक विभाग निहाय आढावा घेतला. यावेळी संबंधीत विभागाचा सन 2017 चा आपत्ती व्यवस्थापन आराखडा, SOP (आदर्श कार्यप्रणाली) व महत्वाच्या दुरध्वनी क्रमांकाच्या अद्यावत याद्या तयार करुन तालुका प्रशासनास सादर करणे. 24 बाय 7 विभाग निहाय नियंत्रण कक्ष स्थापन करणे. विभागनिहाय मदत व बचाव पथकांची स्थापना व नोडल ऑफीसर यांची नियुक्ती करणे. शहरातील सर्व लहान मोठ्या गटारी, नाले तसेच शहरातील सार्वजानिक विहीरीतील गाळ काढण्याच्या कामांना गती देणे. शहरातील अतिक्रमीत भागातील अतिक्रमणे त्वरीत दुर करणे. अग्निशमन दल सुसज्ज व अद्यावत ठेवणे तसेच अग्निशमन कार्यासाठी आवश्यक वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे. विज वितरण कंपनीने विज व अटकाव यंत्रणा सज्ज असलेबाबत आपले स्तरावर खात्री करणे. धरणाच्या विसर्गाची माहिती ज्या-ज्या वेळी धरणातुन विसर्ग केला जाईल त्या-त्या वेळी या कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात कळविणे व योग्य दखल घेणे. पुररेषेची आखणी करुन त्या ठिकाणावरील अतिक्रमणे त्वरीत काढणे. मान्सुन कालावधीत साथीचे रोग पसरु नयेत म्हणुन त्या दृष्टीने पुर्व नियोजन करणे. मान्सुन कालावधीत सर्व नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे कामी नियोजन करणे. विभागनिहाय शोध बचाव साधन सामग्रीची देखभाल व दुरुस्ती करणे व ते सुसज्ज ठेवणे. विज वितरण कंपनीने विज वाहक तारांना अटकाव होणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून विज वाहक तारा मोकळ्या करणे. तसेच आपल्या विभागाशी संबंधीत सर्व यंत्रणा तसेच आराखडे अद्यावत करुन सुसज्ज करणे, अशा सुचना तहसिलदार श्री.देवरे यांनी आयोजित बैठकीत उपस्थितांना केल्या.
             तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसात अंगावर विज पडून तीन जणांवर मृत्यू ओढवला अशा वेळी त्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून देण्यात येणारी शासकीय मदतीसाठी प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे तहसिलदार कैलास देवरे यांनी कौतुक करत तालुक्यातील सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बाधितांना तात्काळ मदत पुरविण्यासाठी तत्पर राहून कामकाज केल्यास नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला सहजपणे करता येईल असा विश्वासही तहसिलदार श्री.देवरे यांनी व्यक्त केला.


* * * * * * * *

Friday, 19 May 2017

आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक संपन्न


आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक संपन्न

चाळीसगाव दि. 19 मे (उमाका वृत्तसेवा) : नैसर्गिक आपत्ती व मान्सून पुर्व करावयाच्या कामकाजासाठी तहसिल कार्यालय भडगाव येथे तहसिलदार सी.एम.वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी गट विकास अधिकारी सुभाष जाधव, नायब तहसिलदार अमित भोईटे, मुकेश हिवाळे, विज वितरण कंपनीचे अभियंता शुक्ल, तालुका कृषी अधिकारी जाधव, उमेश शिर्के, संदीप बडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख व सर्व बँक शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
            यावेळी तहसिलदार श्री.वाघ यांनी मान्सूनपुर्व करावयाच्या कामांचा प्रत्येक विभाग निहाय आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ग्रामसेवक व तलाठी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून आपत्कालीन परिस्थितीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सज्ज रहावे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ वरिष्ठांना कळविण्याबाबत सुचना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संबंधित गावातील कर्मचाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नावांच्या याद्या भ्रमणध्वनीक्रमांकासह मागविण्यात आल्या. नगरपरिषदेमार्फत नालेसफाईच्या कामाचा आढावा घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी सुचना देण्यात आल्या. विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाकलेले इलेक्ट्रीक पोल, धोकादायक लोंबकळणाऱ्या तारा आदि बाबत तात्काळ दुरुस्तीसह यंत्रणा अद्यावत ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेसह रोजगार हमी योजनेतील कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे अशा सुचना उपस्थितांना तहसिलदार श्री.वाघ यांनी दिल्या.
मुद्रा लोन योजनेचा प्रचार व प्रसार करा
            केंद्र शासनाच्या मुद्रा लोन योजनेबाबत संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा आढावा घेण्यात आला यावेळी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करुन मुद्रा लोन योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचनाही तहसिलदार सी.एम.वाघ यांनी यावेळी दिल्या


* * * * * * * *

तालुक्यातील विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द् : आमदार उन्मेश पाटील


तालुक्यातील विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द्
                                     : आमदार उन्मेश पाटील

चाळीसगाव दि. 19 मे (उमाका वृत्तसेवा) : बसस्थानकातील चिखल तुडवित प्रवासास सुरूवात करणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांच्या भावना विचारात घेऊन चाळीसगाव बसस्थानाकाचे नुतनीकरणासाठी दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करतांना मनस्वी आनंद होत आहे, तसेच तालुक्यातील प्रत्येक विकासकामांच्या वचनपुर्तीसाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी आज केले.
            चाळीसगाव बसस्थानाचे नुतनीकरणासह काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून भरीव निधी व मंजूरी प्राप्त झाल्याने आज या विकास कामांचे भुमीपूजन आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रिडा सभापती पोपट भोळे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर, परिवहन विभागाचे विभागीय स्थापत्य अभियंता श्री.चव्हाण, आगार प्रमुख सागर झोडगे, आनन खरात, शेखर बजाज, बाबा चंद्रात्रे, सरदारशेठ राजपूत, सुनिल साहेबराव पाटील, ॲड.सोनवणे, मानसिंग राजपूत, अरुण अहिरे, नानाभाऊ कुमावत आदि मान्यवरांसह प्रसार माध्यमांचे प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना आमदार श्री.पाटील म्हणाले, विकासकामांसाठी दळणवळणाची उपलब्धी आवश्यक असते, त्याअनुषंगाने तालुक्यातील रस्ते विकास साधतांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो वा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राज्यासह केंद्रशासनाकडून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करुन तालुक्यातील रस्ते विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सांगतांना आमदार श्री.पाटील पुढे म्हणाले की, तालुक्यातील 136 गावांचा नियमीत संपर्कात येणाऱ्या चाळीसगाव बसस्थानाच्या नुतनीकरणामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण जनतेस मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. नियमीत शैक्षणिक कामासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक सवलतीचे पासेस मिळण्यासाठी ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांमध्ये मासिक सवलती पासेस सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, तसेच तालुक्यातून लांब पल्ल्यांच्या काही बसेस सुरु केल्यास नागरिकांसाठी सोईचे होऊन महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल. या प्रमाणेच अजून काही प्रस्ताव परिवहन महामंडळाला आमदार श्री. पाटील यांनी सादर केले असून त्यांची पूर्तता करण्याच्या सुचनाही त्यांनी उपस्थित परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी आमदार श्री.पाटील यांनी प्रसार माध्यमांकडून होणाऱ्या टिकाटिपणीमुळे दुर्लक्षीत विकास कामे निदर्शनास आणून दिल्याबद्दल सर्व प्रसार माध्यमांचेही विशेष आभार मानले.
            प्रास्ताविकात परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर म्हणाल्या चाळीसगाव बसस्थानक व आगाराच्या एकूण 1 हेक्टर 53 आर क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाकडून प्रथमच मोठ्या प्रमाणात भरीव निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये मुख्य बसस्थानाकाच्या नुतनीकरणासाठी 53.39 लक्ष तर वाहनतळासह इतर कामांसाठी 35.69 लक्ष निधीचे वितरण करण्यात येणार आहे. बसस्थानकात 11 बसेससाठी फलाट, एक नियंत्रण कक्ष, एक बसस्थानक प्रमुख कक्ष, एक एटीएस रूम व एक पार्सल रुमचा समावेश करण्यात येणार आहे.  बस स्थानकाच्या कामात बसस्थानकातील फलाटाची उंची वाढविणे, तळाला कोटासह आधुनिक पध्दतीचे फ्लोरींग बसविणे,  ग्रॅनाईट बँचेस, ॲल्युमिनियम विंन्डोज, बसस्थानकास रंगरंगोटीसह संपुर्ण काँक्रिटीकरण, स्वतंत्र नियंत्रण कक्ष इ.चा समावेश राहणार आहे. तसेच पार्कींग एरियाचे काँक्रिटीकरणासह ड्रेनेज लाईनची स्वतंत्र व्यवस्थाही यातुन उभारण्यात येणार असल्याचे श्रीमती खिरवाडकर यावेळी म्हणाल्या.
            यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, गटनेते राजेंद्र चौधरी, के.बी.साळुंखे, विश्वास चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून चाळीसगाव बसस्थानकाच्या नुतनीकरणाच्या वचनपूर्तीच्या अनुषंगाने आमदार उन्मेश पाटील यांचे आभार मानले.                                                    

* * * * * * * *

Thursday, 18 May 2017

नैसर्गिक आपत्तीमुळे मयत व्यक्तींच्या वारसांना आमदारांच्या हस्ते धनादेश वाटप


नैसर्गिक आपत्तीमुळे मयत व्यक्तींच्या वारसांना
आमदारांच्या हस्ते धनादेश वाटप

चाळीसगाव दि. 18 मे (उमाका वृत्तसेवा) : रविवार दिनांक 07 मे, 2017 रोजी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मौजे खेडगांव व मौजे पिलखोड येथील दोन व्यक्तींच्या अंगावर विज कोसळून नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला होता. या मयतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत होण्यासाठी तालुक्याचे आमदार श्री.उन्मेश पाटील यांनी पाठपुरावा करत आज त्यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा प्रत्येकी रु. 4 लाखाच्या धनादेशांचे वाटप आमदार  श्री.उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
            चाळीसगांव तालुक्यातील मौजे खेडगांव येथील पितांबर हिरामण सुर्यवंशी (रामोशी) वय 21 वर्षे हा तरुण शेतात कामासाठी गेला असता अचानक विज त्याच्या अंगावर कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. तर तालुक्यातील मौजे पिलखोड येथील किरण सतिलाल माळी (भिल्ल) वय 22 वर्षे हा तरुण पिंप्री शिवारात लाकडे घेण्यासाठी गेला असता अचानक विज त्याच्या अंगावर कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. या दोघा मयतांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आमदार श्री.उन्मेश पाटील व तालुका प्रशासनाच्या वतीने तहसिलदार कैलास देवरे यांनी थेट मयतांच्या निवासस्थानी (खेडगांव व पिलखोड) येथे जाऊन मदतीचा धनादेश मयतांच्या वारसांकडे सुपूर्त केला. यावेळी त्यांच्या समवेत संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, खेडगावचे सरपंच माळी, पंकज साळुंखे, राकेश बोरसे स्थानिक लोकप्रतिनीधींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           

* * * * * * * *

Monday, 15 May 2017

संगणकीकृत अभिलेख व ई-फेरफार पडताळणीसाठी चावडी वाचनाचे आयोजन : तहसिलदार कैलास देवरे

संगणकीकृत अभिलेख व ई-फेरफार पडताळणीसाठी
चावडी वाचनाचे आयोजन
                                                :तहसिलदार कैलास देवरे

       चाळीसगाव दि. 15 मे (उमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या ई-फेरफार कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 01 ऑगस्ट, 2017 पासून सर्व सातबारा उतारे तलाठ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी खातेदारांना त्यांचा सातबारा पडताळणीसाठी व त्यात दुरुस्ती असल्यास आक्षेप नोंदविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील संगणकीकृत सातबाराचे चावडी वाचनासाठी दिनांक 16 ते 21 मे, 2017 दरम्यान 7 मंडळस्तरावरील 61 गावांमध्ये  चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करणेबाबत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व खातेदारांनी आपल्या संबंधित सजेवर उपस्थित राहून चावडी वाचन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            तालुक्यातील एकूण 136 गावांपैकी 61 गावांचे सातबारा संगणकीकरणाचे कामकाज 98 टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने पहिल्या टप्प्यात ( दि 16 ते 21 मे, 2017) या गावांमध्ये चावडी वाचनाचे नियोजन असून उर्वरित गावांचे संगणकीकरणाचे काम अंतीम टप्प्यात असून त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाचे नियोजनही लवकरच प्रसिध्द करुन तालुक्यातील संपुर्ण सातबारा संगणकीकरणाचे कामकाज महिन्याभरात पुर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल प्रशासनास तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असेही तहसिलदार श्री.देवरे यांनी कळविले आहे.
            चावडी वाचनाच्या नियोजित कार्यक्रमात दिनांक 16 ते 18 मे, 2017 या कालावधीत चाळीसगांव मंडळातील 3 गावे, शिरसगांव मंडळातील 6 गावे, बहाळ मंडळातील 10 गावे तर हातले मंडळातील 3 गावांचा समावेश करण्यात आला आहे. दिनांक 16 ते 19 मे, 2017 दरम्यान मेहुणबारे मंडळातील 13 गावे, दिनांक 16 ते 21 मे, 2017 दरम्यान तळेगांव मंडळातील 9 गावे तर दिनांक 16 ते 22 मे, 2017 या कालावधीत खडकी मंडळातील 17 गावे असे पहिल्या टप्प्यातील 61 गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            चाळीसगांव तालुक्यातील  136 गावांमधील एकूण सातबाऱ्यांची संख्या ही  1 लाख 37 हजार 81 इतकी असून आजतागायत 1 लाख 17 हजार 146 इतक्या सातबाऱ्यांचे संगणकीकरणाचे काम पुर्ण झाले असून त्याची टक्केवारी 85.5 टक्के इतकी आहे. एकूण 136 पैकी 61 गावांचे संगणकीकरणाचे कामकाज 98 टक्क्यापेक्षा अधिक पुर्ण झाल्याने पहिल्या टप्प्यात 61 गावांची निवड चावडी वाचनासाठी करण्यात आली आहे. संगणकीकरणाच्या कामाचा आवाका अधिक असल्याने सर्व नागरिकांनी स्वतःशी संबंधीत 7/12 वेबसाईटवरून डाऊनलोड करून अथवा तलाठी यांचेकडील अभिलेख पाहण्यासाठी चावडी वाचनात सहभाग घेऊन आपापल्या 7/12 वर चुका असल्यास योग्य त्या पुराव्यासह दुरुस्ती असल्यास तसा अर्ज करुन दुरुस्ती करुन घ्यावी व  प्रशासनास सहकार्य करावे असे तहसिलदार श्री.देवरे यांनी कळविले आहे.


* * * * * * * *

Monday, 8 May 2017

कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने अनुदान तत्वावर कृषी औजारांसाठी अर्ज सादर करा : तालुका कृषी अधिकारी राजपूत

कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने अनुदान तत्वावर
कृषी औजारांसाठी अर्ज सादर करा
: तालुका कृषी अधिकारी राजपूत
             
       चाळीसगाव दि. 8 मे (उमाका वृत्तसेवा) :  सन 2017-18 या वर्षापासून खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती - समृध्द शेतकरी ही मोहिम राबवून या मोहिमेतंर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या आढावा बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार सुधारित कृषी औजारे शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी विहित प्रपत्रातील अर्ज कृषी विभागाकडे सोमवार दिनांक 15 मे, 2017 पर्यंत सादर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेतंर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर इ. औजारे प्रती वैयक्तीक लाभार्थीस एक औजार याप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे.  या योजनेतंर्गत सामुहिक अथवा गटनिहाय कृषी औजारे बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्य सुध्दा देण्यात येणार आहे. दिनांक 15 मे, 2017 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांमधुन जिल्हा स्तरावर सोडत पध्दतीने निवड करुन पुर्वसंमती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
            या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी थेट संपर्क साधून या योजनेचा तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी  मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत यांनी केले आहे.


* * * * * * * *

Saturday, 6 May 2017

आदर्श आमदार ग्राम वाघळीच्या 835 प्रस्तांवाना तात्काळ मंजूरी द्या : आमदार उन्मेश पाटील


आदर्श आमदार ग्राम वाघळीच्या 835 प्रस्तांवाना तात्काळ मंजूरी द्या !
आढावा बैठकीत आमदार उन्मेश पाटीलांनी दिले निर्देश
             
       चाळीसगाव दि. 6 मे (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यातील आदर्श आमदार ग्राम म्हणून वाघळी या गावाची निवड करण्यात आली आहे. या गावातील 450 शोषखड्डे, 225 शौचालये व 160 गोठे असे एकूण 835 प्रस्ताव मंजूरीसाठी आले असून येत्या 13 मे, 2017 पर्यंत या सर्व प्रस्तावांना मंजूरीसह लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्याचे निर्देश आज आढावा बैठकीत आमदार उन्मेश पाटील यांनी दिले.
            या बैठकीला जि.प.कृषी सभापती पोपट भोळे, पंचायत समिती सभापती सौ.स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, सदस्य सुनिल साहेबराव पाटील, भाऊसाहेब केदार, कैलास निकम, रुपाली साळुंखे, अजय पाटील, मायाबाई पाटील, माजी सदस्य दिनेश बोरसे, सरपंच विकास चौधरी तहसिलदार कैलास देवरे, गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
            आपले गाव आपला आपला आराखडा सादर करतांना आदर्श आमदार ग्राम विकास कामांसाठी कुठलाही विशेष निधी दिला जात नाही. परंतु तालुक्याचा विकास साधतांना एक आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी नियोजन समितीसह आमदार निधी वापरुन शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून आदर्श ग्राम निर्मीतीचा आपला मानस आहे. यासाठी राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना आमदार श्री.पाटील यांनी उपस्थितांना दिल्या.
            वाघळी गावातील 1318 कुटूंबाचा सर्व्हे पुर्ण झाला असून या गावातील 2293 हेक्टर शेत जमीनीचे 1400 खातेदारांची शेतजमीन संपुर्ण सिंचनाखाली आणण्यासाठी या गावाची जलयुक्त शिवारात निवड करण्यात आली आहे. गावातील सर्व शाळा डिजीटल करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जातीचे दाखले वितरीत करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. गावातील 27 कुपोषीत बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधींनी दत्तक घेऊन गाव कुपोषणमुक्त करण्याचा निर्धारही करण्यात आला.  तर महसूल प्रशासनामार्फत महाराजस्व अभियानातंर्गत वाघळी गावात शिबीराचे आयोजन करुन ग्रामस्थांना लागणारे विविध दाखले वाटप करण्याच्या सुचनाही महसूल प्रशासनास यावेळी देण्यात आल्या.
मोतीबींदू मुक्त गावाचा मानस
            गावातील एकही नागरिकास मोतीबींदू राहणार नाही यासाठी आरोग्य प्रशासनाने शिबीराचे आयोजन करुन मोतीबींदूची तपासणी व शस्त्रक्रीया करुन संपुर्ण गांव मोतीबींदूमुक्त करण्याच्या सुचनाही आमदार श्री.पाटील यांनी  यावेळी दिल्या. शासनाच्या विविध योजनांचे लाभ यापुढे रोख स्वरुपात देण्यात येणार नसल्याने गावातील 100 टक्के नागरिकांचे बँक खाते उघडली जाणार असून प्रत्येक बँक खातेधारकांचा बारा रुपये भरून विमा उतरविण्यात येणार.  तसेच शासनाच्या मुद्रा लोन योजनेतून सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी चालना देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. गावात व्यायामशाळा, वाचनालय, वृक्षलागवड, स्वच्छता अभियान, आरोग्य व शिक्षण या मुलभूत गरजांची पुर्तता होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करणे अपेक्षीत आहे. केवळ कागदोपत्री कामे न करता ग्रामस्थांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून काम करणे हे प्रत्येक शासकीय अधिकारी व  कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे आणि हे त्यांनी लोकसेवक या नात्याने पार पाडणेही गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
                       

* * * * * * * *