Thursday, 8 September 2016

छायाचित्र मतदार याद्या: संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

छायाचित्र मतदार याद्या: संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
        जळगाव दि.8 - जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी आदेश दिले असुन पुनरिक्षणाचा विशेष कार्यक्रम खालीलप्रमाणे-
            प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी कालावधी (शुक्रवार) 16 सप्टेंबर 2016, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी (शुक्रवार) 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2016 (शुक्रवार), मतदार यादी मधील संबंधित भागाचे, ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्युए सोबत बैठक इत्यादी आणि नावांची खातरजमा करणे (शुक्रवार) 16 सप्टेंबर 2016 आणि (शुक्रवार) 30 सप्टेंबर 2016, विशेष मोहिमेचे दिनांक (रविवार) 18 सप्टेंबर 2016 आणि (रविवार) 9 ऑक्टोबर 2016, दावे व हरकती निकालात काढणे (बुधवार) 16 नोव्हेंबर 2016 पर्यंत, डाटाबेसचे अद्ययावतीकरण करणे छायाचित्राचे सरमिसळ, कंट्रोल टेबलचे अद्ययावतीकरण, पुरवणी मतदार यादीची छपाई इत्यादी (गुरुवार) 15 डिसेंबर 2016 आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्धी (गुरुवार) 5 जानेवारी 2017.
            विशेष मोहिमेच्या तारखांना मतदान केंद्राच्या ठिकाणी बी.एल.ओ.मार्फत मतदार नोंदणीचे फॉर्म स्विकारले जातील. मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय भाग घेऊन निवडणूक यंत्रणेला सहकार्य दिल्यास त्या अचूक व परिपूर्ण होण्याची खात्री बाळगता येईल. ऐनवेळी पात्र मतदारांची नावे मतदार यादीमध्ये वगळली गेल्याबाबतची तक्रार करण्यास वाव राहणार नाही. तरी या कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

०००००

घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण; 2600 पथके सज्ज

कुष्ठरोग शोध अभियान 2016-17 (19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर)
घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण; 2600 पथके सज्ज

        जळगाव दि.8- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा समावेश केला असून त्याअंतर्गत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात हे अभियान 16 जिल्ह्यात राबविण्यात येणार असून त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत दि.19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत घरोघरी जाऊन तपासणी करुन सर्वेक्षण होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 2600 पथके सज्ज केली आहेत.
यासंदर्भात जिल्हा समन्वय समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. उपजिल्हाधिकारी साजिदखान पठाण हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. जयवंत मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. रावलानी, जिल्हा करमणूक कर अधिकारी महेश चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या माहिती नुसार, जळगाव जिल्ह्यात मार्च 2016 अखेर प्राप्त आकडेवारीनुसार 45 लाख 48 हजार 682 लोकसंख्येपैकी प्रत्यक्ष उपचाराखाली 659 रुग्ण असून नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या धरुन ही संख्या 1061 इतकी होते. जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून सर्व तालुक्यात हे सर्वेक्षण होणार आहे. पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर हे सर्वेक्षण करण्यात येईल.  जिल्ह्यातील 9 लाख 9 हजार 737 घरांमधून हे सर्वेक्षण 14 दिवसात 2600 पथके करणार आहेत. या पथकांमध्ये एक पुरुष व एक महिला (आशा) असे दोन सदस्य राहणार आहेत. या पथकांचे प्रशिक्षण याआधीच पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय संनिरीक्षण व पर्यवेक्षणासाठी विशेष पथके नेमण्यात आले आहेत. या सर्वेक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग स्कूल,एन.सी.सी.व एन.एस.एस. विद्यार्थी, आशा, अंगणवाडी वर्कर आदींमधून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठीही विविध माध्यमांचा वापर करुन हे अभियान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. आढळलेल्या कुष्ठ रुग्णांवर उपचार करुन कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यात येणार आहे. दर दहा हजार लोकसंख्येमागे कुष्ठरुग्णांचे प्रमाण एकापेक्षाही कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी  डॉ. जयवंत मोरे यांनी दिली.
या अभियानात सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. तसेच महानगरपालिका क्षेत्रात सर्वेक्षणासाठी मनपा कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, अशा सुचना उपजिल्हाधिकारी साजिदखान पठाण यांनी केल्या.

०००००

जळगांव जिल्ह्यातील दिनांक 8 सप्टेंबर, 2016 पर्यंतचे पर्जन्यमान


शेतकऱ्यांना देणार हक्काचं पाणी आणि वीज - ना.गिरीष महाजन


लोहारा येथे महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर
शेतकऱ्यांना देणार हक्काचं पाणी आणि वीज -ना.गिरीष महाजन

 जळगाव दि.7- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे हे ध्येय्य डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखली आहेत. राज्य सरकार त्यानुसार आपले काम करीत आहे. गेल्या दीड- दोन वर्षात योग्य नियोजन केल्याने आता शेतकऱ्यांना वीज मिळू लागली आहे, तर राज्यातील सर्व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. त्यासाठी केंद्राकडून 17 हजार कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांनी आज लोहारा येथील सभेत बोलतांना दिली.
मुख्यमंत्री समाधान शिबिर योजना राबवून त्यामाध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यासाठी सध्या जामनेर विधानसभा क्षेत्रात समाधान शिबिर योजना राबविली जात आहे. या योजनेमुळे ‘शासन आपल्या दारी’चा प्रत्यय जनतेला येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आज लोहारा येथे दाखल्यांसाठी नोंदणी व दाखले वितरण करण्यात आले. यावेळी ना. गिरीष महाजन, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, कृषिभूषण विश्वासराव पाटील, शिवाजी सोनार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
 या कार्यक्रमात ना.महाजन व खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ना. महाजन म्हणाले की, पुर्वी दाखले मिळविण्यासाठी कचेऱ्यांमध्ये फेऱ्या माराव्या लागत. मात्र विद्यमान शासन लोकाभिमुख असल्याने थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे. लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यात या उपक्रमाला गती देण्यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज बस याभागात आणून गावोगावी जाऊन दाखले देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ना. महाजन यांनी सांगितले.
 त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. त्यासाठी शेतकऱ्याला हक्काचं पाणी आणि वीज देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे, असे त्यांनी सांगितले.
 यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनीही गरजूंपर्यंत शासन यंत्रणा पोहोचून लाभ देत असल्याबद्दल उपक्रमाचे कौतूक केले.
यावेळी शिबिराचे प्रमुख समन्वयक अरविंद देशमुख यांनी उपस्थितांना या शिबिराची माहिती दिली. तर तहसिलदार दीपक पाटील यांनी शिबीराच्या कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना सांगुन सहकार्य करण्याचे आवाहन केले. या शिबीरास डॉ. के.ई.चौधरी. हसन कुरेशी, मरियम कुरेशी, सीमा पाटील, बाळू गुजर,  शेखर काळे,  प्रमोद पाटील, सागर भोई, रुपा बाविस्कर,  प्रभाकर माळी, सविता निकम, आदी प्रमुख पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने लोहारा आणि पंचक्रोशीतील शेतकरी , नागरिक उपस्थित होते.
मंत्र्यांनी स्वतः घरी जाऊन दिली शिधापत्रिका
लोहारा येथे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरात अनेक लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले. याच गावात राहणाऱ्या बेबाबाई भिल या वृद्धेस द्यावयाची शिधापत्रिका स्वतः मंत्री महोदय ना. गिरीष महाजन यांनी तिच्या झोपडीत जाऊन दिली. झोपडी समोर जेव्हा हा लालदिव्याची गाडी आणि मंत्र्यांचा ताफा थांबला तेव्हा या वस्तीतील लोक आश्चर्यचकित झाले.  तेथे शेजारीच राहणाऱ्या शांताराम भिल यांनाही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना दिली जाणारी पिवळी शिधापत्रिका स्वतः मंत्र्यांनी दिली. खासदार रक्षाताई खडसे, प्रांताधिकारी शर्मा, तहसिलदार दीपक पाटील यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ या उक्तीची खरीखुरी प्रचिती यानिमित्ताने लोहारेवासीयांना आली.
* * * * * * *

Tuesday, 6 September 2016

मुद्रा बॅंक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘उद्योग भेट’ उपक्रम राबविणार- जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल


जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक समन्वय समितीची बैठक
मुद्रा बॅंक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
‘उद्योग भेट’ उपक्रम राबविणार- जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
जिल्ह्यात 15 हजार लाभार्थ्यांना 164 कोटींचे कर्ज वितरीत

जळगाव दि.6- मुद्रा बॅंक योजनेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारलेल्या युवक युवतींचे उदाहरण  अन्य होतकरु तरुणांसमोर आणून त्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यात ‘उद्योग भेट’ हा उपक्रम राबविण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज येथे दिले.
मुद्रा बॅंक योजनेचा जास्तीत जास्त युवकांना लाभ मिळावा यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय  समन्वय समितीची  बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या होत्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. पी.सी. शिरसाठ, जिल्हा अग्रणी बॅंकेचे बी.एस. मराठे  जिल्हा उद्योग अधिकारी एस.एच. पाटील,  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य डी.एम कोठावदे,  सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रभाकर हरदे,  प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते.
 यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अग्रवाल म्हणाल्या की, जिल्ह्यात मुद्रा बॅंक योजनेचे काम चांगले झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत शिशुगटात 9351 पुरुष 7571 महिला असे 16 हजार 922 जणांना तर किशोर गटात765 पुरुष, 561 महिला अशा 1326 जणांना, आणि तरुण गटात 313 पुरुष तर 193 महिला अशा 506 जणांना लाभ देण्यात आला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 15 हजार 917 जणांना एकूण 164 कोटी 13 लाख 41 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून उद्योग सुरु केलेल्या होतकरु युवकांना लोकांसमोर आणण्यासाठी आणि त्यातून इतरांना उद्योग व्यवसायाची प्रेरणा मिळावी यासाठी उद्योग भेट हा उपक्रम राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी या बैठकीत सुचना केली.
मुद्रा बॅंक योजनेअंतर्गत बॅंकांना दरमहा 15 जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याचा नियमित आढावा घेऊन  येत्या जिल्हा अग्रणी बॅंक समन्वय समितीच्या सभेत आढावा घेतला जाईल, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी शासकीय संस्थांमधुन उद्योग व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या बेरोजगार युवक- युवतींना कर्ज तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी व ही योजना अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचविण्यासाठी  जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार व कौशल्य विकास विभाग, जिल्हा अग्रणी बॅंक या विभागांनी एकत्रित कार्य करावे. जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांचा आणि बेरोजगार युवकांचा प्रेरक संवाद घडवून आणावा, यादृष्टीने आगामी काळात समन्वय करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी केले.

* * * * * * *

शेतीला दिवसा पाणी देता यावे यासाठी कृषीपंपांना 12 तास वीजपुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


शेतीला दिवसा पाणी देता यावे यासाठी कृषीपंपांना
12 तास वीजपुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·कृषीपंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा 12 तास वीजपुरवठा
·वीजचोरीच्या तक्रारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस ठाणे प्राधिकृत करणार
·कृषी फिडरना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठ्यासाठी संगमनेर तालुक्यात
प्रायोगिक तत्वावर प्रकल्प
            मुंबई,दि.6 : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावे यासाठी कृषीपंपाना  दिवसा12 तास वीज पुरवठा  नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. वीजचोरीला आळा घालण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोलीस ठाणे प्राधिकृत करावेत. सौर ऊर्जेवर आधारित कृषी फिडरसाठी संगमनेर येथील  कारजुले पठार आणि निमोन येथे प्रायोगिक तत्वावर फिडर सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
          मंत्रालयात झालेल्या बैठकीत कृषीपंपांना 12 तास वीज पुरवठा, वीज चोरी रोखणे आणि सौरऊर्जेवर आधारित कृषीफिडरचे विद्युतीकरण याबाबत आढावा घेण्यात आला.  ऊर्जामंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.
कृषीपंपांना नोव्हेंबरपर्यंत 12 तास वीज पुरवठा
          राज्यात मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागातील पीकांना पाण्याची गरज आहे.  शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी उपलब्ध आहे, मात्र वेळेवर वीज मिळाली नाही तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसेल त्यामुळे दिवसाच्या वेळी वीज उपलब्ध करुन दिल्यास पिकांना फायदा होईल त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपांसाठी आठ तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
वीज चोरीच्या तक्रारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस ठाणे प्राधिकृत करणार
          राज्यात वीजचोरीचे प्रमाण गंभीर आहे. वीजचोरीबाबत सध्या राज्यात सहा सर्कलमधील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जाते. यामुळे वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई करताना वेळेचा अपव्यय होतो ते रोखण्यासाठी व वीजचोरीला प्रतिबंध घातला यावा यासाठी आता सर्वच जिल्ह्यांमध्ये दोन किंवा तीन पोलीस ठाणे प्राधिकृत करुन तेथे वीजचोरीची तक्रार नोंदवून घेतली जाईल. वीजचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांच्या सहाय्याने प्रयत्न करावेत. सुरक्षा मंडळ अधिक सक्षम करुन वीजचोरी रोखावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या. वीजचोरी रोखण्यासाठी भरारी पथकासोबत स्थानिक पोलीसदेखील सहभागी होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कृषी फिडरना सौरऊर्जेव्दारे  वीजपुरवठ्यासाठी
संगमनेर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर प्रकल्प
          राज्यात कृषी क्षेत्रासाठी 30 टक्के वीज वापरली जाते. शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करुन दिली जाते. ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडर यांचे विलगीकरण करण्यात आले असून अशा कृषी फिडरना सौर ऊर्जेव्दारे वीजपुरवठा करण्यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील कारजुले पठार व निमोन उपकेंद्र येथे प्रायोगिक तत्वावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी शासनाकडून स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येईल. या प्रकल्पासाठी खाजगी विकासकाची निवड केली जाईल त्याच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येईल.
          राज्यात अन्य ठिकाणी देखील अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करण्यासाठी फ्रेंचाईसी मॉडेल तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. सौर ऊर्जेवरील प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसावीज उपलब्ध होईल.शेती क्षेत्राचा चेहरा या प्रकल्पामुळे बदलण्यास मोठी मदत होणार असून सौर ऊर्जेवरील प्रकल्प यशस्वीरित्या सुरु करावे, असे प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणाऱ्या जमिनीकरीता जिल्हाधिकारी, तहसीलदारांना पत्र देण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
          बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, सचिव  ‍मिलिंद म्हैसकर, महाऊर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक नितिन गद्रेमहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, नियोजन विभागाच्या सचिव मिता राजीव  लोचन आदी अधिकारी उपस्थित होते.
* * * * * * * *

विभागीय लोकशाही दिन 12 सप्टेंबर रोजी

विभागीय लोकशाही दिन 12 सप्टेंबर रोजी

नाशिक, दि. 6 :- जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी विभागीय लोकशाही दिनाची बैठक विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे सोमवार 12 सप्टेंबर 2016 रोजी होणार आहे.
लोकशाही दिन बैठकीत विहीत पध्दतीने प्राप्त अर्जांवर सुनावणी घेण्यात येणार असून अर्जदारांनी मूळ अर्जासह सुनावणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन महसूल उपायुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.
लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाहीत. तसेच विविध अडचणींचे निराकरण करणेसाठी अस्तित्वात असलेली न्यायालये, आयोग, लोकायुक्त कार्यालये आदी प्रशासकिय यंत्रणांच्या कक्षेतील न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपिल, सेवा-आस्थपनाविषयक बाबी,  यापूर्वी अंतिम उत्तर दिलेले लोकशाहीदिनातील अर्ज, कागदपत्रांची पुर्तता नसणारे अर्ज आणि वैयक्तिक स्वरुपातील नसतील अशा प्रकरणांचे अर्ज विभागीय लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत. लोकशाही दिन सुनावणीसाठी अर्जदारांनी मूळ अर्जासह सुनावणीसाठी उपस्थित राहणे गरजेचे राहील असे या आवाहनाद्वारे कळविले आहे.
* * * * * * *