Friday, 9 May 2014

केवळ आश्रयस्थान नव्हे तर जिव्हाळा लावणारे माहेर

केवळ आश्रयस्थान नव्हे तर जिव्हाळा लावणारे माहेर
आशादिप महिला वसतीगृहातील अनात मुलीचा उद्या विवाह

जळगाव, दि.9- येथील महिला बाल विकास विभागातर्फे चालविल्या जाणा-या शासकीय आशादिप महिला वसतिगृहाचे रुपांतर सध्या लग्नघरात झाले आहे.  येथे गेल्या दोन वर्षांपासून आश्रयाला आलेल्या रिना चे लग्न रविवार दि.11 मे 2014 रोजी  होणार आहे. निराधार- निराश्रीत महिलांचे निवासस्थान केवळ संकटकाळी दिलासादायक ठरणारा सुरक्षित निवारा नसून जिव्हाळा लावणारे माहेरही ठरले आहे.
महिला बालविकास विभागातर्फे 1983 पासून जळगाव शहरात हे वसतिगृह  कार्यरत आहे. 16 ते 60 वर्ष वयापर्यंतच्या निराधार निराश्रीत महिला मुलींचे हे निवासस्थान आहे. याठिकाणी परितक्त्या, कुमारी माता, संकटग्रस्त व अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय, संरक्षण, मुलभूत सुविधा  पुरवून तिचे पुनर्वसन करण्यात येते.  याच महिला वसतीगृहात रिना तेजराम वनवे, ही कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेली युवती  सन 2012 मध्ये या वसतीगृहात दाखल झाली.  गेल्या दोन वर्षात तिचे या वसतीगृहात वास्तव्य होते. तिने या काळात ब्युटीपार्लर प्रशिक्षण  पुर्ण केले आहे. आता ती स्वतः आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी होऊ शकते. तशातच तिला अहमदनगर जिल्ह्यातील भावी निमगाव ता. शेवगाव येथील देविदास खडके यांच्याकडून विवाहासाठी मागणी आली. देविदास खडके हे सर्वशिक्षा अभियानात विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. परस्पर पसंतीनंतर संस्थेने अहमदनगर जिल्ह्यातील महिला बालविकास अधिका-यांमार्फत तपास करुन गृह अहवाल तयार करण्यात आला. नंतर दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. नंतर लग्नासाठी वराच्या आई वडीलांची संमती घेण्यात आली, आणि त्यानंतर हे लग्न आता रविवारी 11 तारखेला सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे. सो.सु. ग. देवकर प्राथमिक शाळा, मेन स्टेट बॅंक शाखेसमोर, जळगाव येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला  विविध मान्यवर वधुवरांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
आता पर्यंत या संस्थेने 69 विवाह जुळवून मुलींना कुटूंबात पोहोचविले आहे. उद्या होणारा विवाह सोहळा हा 70 वा सोहळा असेल. संस्थेत पुर्वी विवाह होऊन आपल्या कुटूंबात विवाह जीवनाची यशस्वी वाटचाल करणा-या 20 जोडप्यांचा सत्कारही या विवाह सोहळ्यात केला जाणार आहे.
सध्या या संस्थेत 21 मुली आश्रयाला आहेत. त्यांच्याही संगोपन ,संरक्षण आणि पुनर्वसनावर संस्था परिश्रम घेत आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जातो. आता पर्यंत या संस्थेत 1419 महिलांनी येथे आश्रय घेतला असून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथे आश्रयाला आलेल्या महिला- मुलींची वैद्यकीय तपासणीपासून ते सर्वप्रकारची काळजी घेतली जाते. त्यांना त्यांचा कल पाहून शिवण काम, ब्युटीपार्लर तसेच विविध प्रशिक्षण कार्यक्रमातून त्यांना सबल केले जाते. केवळ संरक्षण पुनर्वसन यासारख्या प्रक्रियांतून जातांना या मुलींचे परस्पर स्नेहबंध जुळतात. सुयोग्य विवाह करुन आपल्यातल्या एका भगिनीचे पुनर्वसन होतांना पाहून इतर मुलींनाही आनंद झाला आहे. आश्रयगृहाचे माहेरघर होणे हीच या उपक्रमाची खरीखुरी फलश्रृती आहे.

-       मिलिंद मधुकर दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

Wednesday, 7 May 2014

जालना येथे 30 जून ते 4 जुलै या कालावधीत सैन्य भरती

जालना येथे 30 जून ते 4 जुलै या कालावधीत सैन्य भरती

             जळगाव, दि. 7  :-  जालना येथे सोल्जर जनरल डयूटी, सोल्जर टेकनिशिय, सोल्जर टेक्निशियन नर्सिंग असिस्टंट व नर्सिंग असिस्टंट (व्हेट) , सोल्जर क्लर्क स्टाफ डयुटी आणि सोल्जर स्टेर किपर टेकनिशियन पदांकरिता दिनांक 30 जून ते 4 जुलै या कालावधीत सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त सैन्य इच्छूक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर मिलिंदकुमार बडगे यांनी केले आहे.
           दिनांक 30 जून 2014 रोजी सकाळी 3.00 ते 6.00 यावेळेत उपस्थित रहावे. – सोल्जर जनरल डयुटी, सोल्जर टेक्निशियन, सोल्जर टेक्निशियन नर्सिंग असिस्टंट व नर्सिंग असिस्टंट (व्हेट), सोल्जर क्लर्क स्टॉफ डयुटी आणि सोल्जर स्टोर किपर टेकनिशियन , उत्तीर्ण झालेल्यांसाठी दिनांक 4 जुलै 2014 रोजी चिकित्सा तपासणी  होईल.
वेगवेगळया ट्रेडसाठी लागणारी शारीरिक क्षमता व शैक्षणिक अटी पुढीलप्रमाणे –
           सोल्जर जनरल डयुटी - उंची 168 से. मी., वजन 50 कि.ग्रॅ.  छाती 77-82 से. मी., वय 17 ½ ते 21 वर्षे, शैक्षणिक क्षमता 10 वी पास सायन्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व  इंग्रजी प्रत्येकी 45 टक्के मार्क्ससह
          सोल्जर - उंची 167 से. मी., वजन 50 कि. ग्रॅ., वय  17 ½ ते 23 वर्षे, शैक्षणिक पात्रता (अ) 12 वी पास सायन्स भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी प्रत्येकी 45 टक्के मार्क्स सह, (आ) 10 वी पास 50 टक्के मार्क्स, आणि 3 वर्षाचा इंजि. डिप्लोमा  AICTE इंस्टीटयूट मधून.
         सोल्जर क्लर्क स्टाफ डयुटी आणि सोल्जर स्टोर किपर टेकनिशियन - उंची 162 से. मी. वजन 50 कि. ग्रॅ. वय 17 ½ ते 23 वर्षे , शैक्षणिक पात्रता - (अ) 12 वी पास 50 टक्के मार्क्स सह तसेच 40 टक्के मार्क्स गणित / अकाऊंटन्सी /  पुस्तक रक्षा विषय 10 /12 वी प्रत्येकी. (आ) किंवा B sc ग्रॅज्युएट गणित व इंग्रजी प्रत्येकी 40 टक्के मार्क्स 10 / 12 वी पास किंवा ग्रॅज्युएट गणित, इंग्रजी, अकाऊंट / पुस्तक रक्षा प्रत्येकी 40 टक्के मार्क्स 10 / 12 वी पास.
             आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे -  एस. एस. सी. / एच. एस. सी. च्या गुणपत्रक व बोर्डाच्या प्रमाणपत्राच्या मुळप्रती, जर बोर्डाचे मुळ प्रमाणपत्र नसेल तर बोर्डातील तात्पुरते प्रमाणपत्र ज्यात उमेदवारांच्या जन्म तारखेची नोंद असेल ते आवश्क आहे. लिव्हींग सर्टीफिकेट किंवा शाळा / कॉलेजचे बोनाफाईड सर्टीफिकेटची मुळप्रत, सरपंचाचा दाखला आणि चारित्र प्रमाणपत्र जे सहा महिन्यापेक्षा जुने नसावे फक्त खुल्या प्रवर्गासाठी सरपंचाची सही असलेले जातीचे प्रमाणपत्र, 5X4 से. मी. आकाराच्या नुकत्याच काढलेल्या रंगीत 14 फोटोंच्या प्रती निगेटीवसह, विना अटेस्टेड केलेले, संपूर्ण तपशिल असलेल्या जिल्हाधिकारी / उप जिल्हाधिकारी किंवा उप विभागीय अधिकारी यांचे हस्ताक्षर असलेला रहिवाशी दाखला. वय आणि राष्ट्रीयत्वा बाबतचे तहसिलदार / कार्यकारी दंडाधिकारी यांचे हस्ताक्षर असलेले प्रमाणपत्र, मुलासाठी स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट वापरण्यात येण्याबाबतचे संपूर्ण तपशिलसह कमीत कमी मेजर रँक अधिका-यांच्या कार्यालयीन स्टॅम्प लावून स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र. सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिंचा एक संपूर्ण ॲटेस्टेड केलेला सेट.
       विशेष सुचना : सेनेत भरती होणेसाठी पैसे लागत नाहीत. जर तुम्ही सर्व परीने सक्षम असाल तर मेरीट लिस्टमध्ये तूमचे नाव येईल. बेइमान दलाल आणि धोकेबाजांपासून सावधान त्यांना कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नये. जर अशी कोणी व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा भ्रस्टाचार विरोधी पथकास द्यावी. आपल्या कोणत्याही प्रकारच्या शंकेचे समाधान आमच्या रिक्रुटींग स्टाफ कडून केले जाईल जे तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करत राहतील.
               सैन्य भरती इच्छुक तरुणांनी सैन्य भरतीबाबत अधिक माहितीकरीता दुरध्वनी क्र. 020-26341698 वर संपर्क साधावा असे   आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर मिलिंद कुमार बडगे यांनी केले आहे.
                                * * * * * * *

Monday, 5 May 2014

पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट परीक्षा 11 मे रोजी


पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट परीक्षा 11 मे रोजी

             जळगाव, दिनांक 5  - भारतीय डाक विभागातर्फे असिस्टिंट , सॉर्टीग असिस्टंट सरळभरती 2013-14 ची लेखी परीक्षा रविवार दिनांक 11 मे 2014 रोजी दुपारी 2.00 ते 4.00  या वेळेत महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
           सदरील परीक्षेचे प्रवेशपत्र हे www.pasadrexam2014.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.  परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन युजर आयडी व पासर्वड वापरुन प्राप्त करावेत प्रवेश पत्र टपालव्दारे पाठविण्यात येणार नसल्याचे जळगाव डाकघरचे  अधिक्षक श्री. आर. डी. तायडे यांनी कळविले आहे.
* * * * * * *

शासकीयऔद्योगिक  प्रशिक्षण संस्था,
बोदवड येथे मोटार वाहन प्रशिक्षण

               जळगाव, दि. 5 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड येथे मोटार ड्रायव्हींग स्कुल सुरु करण्याकरिता विभागीय परिवहन अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 21 दिवसात 10 तास या प्रमाणे राहील. प्रवेश क्षमता एका बॅच करीता 15 ते 20 प्रशिक्षणार्थी इतकी असून  प्रती  प्रशिक्षणार्थ्यांकरीता रुपये 2800 इतके शुल्क आहे.
               इच्छूक प्रशिक्षणार्थ्यानी मोटार वाहन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संस्थेचे निदेशक श्री. एच. ई पाने यांचेशी संपर्क साधावा ( मोबाईल न.  8050937937 / 02582- 275700) असे आवाहन प्राचार्य श्री. आर एम. राठोड यांनी केले आहे.


* * * * * * *

Thursday, 1 May 2014

चाळीसगावात 54 वा महाराष्ट्र वर्धापन दिन उत्साहात साजरा


चाळीसगावात 54 वा महाराष्ट्र वर्धापन दिन उत्साहात साजरा
                      
            चाळीसगाव, दिनांक 1 मे :- महाराष्ट्र राज्य‍ स्थापनेचा 54 वा वर्धापन दिन  आज उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते सकाळी 08:00 वाजता ध्वजारोहणाने उत्साहात संपन्न झाला.
            पोलीस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमास आमदार राजीव देशमुख, माजी आमदार ईश्वर जाधव, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गट विकास अधिकारी मालती जाधव, तालुका कृषि अधिकारी व्हि.एस.शिंदे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार एम.बी.सुर्यवंशी, ए.एन.परमार्थी आदि उपस्थित होते.
            ध्वजारोहणानंतर पोलीस प्रशासनातर्फे ध्वजास मानवंदना देऊन शानदार संचलन पार पडले. त्यामध्ये पोलीस दल व होमगार्डचा समावेश होता .
            या कार्यक्रमास शिक्षण महर्षी उदेसींग आण्णा पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, महसुल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आमदार राजीव देशमुख यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरीकांना शुभेच्छा देऊन वार्तालाप केला.
प्रांत व तहसिल कार्यालयातही झाला ध्वजारोहण

            महाराष्ट्र दिनानिमीत्त उप विभागीय कार्यालय, चाळीसगांव येथे सकाळी 07:00 वाजता  उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते तर सकाळी 07:15 वाजता तहसिल कार्यालयात तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

                                                   * * * * * * * *

Tuesday, 22 April 2014

लोकसभा निवडणुक 2014 करिता चाळीसगांव महसुल व पोलीस प्रशासन सज्ज



लोकसभा निवडणुक 2014 करिता
चाळीसगांव महसुल व पोलीस प्रशासन सज्ज


            चाळीसगाव, दिनांक 22 एप्रिल :- 24 एप्रिल, 2014 रोजी होणा-या लोकसभा निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर 017 चाळीसगांव मतदार संघातील निवडणुकीसाठी महसुल व पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे
            चाळीसगांव विधानसभा मतदार संघामध्ये एकुण 327 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून पैकी शहरी भागात 71 व ग्रामीण भागात 256 असे एकूण 327 मतदान केंद्र स्थापीत करण्यात आलेले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष-1, मतदान अधिकारी-3 पोलीस कर्मचारी-1 व शिपाई-1 या प्रकारे कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदान प्रक्रीयेमध्ये एकूण 20 उमेदवार व 1 नोटा असे एकूण 21 उमेदवारांची संख्या असल्याने दोन बॅलेट युनिट व 1 कंट्रोल युनिट असणार आहे. मतदान प्रक्रीया सुरु होण्याअगोदर प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपॉल घेण्याच्या सुचना संबंधितांना यापुर्वीच देण्यात आलेल्या आहेत.
            चाळीसगांव मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या 3,14,888 इतकी असून पैकी पुरुष मतदार 1,69,001 व स्त्री मतदार 1,45,887 अशी आहे. मतदान अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व आण्ण्यासाठी वाहतुक आराखडयानुसार 42 बसेस, 8 मिनी बस, 22 जिप असे एकूण 72 वाहनांचे नियोजन करण्यात आलेले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एकुण 9 अधिकारी, 237 पोलीस कर्मचारी व 93 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पोलीस मुख्यालय, जळगांव, चाळीसगांव, अमळनेर, मेहुणबारे व पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथुन पोलीसांची कुमक मागविण्यात आली आहे. दिनांक 23 एप्रिल, 2014 रोजी चाळीसगांव शहरातील राष्ट्रीय विद्यालय, हिरापुर रोड येथुन मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

या वेळी प्रथमच मोठया प्रमाणात ई.डी.सी. व पी.बी. प्रमाणपत्राचे वाटप

            मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रथमच मोठया प्रमाणात ई.डी.सी. (निवडणुक कार्य प्रमाणपत्र) एकुण 1350  व पी.बी. (टपाली मतपत्रीका) एकूण 165 चे वाटप करण्यात आले आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी हे जळगांव जिल्हयातील विविध तालुक्यातून नियुक्त केल्याने मतदान संपल्यानंतर त्यांना त्यांच्या मुख्यालयी जाणेसाठी साहित्य संकलन केंद्र राष्ट्रीय विद्यालय येथुन शेवटचा कर्मचारी जाईपर्यंत पेमेंट बेसिसवर जादा बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याच बरोबर नियुक्त अधिकारी कर्मचा-यांना 23 व 24 एप्रिल रोजीची भोजन व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. बाहेर तालुक्यातील मतदान अधिकारी कर्मचा-यांना बसच्या प्रवास भाडे रक्कमही देण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रात काम करणा-या कामगारांना मतदान करण्यासाठी सुटी जाहिर करण्यात आली असून. लोकसभा निवडणुकीसाठी पुर्ण वेळ सुटी देण्याच्या सुचना कामगार कार्यालयाने दिल्या आहेत. कामगारांनीही मोठया प्रमाणात मतदान प्रक्रीयेत सहभाग नोंदवून मतदान करावे असे आवाहनही सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे. यावेळी मतदान प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला असून सकाळी 07:00 ते सायंकाळी 06:00 या वेळेत सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे. तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज : पोलीस निरीक्षक संजय देशमुख

017 चाळीसगांव मतदार संघातील निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून चाळीसगांव पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 218 मतदान केंद्र येत आहेत. येथील निवडणुक कर्तव्यावर एकूण 9 अधिकारी, 237 पोलीस कर्मचारी व 93 होमगार्ड असे एकूण 339 अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून पैकी प्रशिक्षणार्थी पीएसआय 2 व स्थानिक अधिकारी 7, जळगांव पोलीस मुख्यालय-107, चाळीसगांव-35, अमळनेर-40, मेहुणबारे-10, जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 35 व 10 महिला पोलीस कर्मचारी व 93 होमगार्ड अशी कुमक मागविण्यात आल्याचे चाळीसगांव पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कळविले आहे.
तर मेहुणबारे पोलीस हद्दीत एकूण 109 मतदान केंद्र असून यासाठी एकूण 6 अधिकारी, 90 पोलीस कर्मचारी व 65 होमगार्ड असे एकूण 161 अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून पैकी स्थानिक 2 अधिकारी व 4 नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी तर पोलीस कर्मचा-यांमध्ये 40 स्थानिक व 50 नागपुर रेल्वे पोलीस कर्मचारी, होमगार्ड मध्ये 20 स्थानिक व 45 भुसावळ असे एकूण 161 अधिकारी कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर नियुक्त केल्याचे मेहुणबारे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे यांनी कळविले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदान प्रक्रीया भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी  तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चाळीसगांव पोलीस स्टेशनतर्फे शहरात रुट मार्च काढण्यात आला असून मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सर्व मतदारांना केले आहे.


* * * * * * * *

Friday, 18 April 2014

चाळीसगाव येथील निवडणुक प्रशिक्षण शिबीरास जिल्हाधिका-यांनी केले मार्गदर्शन


चाळीसगाव येथील निवडणुक प्रशिक्षण शिबीरास
जिल्हाधिका-यांनी केले मार्गदर्शन


            चाळीसगाव, दिनांक 18 एप्रिल :- जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी येथील वैभव मंगल कार्यालयात आयोजित अखेरच्या निवडणुक प्रशिक्षण शिबीरास भेट देऊन उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना निवडणुक कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी, नायब तहसिलदार ए.एम.परमार्थी यांच्यासह महसुल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            येथील अखेरच्या प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी मतदान अधिका-यांना दिनांक 23 व 24 तारखेच्या कार्यपध्दतीबाबत योग्य त्या सुचना देऊन निवडणुक कामाची महत्वपुर्ण जबाबदारी आपल्यावर असुन ती योग्यरितीने पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.  
            यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सांगितले की, चाळीसगांव मतदार संघात एकूण 327 मतदान केंद्र असुन एकुण उमेदवारांची संख्या 21 असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट व एक कंट्रोल युनिट असणार आहे. असे या मतदार संघात एकुण 654 बॅलेट युनिट व 327 कंट्रोल युनिट राहणार असुन याच्या 10 टक्के जादा बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट हे राखीव ठेवण्यात येणार आहे. याकरिता पुर्व तयारी म्हणून या बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटची तपासणी व मुलभूत सेटींग्ज करण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर येत्या दोन दिवसात सेटींग्ज व सिलींग चे कामकाज पुर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            या वेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत गरजा जसे फर्निचर, विज, पाणी आदि सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे सांगितले तर आचारसंहिता कक्ष प्रमुख नानासाहेब आगळे यांनी आचारसंहिता भंगाच्या एकूण 3 तक्रारी प्राप्त झाल्या असुन पैकी 2 तक्रारी अर्ज निर्गत व एक तक्रार अर्ज खुलास्या अभावी प्रलंबीत असल्याची माहिती  यावेळी दिली.

                                               * * * * * * * *

Wednesday, 16 April 2014

मतदानासाठी अंगणवाडी सेविकांना प्रांताधिका-यांनी दिली शपथ


मतदानासाठी अंगणवाडी सेविकांना
प्रांताधिका-यांनी दिली शपथ

            चाळीसगाव, दिनांक 16 एप्रिल :- मागील मतदानाची कमी टक्केवारी पहाता महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी दिसुन आलेली उदासिनता घालविण्यासाठी महिलांशी थेट संपर्क होणा-या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेविकांचा मेळावा परदेशी बोर्डींग हॉल येथे आयोजित करुन त्यांना मतदान करण्यासाठी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी शपथ दिली. तसेच आपला संपर्क हा थेट महिला वर्गाशी होत असल्यामुळे निवडणुक आयोगाच्या मतदार शिक्षण कार्यक्रम (sveep) च्या अनुषंगाने आपण प्रत्येक घरा-घरात जाऊन महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.
            अंगणवाडी सेवीकांना मार्गदर्शन करतांना प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील म्हणाले की, आपण दैनंदिन करित असलेल्या कामकाजात जसे महिला व बालकांचे संगोपनाबाबत काम करित असतात त्याच पध्द्तीने या बालकांच्याच भविष्यासाठी व लोकशाही मजबूत करण्यासाठी तसेच चांगले सरकार देण्यासाठी आपण मतदान करा असा संदेश प्रत्येक महिला मतदारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही त्यांनी यावेळी या महिला कर्मचा-यांवर सोपविली. त्याच बरोबर मतदानाच्या दिवशी प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी  मतदान केंद्रावर जाऊन महिला पुरूषांच्या स्वतंत्र रांगा लावण्यास मदत करणे, तसेच बाहेरुन येणा-या मतदान केंद्रावरील कर्मचा-यांना योग्य त्या सोई-सुविधा पुरविण्यासाठी  आवाहन केले.
तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक संपन्न
पोलीस पाटलांनी आपल्या पदनामातील पोलीस या शब्दाची व्याख्या ओळखुन निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या उपक्रमातील शस्त्र साठा, मद्य साठा व रोख रकमेची वाहतुक या विषयी काही बाबी आढळुन आल्यास महसुल व पोलीस प्रशासनास अवगत करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले यावेळी केले. त्याच बरोबर या निवडणुक कालावधीत रहिवास दाखल्या प्रमाणेच इतर प्रकारचे दाखले देतांनाही काळजी घ्यावी व पोलीस पाटील या नात्याने सर्वसामान्य नागरिकांशी  आपला संपर्क सातत्याने येत असल्याने आपणही नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करुन आपल्या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहयोग करण्यासाठीचे आवाहन केले.


* * * * * * * *