Sunday, 19 May 2013

बियाणे - खतांचे सुक्ष्म नियोजन करुन कृती आराखडा तयार करावा - पालकमंत्री गुलाबराव देवकर










       जळगांव, दि. 19 :- जिल्हयात खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे व खतांच्या उपलब्धतेचे सुक्ष्म नियोजन करुन कृती आराखडा तयार करावा. शेतक-यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते माफक दरात उपलब्ध होतील याची दक्षता संबंधीत अधिका-यांनी घ्यावी अशा सक्त सूचना राज्याचे कृषी परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज येथील अल्पबचत सभागृहात दिल्या. खरीप आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर यावेळी खासदर हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीपराव खोडपे, जिल्हा बॅकेचे अधक्ष आमदार चिमणराव पाटील, आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी  ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  शीतल उगले, कृषी सभापती श्रीमती कांताबाई मराठे, विभागीय कृषी सहसंचालक डी. जी. काळाणे आदि उपस्थित होते.
            श्री. देवकर पुढे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत असल्याने खरीप हंगामात चांगल्या प्रकारे मदत होईल असे नियोजन करावे खतांचे दर ठरविण्याचे अधिकार खत कंपन्यांना मिळाल्याने गतवर्षापासून काही खतांचे दर वाढले आहेत. पर्यायी खते वापरण्याबदद्यल शेतक-यांना मार्गदर्शन करुन सेंद्रीय खते वापरण्याबद्दल शेतक-यांचे प्रबोधन करावे. खते बियाणे विक्रीत कोणतेही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेवून गुणवंत्ता  नियंत्रणाकडेही लक्ष दयावे. केळी संशोधन केंद्रास आवश्यक असलेले मनुष्यबळ व इतर सामुग्री बाबत मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.खरीप हंगाम 2013 साठी 563 कोटींचे कर्ज वाटप केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस गैरहजर असणा-या अधिका-यांना कारणे दाखवा नोटिस बजाविण्याचे संकेत त्यांनी दिले.
            खासदार हरिभाऊ जावळे, आमदार सर्वश्री कृषीभूषण साहेबराव पाटील, दिलीप वाघ, संजय सावकारे, चिमणराव पाटील यांनी बैठकीत आपले विचार मांडले. या कार्यक्रमात कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यांत आले.
            बैठकीचे सूत्रसंचालन अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. किसनराव मुळे यांनी तर आभार आत्माचे संचालक श्री. ठाकूर यांनी मानले, बैठकीच्या प्रारंभी सभागृहात जि. प. सदस्य       कै. निखील खडसे यांना  श्रदांजली वाहण्यात आली
 


Saturday, 18 May 2013

अतिसारग्रस्त रुग्णांना जिल्हा रुग्णालयात तत्काळ हलवा - पालकमंत्री : गुलाबराव देवकर



         जळगांव, दि. 18 :- बोरनार येथील अतिसारग्रस्त रुग्णांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याच्या सूचना राज्याचे कृषी, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री श्री . गुलाबराव देवकर यांनी दिल्या जळगांव तालुक्यातील बोरनार गावात काही दिवसांपासून अतिसाराची लागण झाल्याने जिल्हा प्रशासनाने तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचारासाठी शिबीर लावले आहे.
            आज सकाळी श्री. देवकर यांनी बोरनार येथे जावून रुग्णांची भेट घेऊन होत असलेल्या उपचारांची माहिती घेतली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस एम. लाळीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा बॅकेचे संचालक वाल्म्कि पाटील, दिलीप धनगर, नाना पाटील आदि उपस्थित होते.
            शिबीरात उपचारासाठी 4 पुरुष 5 महिला दाखल आहेत. डॉ. एस. एम. पवार, डॉ. विजय भगत, आरोग्य सहाय्यक एस. ओ. महाजन व त्यांचे सहकारी त्यांना उपचारांसाठी तैनात आहेत. गेल्या 3 - 4 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या परिस्थित सुधारणा दिसत नसल्याने सर्वाना जिल्हा रुग्णालयात स्थलांतरीत करण्याच्या सूचना श्री. देवकर यांनी यावेळी दिल्या.
            म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैदयकीय अधिका-यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांना केली. वैदयकीय अधिकारी नेमण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याची सूचना श्री. देवकर यांनी संबंधितांना दिली.
            शिबीरात एकूण 416 नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली 64 रुग्णांस अतिसाराची लागण झाली होती. त्यातील दोन रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी यापूर्वी पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी उपस्थित वैदयकिय अधिका-यांनी दिली.

Friday, 17 May 2013

जळगांव जिल्हा परिषदेतील गट – क मधील रिक्त पदे भरण्याबाबत


        जळगांव – 17 :- जळगांव जिल्हा परिषदेतील विविध संवर्गची गट क व गट ड ची रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच सदर जाहिरात जळगांव जिल्हा परिषदेच्या वेबसाईट  (www.zpjalgaon.gov.in)  वरही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी कळविले आहे.

महिला अधिका-यांनी गर्भलिंग तपासणी प्रतिबंधासाठी दक्ष रहावे- जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर



           जळगांव, दि. 17 :- जिल्हयातील विविध खात्याच्या महिला अधिका-यांनी गर्भलिंग तपासणीस प्रतिबंध करण्यासाठी दक्ष राहून होणा-या गर्भलिंग तपासणीस प्रतिबंध घालण्याच्या कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र जिल्हा दक्षता पथकाच्या आढावा बैठकीत केले.
            जिल्हा दक्षता पथकाच्या आजच्या आढावा बैठकीत जिल्हयातील सर्व सामुचित प्राधिकारी यांनी केलेल्या कामाचा आढावा तसेच जिल्हा व तालुका सल्लागार समितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी www.amchimalgi.gov.in ही वेबसाईट सुरु करण्यात आली असून टोलफ्री क्रमांक 18002334475 सुरु करण्यात आले असून नागरिकांनी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून घडणा-या गैर प्रकारांची माहिती वेबसाईट व टोलफ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन करण्यात आले. स्त्रीभ्रुण हत्या टाळण्याच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाच्या सहभागाने जनप्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यांत आली.
            बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर पोलिस अधिक्षक एन अंबीका, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हयातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, न. पा. चे मुख्याधिकारी व आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, 14 May 2013

जलपुर्नभरणाच्या वेळी दूषित पाण्याचा एक थेंब ही जमिनीत जाऊ नये -जलतज्ञ राजेंद्रसिंह


             





     

      जळगांव, दि. 14 :- अस्वच्छ पाण्याच्या एका थेंबामुळे सर्व पाणी दूषित होऊ शकते त्यामुळे जलपुर्नभरणाचा वापर करत असताना दूषित पाण्याचा एक थेंब ही जमिनीत जाऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले.
      जळगांव महानगर पालिकेच्यावतीने कांताई सभागृहात आयोजित दि. 14 ते 15 मे 2013 या दोन दिवसीय पाणी परिषदेच्या उदघाटन सोहळयात राजेंद्रसिंह मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार ईश्वरलाल जैन, खा. हरिभाऊ जावळे, महापौर किशोर पाटील, जलतज्ञ संध्याताई एदलाबादकर, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, रमेश जैन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
                 राजेंद्रसिंह म्हणाले जमीनीची अंतर्गत रचना फारच संवेदनशील असल्याने जलपुर्नभरणाच्या वेळी दूषित पाण्याचा एक थेंब ही सर्व पाणी दूषित बनवू शकतो. त्यामुळे जलपुर्नभरण करताना काळजी घेणे आवश्यक असून जास्त खोलीवर जलपुर्नभरण करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
          स्वातंत्रयानंतर देशातील लहान लहान नदया नाहीसा होऊन काही मोठया नदया नाल्याप्रमाणे बनल्या आहेत. त्यामुळे देशासमोर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, असे राजेंद्रसिंह यांनी सांगितले. तसेच जमिनीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून  जमीनीत जिरवला पाहीजे याकरिता राजकीय नेतृत्वाने पुढाकार घेतला पाहीजे असे त्यांनी म्हटले.
          तसेच भविष्य काळात दुष्काळाची परिस्थिती येऊ नये म्हणून आपल्या परिसरातील सर्व नदयांचा प्रवाह जीवंत ठेवण्याबरोबरच प्रवाह वाढविले पाहिजेत असे राजेंद्रसिह यांनी स्पष्ट करुन जळगांव जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नदया व तलावाच्या पुर्नजीवनाची काम झाली पाहीजेत असे त्यांनी सांगितले. जळगांव महानगरपालिकेने जलनिती धोरणाचा अवलंब करावा. रुफ वॉटर हॉर्वेस्टींग, पावसाच्या पाण्याचा स्थानिक स्तरावर वापर, पाणी वापराची मार्गदर्शक तत्वे व पाणी वापर कृति समिती आदिचे पालन जलधोरणात केल्यास जळगांव शहराला भविष्यकाळात पाण्याची समस्या भेडसावणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेने आपल्या भागातील सर्व तलावांची माहिती घ्यावी व ते पुर्नजीवीत करण्याचे आवाहन राजेंद्रसिंह यांनी केले. हे सर्व करत असतांना जळगांव शहरातील नागरिकांना माहिती देऊन यात त्यांचा सहभाग घेण्याची सूचना त्यांनी केली.
           पाणी मर्यादित असून वापर अमर्याद असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा तसेच प्रत्येक गाव व शहरांने पाणी वाटपाचे अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली. तर भविष्यकाळात पाणी प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्वांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन खा. ईश्वरलाल जैन यांनी अध्यक्षीय भाषणात केले. यावेळी खासदार हरिभाऊ जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांची ही भाषणे झाली.
       प्रारंभी जलतज्ञ राजेंद्रसिंह व मान्यावरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात जलनुर्पभरण करुन दोन दिवसीय पाणी परिषदेचे उदघाटन करण्यात आले. महापौर किशोर पाटील यांनी जळगांवला ` जल `गांव बनविण्याचा संदेश व पाणी परिषदेच्या आयोजनाचा उद्देश प्रास्ताविकातून सांगितला.
             कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्रीमती उषा शर्मा यांनी केले तर महापालिकेचे उपायुक्त भालचंद्र बेहरे यांनी आभार मानले.


Friday, 10 May 2013

जिल्हाधिका-यांचे हस्ते डाऊन स्कीम योजनेचा शुभारंभ



             जळगांव, दि. 10 :- जळगांव शहराला पाणी पुरवठा करणा-या वाघूर धरणाच्या मृत साठयातून अतिरिक्त पाणी उचलण्यासाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्चाची डाऊन स्क्रीम योजना मंजूर होऊन दोन महिन्याच्या कालावधीत योजनेचे काम पूर्ण करण्यांत आले. सदर योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांचे हस्ते कळ दाबून आज सायंकाळी करण्यात आला.
           यावेळी महापालिकेचे पाणी पुरवठा सभापती नितीन बरडे, कार्यकारी अभियंता अ. वा. जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता आर. सी. जैन, एस. एम. पाटील, एस. एल. पाटील, एस. व्ही. महाजन, ठेकेदार पी. एल. आडके आदि अधिकारी / पदाधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी राजूरकर  म्हणाले, डाऊन स्क्रीम योजनेसाठी 2 कोटी 1 लाख रुपये खर्च करण्यात आले असून राज्य शासनाने 1 कोटी 36 लाख रुपये मंजूर केले असून उर्वरित 65 लाख रुपये महापालिकेने खर्च केलेले आहेत. त्यामुळे सदर योजना कार्यान्वित झाल्याने जळगांव शहराला ऑगस्ट 2013 अखेर पर्यंत पाणी पुरवठा करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            वाघुर धरणात मृत साठयाच्या वर 0.30 मीटर म्हणजेच 85 दशलक्ष घन फुट पाण्याची आज उपलब्धता आहे. व हे पाणी मे 2013 अखेर पर्यत जळगांवकरांना पुरेल. त्यानंतर मात्र मृत साठयातून अतिरिक्त्‍ पाणी डाऊन स्क्रीम व्दारे उचलले जाऊन ते ऑगस्ट अखेर पर्यंत पुरवठा करता येईल अशी माहिती अभियंता अ. वा. जाधव यांनी दिली.
          डाऊन स्क्रीम योजनेसाठी धरणाच्या सांडव्यातून 1168 एम . एम. ची पाईप लाईन जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला जोडण्यात आलेली आहे. सांडव्यातून पाणी उचलण्यासाठी प्रत्येकी 100 एच पी चे चार पंप लावण्यात आलेले आहे. या पंपाव्दारे पाणी उपसा करुन मुख्य  पाईपलाईन मध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जळगांव शहराला सध्याच्या टंचाईच्या काळात तसेच भविष्य काळातही डाऊन स्क्रीमसारखी पर्यायी  पाणी पुरवठा योजना उपलब्ध झाल्याने पाणी टंचाई भासणार नसल्याचे अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.
          डाऊन स्क्रीम योजनेची चाचणी यशस्वी होऊन आज सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी कळ दाबून योजना कार्यान्वीत केली सदर योजनेच्या यशस्वीतेसाठी महापालिका, जिल्हा प्रशासन पीडब्लूडी व एमजीपी यांनी मागील दोन महिन्यापासून परिश्रम घेतले. सदर विभागाच्या संयुक्तीक प्रयत्नांतून आज डाऊन स्क्रीम कार्यान्वीत झाली. या सर्व विभागातील अधिका-यांचे व ठेकेदारांचे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अभिनंदन केले.       

14 मे 2013 रोजी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र सामाईक प्रवेश परिक्षा



     जळगांव, दि. 10 :-  गतवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षीही महाराष्ट्र शासनाने मा. श्री. राजेश टोपे, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, मा. श्री. डी.पी. सावंत, राज्यमंत्री, उच्च व तंत्राशिक्षण विभाग आदि मान्यवरांच्या पुढाकाराने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवार , दिनांक 16 मे, 2013 रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्याचे ठरविले आहे.
     शैक्षणिक वर्ष 2013-  या वर्षासाठी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय , मुंबई यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
            सदर प्रवेश परीक्षेसाठी राज्यातुन एकुण 2.85 लाख इतके विदयार्थी परीक्षेस बसणार आहेत. त्यापैकी जळगांव जिल्हयात एकुण 9568 विदयार्थी परीक्षेस बसणार आहेत. सर्व उमेदवारांनी सकाळी 9.15 वाजता परीक्षा केंद्रावर हजर रहाणे बंधनकारक आहे. त्याकरिता विदयार्थांना आवाहन करण्यात येत आहे की, दिनांक 16 मे 2013 या दिवशी गुरुवार असल्याकारणाने सदरचा दिवस हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे त्यामुळे विदयार्थ्यांनी नियोजीत वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरुन परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहणे शक्य होईल.
           सदर प्रवेश परीक्षेसाठी जळगांव जिल्हयासाठी शासनामार्फत श्री. के. सी. रायपूरकर यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी जळगांव जिल्यात एकूण 26 शाळा / महाविदयालये यांची परीक्षा केंद्रे म्हणून निवड करण्यात आली आहेत. विदयार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविदयालयांमधून प्रवेश परीक्षेची ॲडमीट कार्ड (प्रवेश पत्र ) उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. महाराष्ट्राबाहेरील जे विदयार्थी या परीक्षेस बसले आहेत त्यांना , त्यांनी अर्ज सादर केलेल्या नोटीफाईड कॉलेज अधिका-यांच्या कार्यालयातून ॲडमिट कार्ड उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ज्या विदयार्थ्यांची ॲडमिट कार्ड परीक्षेपुर्वी मिळाली नसतील किंवा गहाळ झाली असतील त्यांनी डुप्लीकेट ॲडमिट कार्ड प्राप्त करुन घेण्याकरीता संबंधित जिल्हयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
           गतवर्षी प्रमाणे अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्रा या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा एकत्रितरित्या होत असल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित / बायोलॉजी या विषयांची परीक्षा देणे गरजेचे आहे. तसेच ज्या विदयार्थ्यांना दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षांना बसू देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे परीक्षा केंद्राचे वर्गीकरण करण्यात आले आहे. (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) एम.एम. प्रकारचे केंद्र  औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी , भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित / बायोलॉजी – एम. बी प्रकारचे केंद्र , भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि बायोलॉजी  - बी.बी. प्रकारचे केंद्र प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर 144 कलम दिनांक 16 मे 2013 रोजी सकाळी 6.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत लागू राहील. या कलमानुसार दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावाला परीक्षा केद्राच्या 100 मीटरच्या परीसरात प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच उपरोक्त कालावधीमध्ये परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परीसरात झेरॉक्सयंत्र, इंटरनेट सुविधा व दुरध्वनी केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रामध्ये परीक्षार्थी विदयार्थ्यांशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही किंवा परीक्षा संपेपर्यत कोणत्याही विदयार्थ्यास केंद्र सोडून बाहेर जाता येणार नाही, परीक्षा केंद्रामध्ये परीक्षार्थी मोबाईल फोन, पेजर, लॅपटॉप, कॅलक्युलेटर इत्यादी नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
          परिक्षा केंद्रामध्ये विदयार्थ्यांना फक्त काळे बॉलपॉईट पेन, ॲडमिट कार्ड , रिसिप्ट – कम- आयडेंटीटी कार्ड नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विदयार्थ्या लॉग टेबल प्रश्नपत्रिकेसोबत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
          या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. सदर प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या अधारे व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार विदयार्थ्याच्या प्रेफरन्स फॉर्म भरुन त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.