Wednesday, 17 April 2013

जिल्हाधिकारी यांचेकडून स्थानिक सुटयांचे दिवस जाहीर



       जळगांव , दि. 17 :-  राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जळगांव जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयासाठी (न्यायालयीन विभाग वगळून ) तीन स्थानिक सुटयांचे दिवस जाहीर केलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे 
          सोमवार, 13 मे 2013 अक्षय तृतीया,   मंगळवार  20 ऑगस्ट 2013, रक्षाबंधन शुक्रवार 1 नोव्हेंबर 2013 धनत्रयोदशी

Tuesday, 16 April 2013

कामगार न्यायालयातील प्रलंबित खटले निकालासाठी 28 एप्रिल रोजी लोक अदालत



           जळगांव, दि. 16 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांच्यामार्फत कामगार न्यायालय, जळगांव येथील प्रलंबित असलेले खटले तडजोडीने व लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी रविवार दि. 21 एप्रिल 2013 रोजी सकाळी 10.30 वाजता कामगार न्यायालय परिसर, जुने बी. जे. मार्केट, 3 रा मजला, जी गाळा जळगांव येथे लोकअदालत घेण्यात येणार आहे. तरी कामगार न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस ज्यांना लोकअदालतमध्ये ठेवावयाच्या असतील त्या सर्व संबंधितांनी स्वत: वकीलांमार्फत, प्रतिनिधीमार्फत लोकअदालतमध्ये प्रकरण ठेवण्याबाबतचे संमतीपत्रक भरुन दयावे असे न्यायालय अधिक्षक , श्री अशोक पानपाटील यांनी कळविले आहे.

जिल्हयाला केरोसीनचा साडेपाच हजार किलोलीटरचा तिमाही कोटा प्राप्त



           जळगांव, दि. 16 :- महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जळगांव जिल्हयासाठी केरोसीनचा तिमाही कोटा 5 हजार  544 किलोलिटर प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी दिली आहे.
          प्रतिमहा 1848 किलो लिटर प्रमाणे माहे एप्रिल, मे व जून 2013 चा केरोसीन कोटा एकूण 5 हजार 544 किलोलीटर प्राप्त झाला असून तालुका स्तरावर तहसिलदार यांनी सदरचे केरोसीन नियतन महिन्याच्या 25 तारखेपर्यंत उचल करुन वाटप करणे आवश्यक आहे. तालुकानिहाय केरोसीनचा तिमाही एकूण कोटा पुढीलप्रमाणे – जळगांव 414, जामनेर – 522, एरंडोल – 288, धरणगांव – 360, भुसावळ – 414, बोदवड – 234, यावल – 432, रावेर – 378, मुक्ताईनगर – 234, पाचोरा – 378, चाळीसगांव – 486, भडगांव – 288, अंमळनेर – 342, चोपडा – 486, पारोळा – 288 ,  एकूण  - 5544   

पोस्टल असिस्टन्ट ची परीक्षा 21 एप्रिल रोजी



        जळगांव, दि. 16 :- भारतीय डाक विभागात सन 2011 व 2012 करिता पोस्टल असिस्टन्ट / सॉर्टिंग असिस्टन्ट पदांच्या सरळ भरती करिता ज्यांनी सप्टेंबर 2012 मध्ये अर्ज केले आहेत. अशा सर्व उमेदवारांची परीक्षा, दिनांक 21 एप्रिल 2013 रोजी होईल, अर्जदारांनी प्रवेश पत्रा संबंधीची स्थिती जाणून घेण्यासाठी indiapost.gov.in  ही वेब साईट पहावी असे आवाहन मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांनी केले आहे.

शासकीय बहुउद्देशिय अपंग संमिश्र केंद्रात प्रवेशासाठी 15 जून पर्यत अर्ज करावेत



     जळगांव, दि. 16 :- शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र या संस्थेत सन 2013 – 14 या वर्षाकरिता वय वर्षे 6 ते 15 या वयोगटातील अंध, मुकबधिर अस्थिव्यंग मुलांना प्रवेशासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज दि. 31 मे 2013 पर्यत या कार्यालयाकडून पुरवठा करण्यात येतील सदरील अर्ज संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन दि. 15 जून 2013 पर्यत स्विकारले जातील उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही . विहीत मुदतीच्या आत प्राप्त झालेल्या योग्य त्या उमेदवारास जून महिन्यात मुलाखतीस बोलविण्यात येईल मुलाखत संपल्यानंतर दुस-या दिवशी निकाल घोषीत करण्यात येईल असे अधिक्षक शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र या संस्थाकडून कळविण्यात येत आहे.
         या संस्थेत शासनामार्फ मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरुण – पांघरुण, क्रमिक पुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, शालेय व कला शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. अर्ज पाठवितांना अर्जासोबत खालील प्रमाणपत्राच्या झेरॉक्स पाठवाव्यात आणि मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्र घेवून उपस्थित रहावे.
अपंगत्वाचे वैदयकिय प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मुलांचे 4 फोटो, (शक्यतो अपंगत्व दिसेल असे)
        वरील तिन्ही अपंगत्वाचे प्रवर्गानुसार त्या विभागातील तज्ञांचा वैदयकिय दाखला व मुकबधिरासाठी श्रवणालेख आवश्यक आहे.
        अस्थिव्यंग मुलांना शारिरीक पुन:र्वसन हा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी प्रवेश दिला जाईल. त्या कालावधीत त्यांना शालेय शिक्षण दिले जाईल, शारिरीक पुन:र्वसन झाल्यानंतर त्याचे पुढील वर्षी संस्थेतून नाव कमी करण्यात येईल.
         संस्थेत प्रवेश दिल्यानंतर संस्थेचे सर्व नियमांचे उमेदवार व पालकांनी कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्जच फक्त विचारात घेतले जाईल. अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. परिपूर्ण प्रवेश अर्ज अधिक्षक , शासकीय अपंग संमिश्र केंद्र, जळगांव कडे पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांकावर 9421712828, 9673970531 वर संपर्क साधावा.    

Monday, 15 April 2013

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या सुवर्ण संधी



          जळगांव, दि. 15 :- भारतीय सैन्य दलात युवकांना अधिकारी पदाची संधी उपलब्ध व्हाव्यात   यासाठी, केंद्रीय लोकसेवा अयोगाच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा माहे सप्टेंबर व माहे फेब्रुवारी या महिन्यामध्ये सीडीएस च्या परिक्षा घेतल्या जातात, त्यासाठी माहे सप्टेंबर 2013 मध्ये होणा-या सीडीएस परिक्षेचे ऑनलाईन अर्ज दिनांक 25 मे 2013 रोजी उपलब्ध होणार आहे. यासाठी सीडीएस या परिक्षेला बसणारा उमेदवार हा पदवीच्या परिक्षेला शेवटच्या वर्षात शिकत असावा अथवा पदवीची शेवटची परिक्षा दिलेली असावी, कंबाईन डिफेन्स सर्व्हीसेस या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पुरुषांप्रमाणे महिला उमेदवारांना सुध्दा आर्मीत अधिकारी पदाच्या संधी उपलब्ध असल्याने या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण कंद्र नाशिक रोड, नाशिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी केंद्राच्या दुरध्वनी क्र 0253 / 2451031 व 2451032 वर संपर्क करावा.

शालेय शिक्षण मंत्री (म. प्र.) अर्चना चिटणीस यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



          जळगांव, दि. 15 :- मध्यप्रदेश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्रीमती अर्चना चिटणीस यांचा दिनांक 16 एप्रिल 2013 रोजी जळगांव जिल्हा दौरा आहे त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे—
        दि. 16 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता धामनगांव  (म.प्र) येथून जळगांवकडे प्रयाण, दुपारी 4.30 वाजता जळगांव येथे आगमन. विवेक साप्ताहिक प्रकाशन समारंभास उपस्थिती स्थळ :- कांताई सभागृह, नटराज सिनेमा, जळगांव रात्री 8 वाजता जळगावहून धामनगांव कडे प्रयाण.