Monday, 28 May 2012

जळगांव जिल्हा खरिप हंगाम आढावा बैठक


जळगांव, दि. 28 :- जळगांव जिल्हास्तरीय खरिप आढावा 2012 ची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन मध्ये कृषि राज्यमंत्री गुलाबराव देवकर  यांचे अध्यक्षते खाली झाली.
     जळगांव जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 11.64 लाख हेक्टर क्षेत्र असून 8.93 लक्ष हेक्टर क्षेत्र लागवडी लायक असून खरिपासाठी साधारणपणे 8.33 लाख हेक्टर क्षेत्र आहे. बैठकीत सन 2012 - 13 च्या खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून खरिपाचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
     भात, ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांसाठी 222700 हेक्टर तूर,मूग, उडीद या कडधान्यांसाठी 132300 हेक्टर क्षेत्र, भुईमूग सुर्यफूल, तिळ, सोयाबीन या तेलबिया पिकांसाठी 47200 हेक्टर कापसासाठी 401900 हेक्टर क्षेत्र नियोजन असून खरिपासाठी 823400 हेक्टर क्षेत्राचे नियोजन असून उसासाठी 19300 हेक्टर क्षेत्र असे एकूण 823400 हेक्टर वरील नियोजन बैठकीत सादर करण्यात आले.
     बैठकीत महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध व्हावयाच्या बियाणे वितरण, खरिप हंगामातील रासायनिक खतांचे नियोजन , कृषि निविष्टांचे गुणवत्ता नियंत्रण, कृषि यांत्रिकीकरणाची विशेषमोहिम बैठक विकास, कडधान्य उत्पादन कार्यक्रम राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान विविध विस्तार योजना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, सुक्ष्म सिंचन रोजगार हमी योजनेसाठी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम, वृक्ष लागवड कार्यक्रम, शेतकरी जनता अपघात विमा योजना , मृद व जलसंधारण शेततळे, महात्मा फुले जलभुमी संधारण योजना पाणलोट विकास, कापूस उत्पादक शेतक-यांना मदत, बीज प्रमाणीकरण पीक कर्ज वाटप 60 योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
     बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेता एकनाथराव खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, खा. ए.टी. पाटील, खासदार हरिभाऊ जावळे, आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार  संजय सावकारे , आमदार दिलीप वाघ, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर , डॉ. एस.एस. अडसूळ , कृषि सहसंचालक आगडे, कृषिसभापती कांताताई मराठे व इतर शासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.                                                                    0 0 0 0 0


   


  

  अल्पबचत सभागृहात झालेल्या  खरीप आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर, मंचावर विरोधीपक्ष नेते एकनाथराव खडसे, खासदार हरिभाऊ जावळे, खासदार ए. टी. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. बनसोडे, कृषि सभापती कांताताई मराठे, अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष नागरे, शेजारच्या छायाचित्रातात लोकप्रतिनिधी, अधिकारी दिसत आहेत.   ( छाया - जिमाका, जळगांव ) 

Friday, 25 May 2012

हेक्टरी 10 हजार रुपये मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करु ! पालकमंत्री ना.देवकर


जळगांव, दि. 24 :- गारपीट, वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतक-यांना प्रती हेक्टरी 10 हजार रुपयांची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करु अशी माहिती राज्याचे कृषी परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव देवकर यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
     यावल तालुक्यातील न्हावी, बोरखेडा, मारुळ, हंबर्डी या परिसरातील केळी उत्पादक शेतक-यांच्या केळी बागांचे गारपीट व वादळाने झलेल्या केळी बागेस भेट देवून त्यांनी  पहाणी केली यावेळी त्यांच्या समावेत खासदार हरिभाऊ जावळे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, वाल्मिक पाटील, शरद महाजन, विलास पाटील, अनिल साठे आदि उपस्थित होते.
     ना. देवकर पुढे म्हणाले की, प्रती हेक्टर 10 हजार रुपये मदतीसाठी मी आग्रही राहणार असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रति खोड केळी उत्पादक शेतक-यास नुकसान भरपाई मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातील. शेतक-यांना पीक वीमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हयातील केळी उत्पादक तालुक्यात जिल्हा नियोजन विकास समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत वेधशाळा स्थापन करण्यात येणार आहे. त्‍यामुळे दैनंदिन हवामानातील बदलांचा अभिलेख तयार होईल. शेतक-यांना पीक वीमा संरक्षणाचा लाभ मिळविता येईल. केळी वरील करपा निर्मूलनासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या पथदर्शक प्रकल्पात आवश्यक बदल करण्याबाबत सूचना काही शेतक-यांनी केल्या आहेत. त्यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
                                   * * * * * * *

Thursday, 24 May 2012

रावेरला तालुका मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे महसुल मंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन


जळगांव, दिनांक 24 :- जिल्हयातील रावेर येथे 2 कोटी 75 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात यावयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्‍याणमंत्री पद्माकर वळवी होते.
      प्रारंभी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी प्रशासकीय इमारतीत तहसिल कार्यालय, उपकोषागार कार्यालय, भूमी अभिलेख, तालुका उपनिंबधक, लोक आदलत व सेतू-सुविधा केंद्रासह उपहारगृहाची व्यवस्था राहणार आहे असे सांगून महसूल प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी जिल्हयात राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती त्‍यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.
      यावेळी मार्गदर्शन करतांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महसूल विभाग हा शासनाचा कणा मानला जातो. म्हणून सर्व सामान्‍य जनतेची कामे वेळेवर व पारदर्शी व बिनचूकपणे होण्यासाठी यापुढे जनतेस महसूल विभागाकडून लागणारी कागदपत्रे ऑनलाईन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. व ही कामे होण्यासाठीच तालुका मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची निर्मिती करण्यात येत आहे.
      या कार्यक्रमात ई-चावडी कार्यक्रमांर्तगत तलाठयांना लॅपटॉपचे वितरण करण्यात येऊन संगणकीकृत, सातबारा प्रिंट, संगणीकृत नकाशे, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व आम आदमी विमा योजनेअंतर्गत धनादेशाचे वितरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमास आ. शिरिष चौधरी, डॉ. सुधिर तांबे, आ. एम.एन. शेख, माजी खासदार उल्हास पाटील, पं.सं. सभापती अलका चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार बबन काकडे, परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी, विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.
                                 * * * * * * * *

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

जळगांव, दि. 24 :- महाराणा प्रतापसिंह यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी केली प्रथम अपर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आदरांजली दिली. 
                                   * * * * * * 

राज्यात 71 नवीन उपविभागांची निर्मिती, प्रलंबित कामांना वेग येणार


महसूल विभागाच्या पुनर्रचनेकरिता नेमण्यात आलेल्या बोंगिरवार अभ्यास गटाने केलेली शिफारस आज मान्य करण्यात आली असून, त्यामुळे राज्यात 71 नवीन उपविभाग निर्माण करण्यात येतील. तसेच या उपविभागांसाठी 396 पदे नव्याने निर्माण करण्यात येतील.
     सध्या राज्यात एकूण 112 उपविभाग आणि 358 तालुके आहेत. या निर्णयामुळे एकूण 183 उपविभाग अस्तित्वात येतील.
     निर्णयाचा लाभ:- या निर्णयामुळे भूसंपादनाची कामे वेगाने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण होतील. जाती प्रमाणपत्र, क्रिमीलेअर तसेच नॉन क्रिमीलेअर, आदिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट तपासणी त्याचप्रमाणे वनहक्क दावे निकाली काढणे अशी कामे जलदगतीने होतील. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असलेले कमी मनुष्यबळ लक्षात घेता छोटे उपविभाग केल्यास भूसंपादनाचे काम वेगाने होऊन आर्थिक बचत होईल. उपविभागीय अधिकारी हे दंडाधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडील अपीलांच्या प्रकरणाचा ही जलदगतीने निपटारा होईल.
     शासनाच्या विविध योजनाची अंमलबजावणी त्याचप्रमाणे बी. पी. एल. सर्वेक्षणाचे कामही उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिक प्रभावीरित्या करता येईल.
     पार्श्वभूमी :- महसूल विभागाच्या पुनर्रचनेकरिता 1987 मध्ये नेमलेल्या बोंगिरवार अभ्यास गटाने दोन तालुक्यांकरिता एक उपविभाग निर्माण करावा आणि सध्याच्या भूसंपादन अधिकाऱ्यांकडे उपविभागीय अधिकाऱ्यांचा कार्यभार सोपवून त्यांच्याकडून सर्व प्रकारची महसुली कामे करुन घ्यावीत असे सुचविले. या शिफारशींवर कार्यवाही करण्यास पुणे येथे झालेल्या विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या राज्यस्तरीय परिषदेत तत्वत: मान्यता देण्यात आली होती.
                                                                              00000

Wednesday, 23 May 2012

सैन्य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण


    जळगांव- सैन्य व पोलीस दलात भरती होऊ इच्छिणा-या जळगांव जिल्हयातील युवकांसाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे व कमीत कमी खर्चात प्रशिक्षण देऊन भरती योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगिकृत असलेल्या माजी सैनिक महामंडळाव्दारे करंज नाका, सातारा येथे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. येथे 30 (तीस) दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवास व भोजनासह एकुण शुल्क रु. 5200 (पाच हजार दोनशे) आकारले जाते. तरी इच्छूक उमेदवारांनी (10 वी व 12 वी पास असल्याचे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला) शैक्षणिक प्रमाणपत्रांसह निवड चाचणीसाठी दिनांक 26 मे 2012 रोजी सकाळी 9.00 वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगांव येथे हजर रहावे. चाचणीनंतर पात्र ठरलेल्या युवकांना सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश शुल्क रक्कम रुपये 200/- मात्र त्वरीत भरुन उमेदवाराने आपला प्रवेश निश्चित करावा. या प्रशिक्षण केंद्रामध्ये पात्र विद्यार्थ्यांकडून सैन्यात भरती होण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करुन घेतली जाते. यात शारिरीक चाचणीमध्ये - रनिंग, मैदानी खेळ, पुलप्स, लॉग जम्प व गोळा फेक इत्यादी तसेच इतर विषयांमध्ये लेखी परीक्षेकरिता जनरल नॉलेज, इंग्रजी, गणित या विषयांची तयारी करुन घेतली जाते. तरी जळगांव जिल्हयातील युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कॅप्टन मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.