Tuesday, 3 September 2024

ई गव्हर्नन्समुळे 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण' योजना

 

ई गव्हर्नन्समुळे 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण' योजनेची रक्कम
कमी वेळेत थेट खात्यात जमा होणे शक्य
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ*
मुंबई, दिनांक 0३ सप्टेंबर : ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असून सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत विश्वास निर्माण होतो. 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई-गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
ई-गव्हर्नन्सविषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. "विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण" अशी संकल्पना असलेल्या या दोन दिवसीय परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय सचिव व्ही.श्रीनिवास, केंद्रीय सचिव एस.कृष्णन, केंद्रीय अतिरिक्त सचिव पुनीत यादव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, धोरणकर्ते, पुरस्कार विजेते, देशभरातील प्रतिनिधी, विविध राज्यातील शासकीय अधिकारी, तज्ज्ञ उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात घराची खरेदी-विक्री संदर्भातील मालमत्तेची नोंदणी ही कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात करणे शक्य झाले आहे. सुशासनबाबत बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या "किमान सरकार, कमाल प्रशासन" या वाक्याची आठवण होते. भविष्यात मालमत्ता खरेदी विक्री ही ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता मुख्यमंत्री सचिवालयात ई-ऑफिसद्वारे संपूर्ण फायलिंगचे काम होते. भविष्यात मंत्रालयातील कामे ई ऑफीसद्वारे होणार आहेत. राज्यात सेवा अधिकारांतर्गत सर्व सेवा ऑनलाईन पुरविण्यात येत आहेत.
मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ केंद्रीय नोंदणी केंद्र सुरू केले असून येथे सर्व पत्रे स्वीकारली जात आहेत. यामुळे लोकांचे श्रम आणि वेळ यांची बचत होते. याचदृष्टीने आगामी काळात मुंबई, नवी मुंबई येथे डेटा सेंटर हब बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यासाठी आपल्याकडे उत्तम कुशल मनुष्यबळ असून तंत्रज्ञान आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
ई गव्हर्नन्स प्रणाली राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून शासनाने माहिती तंत्रज्ञान धोरण तयार केले आहे. आता ए.आय. या तंत्रज्ञानाचा वापर उद्योग, कृषी, आरोग्य या क्षेत्रात केला जाणार आहे. प्रशासकीय कामात गती देण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला पारदर्शक न्याय मिळाला पाहिजे. भविष्यात प्रशासन अधिक प्रतिसादात्मक, सर्वसमावेशक आणि नागरिक केंद्रित होत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते कळ दाबून सामान्य प्रशासन विभागाच्या "प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्यपद्धती" याचे नाव बदलण्यात आले असून ते आता नाव "प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन" असे करण्यात आले.
00000000000000

Monday, 2 September 2024

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार बोलीभाषेत शिक्षण


आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार बोलीभाषेत शिक्षण
पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

नाशिक, 2

                राज्यातील काही आदिवासी बहुल भागात कोलामी, माडिया, गोंडी, वारली यासारख्या भाषांचा वापर दैनदिन व्यवहारात केला जातो. तर या भागातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शैक्षणिक भाषेचा विरोधाभास तसेच मातृभाषेतील बालवाचन पुस्तकांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यापार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक बोलीभाषांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळणार आहे.

                अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयच्या निर्देशानुसार इयत्ता १ ली ते ४ थी च्या मराठी बालभारती क्रमिक पाठ्यपुस्तकांचे महाराष्ट्रातील कोरकु, गोंडी, भिल माथवाडी, मावची, माडिया, कोलामी, भिल बसावे, भिल-भिलावू, वारली, कोकणा/ कोकणी, पावरी व कातकरी या १२ बोलीभाषेत अनुवाद करण्यात येत आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात ‘टीआरटीआय’ने त्यांच्याकडे असलेल्या बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांचे भाषांतर करून शासकीय आश्रमशाळासाठी उपलब्ध केले. त्यामाध्यमातून आदिवासी बहुल भागातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी व शिक्षकांना बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे नेले जाणार आहे. 

        दरम्यान, पहिल्या टप्प्यात पहिली व दुसरीचे अनुक्रमे 8682 व 8762 असे एकूण 17 हजार 444 पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहे या पुस्तकांचे वितरण आश्रमशाळास्तरावर सुरु आहे. उर्वरित पाठ्यपुस्तके लवकरच प्राप्त होणार असून, त्यानंतर त्यांचेही आश्रमशाळास्तरावर वितरण केले जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

0000000000

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन









 
शासन आणि प्रशासन एकत्र आलं अन पंतप्रधानांचा जळगावचा कार्यक्रम ऐतिहासिक झाला
   - ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
*माझ्या आयुष्यातला महिलांचा सर्वात मोठा कार्यक्रम - पालकमंत्री गुलाबराव पाटील
*अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

                    जळगाव, दिनांक 02 ( जिमाका ) : जळगाव मध्ये पंतप्रधान यांच्या उपस्थितीत ' लखपती दीदी संमेलन' ही ऐतिहासिक घटना ठरली. शासन म्हणून आम्ही होतो, त्याला प्रशासनाने अत्यंत तळमळीने, झोकून देऊन काम केले म्हणून विपरीत परिस्थितीतही हा ऐतिहासिक कार्यक्रम होऊ शकला असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एवढा सुनियोजित एवढ्या मोठ्या संख्येनी महिला एकत्र आलेला कार्यक्रम आयुष्यात पहिल्यांदा अनुभवल्याचे सांगितले. 

                 आज नियोजन भवन मध्ये ' लखपती दीदी संमेलन' आणि 'महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सहभागी असणाऱ्या पडद्या मागच्या हातांचा गौरव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

                यावेळी मंचावर आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे  हे मान्यवर उपस्थित होते. 

               मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक मोठा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यापाठोपाठ पंतप्रधानांचा एवढा भव्य कार्यक्रम तेही पावसात करणं हे सोपं काम नव्हतं. पण हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अत्यंत यशस्वीपणे केला यात. जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, आणि जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणानी अत्यंत नियोजनबद्द काम केलं त्यामुळे देशभर या कार्यक्रमाचे कौतुक होतं असल्याचे आणि तसे फोन आणि संदेश आल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. 

                 जळगाव मधला महिला सशक्तीकरण अभियाननांतर्गत घेतलेला कार्यक्रम राज्यभर गौरवला गेला आणि 'लखपती दीदी संमेलन' तर देशभर गाजतो आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी कुटुंबं म्हणून काम केलं. 26 एकरचा सभा मंडप, वरून पाऊस असं हे आव्हानात्मक काम गिरीशभाऊंच्या नेतृत्वात झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिलांचा झालेला हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा म्हणून नोंद झाली असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. 

              आ. सुरेश भोळे यावेळी यांनीही या नियोजनाचे कौतुक करून, शेवटच्या घटकाला न्याय देण्याची पंतप्रधानांची भूमिका असल्यामुळे या कार्यक्रमाला झटणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. 

                यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी  या कार्यक्रमातील केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांनी दोन्ही कार्यक्रमात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. 

              यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित , अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनावने, नगरप्रशासन अधिकारी एकनाथ पवार यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. 

अधिकारी, कर्मचारी यांचा गौरवपत्र देऊन सन्मान

            'लखपती दीदी संमेलन' कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव पत्र देऊन सन्मानीत केले. त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, एस. टी महामंडळ अधिकारी, ज्यांच्या ज्यांच्यावर या कार्यक्रमाकाची जबाबदारी होती त्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी दोघांनी गौरव केला.

00000000000000

विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती

 राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन !

                 जळगाव, दिनांक 2 ( जिमाका ) : राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी  परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

                महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात उच्य शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे. 

            याबाबत शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०६/०९/२०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहेत.

अटी व शर्ती लाभाचे स्वरूप

* विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदायातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

* पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल.

* विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.८.०० लक्ष इतके मर्यादित असावे.

* परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी.

* परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहित पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी.

* पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी.

* निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्ती ह्या जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार व संबंधित शासन निर्णयानुसार लागू राहील.    * परदेशातील शैक्षणिक संस्थेने Offer Letter मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गांनी Economy Class विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह), निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डींग पास  इ.तपासून विद्यार्थ्यांचे बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केले जाईल.   

* विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर देशांसाठी USD१५४०० तर युकेसाठी GBP९९०० इतक्या रकमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तिक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

* विद्यार्थ्यांस खालील बाबींवर होणा-या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यु.एस.ए. व इतर देशांसाठी (यु.के. वगळून) १५०० USD आणि यु.के. साठी ११०० GBP इतका इतर खर्च/आकस्मिक खर्च म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.       

                अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना,  शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्वाच्या अटी व शर्ती इ.सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.   

            या योजनेस पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील परिपुर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि.०६/०९/२०२४ पर्यंत वेळ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. 

0000000000

खेलो इंडिया

 


खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिर जळगाव येथे ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान आयोजित

            जळगाव, 2 सप्टेंबर २०२४ : खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चा एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांच्या उभरत्या खेळाडूंचे मूल्यांकन केले जाणार आहे. 

            या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री, माननीय श्रीमती रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.यावेळी त्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार असून, क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या बाबतीत चर्चा करतील.

        खेलो इंडिया KIRTI कार्यक्रमाचा उद्देश खेळाडूंच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे हा आहे. या शिबिरामुळे जळगाव आणि परिसरातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे.

        या शिबिरात विविध क्रीडा प्रकारांसाठी कौशल्ये तपासण्यात येणार आहेत. खेळाडूंच्या व क्रीडा मार्गदर्शकांच्या सहभागाने या शिबिराचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे.

0000000000

वाघूर नदीला पूर ;

 



वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन

                जळगाव, दिनांक  2 ( जिमाका )  : वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील 02 दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच मदतकार्याची गती वाढविणेबाबत सूचना केल्या.

    वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही मात्र वित्तहानी झालेली आहे.  बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणेत येत आहे. मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) ही मागविणेत आलेले असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदतकार्य करणेत येत आहे. तसेच जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इ. ठिकाणीही मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) नियुक्त करण्यात आलेले आहे. 

    तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जावु नये तसेच पशुधन ही नेऊ नये.  आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000000000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखहून अधिक विद्यार्थ्यांची निवड
साठ हजारहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू
कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची माहिती


मुंबई, दिनांक २ सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत ३.३५ लाख रोजगारासाठी २.८५ लाख युवक-युवतींनी आपली मागणी नोंदवली आहे. यौपैकी १.१० लाख जणांना प्रत्यक्षात रोजगार प्राप्त झाला आहे. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली.

याविषयीची अधिक माहिती देतान मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा म्हणाले की “भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देवून, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.”

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि त्या खालोखाल अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ५००० युवा रुजू झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असे मंत्री श्री. लोढा म्हणाले.

या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत १० लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दीष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन श्री. लोढा यांनी यावेळी केले.
000000000