Tuesday, 2 July 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची टंकलेखन
कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय

 

मुंबई, दिनांक २ जुलै, 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा- २०२३ लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता १ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            १ जुलै, २०२४ ते ३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आयोगाने कळविले आहे.


             या परीक्षेमधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवगांकरीता टीसीएस या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत दिनांक ०१ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. तथापि दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्धवभल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही.


            यामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी लागू शकणारा वेळ विचारात घेवून दिनांक ०१ जुलै, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.


0 0 0 0 0 0 0

विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

 विधानसभेत विश्वविजेत्या 
भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

 

मुंबई, दिनांक २ जुलै, 2024 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आज मर्यादित २० षटकांच्या विश्व करंडक स्पर्धेतील विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. नुकत्याच पार पडलेल्या नवव्या मर्यादित २० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात बर्बाडोस  येथील किंग्सटन ओव्हल मैदानावर दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा भारताने पराभव केला. यावेळी कर्णधार रोहित शर्मासह क्रिकेट संघातील सर्वच खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

0 0 0 0 0

Monday, 1 July 2024

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी : विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारीडॉ.प्रवीण गेडाम यांनी केली घोषणा

 


नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे  विजयी
   -विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारीडॉ.प्रवीण गेडाम यांनी केली घोषणा

नाशिक, दिनांक २ जुलै, २०२४ (विमाका वृत्तसेवा)

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती 26 हजार 476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक  पसंतीक्रमाची  32 हजार 309 मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये 19 व्या बाद फेरीनंतर श्री. संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये  जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. 19 व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक  पसंतीक्रमाची  5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसरा फेरी अखेर 17 हजार 393 मते पडली असून सर्वाधिक पसंती

क्रमाची 6 हजार 72 मते पडली.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा., जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल , जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर,  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

0 0 0 0 0 0 0 0

पाणी पुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेणार - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 पाणी पुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेणार
- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दिनांक 1 जूलै, 2024 : राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी योजना पुर्ण होऊन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र बऱ्याच जिल्ह्यात योजनांची कामे पूर्ण करताना अडचणी येत आहे. या बाबत प्रत्येक जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या समवेत आढावा बैठक घेण्यात येईल. या बैठकांमध्ये जिल्ह्यातील योजना पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

               जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांबाबत सदस्य दादाराव केचे यांनी लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. या सुचनेच्या चर्चेमध्ये सदस्य यशोमती ठाकूर, राजेश पवार, नितेश राणे, सुभाष धोटे, धीरज देशमुख, त्रुतूजा लटके, श्री. खोसकर यांनीही सहभाग घेतला.

                उत्तरात अधिकची माहिती देताना पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, पाणी पुरवठा योजनांचे कंत्राट देताना गावातील खोदून ठेवलेले रस्ते दुरूस्त करून देण्याची तरतूद आहे. यामध्ये आणखी काही तरतूदी करावयाच्या असल्यास किंवा योजनांचे सुलभीकरण करण्यासाठी सूचना द्याव्यात. गावातील कुठल्याही योजनेच्या कामासाठी  ग्रामसभेची संमती आवश्यक असते. त्याशिवाय काम सुरू करता येत नाही. पाण्याच्या उद्भवासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. प्रमाणपत्र असल्याशिवाय पाणी पुरवठा योजनेतील पाण्याचा उद्भव करण्यात येत नाही.

              श्री. पाटील म्हणाले, पाणी पुरवठा योजनांची कामे मोठ्या संख्येने असल्यामुळे एका कंत्राटदाराकडे एकापेक्षा जास्त योजनांची कामे आहेत. याबाबत तालुक्यातील एकत्रित कामांची एकच निविदा काढण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या निकालामुळे एकत्र कंत्राट न देता सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी त्यांच्या कामाच्या अनुभवानुसार कंत्राट देण्यात आले.  पाणी पुरवठा योजनांचे देयक त्रयस्थ संस्थेकडून कामाचे अंकेक्षण केल्याशिवाय काढण्यात येत नाही. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, कारंजा व आष्टी तालुक्यातील 104 गावांच्या योजनांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत चौकशी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. योजनेची कामे करताना कुठेही गैरप्रकार, अनियमितता झाली असल्यास तक्रार आल्यास चौकशी करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

0 0 0 0 0 0 0

मंत्रिमंडळ उपसमितीच्या मान्यतेनंतर सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी लागणार - मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 मंत्रिमंडळ उपसमितीच्या मान्यतेनंतर
सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी लागणार
- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

           

 मुंबई, दिनांक 1 जूलै, 2024 - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणीचालकांचा प्रलंबित देयकांबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राप्त झाला असून मंत्रिमंडळ उपसमितीच्या मान्यतेनंतर आजच हा प्रश्न निकाली निघेल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. सदस्य जयंत पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य शशिकांत शिंदे यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांतील 299 चारा छावण्यांचा अनुदानाचा प्रश्न 2019-20 पासून प्रलंबित होता. त्यापैकी काही चारा छावण्यांना अनुदानाचे वितरण झाले होते. तर काही छावण्यांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी समर्पित केला होता. सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्यांच्या प्रलंबित अनुदानाच्या प्रश्नाबाबत 11 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक घेऊन विभागीय आयुक्तांना त्रुटींबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून आणि नैसर्गिक न्याय तत्वानुसार किरकोळ त्रुटींबाबत न्यायाची भूमिका घेऊन तांत्रिक अडचणींवर समाधान काढण्याची सूचना करण्यात आली. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांमार्फत फेरप्रस्ताव प्राप्त झाला असून आज होणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत त्यास मान्यता मिळाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. सांगोला, मंगळवेढा याबरोबरच माण, खटाव, पंढरपूर, मोहोळ, फलटण येथील प्रश्न देखील मार्गी लावण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

            चारा छावण्यांना अनुदान देताना केंद्राच्या एनडीव्हीआय च्या निकषांनुसार अनुदान द्यावे लागते. यातील निकषांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने केंद्राकडे विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सदस्य जयंत पाटील यांनी या प्रश्नी पाठपुरावा केल्यानंतर मंत्री श्री. पाटील यांनी सकारात्मकतेने हा प्रश्न सोडविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

0 0 0 0 0 0 0

खरीप पिक योजना २०२४ शेतकऱ्यांनी CSC चालकांना प्रती विमा अर्ज रु.१ पेक्षा अधिक रक्कम देऊ नये

 खरीप पिक योजना २०२४  शेतकऱ्यांनी CSC चालकांना
प्रती विमा अर्ज रु.१ पेक्षा अधिक रक्कम देऊ नय

जळगाव, दिनांक १ जुलै 2024 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. गत वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. खरीप २०२४ मध्ये ३० जून पर्यंत ४० लाख विमा अर्ज नोंद झाली आहे.

विमा अर्ज बाबत महत्वाची माहिती - प्रधानमंत्री पिक विमा योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति विमा अर्ज रुपये एक प्रमाणे योजनेतील सहभाग शासनाने देऊ केला आहे.  

विमा योजनेमध्ये सहभागासाठी खालील पर्याय आहेत - शेतकरी स्वतः केंद्र सरकारचे विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर ऑनलाईन अर्ज भरू शकतो, शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो ,  कर्जदार शेतकऱ्यांनी विमा मुदत संपायच्या किमान सात दिवस आधी विमा योजनेत सहभाग घ्यायचा असल्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेस कळविल्यास त्या संस्थेमार्फत त्याचा विमा हप्ता जमा करुन त्यांना सहभागी करुन घेण्यात येते,  केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सहभाग घेऊ शकतो,  सीएससी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो,  सीएससी केंद्र चालकांना प्रति शेतकरी रुपये 40 प्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. सदर शुल्क संबंधित विमा कंपनी ही सीएससी यांना अदा करणार आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य शुल्क सीएससी चालक घेऊ शकत नाहीत, मात्र शेतकऱ्याने ७/१२, ८-अ स्वत: काढून दिला पाहिजे. किंवा शासकीय शुल्क भरून online प्राप्त करून घ्यावा. 

राज्यात काही ठिकाणी काही सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्याकडून प्रति अर्ज रुपये एक पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत अशा प्रकारची घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाईल.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे ?  - अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतक-यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्या साठी शेतक-याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतक-याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत दि. १५ जुलै, २०२४ आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन कृषी दिनाच्या दिल्या शुभेच्छा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
कृषी दिनाच्या दिल्या शुभेच्छा

 

मुंबई, दिनांक 1 जूलै, 2024 :  महाराष्ट्रातील कृषी, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या राज्यातील शेतकरी तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रात सक्रिय, अशा सर्वांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आदींनीही पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

0 0 0 0


दि.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दिनांक 1 जुलै, 2024 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित-धवल क्रांतीचे प्रणेते दि. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या  उपसभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड, अमोल मिटकरी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0 0 0 0 0 0 0