Tuesday, 24 January 2017

ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी कार्यशाळा संपन्न तहसिलदार कैलास देवरे यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन


ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी कार्यशाळा संपन्न
तहसिलदार कैलास देवरे यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन

            चाळीसगांव, दिनांक 24 :-  जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2017 साठी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यापुर्वी स्वत:च्या नावाची नोंदणी करुन लॉग-इन व पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. अर्ज भरतांना काही चुका होऊ नयेत, उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरु नयेत,  ऑनलाईन अर्ज कसा भरावा यासाठी आज तहसिल कार्यालयात ऑनलाईन नामनिर्देशन भरण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करतांना तहसिलदार कैलास देवरे बोलत होते.
            यावेळी निवडणूक नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, अवल कारकून डी.जे.राजपूत, अमृतकार यांच्यासह विविध पक्षाचे उमेदवार, संग्राम कक्ष, ई-सेवा केंद्र, मदत कक्षातील संगणक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी वेबपेज पुढील सर्व प्रक्रियेसाठी वापरावयाचे असून यामध्ये निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली स्वत:ची नोंदणी करुन नामनिर्देशन भरतांना कुठलाही रकाना रिकामा ठेवू नये. ज्या पर्यायाचे उत्तर नसेल त्या ठिकाणी रेष ओढावी, मात्र ती जागा रिक्त ठेवू नये. अन्यथा अर्ज बाद होईल अशा सूचना चाळीसगांव तालुक्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कैलास देवरे यांनी आज दिल्या.
            सर्वोच्च न्यायालयाच्या 2002 च्या निर्णयानुसार मतदारांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याआधी उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभुमी, संपत्ती व शैक्षणिक अर्हतेबाबत माहिती मिळण्याचा त्यांना हक्क आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराला नामनिर्देशनासोबत प्रतिज्ञापत्र दाखल करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन नामनिर्देशनासाठी असलेल्या चार टप्प्यांपैकी, पहिले तीन टप्पे हे संगणकीय प्रणालीचे असून चौथा टप्पा हा उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र/घोषणापत्राचा आहे.
            नामनिर्देशनपत्र नोंदविण्यासाठी आधार क्रमांकाची जागा दर्शविली आहे. त्या ठिकाणी आधार क्रमांक भरावा, तथापि आधार क्रमांक एच्छिक आहे, तो न दिल्यास नामनिर्देशपत्र फेटाळले जाणार नाही. नामनिर्देशपत्रावर आपणास ज्या पध्दतीने नाव आवश्यक आहे त्या पध्दतीने स्वत:चे नाव, वडीलांचे/पतीचे नांव, आडनाव भरा. माहिती भरतांना आडनावाच्या जागी आडनाव व स्वत:च्या नावाच्या ठिकाणी स्वत:चे नाव येईल याची खात्री करा. आपल्या नावाचे मराठीकरण संगणकाव्दारे केले जाईल. नावाची अक्षरे योग्य नसल्यास आलेल्या पर्यायांमध्ये सिलेक्ट करुन योग्य नावाची खात्री करा. अर्ज भरतांना लिंग, जन्म तारीख, व्यवसाय, पिनकोडसह पत्ता भरा. आपले वय जन्म तारखेनुसार संगणकाने अचूक दर्शविले आहे, याची खातरजमा करा. नसल्यास योग्य जन्म तारीख पुन्हा भरून खात्री करा. यासारख्या विविध सुचना देऊन उपस्थितांच्या शंकाचे निरसनही या कार्यशाळेत करण्यात आले.

* * * * * * * *

Monday, 23 January 2017

पंतप्रधानांच्या हस्ते निशा पाटील हीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान


पंतप्रधानांच्या हस्ते निशा पाटील हीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान

       नवी दिल्ली, दि.23 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जळगाव जिल्हयातील भडगाव येथील निशा पाटील हीला यंदाचा(वर्ष 2016) राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
            पंतप्रधानांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी आयोजित शानदार कार्यक्रमात आज 12 मुली आणि 13 मुले अशा एकूण 25 बालकांना वर्ष 2016 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यातील ४ बालकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी हा पुरस्कार स्वीकारला.केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मनेका गांधी, भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यावेळी उपस्थित होत्या. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
            याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित बालकांना संबोधित केले. ते म्हणाले, पुरस्कार प्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचले. या बालकांच्या आयुष्यातील ही उत्तम सुरुवात असून त्यांनी देशासाठी उत्तमोत्तम काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती  निमित्त नेताजींच्या योगदानाबाबतही पंतप्रधानांनी बालकांना मार्गदर्शन केले. महापुरूष आणि खेळाडुंच्या आत्मचरित्राचे वाचन करून त्यांच्या कार्याचा अंगीकार करा असे आवाहन त्यांनी, पुरस्कार विजेत्या बालकांसह देशातील बालकांना केले. मनेका गांधी यांनीही उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले.
 जळगाव जिल्हयातील निशा पाटील हीला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. प्रसंगावधान आणि धाडस दाखवून निशा पाटीलने 6 महीन्याच्या चिमुरडीला आगीच्या विळख्यातून वाचविले होते. निशाच्या या कामगिरीची नोंद घेऊन तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  
            प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनात ही बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कार प्राप्त बालकांनी याआधी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासह  अन्य गणमान्य व्यक्तींची  भेट घेतली आहे.           
भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणा-या ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिना आधी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते 


* * * * * * * *

ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी चाळीसगांवात कार्यशाळेचे आयोजन

ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी
चाळीसगांवात कार्यशाळेचे आयोजन
           
            चाळीसगांव, दिनांक 23 :-  जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक 2017 साठी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरतांना काही चुका होऊ नयेत, उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरु नयेत यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा यासाठी मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2017 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता तहसिल कार्यालय, चाळीसगाव  येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
            चाळीसगाव तालक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती  सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार हे आहेत. दिनांक 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी  हा उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे. उमेदवारांना त्यांचा अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरावयाचा आहे. त्याची प्रिंट करुन त्यावर नोटरी स्वत:ची सही करुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरतांना येणाऱ्या अडीअडचणी, शंकाचे निरसनासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद  व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 तथा तहसिलदार कैलास देवरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

Wednesday, 18 January 2017

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थिर सर्वेक्षणासह व्हिडीओ सर्वेक्षण पथकांची नेमणूक : प्रातांधिकारी शरद पवार

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
स्थिर सर्वेक्षणासह व्हिडीओ सर्वेक्षण पथकांची नेमणूक
: प्रातांधिकारी शरद पवार
            चाळीसगांव, दिनांक 17 :-  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या पथकांनी चोख कामगिरी बजावून अहवाल सादर करण्याच्या सुचना निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक-2017 तथा प्रातांधिकारी शरद पवार यांनी दिल्या.
            निवडणूकी संदर्भात रोख रकमेचे वाटप, मद्याची अवैध मार्गाने वाहतुकीसह इतर तक्रारी प्राप्त होतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तालुक्यातील पिलखोड, मेहुणबारे, हिंगोणे सीम, हिरापुर, बोढरे, जामडी प्र.ब. या सहा ठिकाणांवर स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील पिलखोड येथील जबाबदारी अमोल भदाणे विस्तार अधिकारी, मेहुणबारे येथील जबाबदारी प्रतापराव पाटील पशुधन पर्यवेक्षक, हिंगोणे सीम येथील जबाबदारी अविनाश राठोड कनिष्ठ सहा., हिरापूर येथील जबाबदारी पी.जे.पाटील कनिष्ठ लिपीक सहा. निबंधक, बोढरे येथील जबाबदारी सतिष सोनवणे वसुली कर्मचारी सहा.निबंधक तर जामडी प्र.ब. येथील जबाबदारी बाळकृष्ण सोनवणे रोखपाल सहा.निबंधक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांसमवेत एका सहाय्यकासह एक पोलीस कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.
सभा आणि रॅलींवर असणार व्हिडीओ सर्वेक्षण पथकाची नजर
            निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सभा, रॅलींवर  व्हिडीओ सर्वेक्षण पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे. यासाठी देखील सहा पथके नियुक्त केले असून पथक प्रमुख म्हणून पोपट गाढवे कृषी पर्यवेक्षक, सुनिल भालेराव कृषी पर्यवेक्षक, सुभाष राठोड कृषी पर्यवेक्षक, मनोहर गांगुर्डे कार्यालय अधिक्षक पंचायत समिती, प्रदीप सोनवणे आरोग्य विस्तार अधिकारी, धीरज पाटील कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती या सहा अधिकाऱ्यांसह एक सहाय्यक व व्हिडीओग्राफरची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके आयोजित सभा, रॅलींचे चित्रीकरण करुन चित्रीकरणाचा अहवाल आचारसंहिता कक्षाकडे सादर करणार असून सभेच्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शणास आल्यास तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
            या पथकात नेमणूक केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारीत हयगय किंवा टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अन्वये तसेच पंचायत आणि नगर पालिका निवडणुक अधिनियम 1995 चे नियम 9 नुसार कारवाई करण्याची तंबी देखील निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार यांनी दिली आहे.

* * * * * * * *

Tuesday, 17 January 2017

विधान परिषद निवडणूकी संदर्भात मतदारांना आवाहन

विधान परिषद  निवडणूकी संदर्भात मतदारांना आवाहन
        नाशिक, दि. 17 :- विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीचे मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने मतदारांना मतदान करण्याबाबत सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान अधिकारी क्र. 2 यांचे कडून मतपत्रिकेसोबत दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच मतदान करावे. याशिवाय इतर पेन,पेन्सिल,बॉल पाँईंट पेन वापरू नये. अन्यथा मतपत्रिका रद्द होऊ शकते. मतदान पसंती क्रमांकानुसार असल्याने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर अंकी क्र.1 लिहून मतदान करावे. 1 हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा. मतदाराच्या निवडीनूसार जास्तीत जास्त तीन पसंतीक्रम (अंकांमध्ये) नमूद करू  शकतो. सर्वात खाली वरीलपैकी नाही (नोटा) पसंतीक्रम असेल.
एकापेक्षा जास्त उमेदवारांचे नावासमोर सारखाच पसंतीक्रम दर्शविल्यास सदर मतपत्रिका बाद होईल. मतपत्रिकेवर नमूद करावयाचा पसंतीक्रम फक्त अंकांमध्येच (मराठी देवनागरी, इंग्रजी, रोमन .)नमूद करावयाचा आहे. सदर पसंतीक्रम शब्दात लिहिल्यास मतपत्रिका बाद होईल. आपल्या पसंतीच्या उमेदवारापुढे X असे करू नये.अन्यथा मतपत्रिका बाद होईल. मतदारास आपला पहिला पसंतीक्रम नमूद करणे आवश्यक आहे.
पहिला पसंती क्रम नमूद केल्यास किंवा पहिला पसंती क्रम एकापेक्षा जास्त उमेदवारांचे नाव पुढे दर्शविल्यास मतपत्रिका बाद होते. कोणत्या उमेदवारास पसंती क्रम नोंदविला आहे याचा बोध   झाल्यास, एकाच उमेदवाराच्या नावासमोर सर्व पसंतीक्रम दर्शविल्यास, पसंतीक्रम अंकी दर्शविता अक्षरी दर्शविला असल्यास, मतदाराची ओळख पटेल अशा रितीने मतपत्रिकेवर चिन्ह अथवा मजकूर नमूद असल्यास आणि मतदान अधिकारऱ्याने पूरविलेल्या जांभळया स्केचपेन शिवाय इतर साधनांचा वापर करून पसंतीक्रम दर्शविल्यास  मतपत्रिका बाद होते.
मतदारांनी या सुचनांचे काटोकोरपणे पालन करून योग्य पद्धतीने मतदान करावे,असे आवाहन उपायुक्त, सहा. निवडणूक  निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधरमतदार संघ  यांनी केले आहे.
निवडणूक निरीक्षक म्हणून आर.जे. कुलकर्णी यांची नियुक्ती
भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुक 2017 करीता दुग्ध व्यवसाय आयुक्त आर.जे कुलकर्णी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-2312182 आणि भ्रमणध्वनी क्रमांक 9112497953 आहे, असे निवडणुक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ यांनी कळविले आहे.

* * * * * * * *

Monday, 16 January 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा: प्रातांधिकारी शरद पवार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा
: प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगांव, दिनांक 16 :-  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पडण्यासह सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश शरद पवार, उप विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक-2017 यांनी दिले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कैलास देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, गट विकास अधिकारी अे.बी.राणे, पोलीस निरिक्षक (शहर) आदिनाथ बुधवंत, पोलीस निरिक्षक (ग्रामीण) एस.पी.गायकवाड, सहा.पोलीस निरिक्षक (मेहुणबारे) डि.के.शिरसाठ, उप अधिक्षक भुमी अभिलेख बी.सी.अहिरे, नायब तहसिलदार (निवडणुक) विजय सुर्यवंशी, नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला  आहे. याबरोबरच तक्रार निवारणकक्ष, व्हिडीओ ग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्ट पथक तात्काळ सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. 
या निवडणूका मुक्त, निर्भय, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आप-आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशी सूचना करुन उप विभागीय अधिकारी श्री.पवार म्हणाले, आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणूकीच्या क्षेत्रात घडणाऱ्या महत्वाच्या घटना, मिरवणूका, प्रचार फेऱ्या, सभा अथवा आचारसंहितेचा भंग होईल अशा घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. भरारी पथक स्थापन करुन रोख रकमेसह मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभन ठरतील अशा व अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यावेळी नामनिर्देशनपत्र व शपथपत्र ऑनलाईन भरण्यात येणार असून या फॉर्मची प्रत स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत कक्षांची स्थापना देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 व मा.राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणे यावर बंदी घालण्यात आली असून अशी वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही सर्व संबंधितांना यावेळी देण्यात आल्या.


* * * * * * * *

Friday, 6 January 2017

समाज व्यवस्था सुदृढ करण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे : प्रातांधिकारी शरद पवार


समाज व्यवस्था सुदृढ करण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे
: प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगांव, दिनांक 6 :-   मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिनम्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत समाज व्यवस्था सुदृढ करण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे असे आवाहन चाळीसगावचे उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी आज केले.
चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळ तसेच उप माहिती कार्यालय, चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेट बँकेच्या इमारतीमधील रिलायन्स हॉल येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, तहसिलदार कैलास देवरे, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सहाय्यक निरीक्षक (वाहतुक) सुरेश शिरसाठ, जेष्ठ पत्रकार बी.एस.पाटील, किसनराव जोर्वेकर, बी.ए.पाटील, रविंद्र अमृतकार, संजय सोनार, आनंद खरात, प्र.माहिती सहाय्यक मनोहर पाटील, तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, एम.बी.पाटील, जिजाबराव वाघ यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रातांधिकारी श्री.पवार म्हणाले, सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमांव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला असून पत्रकारीतेला दिलेल्या स्वातंत्र्यानंतर आपले नैतिक मुल्ये जोपासून समाजहितासाठी प्रत्येक पत्रकाराने जागरूक राहणे ही काळाची गरज आहे. सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्याबरोबरच वैचारिक चळवळ उभारून समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले तर समाज व्यवस्था सुदृढ होण्यास वेळ लागणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर प्रसिध्दी माध्यमांचेही मोठे योगदान लाभत असल्याचे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर आपल्या मनोगतात म्हणाले.
यावेळी बोलतांना तहसिलदार श्री.देवरे म्हणाले, प्रसिध्दी माध्यमातील प्रत्येक व्यक्ती हा शब्दाने श्रीमंत असून त्यांनी आपल्या शब्द श्रीमंतीचा उपयोग समाजातील उपेक्षीत घटकांसाठी करावा. यामुळे शासनाच्या योजनांपासून कुठलाही घटक उपेक्षीत राहणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी चाळीसगांव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळातर्फे तालुक्यातील जेष्ठ पत्रकार बी.एस.पाटील, किसनराव जोर्वेकर, बी.ए.पाटील, रविंद्र अमृतकार, संजय सोनार, आनंद खरात यांच्यासोबत प्रभारी माहिती सहाय्यक मनोहर पाटील यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर सत्कारार्थींच्या वतीने जेष्ठ पत्रकार बी.एस.पाटील व किसनराव जोर्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत  उपस्थिती पत्रकारांना पत्रकारांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करुन दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी यांनी पत्रकारांना संघटीत करुन पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिजाबराव वाघ यांनी त्यांच्या काव्यात्मक शैलीतुन केले तर आभार सचिव एम.बी.पाटील यांनी मानले.

* * * * * * * *