Monday, 22 April 2013

म्हसावद रेल्वे उडडाणपुलाचे काम वेळेत पूर्ण करावे - पालकमंत्री गुलाबराव देवकर

      जळगांव, दिनांक 22:- म्हसावद व परिसरातील ग्रामस्थांची बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली रेल्वे उडडाणपुलाची मागणी आज पूर्ण होत असून या रेल्वे उडडाणपुलाचे काम चांगले व दर्जेदार झाले  पाहीजे. तसेच संबंधीत मक्तेदारांने हे काम आठरा महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी केली.

     म्हसावद येथे ना. देवकर यांचे हस्ते रेल्वे उडडाणपुलाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्याप्रसंगी ते बोलत होते.  या पुलासाठी शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी दिला असून सदरचे काम अठरा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.  सदरचा पूल एरंडोल-नेरी- रस्त्यावर असून यामुळे या परिसरातील लोकांना फायदा होणार आहे.

     यावेळी जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, गोपाळ पाटील, दिलीप धनगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे आदिसह म्हसावदचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


सहकारी पीक संरक्षक संस्थांनी मानसिकता बदलणे आवश्यक -- पालकमंत्री गुलाबराव देवकर




         जळगाव, दिनांक 22:-  जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशन अंतर्गत जिल्हयात सुमारे पाऊणे तीनशे प्राथमिक पीक संरक्षक संस्था कार्यरत आहेत.  आजच्या स्पर्धेच्या युगात संस्था जीवंत राहाव्यात म्हणून त्यांनी मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
  
      जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनचा सुवर्ण महोत्सव समारंभाचे उदघाटन प्रसंगी ना. देवकर बोलत होते.  यावेळी राज्य मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे, जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, फेडरेशनचे चेअरमन वसंतराव पंडीतराव कोल्हे, जिल्हा सहकारी बोर्डाचे चेअरमन बापूराव हिंमतराव देशमुख, दिपीप बंडगर, उपसभापती विजय नारखेडे आदि मान्यवरांसह सोसायटयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

     श्री. देवकर म्हणाले, स्पर्धेच्या युगात पिक संरक्षक सोसायटयांचनी फेडरेशनच्या माध्यमातून कृषि विषयक इतर कार्ये सुरु करुन आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.  या सोसायटयामार्फत खते व बियाणे, कृषि औषधी आदि कार्ये करावीत. पीक कर्ज वाटपात सहकारी पीक सरंक्षक संस्थांचे ना हरकत प्रमाणपत्रा घेणे याबाबत राज्य शासन धोरणात्मक निर्णय होईल. परंतु कोंडवाडे, पीक पहाणी व नुकसानीचे पंचनामे या कामात सोसायटयांनी कशा प्रकारे सहभागी करुन घेता येईल याकरिता प्रयत्न केला जाईल असे ना. देवकर यांनी सांगितले.

     प्रारंभी ना. देवकर  यांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. फेडरेशनचे संचालक नानासाहेब शामराव पाटील यांनी प्रास्तावीकात फेडरेशन समोरील आडचणी व समस्या मांडून फेडरेशनच्या 50 वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.

     जिल्हयातील सहकारी पीक संरक्षक सोसायटयांना संरक्षण मिळणे आवश्यक असून संस्थांनी ही वसुली करुन संस्था टिकवून ठेवल्या पाहिजेत, असे मार्केटींग  फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी सांगितले.  यावेळी जिल्हा सहकारी बोर्डाचे चेअरमन बापूराव हिंमतराव देशमुख यांचे ही मार्गदर्शनपर भाषण झाले.

     यावेळी ना. देवकर व मान्यवरांच्या हस्ते जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले. 

    कार्यक्रमाचे प्रास्तावीक व आभार नानासाहेब पाटील यांनी केले.

Saturday, 20 April 2013

राज्यात उत्पादित होणाऱ्या शंभर टक्के कापसावर प्रक्रिया केली जाईल-- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

 


            जळगांव,दिनांक 20 -  राज्यातील एकूण कापूस उत्पादनाच्या 75 टक्के कापूस बाहेरील राज्यात जात असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना न मिळता मध्यस्थ व्यापाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे राज्य शासन वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून राज्यात उत्पादित होणाऱ्या शंभर टक्के कापसावर येथेच प्रक्रिया  करणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मोठया प्रमाणावर मिळेल,  असे  प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

        जळगांव येथे आमदार मनीषदादा जैन फाऊंडेशनमार्फत आयोजित महाराष्ट्र कापूस परिषदेच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.  याप्रसंगी कृषि व पणन मंत्री श्री.राधाकृष्ण विखे-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री मोहमद आरिफ (नसीम) खान, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार माणिकराव ठाकरे, आ.मनीष जैन, आ.शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, महापौर किशोर पाटील, संजय गरुड, रमेश जैन, डॉ.सी.डी.माई आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

        मुख्यमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, राज्यात कापूस उत्पादनासाठी 95 टक्के बी.टी. बियाणाचा वापर होत असून कापसाचे नवीन वाण विकसीत करणाऱ्या बियाणे कंपन्यांचे संघटन करुन त्यांना शासनाकडून मदत दिली जाईल.  तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 2 हजार 100 कृषि सर्कल मध्ये स्वयंचलित हवामान मापक यंत्र लावण्यात येणार आहेत.  त्यामुळे उपग्रहाच्या माध्यमातून उष्णतामान, हवा, आद्रता, पाऊस आदि निकषांची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

      राज्यातील सुमारे 82 टक्के  शेतकऱ्यांसाठी  कोरडवाहू शेती अभियान राबविले जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना कृषिमधील आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, पाण्याचा शास्त्रीय वापर आदिबाबत माहिती दिली जाणार असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.  तसेच कृषि विभागामार्फत टेलीफोनचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि मधील शास्त्रोक्त ज्ञान, प्रगत तंत्रज्ञान, बाजारपेठांची माहिती आदि दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ठिबक सिंचनाच्या ग्लोबल टेंडरमुळे ठिबकच्या किंमती 30 टक्के कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

     राज्यात जळगांव जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर असून येथे टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याकरिता उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतून उद्योजकांना सोयी-सुविधा देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी  जळगांव जिल्हयात कापूस संशोधन केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. तसेच टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.                                                                    
      विदर्भातील आठ जिल्हयासाठी विदर्भ इंटेन्सिव पॅकेज अंतर्गत मा.पंतप्रधान यांचेकडून पुढील 5 वर्षासाठी साडेतीन हजार कोटीचा निधी मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने खान्देश इंटेन्सिव पॅकेजची मागणी पंतप्रधान यांचेकडे करणार असल्याची माहिती  श्री.चव्हाण यांनी दिली.  राज्य शासन टंचाई परिस्थितीचा सामना करत असून जळगांव जिल्हयातील सात तालुक्यात टंचाई परिस्थिती आहे अशा ठिकाणी मागेल तेथे टॅंकर व गुरांसाठी चारा छावणी सुरु केली जाईल, असे त्यांनी सांगितले. टंचाईच्या कामाबाबत लोकांच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांनी त्वरीत कराव्यात असे त्यांनी सांगितले.

     सन 2011-17 च्या वस्त्रोद्योग धोरणात जळगांव जिल्हयाचा समावेश केला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांनी सांगितले. तर कापूस फेडरेशन व कापूस एकाधिकार योजना बंद पडल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे असे आमदार माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

      कापसाच्या बी.टी. वाणात काही गैरप्रकार झाले, परंतु शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही बियाणे कंपनीवर शासन कारवाई करेल असे कृषि मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.  तसेच राज्यातील कापूस उत्पादकांनी रंगीत कापसाचे उत्पादन घेण्याचे त्यांनी आवाहन केले. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध केली जात आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषि सहाय्यकांकडे बियाणांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शेतकरी हा चालती बोलती प्रयोगशाळा असल्याने अशा प्रगत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन विद्यापीठातील प्राध्यपकांना मिळावे याकरिता कृषि विद्यापीठांना सूचना दिल्याचे श्री. विखे-पाटील यांनी सांगितले यावेळी माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार , आ. शिरीष चौधरी यांचे ही भाषणे झाली.

      आमदार मनीष जैन यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र कापूस परिषदेच्या आयोजनाचा उददेश सांगितला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी महाराष्ट्र कापूस परिषदेच्या आयोजनाचे कौतुक केले. या परिषदेस जळगांव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, जालना आदि जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

      प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन महाराष्ट्र कापूस परिषदेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कापूस उत्पादक प्रगतशील शेतकरी श्री.अशोक ओंकार पाटील व जीभाऊ धनसिंग पाटील यांचा मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या परिषदेत शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ डॉ.सी.डी.माळी, डॉ.व्ही.एन.वाघमारे, एस.बी.नंदेश्वर, जे.एच.मेश्राम, एस.एम.रोकडे आदिचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुरवाडे यांनी केले तर आभार उदय पाटील यांनी मानले.
 




पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी मागेल त्या गावाला टॅकर - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण



      जळगाव, दिनांक 20:- राज्यात उदभवलेल्या  पाणी  टंचाईला सामोरे जाण्यासाठी  मागेल त्या गावाला टॅकरव्दारे पाणी दिले जाईल, कोणीही पाण्यावाचून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जळगांव जिल्हा टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलतांना दिली.
      मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात दोन तीन वर्षापासून कमी पाऊस पडला आहे. त्यास कदाचित हवामानातील बदल कारणीभूत असून त्यामुळे राज्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उदभवली आहे. राज्यातील दुष्काळ कायमस्वरुपी दूर करण्यासाठी दिर्घकालिन उपाय योजण्यासाठी काळजीपूर्वक व काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे.  तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात येत आहे. ज्या गावांना टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येतो त्या गावांना सिमेंट बंधारे बांधणे, शेततळी करणे आणि बंधाऱ्यातील गाळ उपसा करणे या कामांना प्राधान्य देण्यात येऊन तलावांमधील गाळ शेतीसाठी तसेच विटभटटयांसाठीही वापरण्यात यावा असे सांगून त्यांनी पाणी टंचाई दूर करण्यासाठी खाजगी संस्थांनी पुढे यावे असे  आवाहनही  यावेळी केले.
     प्रारंभी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हयातील टंचाई परिस्थिती निवारण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचा आढावा सादर केला.   पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हयातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाय योजनांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीची मागणी करुन खांन्देशासाठी विदर्भाच्या धर्तीवर खान्देश विकास कार्यक्रम आखावा अशी सूचना केली. तसेच  कापूस, केळी यांच्या नुकसान भरपाईसाठी अनुदानाची रक्कम त्वरीत मिळावी अशीही  विनंती केली.
     या आढावा बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, आ. शिरीष चौधरी, आ. मनिष जैन,जळगांव महानगरपालिकेचे महापौर किशोर पाटील, स्थायी समिती अध्यक्ष रमेश जैन, जळगांव जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल उगले , जिल्हा पोलिस अधिक्षक एस जयकुमार तसेच जिल्हयातील विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

* * * * * * * *

Friday, 19 April 2013

टंचाई निवारणाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई - पालकमंत्री

जळगाव : टंचाईची भीषणता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सर्व विभागांनी टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. या कामांमध्ये कोणी हलगर्जीपणा करत असेल  तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सूचित केले.

पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी आयोजित पाणी व चारा टंचाई आढावा बैठकीत श्री. देवकर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, तापी  सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, राहुल मुंडके, गणेश मिसाळ, तुकाराम हुलवडळे, पशुसंवर्धन उपायुक्त प्रकाश फालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, महापालिका पाणी  पुरवठा विभागाचे अभियंता श्री. जाधव आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

श्री. देवकर म्हणाले, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकी राहिल्याने खंडित करु नये. सदरचे वीज बिल भरण्यासाठी गावांना मुदत द्यावी. त्यानंतरही संबंधित गाव वीज बिल भरत नसेल तर जिल्हा प्रशासनाशी चर्चा करावी. परंतु, कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडित करु नये. वीज वितरण कंपनीच्या कारभाराबद्दल जनतेच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. त्यामुळे सदर विभागाने टंचाईच्या परिस्थितीची जाणीव ठेवून काम करावे, अशी सूचनाही श्री. देवकर यांनी केली. टंचाईच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याने या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर त्वरित कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात महात्मा फुले जल व भूमी अभियानांतून तलावातील गाळ काढण्याची कामे अत्यंत मंद गतीने सुरु आहेत. ती मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आवश्यक असल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले. जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील तलावामधील जास्तीत जास्त गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतावर टाकण्याच्या कामात प्रशासनाने अधिक गतिमानता आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील चारा उपलब्धतेची माहिती घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चारा छावणी सुरु कराव्यात. तसेच  सर्व तालुकानिहाय चारा परिस्थितीची माहिती घ्यावी, अशी श्री. देवकर यांनी सूचना केली. तसेच  टंचाईची भीषणता पाहता ज्या ट्रान्सफॉर्मरवरुन पाणी पुरवठा योजनांना वीज पुरवठा केला जात असेल आणि ते जर नादुरुस्त असतील तर ते 24 तासांच्या आत वीज कंपनीने दुरुस्त करुन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी  सांगितले.

रोहयो अंतर्गत शेत रस्ते, शिव रस्ते, नाला खोलीकरण आदी कामांसाठी गावे स्वत:हून पुढे येत असतील तर त्यांना त्वरित कामे द्या. तसेच सर्व प्रांताधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन सदरची कामे मार्गी लावण्याची सूचना देवकर यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावाही घेण्यात आला.

प्रारंभी जिल्हाधिकारी राजूरकर यांनी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यात जिल्ह्यात 104 टँकर, 257 विहीर अधिग्रहण, 640 बोअरवेल्सना मंजुरी, 549 बोअरवेल पूर्ण करुन 198 पंप कार्यान्वित झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तात्पुरती पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले

Wednesday, 17 April 2013

जळगांव येथे पोलीस भरतीचे आयोजन



       जळगांव, दि. 17 :- जळगांव येथे पोलिस भरती आयोजित  करण्यात आली असून जिल्हयातील माजी सैनिक / विर पत्नी यांनी पोलीस भरतीचे अर्ज करावेत सदर भरती करीता अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे असल्याने त्याची प्रक्रीया दि. 15 एप्रिल 2013 पासून सुरु झाली आहे. याबाबतची जाहिरात मा पोलीस अधिक्षक जळगांव यांनी दि. 11 एप्रिल 2013 रोजी दैनिक पुण्यनगरी आणि तरुण भारत या वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द केली आहे. तरी पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमुद केले प्रमाणे कार्यवाही करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा असे आवाहन माजी कॅप्टन मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगांव यांचा दुरध्वनी क्रमांक 0257 – 2241414 वर संपर्क करावा.

महार रेजिमेंटमध्ये सैन्य भरती


       जळगांव, दि. 17 :- सागर (म.प्र) येथील महार रेजिमेंट सेंटर मध्ये युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती शहिदांची विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक यांच्या पाल्यांकरीता सोल्जर ट्रेडमॅन या पदांची दिनांक 1 मे 2013 ते 04 मे 2013 रोजी सैन्य भरती आयोजित करण्यात आलेली आहे. तरी माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन कॅप्टन मोहन कुलकर्णी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी केले आहे.