Monday, 8 April 2013

पालकमंत्री ना. देवकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



         जळगांव, दि. 8 :-  राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री  ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
          मंगळवार दिनांक  9 एप्रिल 2013 रोजी सकाळी  6.15 वाजता जळगांव रेल्वे स्थानक येथे आगमन व मधुबन बंगला, जळगांवकडे प्रयाण, सकाळी 8.30 ते 12.00 वा राखीव, दुपारी 12.25 वाजता शासकीय मोटारीने मधुबन बंगला येथुन जळगांव विमानतळाकडे प्रयाण, दुपारी  12. 40 वा. जळगांव विमानतळ येथे आगमन व               मा. उपराष्ट्रपती यांचे स्वागतास उपस्थिती, दुपारी 12.50 वा. जळगांव विमानतळ येथुन अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 1.05 वा. अजिंठा विश्रामगृह येथे आगमन, दुपारी  1.10 वा. शासकीय मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण, दुपारी 1.15 वा. मधुबन बंगला येथे आगमन व राखीव, दुपारी 3.00 वा. शासकीय मोटारीने अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 3.10 वा. शासकीय मोटारीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आगमन, दुपारी 3.30 ते 5.00 वा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित 21 व्या दिक्षांत समारंभास उपस्थिती स्थळ : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव, सायं. 5.00 वा. शासकीय मोटारीने जळगांव विमानतळाकडे प्रयाण, सायं. 5. 20 वा. जळगांव विमानतळ येथे आगमन, सायं. 5. 30  वा. शासकीय मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण रात्री 10.45 वा. हावडा मुंबई मेल या गाडीने मुंबईकडे प्रयाण.

मा. उपराष्ट्रपती यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



            जळगांव, दि. 8 :- मा. उपराष्ट्रपती श्री. मो. हमीद अन्सारी यांचा दिनांक 9 एप्रिल 2013 रोजी जळगांव जिल्हा दौरा असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे --
         मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 12.45 वाजता जळगांव विमानतळावर आय.ए. एफ. च्या विशेष विमानाने आगमन, 12. 50 वाजता जळगांव विमानतळावरुन अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 3.10 वाजता अजिंठा विश्रामगृह येथुन उत्तर महाराष्ट्र विदयापीठाकडे प्रयाण, दुपारी 3.30 ते 5 वाजेपर्यत विद्यापीठात होणा-या 21 व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, सायं. 5 वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून जळगांव विमानतळाकडे प्रयाण व सायं 5. 20 वाजता विमानतळावरुन आय. ए. एफ. च्या विशेष विमानाने पुणेकडे प्रयाण.
00000

Sunday, 7 April 2013

शेळगाव ग्रामस्थांनी कृषि विज्ञान मंडळामार्फत राबविल्या जाणा-या योजनांचा लाभ घ्यावा- पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर



            जळगांव दि. 7 :- महात्मा फुले कृषि विज्ञान मंडळामार्फत स्थानिक स्तरावर कृषि विकासाच्या योजना राबविल्या जात असतात. सदर मंडळांतर्गत जमिनीचे माती व पाणी परिक्षण करुन त्याप्रमाणात खताची मात्रा देण्याची सूचना केली जाते. त्यामुळे शेळगांव ग्रामस्थांनी कृषि विज्ञान मंडळामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ घेऊन शेती उत्पादन वाढविण्याचे आवाहन कृषि राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
            शेळगांव ता. जळगांव येथे आयोजित दलित वस्ती काम, रस्ता क्रांकीटीकरण काम  व कृषि विज्ञान मंडळाचा लोकार्पण सोहळा ना. देवकर यांचे हस्ते आज संपन्न झाला. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमास जळगांव पंचायत समिती सभापती दिलीप पाटील, उपसभापती विजय नारखेडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, बळीराम सोनवणे, दिलीप धनगर, राजेश पाटील, घनशाम सोनवणे तालुका कृषि अधिकारी श्री. चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.
            ना. देवकर म्हणाले, कृषि विज्ञान मंडळाला राज्य शासनाकडून मोठया प्रमाणात सवलती देण्यात येत असतात. सदर मंडळ स्थानिक स्तरावर शेतक-यांना कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शन देत असते. तसेच जमिनीचे माती परिक्षण करुन आरोग्य पत्रिका तयार करते. त्यामुळे जमिनीची पोत सुधारणा करुन शेती उत्पादन वाढविले जाते, असे त्यांनी सांगितले.
            कृषि विभागाकडून गावातील दहा-बारा शेतक-यांनी गटाने एमएआयडीसीकडे नोंदणी केल्यास बांधावर खत पुरवठा केला जाते. तसेच आत्मा अंतर्गत शेतक-यांना दहा हजाराचा फिरता कर्ज पुरवठा केला जातो, अशी माहिती देवकर यांनी दिली.
            शेळगांव गांवामध्ये महात्मा फुले कृषि विज्ञान मंडळाची स्थापना झाल्याने सदर मंडळाचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
            प्रारंभी ना. देवकर व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन  करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. तर घनशाम सोनवणे यांनी आभार मानले.

Thursday, 4 April 2013

विधिमंडळ कामकाज / विधानपरिषद इतर कामकाज :



विधिमंडळ कामकाज :                                      दिनांक : 4 एप्रिल, 2013
विधान परिषद प्रश्नोत्तरे
विनयभंगासारख्या गुन्ह्यांना
अजामीनपात्र ठरविण्याची शिफारस
                                                        - आर. आर. पाटील
            मुंबई, दि. 4: स्त्रियांवरील होणाऱ्या विविध अत्याचारांना आळा बसावा यासाठी कडक कायदे करण्यात आले असून, विनयभंगासारख्या गुन्ह्यांना अजामीनपात्र ठरविण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
            श्री. पाटील म्हणाले, फौजदारी कायदे सुधारणा विधेयक 2013 हे सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन असून त्यासाठी मागविलेल्या सूचनांमध्ये ही शिफारस करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला आळा बसण्यासाठी संपूर्ण देशात राज्यातील कायदे हे सर्वात कडक कायदे असल्याचेही त्यांनी सांगितले.
            उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण, शोभाताई फडणवीस आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
---
सागरी सुरक्षेसाठी  केंद्राकडून
मिळणारा निधी पुरेसा
                                        - आर. आर. पाटील
            सागरी सुरक्षा योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून मिळत असलेला निधी पुरेसा असून राज्याच्या सुरक्षेसाठी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केले.
            श्री. पाटील म्हणाले, सागरी सुरक्षा योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून राज्यास नवीन 7 सागरी पोलीस ठाणे, 3 जेट्टी, 14 वेगवान बोटी, 7 चारचाकी वाहने व 14 दुचाकी वाहने मंजूर झालेली आहेत. सागरी सुरक्षा फेज 2 अंतर्गत मंजूर 7 पोलीस ठाण्यांपैकी 4 पोलीस ठाण्यांची जागा ताब्यात मिळाली आहे. उर्वरीत 3 पोलीस ठाण्यांसाठी जागा मिळविण्याची प्रक्रिया चालू आहे.
            उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुभाष चव्हाण,विनायक राऊत, रमेश शेंडगे, डॉ. दिपक सावंत, निरंजन डावखरे, जयंत पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
---
विधानसभा इतर कामकाज
एमपीएससीची 7 एप्रिलला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली
                                                                                - मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 4: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) दि. 7 एप्रिल 2013 रोजी  होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख आयोगाच्या निर्णयानंतर कळविण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.  
मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवार दि. 7 एप्रिलला होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची पुढील तारीख आयोगाच्या निर्णयानंतर कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
0 0 0 0 0

विधानपरिषद इतर कामकाज :

सरकारी शाळा, शासकीय रुग्णालयांना
सवलतीच्या दरात वीज दर आकारण्यास शासन सकारात्मक
                                                                        - उपमुख्यमंत्री
            मुंबई, दि. 4 : सरकारी शाळा, शासकीय रुग्णालये यांना वीज दरात 25 टक्के सवलत मिळावी यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असून या संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर अपील सादर केले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
       खासगी शाळा तसेच अनुदानित शाळांना सुद्धा वीज दरात सवलत मिळावी या उपप्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, या संस्थांनी एकत्रित अपिल केले तर त्यास शासनामार्फत सहकार्य करण्यात येईल.
            वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार अनुदानित व विनाअनुदानित शाळांसह सर्व शैक्षणिक संस्थांचा सार्वजनिक सेवा या नवीन वर्गवारीमध्ये समावेश करण्यात आला असून तो व्यावसायिक दरापेक्षा कमी ठेवण्यात आला असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मूळक यांनी सांगितले.
            शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात वीज दर आकारण्यात यावा या संदर्भात सदस्य निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी दिली होती.
0 0 0 0 0
महात्मा गांधी रुग्णालय दुरुस्तीच्या
प्रलंबित कामाची चौकशी होणार
                                                - प्रा. फौजिया खान
            परळ येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीच्या प्रलंबित कामासंदर्भात अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल, असे आरोग्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी आज विधानपरिषदेत या संदर्भात सदस्य डॉ. दीपक सावंत यांनी नियम 93 अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेला उत्तर देताना सांगितले.
0 0 0 0 0
अपंगांच्या विकास आणि पुनर्वसनासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार
                                                                        - शिवाजीराव मोघे
            अपंगांच्या समस्यांकडे शासन संवेदनशील दृष्टीकोनातून पहात असून त्यांच्या विकास आणि पुनर्वसनासाठी तज्ज्ञ समिती गठीत करुन या समितीच्या शिफारशी अंमलात आणण्यात येतील, असे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
            नियम 260 अन्वये अपंगांच्या समस्यांबाबत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना श्री. मोघे बोलत होते.
            श्री. मोघे म्हणाले, अपंगांना देण्यात येणाऱ्या बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी या प्रमाणपत्रांचे संगणकीकरण करण्यात आले असून या प्रमाणपत्रावर आता तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नांवे, त्यांचा नोंदणी क्रमांक तसेच पत्ता असेल. तसेच सदर व्यक्ती किती टक्के अपंग आहे हे देखील या प्रमाणपत्रामुळे कळू शकेल. अपंगासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            या प्रस्तावरील चर्चेत आमदार सर्वश्री डॉ. सुधीर तांबे, प्रकाश बिनसाळे, हेमंत टकले, रमेश शेंडगे,
डॉ. निलम गोऱ्हे, डॉ. दीपक सावंत आदी सदस्यांनी भाग घेतला.
0 0 0 0 0 0

राष्ट्रीय खादी व ग्रामोद्योग पुरस्काराचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण महाराष्ट्रातील प्रत्येकी 3 व्यक्ती, संस्था आणि बँकाचा समावेश




            नवी दिल्ली, दि. 4 : सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम मंत्रालयातर्फे खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना वर्ष 2011-12 साठी प्रदान करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 3 व्यक्ती, 3 संस्था आणि 3 बँकाचा समावेश आहे.  
येथील विज्ञान भवनात काल, बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
के. एच. मुनिअप्पा, सचिव माधव लाल, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्‍यक्ष देवेन्‍द्रकुमार आर देसाई,  कोयर बोर्डाचे अध्‍यक्ष प्रो. जी. बालचन्‍द्रन, एनएसआयसी चे अध्‍यक्ष एच.पी. कुमार आणि मंत्रालयाचे इतर वरिष्‍ठ अधिकारी उपस्‍थि‍त होते.
विभागीय राष्ट्रीय खादी कारागीर (कापड कातणारा) पुरस्कार वर्धा येथील ग्रामसेवा मंडळ गोपुरीच्या लक्ष्मी रामकृष्ण लोखंडे यांना प्रदान करण्यात आला. खादी कारागीरासाठी (विणकर) देण्यात येणारा पश्चिम विभागासाठीचा पुरस्कार चंद्रपूर येथील नाग विदर्भ चरखा संघाचे कारागीर मुमताज वल्दूदन निजामुद्दीन यांना प्रदान करण्यात आला.पश्चिम विभागीय ग्रामोद्योग कारागिराचा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती जिल्हयातील धारणी येथील प्रगती बहुउद्देशीय संस्थेचे कारागीर राजेश झापर्‍या जाम्बेकर यांना प्रदान करण्यात आला.
प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रमांतर्गत गृह उद्योगासाठी देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार रत्नागीरी जिल्हयातील रसिका महिला गृह उद्योगाच्या उद्योजक रसिका परेश तांबट यांना प्रदान करण्यात आला. स्फूर्ती क्लस्टर पुरस्कार नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला प्रदान करण्यात आला. तर राष्ट्रीय खादी आणि ग्रामोद्योग भवनचा पुरस्कार मुंबईच्या विले पारले (प.) येथील खादी ग्रामोद्योग भवनाला प्रदान करण्यात आला.
सुक्ष्म आणि लघु उद्योगाला कर्ज उपलब्ध करुन देणा-या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार मुंबईच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (स्टेट बँक भवन,मॅडम कामा रोड), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना विभागीय स्तरावर देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार मुंबई येथील बँक ऑफ बडौदा (वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स) आणि बँक ऑफ इडिया (वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स) यांना प्रदान करण्यात आला.

Wednesday, 3 April 2013

मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीत आतापर्यंत 55 कोटी रुपये जमा :मुख्यमंत्री



मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीत
आतापर्यंत 55 कोटी रुपये जमा
-         मुख्यमंत्री

मुंबई, दि. 3 एप्रिल : मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीतआतापर्यंत 55 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 
चालू वर्षी राज्यातील काही भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे.  या दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.  शासनाच्या या प्रयत्नाबरोबरच विविध संस्था, स्वयंसेवी संघटना आणि दानशूर व्यक्तीकडूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निधीत सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे 25 कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळाकडून एक कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून दोन कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून एक कोटी रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रकडून 2 कोटी 51 लाख रुपये, अभ्युदय को-ऑपरेटीव्ह बँकेकडून एक कोटी रुपये, दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ (जि.कोल्हापूर) यांच्याकडून एक कोटी 20 लाख रुपये, किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडून (जि.सातारा) 51 लाख रुपये तसेच इतर संस्था व दानशूर व्यक्तींकडून धनादेश प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीस मदत करु इच्छिणाऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून देणगीदारांना थेट बँकेमध्ये किंवा संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बँकेत थेट भरणा
देणगीदार थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत स्वत: आपला धनादेश किंवा ड्राफ्ट जमा करु शकतात.हे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ 2013) /Chief Minister Relief Fund(Drought 2013)स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा खाते क्र. S.B.32860305777या खात्यात जमा करावेत. ही रक्कम जमा केल्यानंतर देणगीदारांनी पत्राद्वारे लेखाधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-32 यांना बँकेच्या पावतीच्या प्रतिसह कळवावे, ज्यायोगे त्यांना पावती पाठविणे सोपे जाईल.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मुख्यमंत्री निधी कक्ष यांच्याशी 022-22026948 अथवा022-22022940या दूरध्वनी क्रमांकावरसुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेतसंपर्क साधावा असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे. तसेच ही सर्व माहिती विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील सूचना फलकावर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

* * * * * * * *

Tuesday, 2 April 2013

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संस्थेची सभा संपन्न

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली
जिल्हा परिविक्षा आणि  अनुरक्षण संस्थेची सभा संपन्न

         जळगांव, दि. 2 :- जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्या कार्यकारी मंडळाची तिमाही सभा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांचे अध्यक्षतेखाली निरीक्षण गृहात आज सायंकाळी संपन्न झाली.
           यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी व्ही. ए. पाटील, महिला व बालविकास अधिकारी देवेद्र राऊत, निरीक्षण गृहाचे मानद सचिव दत्तात्रय  नथ्यू चौधरी, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष  प्र. प्र. इंगळे. निरीक्षण गृहाचे अधिक्षक अशोक मारवाडी आदिसह कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
           यावेळी निरीक्षण गृहासंबधी विविध विषयांवर चर्चा झाली. यात निरीक्षण गृहात गोबर गॅस प्लॅट बसविणे, इलेक्ट्रीकची सर्व कामे पूर्ण करुन भारनियमन कालावधीत वीज खंडित होऊ नये म्हणून बॅटरी बँकपणे देणे आदि कामांना मंजूरी देण्यात आली तसेच दिनांक 6 एप्रिल 2013 रोजी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर  व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती उगले हे निरीक्षण गृहातील मुलांसोबत स्नेह भोजन घेऊन येथील मुलांना देण्यात येणा-या अन्नाची क्वॉलिटी ही पाहणार आहेत.
                                    * * * * * * *