Tuesday, 2 October 2012

ग्रामसभांनी गावाचा विकासाचा आराखडा तयार करावा -- पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर





       जळगांव दिनांक 2 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजना राबविताना निधीची कमतरता नसल्याने ग्रामसभांनी गावाच्या परिसरात विविध विकास कामांचा आराखडा तयार करावा. तो पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले. ते आज नांदेड (ता. धरणगांव) येथे आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जागृती अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थांना मार्गदर्शन करत होते.
          यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) राजन पाटील, नांदेड गावचे सरपंच राजेश अतरदे, उपसरपंच प्रविण अतरदे, पंचायत समिती सदस्या श्रीमती रेखा अतरदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के. डी. महाजन, धरणगांव तहसिलदार महेंद्र पवार आदि अधिकारी/ पदाधिकारी यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
          प्रारंभी ना. देवकर यांच्य हस्ते महात्मा गांधी नरेगा जागृती अभियानाचा शुभारंभ दिपप्रज्वलन नांदेड गावांमधील नोंदणीधारक मजुरांना जॉबकार्डचे (मजुर पत्रक) वितरण करुन झाला. यामध्ये आत्माराम भोमटू धोबी, आण्णा ताराचंद भिल, प्रकाश खैरनार, राजू भिल, वसंत वाजळे आदि बेरोजगारांना जॉबकार्डचे वाटप ना. देवकर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात करण्यात आले.
          रोहयो उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांनी अभियानाचा उद्देश सांगितला. तसेच जिल्हयात मागील सहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी नरेगा योजनेतून साडेसहा लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिला असून सुमारे 20 कोटी पेखा अधिक निधी मजुरीवर खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वसामान्य लोकांना सदरच्या योजनेविषयी माहिती व्हावी त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड गावांमधील ग्रामस्थ कलासंस्कृतीची जोपासना चांगल्या प्रकारे करत असून त्यांनी श्रमसंस्कृती ही जोपासण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड यांनी केले.  
          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी महत्वपूर्ण असून त्याअंतर्गत जलसंधारण, मृदसंधारण इतर सार्वजनिक वैयक्तीक कामे घेता येतील असे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सांगितले. सदरचे अभियान 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबविले जाणार असून ही योजना जास्तीत जास्त लोकभिमुख केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.                                                                        
          त्याप्रमाणेच मजुरांची मजुरी पूर्वी पोस्टातून दिली जात होती. पंरतु मजुरीचे पैसे जमा होण्यासाठी दिरंगाई होत असल्याने अभियानाच्या काळात सर्व जॉबकार्ड धारकांचे पोस्टातील खाते बँकामध्ये वर्ग करण्यात येतील असे श्री. राजूरकर यांनी सांगितले. तसेच मजुरांना पंधरा दिवसात त्यांची मजुरी देण्याची जबाबदारी संबंधित अधिका-यांची असल्याने ती वेळेत देण्याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. सदरच्या अभियानात जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन श्री. राजूरकर यांनी केले.
          ना. देवकर यांनी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यामध्ये सदरच्या योजनेतून जास्तीत जास्त कामे गावांमध्ये करण्यासाठी ग्रामसभांनी कामांचे नियोजन करावे नियोजित केलेली सर्व कामे पूर्ण करावीत. त्याकरिता पदाधिकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. महात्मा गांधी  नरेगा मधून विविध प्रकारची कामे करता येतात. शेतरस्ते रस्त्याची इतर कामे मोठया प्रमाणावर सूचवून ती तात्काळ पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. या योजनेतून केल्या जाणा-या कामांना निधीची कमतरता नसल्याने गावाचा परिसराच्या विकासासाठी लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
          याअंतर्गत दिले गेलेले  जॉबकार्ड हे शासनाकडून शंभर दिवसांच्या कामाची हमी असून पंधरा दिवसांच्या आत रोजगार संबंधितांना मिळाल्यास 25 टक्के बेरोजगार भत्ता देण्याची तरतुद असल्याने जिल्हयातील कोणतीही व्यक्ती मजुरीपासून वंचित राहणार नाही. असे  ना. देवकर यांनी सांगितले.
नांदेड येथे रस्ता कामाचा शुभारंभ
          या योजनेतून नांदेड गावांमधील पाच विहिरींच्या कामांना मंजुरी मिळाली असून श्री. किशोर कोळंबे या शेतक-याला विहिर कामाची वर्क ऑर्डर ना. देवकर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच नदीकाठ ते नांदेड गाव हा पाचशे मीटर रस्त्याच्या मुरुम कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. देवकर जिल्हाधिकारी राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
 धरणगांव क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी
       पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी आज दुपारी धरणगांव तालुका क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी केली. सद्यस्थितीत येथे क्रीडागणांच्या सपाटीकरणाचे काम सुरु असून विद्यार्थ्यांसाठी मैदान धावपट्टीचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी उपअभियंता श्री. सुरवाडे यांना केली. क्रीडागणांच्या कामाकरिता सुमारे 70 लाखाचा निधी आजपर्यंत उपलब्ध झालेला आहे.
          यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, उपअभियंता (सार्व.बांधकाम) श्री. सुरवाडे आदि उपस्थित होते.

Monday, 1 October 2012

जिल्हयात छायाचित्र मतदार याद्यांचा पुर्नरिक्षण व नवीन मतदार नोंदणी कार्यक्रमास सुरुवात


         जळगाव दिनांक 1 - जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्रासह मतदार याद्यांचे संक्षिप्त प्रकारे विशेष पुर्नरिक्षणाच्या कार्यक्रमास आजपासून सुरुवात झाली असून त्याकरिता प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आज (दिनांक 1 ऑक्टोंबर) पासून जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघात सदरच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.
          या कार्यक्रमातंर्गत आज दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी झाली तसेच या याद्यांसंबंधी दावे हरकती दिनांक 1 ते 31 ऑक्टोंबर,2012 पर्यंत स्विकारल्या जाणार आहेत. त्याप्रमाणेच प्रारुप यादीच्या भागाचे ग्रामसभा, स्थानिक संस्था, मोहल्ला सुधार समिती येथे वाचन करुन नावांची पडताळणी दिनांक 6 ते 9 ऑक्टोंबर,2012 या कालावधित करण्यात येईल त्यानंतर जिल्हयातील सर्व राष्ट्रीय राज्यस्तरीय राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते यांच्या उपस्थितीत दावे हरकती स्विकारण्याची विशेष मोहिम 7 ऑक्टोंबर, 14 ऑक्टोंबर 21 ऑक्टोंबर,2012 रोजी संपन्न होईल.
          या याद्यांबाबत आलेले दावे हरकती दिनांक 1 डिसेंबर,2012 रोजी निकालात काढले जाणार आहेत त्यानंतर डाटाबेस अद्यावतीकरण पुरवणी यादीची तयारी छपाईचे काम दिनांक 1 ते 31 डिसेंबर,2012 या दरम्यान केले जाऊन अंतिम मतदार यादी दिनांक 5 जानेवारी,2013 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
          तरी जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघातील मतदारांनी प्रारुप मतदार याद्यांबाबतचे दावे हरकती नोंदवाव्यात तसेच नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन          ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी संतोष थिटे यांनी मतदार यादी पुर्नरिक्षणाबाबतच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, उपजिल्हानिवडणूक अधिकारी संतोष थिटे, शिक्षणाधिकारी (मा) शशिकांत हिंगोणेकर, पोलिस निरिक्षक योगेश मोरे आदि उपस्थित होते.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सह दुय्यम निबंधक वर्ग - 2 , जळगांव - 3 आय सरिता प्रणाली कार्यान्वित


        जळगांव, दि. 1 :- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असलेल्या  नोंदणी मुद्रांक विभागाच्या सह दुय्यम निबंधक वर्ग - 2 , जळगांव - 3 या कार्यालयात ऑनलाईन आय - सरीता नोंदणी पदध्त आज कार्यान्वीत करण्यात आली
      या पध्दतीमुळे नोंदणी पध्दतीत आमुलाग्र बदल झालेले आहे. पक्षकाराला नोंदणीसाठी आवश्यक माहिती ऑनलाईल पध्दतीने igrmaharashtra gov.inया संकेत स्थळावर अगोदरच भरता येणार असल्यामुळे वेळेची बचत होणार असून  प्रचलीत पध्दतीत दस्त हा एकाच बाजूने प्रिंट करावा लागायाचा दस्ताची Zerox प्रत आवश्यक होती, तसेच ओळख पटविण्या-याचे फोटो त्याचप्रमाणे ओळखपटविण्या-याचे शाई लावून अंगठे घेण्याची पध्दत आता कालबाहय होणार आहे.           पक्षकाराला दस्ताची थंबनेल प्रिटची स्कॅन प्रत CDमधील दस्ताची प्रत लगेचच मिळणार आहे. पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली  विभागाची वाटचाल होत आहे. आय सरिता कार्यान्वित करणेकामी सह जिल्हा निबंधक वर्ग -1 श्री वाय.डी. डामसे यांचे मार्गदर्शन लाभले असून सह दुय्यम निबंधक वर्ग - 2 श्री. सुनील पाटील यांना  त्याकामी  कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एस.आर. निकम, किशोर जोशी, तसेच बीओटीचे श्री अहिरे, राणे, खैरनार यांनी सहकार्य केले. हि नोंदणी प्रणाली महानिरीक्षक श्री . चोकोलिंगम यांच्या महत्वाकांक्षी निर्णयाचा एक भाग असल्याचे सह दुय्यम निबंधक वर्ग -2 जळगांव - 3 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.