Friday, 1 June 2012

12 वी निकालाच्या गुणपत्रिका शनिवारी वाटप होणार


जळगांव, दि. 1:- फेब्रुवारी / मार्च - 2012 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक 25 मे 2012 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहिर करण्यात आलेला आहे. त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व विद्यार्थ्यांचे तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख तसेच इतर साहित्याचे वाटप मंडळाच्या निर्धारित केलेल्या वितरण केंद्रावर शनिवार दिनांक 2 जून 2012 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत मंडळ प्रतिनिधी मार्फत हस्तपोच वाटप करण्यात येणार आहे.       
     तरी सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांनी या प्रकटनांची नोंद घेवून निकाल व इतर साहित्य स्विकारण्यास्तव निर्धारित वेळेत संबंधित वाटप केंद्रावर अधिकार पत्रासह जबाबदार प्रतिनिधीस पाठवावे. उपरोक्त दिनांकास साहित्य न स्विकारल्यास सदरचे साहित्य कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नाशिक विभागीय मंडळ कार्यालयातून आपणास स्वखर्चाने स्विकारावे लागेल याची नोंद घ्यावी. असे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ नाशिक 422 001 यांनी कळविले आहे.  
                                                                       *  *  *  *  *
                 जळगांव येथे डाक विभागाची पेन्शन अदालत
      जळगांव, दि. 1 - जळगांव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचा-यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजुन घेण्यासाठी येत्या 25 जून 2012 रोजी सकाळी 11 वाजता पेन्शन अदालत डाक अधिक्षक जळगांव विभाग जळगांव यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
     जळगांव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालत मध्ये दखल घेतली जाईल असे टपाल खात्याच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
     अधिक माहितीसाठी  डाकघर अधिक्षक जळगांव यांचेकडे संपर्क साधावा व आपली तक्रार दयावी असे  अधिक्षक डाकघर जळगांव यांनी कळविले आहे.
                                                                         *  *  *  *  *
                                                                                                                                                      गिरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन
      जळगांव, दि. 1 - गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांवच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पातून टंचाई निवारणार्थ पिण्याच्या पाण्याकरिता जामदा डावा, जामदा उजवा व निम्न गिरणा कालव्याच्या मर्यादित लांबीपर्यत (सा.क्र.25200 मी. पर्यत) पाण्याच्या उपलब्धतेनुसार आवर्तन सोडण्याचे नियोजित आहे. सदरील पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होवू शकणार नाही, याची नोंद घ्यावी. सिंचनासाठी पाण्याचा वापर केल्यास सिंचन कायदा 2005 मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वानी नोंद घ्यावी व टंचाई काळात जलसंपदा खात्यास सहकार्य करावे असे कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगांव यांनी एका पत्रकाव्दारे  कळविले आहे. 
                                                         *  *  *  *  *

25 जून रोजी डाक अदालत


जळगांव, दि. 1 :- देशामधील पोस्टाची सेवा हि सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न अंग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेचे एक वेगळया प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्टाचे खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करते व ग्राहकांचे जास्तीत जास्त संतोषाधिक्य अथवा समाधान वाढविते. हि सेवा देतांना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. हया तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्टाच्या खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्टाचे अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात आणि त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करतात.
     अधिक्षक डाकघर, जळगांव विभाग जळगांव 425001 व्दारा दिनांक 25 जून 2012 रोजी सकाळी 11.00 त्यांच्या कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आलेली आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बॅक, मनी आर्डर, इ. बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिका-यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी संबंधितांनी डाकसेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत एम.एस. जगदाळे, डाक निरीक्षक (तक्रार) अधिक्षक डाकघर यांचे कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगांव 425001 यांच्या नावे अतिरिक्त प्रती सह दिनांक 18 जून 2012 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल. परंतु त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही. असे अधिक्षक डाकघर, जळगांव विभाग जळगांव 425001 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                 * * * * * *