Tuesday, 31 January 2017

विधान परिषद निवडणूकी संदर्भात मतदारांना आवाहन

विधान परिषद निवडणूकी संदर्भात मतदारांना आवाहन

चाळीसगांव,दिनांक 31:-  विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीचे मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने मतदारांना मतदान करण्याबाबत सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान अधिकारी क्र. 3 यांचे कडून मतपत्रिकेसोबत दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच मतदान करावे. याशिवाय इतर पेन, पेन्सिल, बॉल पाँईंट पेन वापरू नये. अन्यथा मतपत्रिका रद्द होऊ शकते. मतदान पसंती क्रमांकानुसार असल्याने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर अंकी क्र.1 लिहून मतदान करावे. 1 हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा. मतपत्रिकेवर निवडणूक लढवित असलेल्या उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम नमूद करावयाचा आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासमोर मतदार त्याच्या निवडीनुसार पसंतीक्रम (अंकामध्ये) नमूद करू शकतो. मतपत्रिकेवर जेवढे उमेदवार नमूद आहेत त्या सर्व उमेदवारांना मतदाराच्या पसंतीक्रमानुसार 1,2,3,4,5,6...... याप्रमाणे जेवढे उमेदवार निवडणुकीकरीता उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना पसंतीनुसार मतदान करता येईल. NOTA चा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
        मतपत्रिकेवर नमूद करावयाचा पसंतीक्रम फक्त अंकांमध्येच (मराठी देवनागरी, इंग्रजी, रोमन .)नमूद करावयाचा आहे. पसंतीक्रमाचे अंक एकाच भाषेत नमूद करावे. पसंतीक्रम नमूद करताना वेगवेगळ्या भाषेचा उपयोग करू नये. सदर पसंतीक्रम शब्दात लिहिल्यास मतपत्रिका बाद होईल. मतपत्रिकेवर कोठेही सही करू नका किंवा आपले नाव किंवा इतर अक्षरे लिहू नका. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसादेखील उमटवू नका अन्यथा मतपत्रिका बाद होईल. आपल्या पसंतीच्या उमेदवारापुढे X असे करू नये.अन्यथा मतपत्रिका बाद होईल. मतदारास आपला पहिला पसंतीक्रम (1) नमूद करणे आवश्यक आहे.
पहिला पसंती क्रम नमूद केल्यास किंवा पहिला पसंती क्रम एकापेक्षा जास्त उमेदवारांचे नाव पुढे दर्शविल्यास मतपत्रिका बाद होते. कोणत्या उमेदवारास पसंती क्रम नोंदविला आहे याचा बोध  झाल्यास, एकाच उमेदवाराच्या नावासमोर सर्व पसंतीक्रम दर्शविल्यास, पसंतीक्रम अंकी दर्शविता अक्षरी दर्शविला असल्यास, मतदाराची ओळख पटेल अशा रितीने मतपत्रिकेवर चिन्ह अथवा मजकूर नमूद असल्यास आणि मतदान अधिकारऱ्याने पूरविलेल्या जांभळ्या स्केचपेन शिवाय इतर साधनांचा वापर करून पसंतीक्रम दर्शविल्यास  मतपत्रिका बाद होते.
मतदारांनी या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन योग्य पध्दतीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ यांनी केले आहे.     


* * * * * * * *

पदवीधर निवडणूक मतदानासाठी ओळखपत्र सोबत असणे आवश्यक

पदवीधर निवडणूक मतदानासाठी ओळखपत्र सोबत असणे आवश्यक


चाळीसगांव,दिनांक 31 :-  विधान परीषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान 3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत होणार असून मतदारांनी ओळख पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाच्या 27 जानेवारी, 2017 च्या आदेशान्वये ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल त्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदवीका प्रमाणपत्र, केंद्र सरकार, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योगसंस्थेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, (खाते 31 डिसेंबर 2016 रोजी किंवा तत्पूर्वी उघडलेले असावे), पट्टे किंवा प्रॉपर्टी नोंदणी छायाचित्र असलेले कागदपत्र, 31 डिसेंबर पूर्वी देण्यात आलेली छायाचित्र असलेली शिधापत्रिका,  सक्षम अधिकाऱ्याद्वारे देण्यात आलेले एससी, एसटी  किंवा ओबीसी छायाचित्र असलेले प्रमाणपत्र, 31 डिसेंबर पूर्वी देण्यात आलेला छायाचित्र असलेला शस्त्र परवाना, सक्षम अधिकाऱ्याने 31 डिसेंबर पूर्वी दिलेला छायाचित्र असलेला अपंगत्वाचा दाखला, आधार कार्ड अथवा रजिस्टर जनरल ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेले एनपीआरचे स्मार्ट कार्ड अशा 13 पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा असल्याशिवाय मतदान करता येणार नाही. मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ यांनी कळविले आहे.


* * * * * * * *

Friday, 27 January 2017

निवडणूक निरीक्षक म्हणून अनिल लांडगे यांची नियुक्ती

 निवडणूक निरीक्षक म्हणून अनिल लांडगे यांची नियुक्ती


चाळीसगांव,दिनांक 27:-  जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या अनुषंगाने चाळीसगांव तालुक्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9403696611  असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 तथा उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी कळविले आहे. 


* * * * * * * *

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज स्विकारणार

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी
आजपासून उमेदवारी अर्ज स्विकारणार

चाळीसगांव,दिनांक 27:-  जिल्हा परिषदेच्या एकूण 67 गटापैकी चाळीसगांव तालुक्यातील 7 गट तर  पंचायत समितीच्या एकूण  134 गणांपैकी चाळीसगांव तालुक्यातील 14 गणांच्या निवडणूकीची अधिसूचना आज दिनांक 27 जानेवारी पासून जारी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या www.panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी दिनांक 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी, 2017 (दुपारी 02:30 पर्यंत)  राहणार आहे, तर रविवार दिनांक 29 जानेवारी, 2017 रोजी सार्वजनिक सुटी असली तरी सकाळी 11:00 ते दुपारी 03:00 दरम्यान नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे
            नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक  बुधवार दिनांक 01 फेब्रुवारी, 2017 रोजी दुपारी 03:00 वाजेपर्यंत असून चाळीसगांव तालुक्यातील मतदार विभागाचा तपशिल पुढील प्रमाणे गट क्रं.61 बहाळ-कळमडू (गण क्रं. 121/122), गट क्रं.62 दहिवद-मेहुणबारे (गण क्रं. 123/124), गट क्रं.63 सायगाव-उंबरखेड (गण क्रं. 125/126), गट क्रं.64 करगाव-टाकळी प्र.चा.(गण क्रं. 127/128), गट क्रं.65 पातोंडा-वाघळी (गण क्रं. 129/130), गट क्रं.66 रांजणगाव-पिपरखेड (गण क्रं. 131/132), गट क्रं.67 देवळी-तळेगाव (गण क्रं. 133/134) या मतदार विभागांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण हे तहसिल कार्यालय, चाळीसगांव आणि मतमोजणी करण्याचे ठिकाण हे नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, किमान  कौशल्य विभागाचा हॉल, चाळीसगांव असा राहणार आहे.
            जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता चाळीसगांव तालुक्यातील एकूण 2 लाख 46 हजार 247 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 1 लाख 31 हजार 532 पुरूष मतदार तर 1 लाख 14 हजार 715 स्त्री  मतदारांचा समावेश असणार आहे.
            रविवार दिनांक 29 जानेवारी, 2017 रोजी सार्वजानिक सुट्टी असली तरी सकाळी 11:00 ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार असून याची सर्व इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.


* * * * * * * *

Wednesday, 25 January 2017

पोलीस परेड मैदानावर प्रांताधिका-यांचे हस्ते ध्वजारोहण


पोलीस परेड मैदानावर प्रांताधिका-यांचे हस्ते ध्वजारोहण

चाळीसगांव,दिनांक 26:- पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ  प्रांताधिकारी शरद पवार यांच्या हस्ते सकाळी 09:15 वाजता संपन्न झाला. यावेळी आमदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, सभापती आशालता साळुंखे, उपसभापती लता दौंड, माजी आमदार राजीव देशमुख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, तहसिलदार कैलास देवरे, अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी,  विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, जेष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस प्रशासन व होमगार्ड यांनी पथसंचलन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर ए.बी.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. यानंतर प्रांताधिकारी शरद पवार, अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, तहसिलदार कैलास देवरे  यांनी प्रशासनाच्या वतीने उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पंचायत‍ समिती चाळीसगाव येथे सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण
पंचायत ‍ समिती चाळीसगाव येथे 26 जानेवारी, 2017 रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त सकाळी 07:00 वाजता सभापती सौ.आशालता साळुंखे  यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उप सभापती सौ.लताताई दौड,  गटविकास अधिकारी मधुकर वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी बी.एस.बागुल, उप अभियंता बाफणा, पोतदार, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्तार अधिकारी ए.बी.राणे, के.एन.माळी एस.पी.विभांडीक कार्यालयीन अधिक्षक आर.डी.महिरे, गांगुर्डे, मालाजंगम, कृषी अधिकारी भालेराव, यांच्यासह पंचायत ‍समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तर सभापती सौ.आशालता साळुंखे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी घाट येथे ध्वजारोहण संपन्न
चाळीसगाव शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.आशालता चव्हाण यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमीत्त  शिवाजी घाट येथे सकाळी 08:20 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार उन्मेश पाटील, उप नगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, राजेंद्र चौधरी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, प्रशासन अधिकारी विजय खरात, अभियंता राजेंद्र पाटील, दिपक देशमुख, संजय अहिरे, संजय गोयर यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, नगरसेवक, नगर परिषदेचे पदाधिकारी, जेष्ठ व प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

नव मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा ! :प्रातांधिकारी शरद पवार


नव मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा !
: प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगांव,दिनांक 25:- लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडणा-या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण  महत्व आहे. एकीकडे आपल्या आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यांची एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान बाळगून प्रत्येक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत आपला सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी तहसिल कार्यालयातील सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात केले.
            यावेळी तहसिलदार कैलास देवरे, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, विशाल सोनवणे, गजानन भालेराव, जे.आर.वाघ, गट विकास अधिकारी ए.बी.राणे, अव्वल कारकुन डी.जे.राजपुत, अमृतकार यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            आपले मत हा आपला हक्क व अधिकार आहे. या बाबतीत जागरूक राहून मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावे. मतदानाचा मुलभूत अधिकार बजवावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासिनता मनातून काढून टाकावी, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले असून त्याचे सातवे वर्ष आज साजरा करतांना मनस्वी आनंद होत आहे. या दिवसाचे महत्व व आपला मौल्यवान मताधिकार ओळखून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.
सातव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालयातील सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून मतदार नोंदणी आणि मतदान जनजागृतीसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेतील.   
            यावेळी तहसिलदार कैलास देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन करत उपस्थित मतदार व नवमतदारांना निवडणूकांचे पावित्र्य व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. उप विभागीय अधिकारी शरद पवार यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात दहा नवमतदारांना मतदान ओळख पत्राचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत मतदार जनजागृतीसाठी शहरातील तात्यासाहेब सामंत महाविद्यालय ते तहसिल कार्यालय अशी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ए.बी.हायस्कुल मध्ये शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये तालुक्यातील 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.


* * * * * * * *

Tuesday, 24 January 2017

‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ साठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार


बेटी बचाओ बेटी पढ़ाओसाठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार

            नवी दिल्ली,24:-‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या केंद्र शासनाच्या अतीशय महत्वकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी महाष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
            ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओअभियानाचा दूसरा वर्धापन दिन तसेच राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
            यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी, महिला व बाल विकास सचिव लीना नायर, रिओ पॅरा ऑलम्पिक विजेत्या दिपा मलिक, फ्लाईंग ऑफीसर अवनी चतुर्वेदी,  पद्श्री गिर्यारोहक अरूनिमा सिन्हा, गिर्यारोहक रेखा चोकन या मंचावर उपस्थित होत्या. यासह दिल्लीस्थित शाळेकरी विद्यार्थ्यांनी, महिला व मुलींसाठी कार्यरत गैरसरकारी संस्था, अंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियानातंर्गत देशभरातील 10 जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद या  दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
            जळगाव जिल्ह्याला बेटी बचाओ बेटी पढ़ाओअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केल्या बद्दल गौरविण्यात आले. जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढ़ाओअंतर्गत सर्वसमावेशक जागृकता अभियान राबविण्यात आले. समाजातील सर्व स्तरात यासाठी प्रचार-प्रसार करण्यात आला. केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया उपक्रमातंर्गत या अभियानाला जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या अभियानाच्या लोगोचा उपयोग करून डिजीटल गुड्डा गुड्डी बोर्ड तयार करण्यात आला. यामध्ये ऑनलाईन जोडणीकरून मुला-मुलीच्या जन्मदराचे अवलोकन करता येते. हे एक ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले कटआऊट आहे. या डिस्पलेवर मान्यवरांचे संदेश, कन्याभ्रुण हत्या विरोधी  जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना, महिलासंदर्भांत महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती प्रसारीत केली जाते. जिल्हा व तालूका स्तरावरील शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामध्येही बोर्ड दर्शनिय भागात बसविण्यात आले आहेत. याच्या परिणाम हा सकारात्मक झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. 2011 मध्ये दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 842 होता. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अंतर्गंत राबविण्यात आलेल्या उपक्रमानंतर  हा जन्मदर 2015 मध्ये 863 तर 2016 मध्ये हा 922 पर्यंत पोहोचला असल्याचे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
            उस्मानाबाद जिल्ह्याला कन्या भ्रुण हत्या कायदा कडक अमलबजावणी करण्यासाठी तसेच आई व शिशु नियंत्रण प्रणालीहा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यातंर्गंत गावातील लोक, सरपंच, आशा सेविका, एएनएम, अगंणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी यांच्या सहभागाने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांचे शिविर आयोजित करण्यात आले. तीन महिने गरोदर असणा-या महिलांचे अकेंक्षण करण्यात आले. पूढील सहा महिण्यांपर्यंत या गरोदर महिलांना लागणा-या औषधी, त्यांच्या चाचण्या शासनाच्यावतीने करण्यात आल्या. यासह गरोदर महिलांच्या कुटूंबातील सदस्यांचे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामधून जागृकता निर्माण केली जाते. प्रसूतीनंतरचे पूढील तीन महिनेही नवजात बाळांचे अकेंक्षण केले जाते. यामध्ये नवजात बालकांना या काळात लागणारे लसीकरण केले जाते.
            या अकेंक्षणाचे तीन भाग पाडण्यात आले. अतीशय जास्त कन्या भ्रुण हत्या दर असणा-या क्षेत्राला लाल रंग देण्यात आला आहे. त्यापेक्षा कमी कन्या भ्रुण हत्या असणा-या क्षेत्राला पिवळा रंग देण्यात आला आहे आणि सर्वांधिक कमी कन्या भ्रुण हत्या असणा-या क्षेत्राला हिरवा रंग देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मुलींचा जन्मदर वाढला आहे. वर्ष 2015 मध्ये 1 हजार मुलांमागे 791 मुली होत्या हा आकडा वाढून 2016 मध्ये 904 येवढा झाला आहे.
            याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील 10 कन्या भ्रुण हत्या करणा-या संस्थेवर कार्यवाही करण्यात आली असून 6 लोकांना या अंतर्गंत शिक्षाही ठोठावण्यात आली, असल्याचे श्री. नारनवरे यांनी सांगितले.

00000