Monday, 7 July 2025

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 73 अर्जांची नोंद

जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पबचत भवन, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण 73 अर्ज प्राप्त झाले.


या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी,उपजिल्हाधिकारी ( महसूल प्रशासन ) विजयकुमार ढगे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, तहसीलदार (संजय गांधी योजनांतर्गत) डॉ.उमा ढेकळे, नायब तहसीलदार राहुल सोनवणे (करमणूक शाखा),

इतर शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्या गेल्या.

Friday, 4 July 2025

जळगाव जिल्हयात M-Sand (मॅन्युफॅक्वर्ड सेंड) प्रकल्प उभारणीसाठी प्रस्ताव मागविणे

जळगाव, दि. ४ जुलै (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्हयातील नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत  शासन  निर्णय क्रमांक गोखानि/10/0325/प्र.क्र.80/ख दोन दि. 23 में 2025 नुसार जळगाव जिल्हयात पर्यावरणपूरक व यांत्रिक पध्दतीने M-Sand उत्पादन करणाऱ्या  प्रकल्पांची आवश्यकता लक्षात घेता खालील अटी व शर्तोंच्या अधीन राहुन M-Sand प्रकल्प उभारणीस इच्छुक उद्योजक, संस्था  अथवा  कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक बाबी आहेत.

1. प्रकल्पाचे संपूर्ण स्वरूप व उदिष्ट

2. प्रकल्पासाठी सुचविलेल्या जागेचे वितरण व भू-संपत्ती बाबतचे कागदपत्र.

3. पर्यावरण परवानगी व संबंधित यंत्रणाकडून आवश्यक अनुमती.

4. यांत्रिक उपकरणे, प्रक्रिया व वार्षिक उत्पादन क्षमतेची माहिती.

5. संस्थेची आर्थिक व तांत्रिक पात्रता दर्शविणारे कागदपत्र

6. मागील संबंधित अनुभव असल्यास त्याचा तपशिल.

इतर अटी-

1. शासन निर्णय दि. 23 में 2025 मधील नियम व मार्गदर्शक तत्वे लागू राहतील.

2. अपूर्ण प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही.

3. अंतिम निर्णयाचा अधिकार जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे राहतील.

तरी, वरीलप्रमाणे सर्व बाबींची तसेच अटींची पुर्तता करून सदर प्रस्ताव आपले तालुक्यातील तहसीलदार /उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत. असे उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्र्यांच्या गटाची पहिली बैठक





नवी दिल्लीदि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांचा गट (GoM) यांची वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक आज महाराष्ट्र सदननवी दिल्ली येथे पार पडली.

 या बैठकीला महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरेछत्तीसगड व पंजाबचे अर्थमंत्री आणि  यांच्यासह नऊ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होतेतर दोन राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने सहभागी झाले. आंध्र प्रदेशगुजरात आणि तेलंगणा यांनी आपली सविस्तर सादरीकरणे सादर केली.


श्रीमती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलेही जीएसटीआयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती. यापूर्वी मंत्र्यांच्या गटाच्या विविध मुद्द्यांवर बैठका झाल्या असल्यातरी जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक आहे. यावेळी तांत्रिक चर्चा मर्यादित राहिलीपरंतु पुढील बैठकींमध्ये सर्व राज्यांकडून सखोल सूचना आणि चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्र नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आपले सादरीकरण करेलत्यामुळे आजच्या बैठकीत महाराष्ट्राकडून सादरीकरण करण्यात आले नाही.

बैठकीत राज्यनिहाय महसूल प्रवृत्तीआर्थिक घटकांचा प्रभावकरचोरीविरोधी उपाय आणि धोरणात्मक शिफारशींवर सविस्तर चर्चा झाली. जीएसटी अंमलबजावणी समितीने (GIC) महसूल संकलन आणि करचोरीविरोधी साधनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC), जीएसटी नेटवर्क (GSTN) आणि आंध्र प्रदेशगुजरात व तेलंगणा यांनी एकसमान अंमलबजावणी आणि अनुपालन व्यासपीठ विकसित करण्यावर जोर दिला. करचोरीला प्रवण क्षेत्रांमधील समस्यांचे निराकरणनोंदणीई-वेबिल आणि B2C अनुपालन यावरही लक्ष केंद्रित झाले. GIC ने पुढील बैठकीत या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले.


गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितलेही बैठक जीएसटी धोरणांना स्पष्ट दिशा देण्यासाठी आणि केंद्र-राज्य यांच्यातील आर्थिक समन्वय बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात 4 शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु

        जळगाव दि – 04  ( जिमाका ) :  सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव येथे शिपाई (बहुउद्देशीय गट-ड कर्मचारी) या कंत्राटी स्वरूपातील पदांच्या भरतीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूण ४ रिक्त पदे ही ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया कंत्राटदार/ठेकेदार/कंपनी/संस्थांमार्फत राबवण्यात येणार असून, संबंधित निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक अटी, शर्ती व तांत्रिक पात्रता जाहीर करण्यात आली आहे.

             यापदाकरिता उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण, पदवीधर असल्यास प्राधान्य. चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालयात सेवा पुरवण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे बयाणा रक्कम (EMD) : ₹५,०००/- राष्ट्रीयीकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्ट / पे-ऑर्डरद्वारे करण्यात येणार आहे.  कागदपत्रांमध्ये जीएसटी, ईपीएफ, ईएसआयसी, व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र, तीन वर्षांचे ITR, पॅन कार्ड प्रत, संस्थेची नोंदणी प्रत, काळ्या यादीत नसल्याचे शपथपत्र, अनुभवाचे पुरावे इ. आवश्यक आहे.

          निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती संबंधित संस्थांनी काळजीपूर्वक वाचून, दोन्ही लिफाफ्यांत (तांत्रिक आणि आर्थिक) आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावीत. निविदा स्वीकारल्यानंतर ३% रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागेल.

           निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असून, त्यानंतर आलेल्या निविदा कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.या भरती प्रक्रियेसाठी जळगाव विभागातील पात्र ठेकेदार, कंपन्या, संस्था यांनी तत्काळ निविदा सादर

करावी, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.

भुसावळ तालुक्यात ८ जुलै रोजी सरपंच पद आरक्षणासाठी सोडत सभा

            जळगाव दि – 04  ( जिमाका ) : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतची सोडत सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

            त्यानंतर, महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्यात येणार आहे. या दोन्ही सभा तापी सभागृह, उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय, भुसावळ येथे पार पडणार आहेत.

            या महत्वपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा



            जळगाव दि – 04  ( जिमाका ) :   राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे, शनिवार दिनांक 05 जुलै, 2025 रोजी दुपारी 02.00 वाजता भुसावळ येथुन शासकीय वाहनाने ता. मंगळवेढा जि. सोलापुरकडे रवाना.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

            जळगाव, दि. 04  जुलै (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा आज, शुक्रवार दिनांक 04 जुलै 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.

             शुक्रवार दिनांक 04 जुलै 2025 रोजी दुपारी 02.00  वाजता मुंबई येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण करतील. रात्री 08. 30 वाजता पाळधी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे आगमन व राखीव.

शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ नियोजनासाठी सहविचार सभा संपन्न


        जळगाव, दि. ४ जुलै (जिमाका वृत्तसेवा): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे नियोजन व आयोजन संदर्भात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. ही बैठक आज सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे खेळीमेळीत वातावरणात पार पडली.

            या बैठकीत जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शारीरिक शिक्षण महासंघ, क्रीडा शिक्षक संघटना व विविध क्रीडा मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक यांनी प्रास्ताविक करत स्पर्धांचे सविस्तर नियोजन, क्रीडा गुण सवलत, क्रीडा प्रमाणपत्रे, क्रीडा व युवा पुरस्कार, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजनेबाबत माहिती दिली.

            सदर शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सिंथेटिक ट्रॅकचे काम सुरु असल्यामुळे मैदानी व सांघिक स्पर्धांसाठी एकलव्य क्रीडा संकुलचा पर्याय निवडण्यात आला. स्पर्धांची सुरुवात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेने होणार असून १५ व १७ वर्षे वयोगटातील मुले-मुलींच्या संघ तयार करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले.

            सहविचार सभेत Train the Trainers संकल्पना मांडण्यात आली. त्याअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी खेळ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी संघटनांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. तसेच पंच प्रशिक्षण कार्यशाळा व क्रीडा कौशल्यविकासासाठी मार्गदर्शक कार्यशाळा घेण्याचे निर्देशही देण्यात आले.

            सातपुडा पर्वतरांगेतील चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये १०० किमी सायकल स्पर्धा/मॅरेथॉन आयोजित करण्याची नावीन्यपूर्ण योजना यावेळी सादर करण्यात आली.

            या वेळी श्री. प्रदीप तळवेलकर, श्री. राजेश जाधव, श्री. अजय देशमुख, श्री. प्रशांत कोल्हे, प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, श्री. फारुक शेख, श्री. प्रदीप साखरे, श्री. खुशाल देशमुख यांनी गतवर्षीच्या अडचणी व यशस्वी उपक्रमांबाबत आपले विचार मांडले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी समस्यांवरील उपायांची माहिती दिली.

            अंतिम सत्रात आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल प्रशिक्षक व राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. किशोर चौधरी यांचा थायलंड येथे आशियाई स्पर्धेत भारतीय संघाने कास्य पदक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याबद्दल क्रीडा विभागाच्या कु. काजल भाकरे यांचाही सत्कार झाला.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभागाच्या कार्यालयाचा पत्ता बदल

जळगाव दि – 04 ( जिमाका ) : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरित करण्यात आले असून, आता हे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हतनुर वसाहत, महाबळ रोड, जळगाव – ४२५००२ येथे कार्यरत असेल. नागरिकांनी नवीन पत्त्यानुसार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने केले आहे.

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ


मुंबई, दि. 04 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. 19 जुलै, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात संचालक सतीशकुमार खडके यांची मुलाखत


मुंबई दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'आपत्ती पूर्व व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन व अंमलबजावणीया विषयासंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. ८ जुलै २०२५ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिवरून रात्री ८.०० वाजता प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुकएक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

हवामानातील बदलवाढते तापमानअनियमित पावसाळा आणि अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींसारख्या घटनांनी आपल्यासमोर मोठी आव्हाने उभी केली आहेत. या केवळ निसर्गजन्य आपत्ती नाहीततर कधी कधी मानवनिर्मित संकटेअपघातआगी यांसारख्या दुर्घटनांचाही आपल्याला सामना करावा लागतो. अशा अडचणींचा योग्य आणि प्रभावी पद्धतीने सामना करता यावायासाठी शासनान स्तरावर त्रिस्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेत राष्ट्रीयराज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा समावेश असूनआपत्तीपूर्व तयारीतात्काळ मदत आणि पुनर्वसन अशा सर्व टप्प्यांवर ही व्यवस्था अत्यंत कार्यक्षमतेने काम करत आहे. यामध्ये गावपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थास्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांशी समन्वय साधून एकत्रितपणेसामूहिक जबाबदारीनेआपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम आणि प्रभावीपणे राबविले जाते. त्याअनुषंगानेच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून संचालक श्री. खडके यांनी आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पनाविविध स्तरांवरील तयारीप्रशिक्षणजनजागृती आणि कृतीशील उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

खास लेख क्रमांक-9



माये'चं दूध... नवजातांसाठी संजीवनी. . . !

जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार. . . .!
आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध पाजू शकत नाही – आजारपण, अति कमी वजनाचं बाळ, किंवा अगदी अनाथत्व. अशा वेळी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे त्या नवजातासाठी जीवदान ठरतं. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) ‘ह्युमन मिल्क बँक’ हे त्याचं अत्युत्कृष्ट उदाहरण ठरतं आहे.
मार्च २०२४ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात आजपर्यंत १८४६ मातांनी स्वखुशीने दुग्धदान केलं असून, २००० हून अधिक नवजात बाळांना सुरक्षित, आरोग्यदायी दूध मिळालं आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली, पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी यांना संकल्पना आवडली, तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या पुढाकारातून झाली. “मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही पर्याय स्वीकारण्यासारखा नसतो. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम उभा राहिला आहे,” असं डॉक्टर पाटील सांगतात.
"मातेचे दूध म्हणजे फक्त अन्न नव्हे, ती जीवनरेषा आहे" – असे सांगत प्रमुख जयश्री पाटील आणि डॉ. शैलजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत मिल्क बँकची पाच सदस्यीय टीम समुपदेशन व सेवा कार्यात समरस आहे.
‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे काय?
‘ह्युमन मिल्क बँक’ ही अशा प्रकारची सुविधा आहे जिथे नवजात बाळांसाठी आईच्या दुधाचा पर्याय म्हणून दुसऱ्या आरोग्यदायी स्त्रीचे दूध गोळा करून सुरक्षितरीत्या साठवले जाते आणि गरजूंना दिले जाते. ही संकल्पना विशेषतः अशा बाळांसाठी उपयुक्त ठरते, ज्यांच्या मातेला कोणत्याही कारणामुळे थेट स्तनपान करता येत नाही — जसे की अकाली बाळंतपण, आईचे आजारपण, मृत्यूनंतर किंवा दूध कमी असणे इत्यादी.
कशी कार्य करते ह्युमन मिल्क बँक?
1. दुग्धदान (Milk Donation):
निरोगी स्त्रियांनी (आईंनी) त्यांच्या बाळाला दूध पाजून उरलेले दूध स्वेच्छेने या बँकेत दान केले जाते. त्यासाठी महिलांची वैद्यकीय तपासणी होते, त्यांच्या आरोग्याचा इतिहास तपासला जातो.
2. दूध संकलन व तपासणी:
संकलित दूध हे प्रमाणित प्रक्रियेनुसार पाश्चराइज (अती उष्ण व अती शीत)केले जाते. त्यामुळे त्यातील जंतू, बॅक्टेरिया नष्ट होतात.
3. साठवण व वितरण:
हे दूध विशेष थंड तापमानात डीप फ्रीझरमध्ये साठवले जाते. गरजूंना – विशेषतः NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मधील कमी वजनाच्या बाळांना – डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते.
का आहे ही गरज?
अनेक वेळा अकाली जन्मलेल्या किंवा कमकुवत बाळांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनासाठी आईचे दूधच सर्वोत्तम असते.
पण काही प्रसंगी आई दूध देऊ शकत नाही, अशा वेळी दुसऱ्या महिलांचे दूध अत्यावश्यक ठरते. हे दूध बाळाच्या जीवितासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे "ह्युमन मिल्क बँक" म्हणजेच आईच्या मायेचा एक सामाजिक विस्तार म्हणता येईल.
फायदे:
▪️बाळाचा आरोग्य विकास योग्य होतो.
▪️मृत्यू दरात घट येते.
▪️स्तनपानास प्रोत्साहन मिळते.
▪️आईच्या अनुपस्थितीतही बाळाला आईच्या दुधासारखे पोषण मिळते.
ह्युमन मिल्क बँक ही विज्ञान, सेवा आणि मातृत्व यांचा सुंदर संगम आहे. ती म्हणजे एक जीवनदायिनी यंत्रणा आहे – बाळांच्या आरोग्याचे रक्षण करणारी!
-युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट



जळगाव, दि. 04 जुलै 2025 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर या आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला व बालकल्याण विषयक विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

या भेटीदरम्यान बालविवाह प्रतिबंध, लैंगिक छळविरोधी अंतर्गत तक्रार समित्यांचे कार्य, PCPNDT कायद्याची अंमलबजावणी, तसेच आशादीप केंद्र, रिमांड होम व पुनर्वसन संस्थांची कार्यक्षमता यावर सखोल चर्चा झाली.
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी गस्त आणि जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी दिले. तसेच, प्रत्येक शासकीय कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करून त्यांचे प्रशिक्षण व नियमित कामकाज सुनिश्चित करण्यावर भर दिला जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
PCPNDT कायद्यांतर्गत सोनोग्राफी केंद्रांची तपासणी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कडक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मा. अध्यक्षा अधोरेखित करत आहेत. आशादीप केंद्र, रिमांड होम आणि पुनर्वसन संस्थांची स्वतंत्र पाहणी करून सेवा अधिक प्रभावी करण्यावरही चर्चा सुरू आहे.
श्रीमती चाकणकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या कार्याची प्रशंसा करत महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक समन्वयात्मक आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

Thursday, 3 July 2025

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी २०२६ प्रक्रिया सुरू

जळगाव, दि. 03 जुलै 2025(जिमाका ) :

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात दिनांक १ जून २०२५ पासून करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागणार असून, नोंदणीसाठी अंतिम तारीख २९ जुलै २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत जिल्ह्यातील निर्धारित परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत आणि अचूक माहिती भरून ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ११,४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा या नोंदणीत १०% वाढ होईल असा अंदाज असून, त्यानुसार योग्य नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, तसेच त्यांना अर्ज भरताना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जामनेर मध्ये ‘बहिणाबाई मॉल’चे भूमीपूजन — बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ



जळगाव, दि. 0३ जुलै २०२५ (जिमाका वृत्तसेवा) :

जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 'बहिणाबाई मॉल' या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.
या ‘बहिणाबाई मॉल’चे भूमिपूजन दिनांक ३ जुलै २०२५ रोजी गुरुवार, जामनेर तालुक्यातील वाकी रोड परिसरात माजी नगराध्यक्ष सौ. साधना महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करनवाल (भा.प्र.से.), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. आर. एस. लोखंडे, श्री. चंद्रकांत बाविस्कर, श्री. जे. के. चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गट अत्यंत गुणवत्तापूर्ण वस्तूंचे उत्पादन करीत असून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार असून, महिला सक्षमीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.”
‘बहिणाबाई मॉल’ हे केवळ विक्री केंद्र नसून, ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे व्यासपीठ ठरणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचा आत्मविश्वास वाढून त्यांची आर्थिक प्रगती सुनिश्चित होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात 7 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव, दि. 03 जुलै 2025(जिमाका ) :

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 7 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे.

या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

“एक पेड मा के नाम” महावृक्षारोपण अभियानाचा भव्य प्रारंभ –केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आयोजन

जळगाव, दि. 3 जुलै (जिमाका ) : जळगाव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असून, “एक पेड मा के नाम” या केंद्र शासन निर्देशित महावृक्षारोपण अभियानाचे आयोजन शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता भुसावळ येथील चोरवड येथे करण्यात आले आहे.

या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, , पोलीस अधीक्षक जळगाव आणि अन्य मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हे अभियान युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन, मेरा युवा भारत (MY Bharat) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे २,००० वृक्षारोपण करण्यात येणार असून, जिल्ह्यात पर्यावरण जागृती आणि हरित चळवळीत नवचैतन्य निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Wednesday, 2 July 2025

वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार

मुंबईदि. २ :- राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी व सचेत ॲपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात  वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येईलअशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी दिली.

या संदर्भात सदस्य समीर कुणावर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधवसंतोष दानवे आणि विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणालेराज्यात पावसाळी वातावरणात वीज पडून होणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असूनशेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक धोका होत आहे. मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळणे आणि वादळी परिस्थिती उद्भवतेयावेळी शेतीकाम करत असताना अनेक वेळा शेतकरी वीज पडण्याच्या दुर्घटनांत बळी पडतात.

वीज पडण्याची पूर्वसूचना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचून जीवित हानी टाळता यावीयासाठी भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (IITM) विकसित केलेली दामिनी’ आणि सचेत’ ही दोन ॲप्स नागरिकांना वीज पडण्याच्या आधीच ४० किलोमीटर परिघात सावध करणाऱ्या सूचना देतात. शासनाच्या विविध विभागांतर्फे या ॲप्सचा प्रचार व प्रसार सातत्याने केला जात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

राज्यात सन २०२२ मध्ये राज्यात वीज पडून २३६ व्यक्तींचातर २०२३ मध्ये १८१ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणांत आपत्ती मदतीच्या निकषांनुसार शासनाकडून आर्थिक सहाय्यही दिले जाते. २०१७ नंतर वीज पडून मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ४ लाखांची मदतगंभीर जखमी व्यक्तीस २.५ लाखांची मदततर जनावरांच्या नुकसानीसाठी गाय/म्हैस/बैल यांना ३७ हजार ५००मेंढी-शेळीसाठी ४०००आणि कोंबडीसाठी १०० रुपये अशी भरपाई शासनाकडून दिली जात आहे. ही मदत वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा जुलैत; स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू

जळगाव, दि. 2 जुलै (जिमाका ) :

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्यातर्फे जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पोलीस मुख्यालय, जळगाव येथील फुटबॉल मैदानावर करण्यात येणार आहे. जिल्हास्तर स्पर्धेचा कार्यक्रम व सहभागासाठी वय पात्रता खालील प्रमाणे आहे.

१५ वर्षे मुले खेळाडू दिनांक १ जानेवारी २०11 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा, १७ वर्षे मुले खेळाडू दिनांक १ जानेवारी २००9 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा, १७ वर्षे मुली खेळाडू दि.१ जानेवारी २००9 किंवा त्यानंतर जन्मलेली असावी. जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांनी स्पर्धेची प्रवेशिका तसेच खेळाडू ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने तयार करावयाचे आहे.
स्पर्धेला येताना खेळाडूंच्या जन्मतारखेच्या पुराव्याकरीता जन्मदाखला व आधारकार्ड / पासपोर्ट या कागदपत्राची मुख्याध्यापक यांनी स्वाक्षांकीत केलेली प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. तसेच सन २०२5-26 या वर्षात इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश झालेल्या परंतू रजिस्टर नंबर न मिळालेल्या खेळाडूंनी ओळखपत्रात रजि. नं. च्या जागी नवीन / NEW असे नमूद करावे व स्पर्धेला येताना ११ वी प्रवेशाच्या फी भरलेल्या पावतीची सत्यप्रत ओळखपत्रा सोबत जोडावी.
संघ नोंदणीसाठी अंतिम दिनांक ८ जुलै २०२५ असून, https://dsojalgaon.co.in/school/login.php या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासोबतच www.subrotocup.in या सुब्रतो स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही संघ व खेळाडूंची नोंदणी व प्रवेश फी भरणे बंधनकारक आहे. केवळ नोंदणीकृत व प्रवेश फी भरलेले संघच स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
नियोजित तारखेनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही. जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरीता नमूद सूचनांनूसार शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.