Monday, 30 September 2024

'भारत गौरव पर्यटन रेल्वे'






मोठ्या उत्साही वातावरणात मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत
जिल्ह्यातील भाविक वातानुकुलीत 'भारत गौरव पर्यटन रेल्वे'नी अयोध्येकडे रवाना

▪️ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या चित्रफितीच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा
▪️ खा. स्मिताताई वाघ,आ. लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांनी झेंडा दाखवला झेंडा
▪️ ढोल ताशांचा गजर, पारंपारिक नृत्य करून यात्रेकरूंचे स्वागत

जळगाव, दिनांक 30 सप्टेंबर ( जिमाका ) : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 यात्रेकरुंची विशेष वातानुकुलीत 'भारत गौरव पर्यटन रेल्वे' अयोध्येकडे सोमवारी 30 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात, ढोल ताशांचा गजरात , पारंपारिक नृत्य करून यात्रेकरूंच्या स्वागतात खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते फीत कापून यात्रेकरूंचा रेल्वेत प्रवेश झाला.

खासदार स्मिता वाघ,आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी महापौर सिमाताई भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी श्री. अंकित, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, माजी नगरसेवक उज्वला बेंडाळे यांनी झेंडा दाखवून ही स्पेशल ट्रेन जळगाव स्टेशनवरून अयोध्येकडे रवाना झाली.
ढोल, तासे, उत्सव कमानीने यात्रेकरूंचे स्वागत जळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर सकाळी लवकर सजावटीसह वातानुकुलीत 'भारत गौरव पर्यटन रेल्वे सज्ज होती. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेची स्वागत कमान लावण्यात आली होती. रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने अयोध्या दर्शनासाठी जात असल्यामुळे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभुषेत कलाकार मंचावर होते, पारंपारिक नृत्य केले जात होते. असे सगळ्या महोत्सवी वातावरणात यात्रेकरू त्यांना दिलेल्या बोगीत बसून आनंद व्यक्त करत होते.

शासन निर्णय १४ जुलै २०२४ अन्वये राज्यातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील एकुण ७३ तर महाराष्ट्र राज्यातील एकुण ६६ तिर्थस्थळांचा समावेश आहे. या योजनेसाठी जळगांव जिल्हयाला एकुण १००० उदिष्ट होते. सदर योजनेअंतर्गत पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आले. या योजनेसाठी जिल्हयातुन एकुण ११७७ अर्ज प्राप्त झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना जिल्ह्याचे समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून एकुण ८०० लाभार्थीची या योजनेसाठी लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी आय.आर.सी. टी .सी यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार वातानुकुलीत 'भारत गौरव पर्यटन' ही विशेष रेल्वे करण्यात आली. ही रेल्वे जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी मार्गे अयोध्येकडे जाणार आहे. ही रेल्वे 1 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजता आयोध्येत पोहचणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी यात्रेकरू रामललाचे दर्शन घेतील. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी रात्री जळगावकडे ही रेल्वे निघेल. जळगाव येथे 4 ऑक्टोबर रोजी सकाळी पोहचेल अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.

आय.आर.सी. टी.सी कडून व्यवस्था
यात्रेकरूंना पाणी,चहा, बिस्कीट, नाष्टा, जेवण ही व्यवस्था त्यांच्याकडून असेल. तसेच आयोध्येत राहण्याची व्यवस्था पण आय.आर.सी. टी .सी करणार आहे. यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदार( सर्वसाधारण ) सुरेश कोळी आणि त्यांच्या सोबत वैद्यकीय पथक, इतर सहायक अशी टीम सोबत असणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चित्रफितीच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत आयोध्यासाठी निघालेल्या यात्रेकरूंना शुभेच्छा देऊन जिल्हा प्रशासनाने अत्यंत व्यवस्थितपणे या यात्रेचे नियोजन केल्याबद्दल कौतुक केले.

मंत्री, खासदार, आमदार यांनी दिल्या शुभेच्छा
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी निघालेल्या जिल्ह्यातील सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा कळविल्या आहेत.

यात्रेकरूंचा प्रतिनिधीक प्रतिक्रिया
नामदेव हरी पाटील,उमाळे तालुका, जिल्हा जळगाव म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नियोजित केलेल्या या तीर्थ दर्शन योजनेचा आम्ही आज लाभ घेतोय, याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. तर रमेश पुंजू पाटील, उमाळा तालुका जिल्हा जळगाव यांनी 'मी यात्रेला जातोय, हे पाहून म्हातारपणी मला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी केलेल्या तळमळीनंतर आम्हाला तीर्थदर्शनाचा लाभ घ्यायला मिळतोय याचा मला खूप आनंद होतोय अशी प्रतिक्रिया दिली. तर विमलबाई ईश्वर निकम म्हणाल्या,या यात्रेला जात आहे, याचा आनंद होतोय या वयात मला रामाचं दर्शन होतंय. सरलाबाई गाव सावरखेडा यांनी आम्ही आयोध्या यात्रेला जातोय शासनाने आम्हाला खूप चांगल्या सोई केलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया दिली.

शेती हेच शाश्वत उद्योगाचे साधन







शेती हेच शाश्वत उद्योगाचे साधन, शेतकरी हा पोशिंदा : पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे प्रतिपादन
जिल्ह्यात इफको लि. मार्फत १२ तालुक्यात फवारणी करिता किसान ड्रोन उपलब्ध

जळगाव, दिनांक 30 सप्टेंबर ( जिमाका ) : युवकांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. शेती ही शाश्वत उत्पन्न मिळण्याचे मोठे साधन आणि शेतकरी हा पोशिंदा आहे.त्यामुळे शेती व्यवसाय म्हणून करतांना आधुनिकतेची कास धरवी लागेल. आता पीक विमा पण मिळतो आहे. तेही महाराष्ट्र शासन केवळ १ रुपयांमध्ये पिक विमा देतं आहे. एकमेव महाराष्ट्र सरकार असे असून सर्व समावेशक पिक विमा योजना व हवामानावर आधारित फळ पिक विमा राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होतो आहे, शेतीसाठी सर्वाधिक नुकसान भरपाई देणारा जिल्हा जळगाव जिल्हा ठरत आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सोबत जोड व्यवसाय करावा. शासन शेती व शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासा व्हावा या दृष्टीने वाटचाल करी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कापूस साठवणूक बॅग व बॅटरी चलित फवारणी पंपाचे वितरण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा अधीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी होते.
कृषी विभाग, आत्मा जळगाव व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांचे संयुक्त विद्यमाने राज्य पुरस्कृत कापूस - सोयाबीन उत्पादकता वाढ विशेष कृती योजने अंतर्गत १०० टक्के अनुदानावर नॅनो युरिया, नॅनो डी.ए.पी., कापूस साठवणूक बॅग व बॅटरी चलित फवारणी पंपाचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांनी ड्रोनचा वापर करून आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन यावेळी ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये इफको लि. मार्फत १२ किसान ड्रोन शेतकऱ्यांना माफक दरात फवारणी करिता उपलब्ध करून दिले असून युवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून एक रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी ड्रोनचा वापर करून आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. मागील वर्षी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रु. पाच हजार प्रती हेक्टरी अनुदान घोषित केले असून जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५ लाख शेतकऱ्यांना या माध्यमातून लाभ होणार असून शेतकऱ्यांनी तात्काळ ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी प्रास्ताविकात कृषी विभागाच्या योजना बाबत सविस्तर माहिती विषद केली.
डॉ. शरद जाधव यांनी रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी केले व आभार अमित भामरे यांनी मानले.
या कार्यक्रम प्रसंगी तज्ञ शेतकरी साहेबराव वराडे, किशोर चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, इफको चे केशव शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ इंजि. वैभव सूर्यवंशी, तुषार गोरे, किरण मांडवडे, किरण जाधव, मंडळ कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, अमित भामरे, राहुल साळुंखे, योगेश अत्रे, परिमल घोडके, दशरथ सोनवणेकृषी विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजना

मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू सोमवारी सकाळी 9.50 वाजता निघणार जळगाव स्टेशनवरून

जळगाव, दिनांक 30 सप्टेंबर ( जिमाका ) : मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू सोमवारी सकाळी 9.50 वाजता जळगाव स्टेशनवरून अयोध्याला निघणार आहेत.
शासन निर्णय १४ जुलै २०२४ अन्वये राज्यातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील एकुण ७३ तर महाराष्ट्र राज्यातील एकुण ६६ तिर्थस्थळांचा समावेश आहे.
या योजनेसाठी जळगांव जिल्हयाला एकुण १००० उदिष्ट होते. सदर योजनेअंतर्गत पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आले आहे सदर योजनेसाठी जिल्हयातुन एकुण ११७७ अर्ज प्राप्त झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने एकुण ८०० लाभार्थीची या योजनेसाठी लॉटरी पध्दतीने निवड केली आहे. श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी IRCTC यांच्या समंतीने रेल्वे प्रवासाचे नियोजन करण्यात आलेले आहे. दि.३०/९/२०२४ रोजी सकाळी ९-५० वाजता जळगांव येथुन या तिर्थयात्रेचा शुभारंभ होणार आहे. दि.१/१० / २०२४ रोजी यात्रा अयोध्या येथे पोहोचणार आहे. दोन दिवस अयोध्या येथे थांबून दि.४/१०/२०२४ रोजी जळगांव येथे यात्रेचे परतीचे आगमन होणार आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन


म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

▪️म्हसावद भागात १९ गावांना अखंडित विजेसाठी दिलासा,शिरसोली १३२ के.व्ही. चे उपकेंद्र मंजुरीच्या अंतिम टप्यात

               जळगाव,  दिनांक 30 ( जिमाका ) : सावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम २ महिन्यात पूर्ण होणार असून यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. तसेच  सुमारे ८० कोटीच्या शिरसोली १३२  के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने वीज पुरवठा होणार आहे. उद्योगधंदे यांच्या विद्युतीकरणाचा प्रश्न या शिरसोली उपकेंद्रामुळे सुटणार असून ३४ कोटी ५२ लक्ष निधीतून  म्हसावद व परिसरातील रुग्णांना आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी सर्व सुविधायुक्त ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाला  लवकरच सुरुवात होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

सुरुवातीला जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील  ३३/११ के. व्हीं उपकेंद्र येथे जिल्हा नियोजन व विकास समिती (डी.पी.डी.सी) अंतर्गत मंजूर ३३ के.व्ही. नागदूली ते म्हसावद ह्या उच्चदाब वाहिनीचे कामाचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते म्हसावद येथील वीज उपकेंद्रात करण्यात आले. या प्रसंगी अजय भोई  यांची एस. आर. पी. कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

१९ गावांना मिळणार दिलासा

म्हसावद उपकेंद्र अंतर्गत म्हसावद व वावडदा परिसरातील १९ गावातील सर्व घरगुती व शेतीपंप ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा विद्युत पुरवठा मिळणार असून सदर कामाचा फायदा म्हसावद, बोरनार, लमांजन , वाकडी, कुऱ्हाडदे, डोमगाव, पाथरी ,वडली, वावडदा, रामदेववाडी व इतर गाव तसेच तांड्यांना फायदा होईल.  सदर उच्च दाब वाहिनी अंदाजे ५ किमी असून १ कोटी २५ लक्ष  रुपये निधी मंजूर झालेला आहे  सदर काम ३ महिन्याच्या आत पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव

याप्रसंगी कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, अति.कार्यकारी अभियंता गोपाळ महाजन, उप अभियंता विजय कपुरे, शाखा अभियंता श्री. आव्हाड, माजी सभापती नंदलाल पाटील, समाधान चिंचोरे, सरपंच गोविंदा पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे, निलेश पाटील, शिवराज पाटील, नारायण चव्हाण,  

उपसरपंच संजय मोरे, माजी  उपसरपंच शितलताई चिंचोरे, ग्रा.पं. सदस्य आबा चिंचोरे, हौसीलाल भोई, महेंद्र राजपूत, प्रमोद खोपडे, बापू धनगर, इंदल भोई, अखिल पटेल, अनिल कोळी, धोंडू जगताप, रवी कापडणे, साहेबराव  वराडे, सुनील बडगुजर, सुनील मराठे, परिसरातील सरपंच विश्वनाथ मंडपे, विनोद पाटील, अर्जुन शिरसाठ,  बापू थोरात, धैर्यसिंग राजपूत, गोरख पाटील, भगवान चव्हाण, यांच्यासह परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांनी नागदेवी ते म्हसावद येथे डीपीडीसी अंतर्ग तमंजूर असलेल्या 33 केव्ही लिंक लाईन बाबत सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन माजी उपसरपंच शितलताई चिंचोरे यांनी केले तर आभार उपअभियंता विजय कपुरे  यांनी मानले.

कापूस-सोयाबीन अनुदान



कापूस-सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात
एका क्लिकवर 2398 कोटी रुपये वितरित
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्या हस्ते
मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण

मुंबई, दिनांक 30 सप्टेंबर : गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रीमंडळ बैठकीतून करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत 2398 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली.
सन 2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली. आज जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसं तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Friday, 27 September 2024

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

‘मुख्यमंत्री योजनादूत’;

अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दिनांक २७ सप्टेंबर : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल


राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल
- पर्यटनमंत्री गिरीश महाजन -


मुंबई, दिनांक २६ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. आगामी काळात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर पर्यटन विभागाचा भर असुन लवकरच विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक पर्यटन दिनांक २७ सप्टेंबर रोजी आहे. या दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळचा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ केला. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला आहे. लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. याठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याच्या सोयी मर्यादित असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महामंडळाने या ठिकाणी 4 हजार 13.23 चौमी एवढया जागेत अद्ययावत असे पर्यटक निवासाचे बांधकाम केले आहे. 20 खोल्या, 2 डॉरमेट्री, 1 उपहारगृह, 1 किचन, स्वागतकक्ष इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. पर्यटक निवास बांधण्याकरिता 7 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. सर्व खोल्या या वातानुकुलित असुन भव्य असे 2 लोकनिवास महीला आणि पुरुषांसाठी तयार करण्यात आले आहेत. भांडारकक्ष, स्वच्छतागृह, अपंगांसाठी स्वच्छतागृह, स्वागतकक्ष, व्यवस्थापक कक्ष याचाही यामध्ये समावेश आहे.

पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या की, राष्ट्रकुट पर्यटक निवासामुळे वेरुळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या आणि घृष्णेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची उत्तम दर्जाची सोय होणार आहे. येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही लेण्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी उपलब्ध होणार असून छत्रपती संभाजीनगर शहरापासुन वेरुळ जवळच असल्याने पर्यटक या ठिकाणी राहण्यास जास्त पसंती देतील.

व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले की, पर्यटक निवासाच्या समोरच हेलीपॅड असून जवळच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्रही आहे. पर्यटक निवासामध्ये विविध सोयी असल्याने पर्यटकांना राहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसचे सदरचे पर्यटक निवास हे वेरुळ लेण्यांच्या अगदी समोरील बाजुस असल्याने पर्यटकांना निवासाच्या खोल्यांमधून आणि छतावरुन लेण्यांचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.

राष्ट्रकूट पर्यटक निवासाचे व्यवस्थापन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक हरणे हे करीत आहेत.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार


केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि
शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन

मुंबई, दिनांक 26 सप्टेंबर : महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे आज रात्रौ 8 वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीश गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.

दिनांक २७ ते २८ सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत.

Thursday, 26 September 2024

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक

 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना
अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळणेसाठी शेतकरी खातेदार यांनी e-kyc करावे

                 जळगाव दिनांक 26 ( जिमाका ) : राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रुपये ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे .

                सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. या साठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासंम्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत .यांची ekyc करणेची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त राहिलेले २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ekyc करणे आवश्यक आहे. यापैकी २.३० लाख खातेदार यांनी दिनांक २५.९.२०२४ अखेर ekyc पूर्ण केले आहे. याकरीत शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्या शेतक-यांचे ई-केवासी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. 

                सदरच्या शेतक-यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे login मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून e-kyc करतील, तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC) जावून सुद्धा e-kyc करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतक-यांनी आपला आधार क्रमांक टाकावा नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतील तरी शेतक-यांनी तात्काळ e-kyc करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे, अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा. असे कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय





उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय
- पालकमंत्री गुलाबराव पाटील -
जळीत वॉर्डात पालकमंत्री यांची भेट ; 
इतर जिल्ह्यातील रुग्णही आहेत भरती

जळगाव, दिनांक 26 सप्टेंबर ( जिमाका ) : आपण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण हे आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागच्या चार वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन मधून अत्याधुनिक करणासाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले यंत्र सामुग्री दिले आहेत. आज त्यात अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डची भर पडली. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसीतून दिलेल्या मोठ्या निधीमुळे सिव्हील हॉस्पिटल व महाविद्यालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असल्याने सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे हॉस्पिटल वाटत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथे मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ होत्या.
ससज्ज असे जळीत कक्ष व अतिदक्षता विभाग
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आणि खा. स्मिता वाघ यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा 20 खाटांच्या जळीत कक्षात ( बर्न वार्ड) 5 खाटांचे आयसीयू, 5 विशेष जळीत खाटा आणि उर्वरित 10 जनरल जळीत खाटांचा समावेश असून येथील सर्व खाटा जळालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत. या अत्याधुनिक वार्डामध्ये वातानुकूलित (ए.सी.) सोयीसह रुग्णांना अधिक आरामदायी उपचार मिळत असून याशिवाय स्क्रीन ग्राफ्टिंगसारख्या जटिल शस्त्रक्रिया आणि हायड्रोशन सारख्या आधुनिक उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच सदर कक्षामध्ये एक सुसज्ज असे लहान शस्त्रक्रिया गृह देखील उपलब्ध आहे ज्यामुळे जळालेल्या रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता अधिक वाढेल. जंतुसंसर्ग कमी होणे, मृत्यूचे प्रमाण कमी होणे व रुग्ण बरा झाल्या व नंतरचे व्यंग/ विद्रूपपणा हे सर्व कमी होण्यास मदत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून एकूण 03 कोटी 60 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्य राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सिव्हील सर्जन डॉ किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अक्षय सरोदे डॉ., डॉ. सुरेखा चव्हाण डॉ. राजेश जांभुळकर वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड, योगिता बावस्कर , विश्वनाथ पुजारी दीपक शेजवळ, राजेश जांभूळकर, डॉ. चंद्रमोहन हरणे तसेच अधिसेविका प्रणीता गायकवाड, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्या विभागातील डॉक्टर्स मेट्रन मॅडम व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी DPDC मार्फत देण्यात आलेल्या मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागासाठी यंत्रसामुग्री बाबत सविस्तर माहिती विषद करून यामुळे रुग्णांना होणारे फायदे याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड यांनी मानले.

जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद

जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी

संवाद साधताना केले प्रतिपादन

कोल्हापूर, दिनांक 25 सप्टेंबर (जिमाका) : समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकास कामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्याप्रकारे पेरले, रूजविले जाणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर येथे केले. ते म्हणाले, कोणत्याही विकास कामांचे नियोजन चांगल्याप्रकारेच केले जाते. उदा. रस्ते करताना, उद्योग उभारताना, योजनांची अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक काम बदल म्हणून केले जाते. ते काम चांगल्या प्रकारे व्हावे, ते बदल लोकांना स्विकारहार्य असावेत. असे बदल प्रशासनाकडून चांगल्याप्रकारे पेरण्याची गरज आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते.

राज्यपाल यांनी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती, शेती, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, राजकीय व माध्यम अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेवून चर्चा केली. यावेळी त्यांनी सुरूवातीला जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेवून जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी टी शिर्के उपस्थित होते.

राज्यपाल महोदयांच्या आगमनावेळी पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली तसेच राष्ट्रगीत वादन करण्यात आले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा, प्रकल्पांचा सखोल आढावा सुरूवातीला घेतल्यानंतर विविध क्षेत्रातील शिष्ट मंडळांशी त्या त्या गटनिहाय चर्चा केली. यावेळी उपस्थित शिष्ट मंडळातील सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विकासासाठी आवश्यक कामांबाबतची चर्चा केली व निवेदने सादर केली. यात जिल्ह्यातील उद्योग वाढ, हद्दवाढ, सार्वजनिक आरोग्य सेवा, खंडपीठ, औद्योगिक विकास, रोजगार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतीसाठी पाणी, पर्यावरण संरक्षण, पूरावर कायमस्वरूपी तोडगा, गुळाचा वापर शालेय स्तरावर मध्यान्ह भोजनात करणे, आरक्षण आदी विषयावर मागण्या करण्यात आल्या तसेच त्यावर चर्चा झाली.

यावेळी हद्दवाढीवर बोलताना ते म्हणाले, शहरांची लोकसंख्या आणि वाढ आपण रोखू शकत नाही. हद्दवाढ काही काळ आपण थांबवू शकतो परंतू ती कायमस्वरूपी थांबविता येत नाही. केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी याबाबत नियोजन केल्यानूसार ते पुर्वीप्रमाणेच करण्याच्या सूचना दिल्या आसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी मुलांसाठी गुळाचा वापर मध्यान्ह भोजनात साखरे ऐवजी करावा याबात सुचविलेल्या मुद्दयांवर याबाबत अधिक चर्चा करू असे आश्वासन दिले. रोजगारक्षम ग्राम संकल्पना, कौशल्य विकासावर भर अधिक चांगल्या प्रकारे सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थित शिष्ट मंडळांतील सदस्यांनी राज्यपालांचे पुष्प देवून स्वागत केले. तसेच त्यांनी आजपर्यंत पहिल्यांदाच राज्यपालांनी प्रत्यक्ष जिल्हयात येवून संवाद साधल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. यावेळी राज्यपाल महोदयांनी स्थानिक पातळीवरील समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या योजना


सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा
एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर;
पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

जळगाव, दिनांक 26 सप्टेंबर ( जिमाका ) : समाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहचाव्या यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर पासून गावोगावी एलईडी चित्ररथ फिरणार असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ केला.

यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य घनश्याम अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयाकडून एलईडी चित्ररथ जिल्ह्यात फिरणार आहे. या चित्ररथातून सामाजिक न्याय विभागांच्या महत्वाच्या योजनांची माहिती असलेले व्हिडीओ, यश कथा, योजनांचा अर्ज कसा करायचा, त्याला लागणारे कागदपत्र ही माहिती या एलईडी च्या माध्यमातून दाखविली जाणार आहे.हा दृकश्राव्य रथ ज्या ज्या गावात जाईल तिथल्या लोकांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजना बघून समजून घ्याव्यात आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रम


दिलखुलास’ कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे
संचालक नवनाथ वाठ यांची मुलाखत

          मुंबईदिनांक 25 सप्टेंबर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'स्वच्छता हीच सेवाया अभियानाची अंमलबजावणी या विषयावर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे (नागरी) 2.0 राज्य अभियान संचालकनवनाथ वाठ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. याच धर्तीवर स्वच्छता हाच आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणेरस्ते झाडणेपाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  हस्ते आरंभ झालेले हे राज्यस्तरीय अभियान 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणार असून राज्यातील नागरी व ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या अभियानाची अंमलबजावणीवैशिष्ट्ये आणि अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम याबाबत अभियानाचे संचालक श्री. वाठ यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.

'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत गुरूवारदि. 26 व शुक्रवार दि.27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘राष्ट्रीय पोषण माह’ राबविण्यात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल




‘राष्ट्रीय पोषण माह’ राबविण्यात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे -

'पोषण भी, पढाई भी' राज्यस्तरीय परिसंवादाचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन
मुंबई, दिनांक २५ सप्टेंबर ( जिमाका ) : केंद्र सरकारने प्रारंभिक बाल्यावस्था देखभाल आणि शिक्षणअंतर्गत सुरू केलेल्या ‘पोषण भी, पढाई भी’ या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण,आहार आणि शिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे 'पोषण भी, पढाई भी' या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, ‘एनआयपीसीडी’चे उपसंचालक रिटा पटनाईक, सहव्यवस्थापक सिद्धांत सचदेवा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी सुरुवातीच्या काळात मिळेल त्या जागेवर अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
आई – वडिलांच्या बरोबरीनेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांवर संस्कार करत असतात. महिला व बालकांना उत्तम शिक्षण आणि पोषण देण्याचे काम महिला व बालविकास विभाग करत आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सेविका, मदतनीस यांनी महत्त्वाची सेवा बजावली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली.
केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर म्हणाल्या, पोषण अभियान हा देशातील 6 वर्षांखालील लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांचे पोषण सुधारण्यासाठीचा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पोषण माह 2024 अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत 7 कोटी 93 लाख विविध उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करून एकत्रित प्रयत्नांतून कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण अभियानाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले आहे.
पोषण भी, पढाई भी या माध्यमातून 'स्वस्थ भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात गर्भवती आणि स्तनदा माता, सहा वर्षांखालील लहान मुले आणि किशोरवयीन मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करून पोषणविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.असेही केंद्रीय राज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले.
आयुक्त कैलास पगारे म्हणाले, महिला व बालकांच्या आहारासंदर्भात असलेले गैरसमज दूर व्हावे, महिलांनी बालकांच्या पोषणासाठी काय काळजी घेतली पाहिजे. यासंबंधी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवून ‘पोषण माह’ साजरा करण्यात येत आहे.
हा 7 वा राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात येत आहे. या अभियानात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली.
दरम्यान बालमंथन या मासिकाचे आणि नवचैतन्य या अभ्यासक्रमाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.