Friday, 27 November 2015

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानासाठी पात्र खातेदारांना आवाहन

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानासाठी
पात्र खातेदारांना आवाहन

              चाळीसगांव, दिनांक 27 :-   पाचोरा तालुक्यातील खरीप-टंचाई अनुदान 2014 तसेच माहे फेब्रुवारी व मार्च 2014 गारपीट अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांना अनज्ञेय असलेल्या अनुदानाची रक्कम अद्यापपर्यंत बँकेत  शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. सदरची रक्कम खातेदारांच्या खात्यावर वर्ग न होता बँकेत शिल्लक असल्याने ती संबंधितांनी आपल्या खात्यावर जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करावी तसेच ज्या शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाली असेल अशा शेतकऱ्यांनी ती तात्काळ काढून घ्यावी असे आवाहन पाचोरा तहसिलदार दिपक पाटील यांनी केले आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांना खरीप-टंचाई अनुदान 2014 व गारपीट अनुदानाची रक्कम प्राप्न झाली नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावचे तलाठी यांचेशी व बँक अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क साधावा व आपणास वितरीत झालेल्या अनुदानाची रक्कम प्राप्त करुन घ्यावी. सदर अनुदानातील उर्वरित रक्कम तात्काळ शासन जमा करावयाची असल्याने शेतकऱ्यांनी कृपया प्राधान्याने याबाबत संबंधितांकडे चौकशी  करण्याचे आवाहन दिपक पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                    
* * * * * * * *

Monday, 23 November 2015

वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी वनविभाग, महसूल सह पोलीस विभागाची धडक कारवाई


वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी
वनविभाग, महसूल सह पोलीस विभागाची धडक कारवाई

              चाळीसगांव, दिनांक 23 :-   पाचोरा वनक्षेत्रातील शिवणी येथील सुमारे 100 एकर क्षेत्रातील वनजमिनीवर मागील 2 ते 3 वर्षापासून काही लोकांकडून अतिक्रमण करित शेतीसाठी जमीन तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर रहिवासासाठी झोपडया देखील बांधण्यात आल्या होत्या. वाढत्या अतिक्रमणामुळे वनक्षेत्राचा मोठया प्रमाणात  ऱ्हास होत होता. यासाठी जळगांव वन विभागाचे उपवन संरक्षक आदर्श रेड्डी यांनी हाती घेतलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या धडक मोहिमेतंर्गत सहाय्यक वनसंरक्षक आय.एम.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस विभागाच्या सहकार्याने ‍ भडगांव तालुक्यातील शिवणी येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई  करण्यात आली.
                     या धडक मोहिमेची पुर्व तयारी म्हणून भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप निकम यांनी भडगांव तहसिलदार बि.ए.कापसे यांच्या अध्यक्षतेखाली वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील यांच्या उपस्थितीत सर्व अतिक्रमण धारकांची बैठक बोलावून स्वत: अतिक्रमण काढून घेण्याविषयी समज दिली तर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही या करिता विशेष खबरदारी घेण्यात आली. मोहिम राबवितांना उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड व सहाय्यक उपवनसंरक्षक आय.एस.पाटील हे उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेची पहाणी करण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नायब तहसिलदार अमित भोईटे, पोलीस निरीक्षक दिलीप निकम, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, उत्तमराव जाधव, संजय मोरे, संजय पाटील या अधिकाऱ्यांसह वनविभागाचे 65 कर्मचारी, पोलीस विभागाचे 50 कर्मचारी, एस.आर.पी.एफ. प्लाटुनसह बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खबरदारीची उपाययोजना म्हणुन एका रुग्णवाहिकेची देखील यावेळी व्यवस्था करण्यात आली होती.
अतिक्रमण निर्मुलणासह जलसंधारणाचेही काम
                     सदर कारवाई अंतर्गत 16 जे.सी.बी. च्या सहाय्याने अतिक्रमीत जमिनीवरील अतिक्रमण काढून प्रत्येकी 10 मिटर अंतरावर लांब व खोल असे चर खोदण्यात आले त्यामुळे अतिक्रमणाला आळा बसून पावसाचे पाणी या चरांच्या माध्यमातून जमिनीत मुरविण्यात मोठी मदत होईल व या दोन चरामधील जमिनीवर वन विभागामार्फत लवकरच वृक्षलागवडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर वनजमिनीवर पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर भविष्यात कठोर कारवाई करण्यात येईल असे महसुल प्रशासनाने एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                     काही दिवसापुर्वीच भडगांव तालुक्यातील धोत्रे व वलवाडी परिसरातील एकुण सुमारे 130 एकर  वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. तर आता शिवणी परिसरातील 100 एकर जमिनीवरील अतिक्रमण काढल्यामुळे संपुर्ण पाचोरा वनपरिक्षेत्र अतिक्रमणाच्या विळख्यातुन मुक्त झाल्याचे महसूल प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. सदर कारवाईचे शिवणी गावचे सरपंच स्वरुपसिंग राजपुत, ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.
                    
* * * * * * * *