Monday, 31 December 2012

सिंचन प्रकल्पाबाबत जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती समितीची कार्यकक्षा व सदस्यांची नावे जाहीर


मुंबई, दि. 31 डिसेंबर : राज्यातील सिंचन प्रकल्पाबाबत ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्याचानिर्णय राज्यसरकारने घेतला होता. या समितीची कार्यकक्षा व सदस्यांची नावे आज सरकारने जाहीर केली आहेत. समितीमध्ये सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त)ए. के. डी. जाधव, सेवानिवृत्त पाटबंधारे सचिव व्हि. एम. रानडे, सेवानिवृत्तकृषिआयुक्त कृष्णा लव्हेकर  यांचा समावेश आहे. समितीचे मुख्यालय वाल्मी, औरंगाबाद येथे राहणार असून सहा महिन्यात अहवाल द्यावयाचा आहे.
समितीची व अध्यक्षांच्या नावाची घोषणा करताना या समितीची कार्यकक्षा, इतर सदस्यांची नेमणूक आणि चौकशीचा कालावधी याचा निर्णय 31 डिसेंबर 2012 पर्यंत घेण्यात येईल,असे निवेदन नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार आज ही कार्यवाही करण्यात आली. समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे राहील.
1)निर्मितसिंचनक्षमता व प्रत्यक्ष सिंचितक्षेत्र, तसेच बिगर सिंचन पाणीवापर याची तपासणी करणे, प्रत्यक्ष सिंचितक्षेत्रापैकीविहिरीद्वारे, शेततळ्याद्वारे, जलसंधारण विभागामार्फत व जलसंपदा विभागामार्फत प्रत्यक्ष सिंचीत क्षेत्र कमी असण्याची कारणे तपासणे, 2)महामंडळांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या प्रकल्पांच्या किंमतीतील वाढ व त्याची कारणे प्रचलित नियम व अधिकारानुसार सुसंगत असल्याची तपासणी करणे, 3) प्रकल्पांच्या विलंबांच्या कारणांची तपासणी करणे, 4)मुळ प्रशासकीय मान्यतेच्या तुलनेत प्रकल्पांच्या व्याप्तीमध्ये झालेल्या बदलाची कारणमिंमासा तपासणे व अशा व्याप्तीमुळे किमतीत झालेल्या वाढीचीतपासणी करणे, 5)उपसासिंचन योजनांची उपयुक्तता वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविणे, 6) जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांच्या कामांच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना सुचविणे, 7) प्रकल्प ठरलेल्या मुदतीत व खर्चात पूर्ण होण्यासाठी उपाययोजना सूचविणे, 8) सिंचनक्षेत्रात वाढ होण्यासाठी उपाययोजना सूचविणे, 9) अनियमितता आढळल्यास जबाबदारी निश्चित करणे व योग्य कारवाई सूचविणे.
 

नवीन वर्ष शांततामय प्रगतीचे जावो : मुख्यमंत्री महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला नव्या वर्षात प्राधान्य देण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प



नवीन वर्ष शांततामय प्रगतीचे जावो : मुख्यमंत्री
महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला
नव्या वर्षात प्राधान्य देण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प

मुंबई, दि. 31 : नवीन वर्ष शांतता, समृद्धी आणि प्रगतीचे जावो, अशा सदिच्छा राज्यातील नागरिकांना देत असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वर्षात महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे.
            सन 2013 या नव्या वर्षानिमित्त राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा देताना श्री. चव्हाण म्हणतात की, येणारे प्रत्येक नवे वर्ष हे नवी आशा घेऊन येत असते.  उद्यापासुन सुरु होणाऱ्या नव्या वर्षाचेही स्वागत सर्वजण मोठ्या उमेदीने करतील, अशी आशा आहे. मात्र वर्षाच्या अखेरीस देशात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांमुळे जनमानस व्यथीत झाले आहे. सामाजिक सलोखा, शांतता, सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षेची भावना असणे, ही आजची सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. यामुळेच राज्यात सर्वत्र सुरक्षेचे वातावरण राहिल, याची सर्वतोपरी खबरदारी घेण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे.
            अपकृत्ये करणाऱ्यांना कायद्यानुसार योग्य आणि कठोर शिक्षा व्हावी, महिलांवरील अत्याचारांचे खटले त्वरेने निकाली निघावेत, शिक्षेची अंमलबजावणी विनाविलंब व्हावी, अशी पावले आम्ही उचलणार आहोत. यासाठी आवश्यक तेथे कायद्यात बदलही करण्यात येतील. महिलांना कोणत्याही दडपणाशिवाय व निर्भयपणे फिरता यावे, अशी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे. सुरक्षा यंत्रणेला याबाबत विशेष प्रयत्न करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. या सर्वामध्ये अर्थातच सर्व सुजाण नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा संकल्प पूर्ण करू, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
 


जेईई मेन आणि ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या प्रवेशासाठी बारावीचे 40 टक्के गुण ग्राह्य धरणार


मुंबई, दि. 31 : ब्रु/मार्च 2013 मध्ये होणाऱ्या जेईई मेन आणि ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वी परीक्षेतील 40 टक्के गुण विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार  आहे.

मार्च आणि ऑक्टोबर 2011   2012 च्या 12 वी परीक्षेत एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी फेब्रुवारी /मार्च  2013 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षेस प्रविष्ठ होण्यास  या योजनेतील अटीस अधिन राहून अंतिम संधी देण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांनी  श्रेणी सुधार  योजनेतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी त्यांची  आवेदनपत्रे  नियमित विद्यार्थ्यांच्या नियमित शुल्काच्या दुप्पट 8 जानेवारी 2013 पर्यत त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाकडे अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर नियमित विद्यार्थ्यांच्या विलं शुल्काच्या दुप्पट शुल्कासह 12 जानेवारीपर्यत अर्ज सादर करता येतील, आणि कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळाकडे 12 जानेवारी पर्यत आवेदपत्र सादर करायचे आहेत त्यानंतर उशिरा आलेल्या आवेदपत्र विलंब शुल्कासह 15 जानेवारी पर्यत सादर करावीत.
मार्च आणि ऑक्टोबर 2011 2012 च्या 12 वी परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयाची जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागेल. मात्र या विद्यार्थ्यांचे तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण व श्रेणी पूर्वीचीच ग्राह्य धरण्यात येईल. यापुढे उच्च माध्यमिक  व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस एकाच वेळी सर्व विषय घेऊन उर्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेतर्गंत सलग दोन परीक्षेस प्रविष्ठ होण्यास संधी देण्यात येत आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना तोंडी प्रात्यक्षिक परीक्षेस प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने प्रविष्ठ व्हावे लागेल. अस राज्य शिक्षण मंडळान कळविले आहे.

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी 5 जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावेत



मुंबई, दि. 31 : महाविद्यालयीन, विद्यापीठ, अभियांत्रिकी शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण/ प्रशिक्षण, चित्रकला/ उपयोजित कला या क्षेत्रात अध्ययन किंवा अध्यापनासह शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित गौरव व्हावा, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यातील शिक्षकांचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सन 2012-13 चे शिक्षण पुरस्कार निवड प्रक्रियेसाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार पुरस्कारांसाठी दिनांक 5 जानेवारी 2013 पर्यंत प्रस्ताव प्राप्त होणे आवश्यक आहे.
संचालक व कुलसचिव यांनी प्राप्त प्रस्ताव / अर्जांची शासन निर्णयातील प्राथमिक अटीनुसार तपासणी करावी व सदर प्रस्ताव/अर्ज प्रमाणित करुन  शिक्षकनिहाय प्रस्ताव दिनांक 10 जानेवारी  2013 पर्यंत छाननी समितीकडे पाठवावयाचे आहे. छाननी समितीने प्रस्ताव दिनांक 15जानेवारी 2013 पर्यंत शासनाकडे / राज्यस्तरीय निवड समितीकडे सादर करावयाचे आहे. राज्यस्तरीय निवड समितीची सभा दिनांक 16 ते 24 जानेवारी 2013 दरम्यान आयोजित केली जाणार असून दिनांक 26 जानेवारी 2013 रोजी राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत तर राज्य शिक्षक पुरस्कार सोहळा दिनांक 5 सप्टेंबर 2013 रोजी आयोजित केला जाणार आहे, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
या पुरस्काराकरिता यापूर्वी प्राप्त झालेले प्रस्तावसुध्दा विचारात घेण्यात येणार आहेत.कोणत्याही परिस्थितीत निश्चित करुन दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रस्ताव राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्याची जबाबदारी प्रत्येक स्तरावरील छाननी समितीच्या अध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे.

औरंगाबाद येथे 10 जानेवारी रोजी पेन्शन अदालत

                जळगांव दि. 31 :- पोस्ट मास्तर जनरल औरंगाबाद विभाग यांचे कार्यालयात दिनांक 10 जानेवारी 2013 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आलेली असून सदरच्या अदालतीमध्ये संबंधीतांनी दिनांक 7 जानेवारी 2013 पर्यत तक्रारी पाठविण्याचे आवाहन पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद यांनी केले आहे.
         सदरची पेन्शन अदालत पोस्ट मास्तर जनरल औरंगाबाद विभाग, छावणी कंम्पाऊंड औरंगाबाद येथे आयोजित केली आहे. तरी संबंधितांनी  बी. इक्बाल, लेखा अधिकारी, पोस्ट मास्तर जनरल, औरंगाबाद विभाग यांचे दिनांक 7 जानेवारी 2013 पर्यंत पाठवाव्यात त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नसल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.                                                        

टोणगांव येथील प्रगती मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई



      जळगांव, दि. 31 :- अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून टोणगांव ता.भडगांव येथील प्रगती मेडीकल ॲन्ड जनरल स्टोअर्सवर दि. 28 डिसेंबर 2012 रोजी धाड टाकण्यात येऊन सदरच्या दुकानातील सुमारे 45 हजार रुपयांचा औषधी साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गु. बा. निनावे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
        टोणगांव ता. भडगांव येथील बस स्टँड समोर असलेले प्रगती मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्सचा परवाना मुदत दिनांक 16 एप्रिल 2012 रोजी संपलेली होती. त्यानंतर  परवान्याचे नुतनीकरण न करता सदर दुकानातून औषधी खरेदी व विक्री सर्रासपणे चालू होती. जळगांव कार्यालयातील औषध निरीक्षक श्री. डॉ. ए. एम. माणिकराव यांनी दिनांक 11 सप्टेंबर 2012 रोजी या दुकानाची तपासणी केली असता या दुकानाचे फार्मासिस्ट हे मॅक्लोडस या औषध उत्पादक कंपनीकडे मेडीकल रेप्रेझेन्टेटिव्ह म्हणून काम करीत असल्याचे उघड झाले. सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य जळगांव यांनी या दुकानाचे औषध परवाने दिनांक 5 डिसेंबर 2012 पासून रद्द केल्याचे आदेश दिले होते. तरीही सदर दुकानातुन बेकायदेशीररित्या सर्रासपणे औषधांची खरेदी व विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरुन अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक श्री. डॉ. ए. एम. माणिकराव, श्री. ह. ये. मेतकर, श्री. एस. एस. देशमुख यांनी सदर दुकानावर

धरणगावातील विविध विकास कामांचा शुभारंभ



       जळगांव, दि. 31 :- धरणगांव येथील विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते करण्यात आले. यात  प्रामुख्याने रुपये 5.84 लक्ष खर्च करुन शिवाजी चौक ते पिलू मशीद जैन गल्ली  रस्त्याचे डांबरीकरण 9.45 लक्ष रु. चे तेली  तलाव शिवाजी तलाव ते बालाजी मंदिर रस्त्याचे डांबरीकरण, वाचनालय व मुंजोबा पार समाजमंदिर बांधकाम करणे. धरणगांव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम व दिवाणी न्यायाधिश यांच्या निवासस्थान बांधकामांचा शुभारंभ करुन बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या आवार भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
          कार्यक्रमास धरणगावातील न. पा. चे नगरसेवक आणि नागरिक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

सशक्त समाजाच्या निर्मितीमध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची - हेमंत अलोने

         जळगांव, दि. 31 :- समाजाची जडणघडण योग्य पदध्दतीने करुन सशक्त समाजाच्या निर्मितीमध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी केले. ते आज सकाळी मूलजी जेठा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आदय पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या व्दिजन्म शताब्दी निमित्त कार्यक्रमात पत्रकारितेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत होते.
         सदरचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालय व मुलजी जेठा महाविद्यालयाच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आला. यावेळी मूलजी जेठा महाविद्यालयाचे उप प्राचार्य एन. एम. भारंबे, जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख श्रीकृष्ण जळूकर, जिल्हा माहिती अधिकारी आर. डी. वसावे, प्रा. सुरेश तायडे , प्रा. आशिष मलबारी, आदि सह पत्रकारितेचे विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
        श्री. अलोने पुढे म्हणाले प्रसार माध्यमे ही एक शक्ती असून तिचा वापर विधायक कार्यासाठी करावा. तसेच समाजाचे प्रबोधन करुन उन्नत व शिक्षित समाजाच्या उभारणीचे काम पत्रकाराकडून झाल्यास ते पत्रकारितेला न्याय दिल्यासारखे असेल, असे त्यांनी सांगितले.
       बहुतांश लोक वृत्तपत्रे वाचून मत तयार करतात. त्यामुळे वृत्तपत्रांनी सकारात्मक पत्रकारिता करावी, असे श्री. अलोने यांनी म्हटले . कारण सातत्याने नकारात्मक वृत्ते दिल्यास यंत्रणा निर्ढाविली जाऊन वृत्तपत्राची दखल घेतली जाणार नाही व त्यातून पत्रकारिता हे हत्यार बोथट होण्याचा संभव असतो, असे  त्यांनी सांगितले.  वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करत असताना नवीन पत्रकारांनी काय छापावे यापेक्षा काय छापू नये याचे ज्ञान घ्यावे, व याकरिता पत्रकारितेचा तंत्रशुध्द अभ्यास करण्याचे आवाहन श्री. अलोने यांनी केले. कारण चांगला पत्रकार होण्यासाठी महाविद्यालयीन अभ्यासक्रम महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्हा माहिती अधिकारी आर. डी. वसावे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात येणा-या वृत्तपत्रीय कामकाजाची माहिती दिली. तसेच शासकीय कार्यक्रमाचे वृत्तांकन करत असताना पाळण्यात येणा-या आचार संहितेबाबात  त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
        जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख श्रीकृष्ण जळूकर यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी आचार्य  बाळशात्री जांभेकर यांच्या व्दि-जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमाचा उद्देश सांगून जांभेकराच्या वृत्तपत्र क्षेत्रातील कार्याची माहिती विदयार्थ्याना दिली. तर प्रा. सुरेश तायडे यांनी बाळशात्री जांभेकरांना अभिप्रेत असलेली समाज प्रबोधन करणारी पत्रकारिता करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात उप प्राचार्य श्री. भारंबे यांनी समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकाराकडून केले जात असते असे सांगून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात कार्य करतांना प्रचंड वाचन करण्याची सूचना केली.
           प्रारंभी संपादक हेमंत अलोने यांच्याहस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंजुषा पवणीकर यांनी केले. तर आभार माहिती  अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालय टीम  व प्रा. अशीष मलबारी, प्रा. प्रवीण चौधरी आदिनी  परिश्रम घेतले.

मुंबई शहर, उपनगर, पुणे, वर्धा, अमरावती व नंदुरबारचा समावेश लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम थेट जमा करण्याच्या योजनेचा राज्यात आज सहा जिल्ह्यात शुभारंभ



जनसंपर्क कक्ष : मुख्यमंत्री सचिवालय

मुंबई शहर, उपनगर, पुणे, वर्धा, अमरावती व नंदुरबारचा समावेश
लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम थेट जमा करण्याच्या
योजनेचा राज्यात आज सहा जिल्ह्यात शुभारंभ

           मुंबई, दि. 31 :विविध शासकीय योजनांची रक्कम आधार क्रमांकाच्या आधारे लाभार्थ्याच्या खात्यात थेट जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ संपूर्ण देशभरातील 51 जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिनी होत असून यात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
आधार या महत्वाकांक्षी उपक्रमाद्वारे शासकीय योजनांची व अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे.  महाराष्ट्रात आधार क्रमांकांसाठी 5 कोटी नागरिकांची नोंदणी झाली असून 4 कोटी 20 लाख नागारिकांना आधार कार्डाचे प्रत्यक्ष वाटप झाले आहे.  आधार क्रमांक नोंदणी महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.  आधार क्रमांकाची सांगड विविध शासकीय योजनांशी घालण्यात आली आहे.  पहिल्या टप्प्यात देशातील 51 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.  यात महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, वर्धा, अमरावती आणि नंदूरबार या 6 जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारने केली आहे.  या 6 ही जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि पालक सचिव यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ होईल.  या पथदर्शी प्रकल्पामध्ये केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात 34 योजनांची निवड केली आहे.
या सहा जिल्ह्यांमध्ये शुभारंभाच्या कार्यक्रमात निवडक लाभार्थींना त्यांच्या आधार क्रमांकानुसार विविध योजनांखाली मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.  ही रक्कम लाभार्थी बँकेचे एटीएम कार्ड वापरुन काढू शकतील.  ज्या गावात एटीएमची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी पोर्टेबल आकाराची मायक्रो एटीएम मशिन घेऊन बँकांचे बिझिनेस कॉरस्पाँडंट लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्याला रोख रक्कम अदा करतील.  राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व सहाही जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून सर्व लाभार्थींचे आधार लिंकेज आणि आधार क्रमांकाशी सांगड असलेले बँक खाते उघडण्याची प्रक्रीया पूर्ण केली आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव श्री.राजेश अगरवाल यांनी दिली.

पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांचा तालुका दौरा कार्यक्रम



चाळीसगांव दि. 31:- राज्याचे कृषि राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नां.गुलाबराव देवकर हे दिनांक 01 जानेवारी, 2013 रोजी चाळीसगांव दौ-यावर येत असुन दिनांक 01.01.2013 रोजी सकाळी 08:30 वाजता जळगांव येथुन शासकीय मोटारीने चाळीसगांवकडे प्रयाण, सकाळी 10:00 वाजता परदेशी बोर्डींग हॉल चाळीसगांव येथे तालुका पाणीटंचाई आढावा बैठकीस उपस्थित, सोईनुसार जळगांवकडे प्रयाण. रात्री 23:15 वाजता जळगांव येथुन 12112 अप अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण

तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनिस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन



चाळीसगांव दि. 31:- एकात्मिक बालविकास सेवा योजना, चाळीसगांव अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त पदासाठी तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, चाळीसगांव यांनी केले आहे.
      तालुक्यातील हिंगोणे खु., वाघळी, जावळे, आंबेहोळ, लोंजे, वडाळा, निमखेडी, विष्णु नगर, तळेगांव तांडा, दडपिंप्री, पिंपळवाड म्हाळसा, आणि शिवापुर येथील रिक्त असलेल्या अंगणवाडी सेवीका व मदतनिस पदासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज विक्री ही दिनांक 07.01.2013 ते 11.01.2013 या कालावधीत होणार असून सदर परिपुर्ण भरलेले अर्ज हे दिनांक 14.01.2013 ते 18.01.2013 (सुटीचे दिवस वगळुन) या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. 
तरी तालुक्यातील अधिकाधिक उमेदवारांनी सदर पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, चाळीसगांव (प्रकल्प नं-2) यांनी केले आहे.

* * * * *

Saturday, 29 December 2012

विकास योजनासाठी उपलब्ध निधी कालबध्दरितीने खर्च करण्याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव देवकर



            जळगांव, दि.29 :- सर्व विकास योजना राबविणा-या अधिका-यांनी त्यांच्या मार्फत राबविण्यात येणा-या विविध विकास योजनांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी कालबध्द रितीने खर्च करण्याची दक्षता घ्यावी . जे अधिकारी खर्च करण्यास असमर्थ ठरतील त्यांचेवर कारवाई करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात येईल याची नोंद घेऊन विकास कामांसाठीचा निधी खर्च करावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज येथील अल्पबचत भवनात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत केले.
          प्रारंभी 30 जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या नोव्हेंबर 2012 अखेर पर्यत झालेल्या सर्व साधारण, अनुसूचित जाती   उपयोजना , आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उप योजनांच्या विकास कामावरील खर्चाचा आढावा घेण्यात आला.
          तसेच सन 2012-2013 मधील योजनांचा पुर्निविनियोजन प्रस्तावांना बैठकीत मंजूरी देण्यात आली. व सन 2013-2014 च्या प्रारुप आराखडयाबाबत चर्चा करण्यांत आली.
          बैठकीत जिल्हयात उदभवलेल्या भिषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाय योजनांवर सखोल चर्चा करण्यांत आली. यात प्रामुख्याने विहिर खोलीकरण, विहिर अधिग्रहण , अपूर्ण नळ योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे , नादुरुस्त नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, नवीन नळ योजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती आणि टँकर व बैलगाडया मार्फत पिण्याचे पाणी पुरविणे आणि नदीवरील बंधा-यांच्या दुरुस्तीची कामे व नवीन बंधारे बांधणे याबाबत चर्चा करण्यांत आली.
        बैठकीत विधानसभा  विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे, खा. हरिभाऊ जावळे, खा. ए. टी. नाना पाटील, आ. संजय सावकारे,आ. गिरीष महाजन, आ. शिरीष चौधरी, आ. कृषिभुषण साहेबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. जगदिश वळवी, आ. दिलीप वाघ  तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी विविध विषयावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ तसेच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.       
                                                                     * * * * * * *

10 वी 12 वी 17 नंबर फॉर्मची मुदत 31 जानेवारी पर्यंत



10 वी 12 वी 17 नंबर  फॉर्मची मुदत 31 जानेवारी पर्यंत

               जळगांव, दि. 29 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी  / मार्च 2013 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता 12 वी ) साठी खाजगी विद्यार्थी थेट योजने अंतर्गत फॉर्म नंबर 17 अन्वये नांव नोदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह दिनांक 31 जानेवारी 2013 पर्यत सादर करण्यास शासनाने मुदतवाढीची मंजूरी  दिली आहे. तरी याबाबत इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी सदर  नांव नोंदणी अर्ज सादर करण्यासाठी नजिकच्या संपर्क केंद्राशी अथवा नाशिक विभागीय मंडळ कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. असे आवाहन बी. एस. सुर्यवंशी, विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी  एका पत्रकान्वये केले आहे.
* * * * * *

लाभधारकांनी 1 जानेवारी पर्यंत पाणी अर्ज भरण्याचे आवाहन

                        जळगांव, दि. 29 :- सुकी, अभोरा, मध्यम प्रकल्पावर  कालव्याच्या वितरिकेवर प्रवाही,  जलाशय, नदी, नाले व कालव्यावर उपसा सिंचनाने पाण्याचा लाभ घेणा-या सर्व  लाभधारकांना यावर्षी 2012-2013 मध्ये उन्हाळी हंगामात सिंचनासाठी उपलबध पाणीसाठयानुसार 1 जानेवारी 2013 ते 30 जून 2013 या मुदतीकरिता उन्हाळी हंगामातील  भुईमूग या पिकांसाठी अटींच्या अधिन राहून  सिंचनास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. ( मुख्य कालव्यापासून प्रत्येक चारीच्या 1.5 (दीड) कि.मी. पर्यतच पाणी पुरवठा करण्यांत येईल.)
            तरी आपले पाणी अर्ज नमुना क्रं. 7 वर मागणी भरुन पाणी अर्ज दिनांक 1 जानेवारी 2013 पर्यत आपल्या भागातील शाखाधिकारी यांचे शाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत, पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे यानंतर पाणी अर्जाची मुदत वाढविली जाणार नाही. असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगांव पाटबंधारे विभाग जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * *

 महिला निवासी गृहांसाठी नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य 
             जळगांव, दि. 29 :- राज्यात महिलांसाठी शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत महिलांसाठी निवासी गृहे चालविणा-या सर्व संस्थांना जाहीरपणे सुचित करण्यात येते की, अनाथालये व इतर धर्मादाय गृहे (पर्यवेक्षण व नियंत्रण) अधिनियम 1960 कलम 13 अन्वये मान्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रमाणपत्राशिवाय महिलांसाठी निवासी गृहे चालविणे अवैध असून अधिनियमातील कलम 24 व 25 नुसार अशा संस्था चालविणा-या व्यक्ति किंवा संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
      नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा नोंदणी प्रमाणपत्राशिवाय सुरु असलेल्या संस्था निदर्शनास आल्यास त्वरीत त्याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, 2 रा मजला, प्रशासकीय इमारत, आकाशवाणी चौक, जळगांव दुरध्वनी क्र 0257-2228828 (Email-iddwcwjal@gmail.com) यांच्याशी संपर्क करावा. 
* * * * * * *

Thursday, 27 December 2012

मन्याड प्रकल्पातून सिंचनासाठी 50 दशलक्ष घनफूट पाणी



         जळगांव, दि. 27 :- गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव यांचे कार्यक्षेत्रातील मन्याड मध्यम प्रकल्पाचे जलाशयावरुन उपसा सिंचनाने पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरित मर्यादीत पाणीसाठयातून फक्त 50 दशलक्ष घनफूट पाणी जलाशयातून उपसा सिंचनाने पाणीपुरवठा करण्यास जिल्हाधिकारी, जळगांव यांनी मंजूरी दिलेली आहे.
           त्या अनुषंगाने पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून रब्बी हंगाम 2012- 13 मध्ये मन्याड जलाशयातून फक्त उपसा सिंचनाने द्राक्ष बागा व इतर फळबागा, चारा पीके, भाजीपाला, इतर बारमाही पिकांना मर्यादित क्षेत्रास मर्यादित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र पाण्याचा काटकसरीने वापर होण्याच्या दृष्टीने सुक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा.
        त्यासाठी काही अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7 अ चे पाणीअर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक 7 जानेवारी 2013 च्या आत संबंधीत  पाटशाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोष्टाने देण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता,  गिरणा पाटबंधारे विभाग जळगांव यांनी केले आहे.     

* * * * * *

Monday, 24 December 2012

ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे! ॲड रविंद्र पाटील



      जळगांव, दि, 24 :-  ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरुक राहून आपल्यावर झालेल्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी तक्रार केली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय उपभोक्ता महासंघ नवी दिल्लीचे सदस्य ॲड रविंद्र पाटील यांनी आज तरसोद येथे केले. शासनाचा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने आज तरसोद येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी उदघाटक म्हणून ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी के.सी निकम हे होते.
       ॲड पाटील पुढे म्हणाले, राज्य व केंद्र सरकार ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले  सर्व प्रयत्न करीत आहेत. तथापी ग्राहक योग्य प्रकारे तक्रार नोंदविण्यास उदासीन आहेत या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक विकास महाजन, जिल्हा संघटक अ.भा. ग्राहक पंचायत जळगांवचे संघटक प्र.ह, दलाल, यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य श्री राजस कोतवाल यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय ग्राहक सप्ताह साजरा करावा. तसेच शासकीय कार्यालयात ग्राहक संरक्षण कक्ष निर्माण करावा अशी मागणी केली.
          जळगांवचे तहसिलदार कैलास देवरे, पुरवठा तपासणी अधिकारी अर्जुन पवार यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले तरसोद गणपती मंदीर परिसरात झालेल्या कार्यक्रमास सरपंच सुदाम रतन राजपूत, तालुका कृषि अधिकारी व्ही.ई.पाटील, निवासी नायब तहसीलदार राजपूत, भालेराव, जोशी, मंगला बारी, ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमांचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जमनादास भाटीया यांनी केले.

मुक्ताईनगर दुय्यम कारागृहातील कैदयांच्या जेवणासाठी निविदा पाठविण्याचे आवाहन


       जळगांव, दि. 24 :- मुक्ताईनगर दुय्यम कारागृहातील वर्ग – 2 च्या कैदयांना दिनांक 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2013 या कालावधीसाठी शिजवुन तयार केलेले अन्न तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी दिवसातुन कमीत कमी दोन वेळा पाणी पुरवठयाचा मक्ता दयावयाचा आहे. त्याकरीता सिलबंद निविदा मागविण्यात येत आहे. सदर निविदा दि. 26 जानेवारी 2012 रोजी दुपारी 3.00 वाजेपावेतो तहसिल कार्यालय मुक्ताईनगर येथे पोहचतील अशा बेताने टपालाने अगर समक्ष सादर कराव्यात, मुदतीनंतर आलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही, असे अधिक्षक दुय्यम कारागृह मुक्ताईनगर यांनी कळविले आहे.

ग्राहकराजाने सतत जागे राहण्याची गरज -ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी



             नाशिक 24- संपूर्ण देशात 1986 सालापासून राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला असला तरी आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक राजा सतत जागा राहिला पाहिजे असे प्रतिपादन भारतातील ग्राहक संरक्षण चळवळीचे प्रणेते , ग्राहकतीर्थ, स्वातंत्र्य सैनिक बिंदू माधव जोशी यांनी आज केले. 24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त श्री.रवींद्र जाधव होते.
            श्री.जोशी पुढे म्हणाले की, उद्योजक, व्यापारी, कामगार, शेतकरी आणि ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे महत्वाचे पाच घटक आहेत. यातील एक घटक जरी नसला तरी अर्थव्यवस्था चालणार नाही. त्यामुळे कार्ल मार्क्सच्या सिध्दांतापेक्षा ही संकल्पना व्यापक आहे. ग्राहक संरक्षण कायदा हा समाजाच्या कोणत्याही घटकाच्या विरोधात नसून तो अनुचित व्यापार, व्यवहार करणाऱ्याच्या विरोधात आहे असे सांगून त्यांनी देशातील ग्राहक चळवळीचा, हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळच्या परिस्थितीचा आणि आजच्या परिस्थितीचा आढावा घेत सखोल विवेचन केले.
            विभागीय आयुक्त श्री.रवींद्र जाधव यांनी प्रारंभी श्री.बिंदू माधव जोशी यांचे स्वागत करुन समाजातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहकच असते म्हणून सर्वांनी आपल्या हक्कांचे व कर्तव्याचे मनापासून पालन केले पाहिजे असे सांगितले. नाशिक ग्राहक पंचायतीचे विभागीय संघटक श्री.अरुण भार्गवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर विभागीय अध्यक्ष श्री.मार्तण्डराव जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.
            या कार्यक्रमास श्री. रावसाहेब भागडे, उपायुक्त (पुरवठा) विविध वरिष्ठ अधिकारी, ग्राहक मंच महाराष्ट्र नाशिक विभागाचे उपाध्यक्ष मनोहर चव्हाण, ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मरणिकेचे प्रकाशन
            ग्राहक संरक्षण कायद्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  "ग्राहक दिपʺ या स्मरणिकेचे यावेळी मान्यवरांचे  हस्ते प्रकाशनही करण्यात आले.